हिरकणी नव्या युगाची

Hirkani Navya Yugachi
तुमचं काय बाबा मज्जा आहे, बायका ना तुम्ही
घर सांभाळलं की झालं, चालतं जरी केलं नाही काही

किती सहजपणे म्हणालास ना?
फक्त एकदा तिच्या ठिकाणी राहून बघ ना

मग कळेलच तुला स्त्री होण्यातली गंमत
अन त्यासाठी मोजावी लागणारी किंमत

खरं तर जन्म मिळाला हेही तिचं म्हणावं नशीबच!
कमनशिबीच ते महाभाग, खुडणारे कळीला गर्भातच !

जन्म होताच मुलगी बघून लोक मुरडतात नाक
जणू आतापासूनच सासरी पाठवण्याचा धाक!

फार कमी असतात रे, पालक समानतेने वागवणारे
बाकी तर सर्व मुलांनाच झुकते माप देणारे

मुलगीसुद्धा लावते जीव , सांगणार कोण त्यांना?
मोठी होऊन कमवेल नाव , विश्वास असू द्या ना!

शिकून सवरून राहील आपल्या पायावर उभी
दोन घरांना जोडणारा प्रेमळ दुवा ही तिची छबी

सांग ना सहज तुला अशी असती का रे सोडवली
प्रत्येक गोष्ट लहानपणापासून जीवापाड जपलेली ?

खरंच सांग , तुटणार नाही का जीव तुझा
प्रिय जन्मदात्या आईवडिलांना सोडताना ?

सोडून मागे भावाबहिणीची प्रेमाची नाती
नवीनच नाती आपलेसे करण्याची परीक्षाच ती !

एवढे कमी की काय तर म्हणे, नावसुद्धा बदलणार तुम्ही!
जन्मापासूनची ओळख, अस्तित्व असं कसं मिटवणार आम्ही?

किती ते बोलणे, टोमणे, एवढीशी झाली जर चूक चुकून !
घट्ट करून काळीज, मिट्ट ठेवून ओठ, घ्यावे लागते ऐकून

मिळालय तिला मातृत्व, जणू नवनिर्मितीचा वर
सहज झालं तर सोहळा, पण लादलं गेलं तर?

दोष असो कोणातही, म्हणतात स्त्रीलाच वांझ
घरासाठी खपताना येऊन ठेपते तिच्या आयुष्याची सांज

यदाकदाचित जर सोडली जोडीदाराने मध्येच साथ
त्यात दोष काय तिचा? पण तिलाच अपशकुनी म्हणतात

सांग, आज राहिले क्षेत्र कोणते, जिथे नाही स्त्रीचा शिरकाव?
शेतीपासून ते आकाशापर्यंत, तिच्या प्रतिभेला नाही मज्जाव!

पण कामाच्या ठिकाणीसुद्धा असते बरेचदा तफावत
मोबदला मिळतो कमी, करूनही पुरुषा एवढीच मेहनत

तुमची मदत नसली तरी चालेल रे, पण नका धरू गृहीत
प्रेमळ साथ अन् विश्वास, एवढेच आमच्या आनंदाचे गुपित

समानता अजूनही खूपशी शब्दातच आहे रे, ती मनात आणून पहा
अन् पुरुषी अहंकार सोडून स्त्रीच्या बहरण्याला एकदा दाद देऊन पहा

कर्तृत्व, मातृत्व नि अस्तित्व जपते ही हिरकणी नव्या युगाची
जिद्द, सहनशीलता, हुशारी बाणवत प्रेरणा बनते नवनिर्मितीची

देव्हारा नकोच रे, फक्त असावे स्त्रीचा सन्मान असलेले मन
पुरुषाच्या कणखरतेने स्त्रीच्या मृदुतेला द्यावे एवढेच वचन

© स्वाती अमोल मुधोळकर