हिंसा की अहिंसा?

हिंसा की अहिंसा?

कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय : अहिंसा एक मानवता धर्म 
                            हिंसा की अहिंसा?

अहिंसा या शब्दाचा उल्लेख होताच गांधीजींची आठवण होते. त्यांनी नेहमीच अहिंसेचा मार्ग अवलंबला. फक्त कृतीतच नाही, तर विचारांनी सुद्धा अहिंसेचा मार्ग स्वीकारणं त्यांना सोयिस्कर वाटत होतं. कोणत्याही शारिरीक किंवा मानसिक हिंसेशिवाय वागणं त्यांना योग्य वाटायचं. शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने सुद्धा आपल्या प्रयत्नांना यश मिळू शकतं हा या मागचा हेतू!

गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन चालणाऱ्यांची संख्या नक्कीच उल्लेखनीय आहे. परंतु खरचं आज सगळेच त्या मार्गावर चालत आहेत का? सगळेच अहिंसेचा मार्ग अवलंबत आहेत का? याचं उत्तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे. कारण असं म्हणतात की आजच्या या जगात अगदीच शांत राहून भागत नाही. बऱ्याच अंशी हे खरं सुद्धा आहे. 

जर अन्याय होत असेल तरीही शांतपणे तो सहन करणं योग्य नसतं. शांततेच्या मार्गाने चालून सुद्धा काही गोष्टी सुरळीत होत नसतील तर नाईलाजाने का होईना हिंसेचा वापर करावा लागतो, मग त्याचं स्वरूप काहीही असो. कोणी एक ठेवून दिली म्हणून दुसरा गाल पुढे करण्याची परिस्थिती आज नक्कीच राहिली नाहीये. वेळेनुसार विचारांमध्ये बदल करणं आवश्यक आहे. आपल्या शांततेचा गैरफायदा घेत जर कोणी वागत असेल तर तिथे जशास तसं उत्तर देणं गरजेचं होऊन जातं. 

हिंसा करणं योग्य आहे असं माझं मत अजिबात नाहीये. पण जिथे त्याची गरज आहे तिथेही अहिंसक मार्गाने वागणं सुद्धा पटत नाही. ज्या गोष्टी अहिंसेच्या मार्गाने पूर्ण होऊ शकतात त्या नक्कीच कराव्यात. परंतु वेळ आल्यास हिंसक वृत्ती दर्शवणं चूक आहे असं म्हणणं निरर्थक ठरतं. आज कित्येक देशांच्या बाबतीत युद्धजन्य परिस्थिती दिसून येते. समोरच्याने जर कोणत्याही प्रकारचा विचार न करता केवळ हिंसेला महत्त्व दिलं तर ज्या कोणत्या देशाच्या बाबतीत हे घडतंय त्यांना योग्य त्या भाषेत प्रतिउत्तर देणं गरजेचं असतं. शेवटी कोणीही स्वतःसाठी लढा देणारच! 

रोजच्या जीवनातील एक उदाहरण घ्यायचं झालं तर घरगुती हिंसाचार आहेच. रोज अशा कितीतरी घटना घडत असतात. जो अन्याय, अत्याचार होतो तो हिंसाचारच आहे. पण जर याच अत्याचाराविरुद्ध काही कृती केली तर ती हिंसा म्हणायची का? उद्देश खूपच महत्त्वाचा असतो. चांगल्या वाईटाची समज हवी. शांत राहून अत्याचार सहन करण्यात कसली आली हुशारी? हिंसाचाराला प्रोत्साहन नाही पण स्वतःसाठी आवाज उठवण्याला नक्कीच पाठिंबा आहे.

अहिंसा आणि हिंसा दोन्ही गोष्टींना तराजूत तोलणं जमणार नाही कारण दोघांचीही आपापली बाजू स्पष्ट आहे. विनाकारण कोणालाही शारिरीक अथवा मानसिक त्रास देऊ नये. कारण आपण अहिंसेला मानवतेचा धर्म मानतो. शांततेच्या मार्गानी समोरच्याला आपलसं करणं, गुण्यागोविंदाने एकत्र राहणं ही आपली संस्कृती आहे. आणि याला गालबोट लागणार नाही ही जबाबदारीही आपलीच आहे.
हिंसा की अहिंसा, परिस्थितीनुसार प्रत्येकाचं मत बदलू शकतं. शेवटी योग्य - अयोग्याची जाण ठेवून त्यानुसार वागणं महत्त्वाचं. 
-©® कामिनी खाने.