Jan 22, 2022
General

हायफाय

Read Later
हायफाय

#हायफाय

"ए बाबा,तुला ठाऊकै का. मला नं एक भारी फ्रेंड मिळालेय." जाई परागला सांगत होती. 

"कोण गं?" जाईची मम्मा पल्लवीही त्यांच्या संभाषणात सामील झाली.

"धनश्री नाव तिचं. नवीन एडमिशन आहे. नागपूरहून आलेय. थोडं बोलणंही वेगळं आहे तिचं म्हणून लाजत होती,बाचकत होती मग मीच तिच्याशी हात मिळवला. आठवडा झाला तिला येऊन. मज्जा येते तिच्यासोबत. तिच्या आधीच्या शाळेतल्या दोस्तांच्या गमतीजमती सांगते. " जाई आपल्या नव्या मैत्रिणीविषयी भरभरुन बोलत होती.

"जाई हे फ्रेंडशीप वगैरे सगळं ठीक आहे पण त्याचा परिणाम अभ्यासावर नको व्हायला आणि तुझ्या नेहमीच्या मैत्रिणी..सारा,मैथिली त्यांचं काय?"

त्या आहेतच गं मम्मा माझ्या मैत्रिणी पण आता आम्ही आमच्या फ्रेंडसर्कलमधे धनश्रीला घेतलय तर शिवानी नाराज झालेय. तिला म्हणे असा ग्रुप वाढवणं आवडत नाही. धनश्रीशी नीट बोलतही नाही ती. आणि अभ्यासाचं म्हणशील तर धनश्रीला गेल्यावर्षी भूमितीत पैकीच्या पैकी गुण होते. ती मला भूमितीत मदत करणारै नि मी तिला मराठीत. तिचं मराठी थोडं कच्चं आहे."

"देट्स लाइक अ गुड गर्ल..प्राऊड टू बी युअर फादर डिअर," पराग जाईशी हात मिळवत म्हणाला.

"बघू काय दिवे लावताय ते. आता झोप लवकर,उद्या शाळेत जायचय ना!" पल्लवी लेकीवर करवादली तशी जाई गच्च डोळे मिटून राहिली.

पल्लवी परागला सांगत होती..आता पुढच्यावर्षी ही नववीला जाईल. नववीदहावीच्या ट्युशनचं एडमिशन घ्यायला हवं.

"दहावीला घालू गं. आतापासून नकोच ते."

"ते काही सांगू नकोस. मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही जाईच्या अभ्यासाबाबत. सकसेस अकादमी छान आहेत. मी चौकशी केलीय पण जागा मर्यादित असतात त्यांच्याकडे. आपण या रविवारी जाऊन जाईचं एडमिशन करुन घेऊ." पल्लवीने परागला तिचा निर्णय सांगितला.

"मम्मा आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र एडमिशन घेऊ. मी आधी बोलते माझ्या मैत्रिणींशी."

"हे बघ जाई,तुझी नसती सोंग चालणार नाहीत माझ्याकडे. ठीकै,विचार तू पण शेवटी तुला माझं ऐकावच लागेल." आईच्या या निर्णयावर जाईने वेडावून दाखवलं. 

शाळेत मधल्या सुट्टीत जाईने हा विषय काढला व सकसेस अकादमीबद्द्ल बोलली. सगळ्यांनी एकाच ट्युशनला जायचं ठरलं. आठवीत थोडी मजाही करुन घेऊ असं त्यांनी आपापसात ठरवलं.

रविवारी पल्लवी,पराग..जाईला घेऊन सकसेस क्लासमधे गेले. अगदी हायफाय ऑफिससारखं फ्लोअरिंग, सिलिंग,कारपेट,वगैरे. काचेच्या केबिनमधे एक माणूस बसला होता..ज्याने क्लासची सगळी माहिती पुरवली..क्लासमधील गेल्या दहा वर्षांपासूनच्या टॉपर्सची लीस्ट दाखवली. टॉपर्सला दिली जाणारी  मोबाईल,घड्याळ,..यांसारख्या महागड्या बक्षिसांचे फोटो दाखवले. सर्व क्लासरुम वातानुकूलित होते.

 पिरयॉडिकल टेस्टच्या पेपर्सचे गठ्ठे काहीजणी आणून ठेवत होत्या मुख्य सरांशी काही बोलणं झालं नाही पण दरवर्षी क्लासकडून फ्री पिकनिक,सँक,छत्री,टेक्स्टबुक्स,गाईड्स,..इतकंच काय तर नोटबुक्सही फ्री मिळणार म्हणून सांगितलं शिवाय क्लासच्या सेंडऑफला सेलिब्रिटी यैतात हेही सांगताच पल्लवीचे डोळे दिपले. तिथल्यातिथे पहिलं इन्स्टॉलमेंट देऊन जाईची सीट बुकही केली. मस्तपैकी बाहेर जेवून तिघं घरी आली. दुसऱ्या दिवशी जाईने मैत्रिणींना सकसेस क्लासमधे एडमिशन घेतल्याचं.सांगितलं. क्लासमधलं हायफाय वातावरण..तिथले वेळोवेळी आलेले टॉपर्स यांबद्दल जाई भरभरुन बोलत होती. बाकीच्यांनी जाईकडे फीज,रुल्स अँड रेग्युलेशन्स,मिळणाऱ्या फेसिलिटीजबद्द्ल चौकशी केली. 

पिकनिक,सेलिब्रेशन्स,सेलिब्रिटी अरायव्हल..सगळं ऐकून वर्गातल्या बऱ्याच मुलींनीही त्याही सकसेस अकादमीमधे प्रवेश घेणार असल्याचं नोंदवलं.

जाई व इतर मैत्रिणींचा निरोप घेऊन धनश्री तिच्या घराकडे जाणाऱ्या अरुंद बोळात वळली. असे तीन बोळ पास केल्यावर अगदी टोकाला असलेल्या जीर्ण इमारतीत ती, तिचे आईवडील व छोटा भाऊ रहात होते. 

धनश्रीने मोरीत जाऊन हातपाय धुतले,कपडे बदलले. भाऊ खेळायला गेला होता. आई पोळ्या लाटत होती. चहापोळी खाताखाता धनश्रीने आईला जाईबद्दल सांगितलं,"आई गं,जाई तिच्या आईबाबांसोबत जाऊन क्लासला एडमिशन घेऊन आलीसुद्धा. बाकीच्याही चारेक दिवसांत घेतील एडमिशन. जाई म्हणत होती,सीट फारच कमी उरल्यात तेंव्हा शक्य तितक्या लवकर एडमिशन घ्या..आई गं आपण कधी जायचं..तुही स़ाग ना बाबांना."

इतक्यात धनश्रीचे बाबा आले..अगदी चिंतित अवस्थेत. धनश्रीने बाबांना पाणी दिलं. 
"काय झालं..इतके अस्वस्थ वाटताय!" धनश्रीच्या आईने विचारलं.

"तुझ्या भावाने शब्द टाकला होतो तिथे जाऊन आलो पण.."धनश्रीचे बाबा अर्धवट थांबले. धनश्रीच्या वडिलांची नागपूरची नोकरी गेली होती म्हणून ते बिर्हाड घेऊन धनश्रीच्या मामाच्या सांगण्यावरुन या शहरात रहायला आले होते. दुसरं काम मिळेस्तोवर असलेली थोडीबहुत पुंजी पुरवूनपुरवून वापरावी लागणार होती.

"अहो बाबा.. ऐका ना. माझी नवी मैत्रीण आहे नं जाई..तिने सकसेस अकादमीत एडमिशन घेतली. नववीदहावीसाठी कंबाइन बेच आहे. पहिल्या बेचमधे सगळी ऐंशी टक्केच्या वरची मुलं..त्यांना वीस टक्के डिसकाऊंट फीजमधे. दुसरीत 70 ते 80 टक्केवाली. अशी टक्क्यांनुसार मुलांची वर्गवारी आहे . माझे 82% होते त्यामुळे मला पहिल्या बेचमधे घेतील. शिवाय वीस टक्के सवलत आहे अबोव्ह एटीवाल्यांना. ऐंशी हजार फी.  म्हणजे आपल्याला सोळा हजार रुपये कमी भरावे लागतील. उरलेले पैसे आपण हफ्त्याने भरु शकतो बाबा." धनश्री बाबांच्या गळ्यात हात गुंफत बोलली.

"दिसतय ना तुला..आताच आलैत ते. काय टिवटिव लावलैस. कितीदा स़ागायचं..नोकरी गेलीय तुझ्या बाबांची. सोळा वर्षांची घोडी होशील दोन महिन्यांनी पण अक्कल काडीची नाही." आई बडबडू लागली तशी धनू पाय आपटत आतल्या खोलीतल्या खाटीवर जाऊन पडली.

धनश्रीच्या बाबांनी कसंबसं पुढ्यातलं अन्न संपवलं. लाडक्या लेकीचं रडू त्यांच्या काळजाला चरे पाडत होतं. हातावर पाणी घेऊन ते धनुच्या कडेला जाऊन बसले.

"धनश्री..धनु बाळा.." धनु हूं का चूं करेना. 

"धनु, खरंच एवढे पैसे सध्या नाहीत माझ्याकडे आणि असले तरी मी नसते अशा क्लासमधे ओतले. अगं धनु,कळत कसं नाही तुला! हा सगळा दिखावा आहे. तुम्हा विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना..काहीबाही आमिषं दाखवून..हे क्लासवाले आपल्या जाळ्यात ओढतात नि बक्कळ पैसा कमावतात."

"मग मी कोणत्याच क्लासला नको जाऊ का!" धनु मुसमुसत म्हणाली.

"अगं राजा,असं कुठे म्हणालो मी! आपल्या तळमजल्यावरची ज्ञानदा ताई महाविद्यालयीन शिक्षण घेताघेता आठवी ते दहावीच्या मुलांच्या शिकवण्या घेते. तू ज्ञानदा ताईकडे शिकवणीला जा म्हणजे तुझा वेळही वाचेल, तिच्याकडे मोजकीच मुलं असतात दहावीची..त्यामुळे तुझ्या अभ्यासाकडे ताईचं वैयक्तिक लक्ष राहील. साठसत्तर मुल़ाच्या शिकवणी वर्गात नि शाळेतल्या वर्गात विशेष फरक तो काय त्यापेक्षा ज्ञानदा ताईकडे जात जा." धनश्री काहीशा नाराजीनेच तयार झाली.

मुलींनी आठवीत अभ्यासासोबतच मज्जाही केली. शाळेतला हळदीकुंकू समारंभ, खोखो,कब्बडीच्या मँचेच,वक्तुत्वस्पर्धा,नाट्यस्पर्धा या सगळ्यात धनश्री भाग घेत असे व नंबरही पटकावीत असे. हळूहळू का होईना शिवानीशीही तिची गट्टी जमली पण झालं काय  नेहमी जाईचा येणारा पहिला नंबर आता धनु पटकावू लागल्याने जाई तिच्यावर नाराज झाली. तिच्याशी मोजकंच बोलू लागली. 

जाई जवळ येताच ती इतर मैत्रिणींशी पुढच्या वर्षी सकसेस अकादमीमध्ये कशी धमाल करणार..याबद्दल बोलत बसे. धनुचं मन खट्टू होई. यात समाधानाची बाब म्हणजे धनुच्या वडिलांना एका कंपनीत वॉचमनची नोकरी मिळाली. कंपनी आडबाजूला असल्याने तिथल्या साहेब लोकांच्या डब्याची पंचाईत होई. धनुच्या आईने मनावर घेतलं नि पोळीभाजीचे डबे करायला सुरुवात केली. धनुच्या आईवर देवी अन्नपूर्णा प्रसन्न होती. डब्यांची मागणी वाढू लागली. हाती चार पैसे येऊ लागले,तसं जरा बऱ्याशा चाळीत त्यांनी आपला मुक्काम हलवला.

"घालुया का आपण धनुला सकसेस अकादमीत?" धनुच्या आईने धनुच्या वडिलांना विचारलं.

"मुळीच नको. मोठ्या क्लासमधे न जाताही माझी लेक चांगले गुण मिळवू शकेल. तिला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे जे ज्ञानदा बरोबर देईल." अतिशय आत्मविश्वासाने धनुचे बाबा बोलत होते. धनुच्या आईला मात्र काळजी लागून राहिली होती. आजुबाजूच्या बायका विचारायच्या..नववीदहावीसाठी कोणता क्लास लावणार अहात? ज्ञानदा ताईचा म्हंटलं की नाकं मुरडायच्या. मोठमोठ्या क्लासचे दाखले द्यायच्या..पण धनुचे बाबा बधले नाहीत. प्रामाणिकपणे अभ्यास करण्यासाठी त्यांनी धनूला  नेहमीच प्रोत्साहन दिलं होतं. तिला कठीण वाटणाऱ्या विषयांसाठी जी काही अतिरिक्त मदत लागणार होती,ती ज्ञानदाताई सहज करु शकेल हे त्यांच मत हळूहळू सत्यात उतरु लागलं. आठवीच्या शनिवार,रविवारीही ज्ञानदाताई धनुची शिकवणी घेऊ लागली. तिचा पाया मजबूत करु लागली.

नववीत बाकीच्या मुली दररोज सकसेस अकादमीत जाऊन बसायच्या. तिथल्या सर,मेडमविषयी कौतुकाने बोलायच्या. दर आठवड्याला त्यांच्या टेस्ट सिरीज होत होत्या, सणामासी क्लासमधे सेलिब्रेशन्सही व्हायचे.  

 जाईचे मार्क्स मात्र कमी होत होते. तिला आधीसारखा स्वअध्ययनाला वेळ पुरत नव्हता,त्यामुळे तिची चिडचिड वाढत होती. याउलट धनू मात्र एखादा धडा हा पुर्ण वाचून त्याचे नोट्स काढायची. जे जे मुद्दे अडतील ते ज्ञानदा ताई तिला समजावून सांगायची.  नववीच्या सहामाहीचं,त्याअगोदर होणाऱ्या क्लासमधल्या भारंभार परीक्षांचं जाईने जाम टेंशन घेतलं..तिची तब्येत खालावली..पोटदुखी सुरु झाली..काही केल्या आराम पडेना. डॉक्टरांनी मनोविकारतज्ञांकडे पाठवलं. त्यांनी जाईच्या मनावरील तणावाचं कारण शोधून काढलं..जाईच्या आईबाबांना विचारलं,"तुम्हाला मुलगी आधी हवी की आधी तिचे मार्क्स,नंबर..? सगळ्याचं कारण ही शर्यत आहे. तिला तिच्या मनाने अभ्यास करु द्या. जे येणार नाही ते विचारण्यासाठी जवळपासची एखादी ट्यूशन लावा. "

जाईच्या आईबाबांना डॉक्टरांचं म्हणणं पटलं. जाईचे बाबा म्हणाले,"जाऊदेत फी गेली तर वाया. माझी जाई पुन्हा फुलली पाहिजे. तिचं असं कोमेजणं नाही बघवणार मला."

क्लासला जाणं बंद केल्यापासनं जाई हळूहळू सुधरु लागली. इतर मुली तिच्याकडे,आता हिचं कसं होणार म्हणून पाहू लागल्या.पण इथेच धनश्री,जाईच्या मदतीला आली. 

तिला म्हणाली,"धनश्री,तू ज्ञानदाताईकडे येत जा. ती गणितांचा,प्रश्नोत्तरांचा सराव करुन घेते. हां,आता तिच्याकडे बेंचेस नाहीत. चटईवर बसावं लागेल पण ज्ञानदा ताई खरंच समरसून शिकवते."

जाईला धनश्रीचं म्हणणं पटलं. जाईची आई तिच्यासाठी महागड्या होम ट्युटरच्या शोधात होती पण जाईने ज्ञानदा ताईकडे शिकवणी लावण्यावर जोर दिला. जाई नुकतीच आजारपणातून उठल्याने तिच्या इच्छेत कोणीही मोडता घातला नाही.

शाळेच्या बाईंनी शिकवून झालेला धडा ज्ञानदा ताई त्यांना दोनदा वाचायला सांगायची. महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करुन घ्यायची. प्रश्नांची उत्तरं त्यांना आयती न पुरवता त्यांना शोधून लिहायला लावायची. भरपूर गणितं सोडवून घ्यायची. तिची फीही अगदी माफक होती.

हायफाय क्लासेसच्या मोहजालात अडकायचं नाही तसंच किती फीज घेतो यावरून एखाद्या क्लासची इमेज ठरवणं हे किती चुकीचं आहे हे जाईच्या आईवडिलांना व जाईलाही कळलं. नववीला दोघीही उत्तम गुणांनी पास झाल्या.  जाई व धनश्री यांनी  दहावीतही अभ्यासात सातत्य ठेवले. गुणवत्ता यादीत येऊन त्यांनी शाळेची, शाळेतील शिक्षकव्रुंदाची व ज्ञानदाताईची मान उंचावली.

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now