Feb 24, 2024
माझे पुस्तक

हिडन अजेंडा भाग 4

Read Later
हिडन अजेंडा भाग 4
मागील भागात आपण बघितलं की झू काई सुकन्यासोबत फ्लर्ट करतो. मिस मिंग सुकन्याला पार्टीला घेऊन जाते. झेन तिथेही सुकन्याचा पिच्छा पुरवते. आता पुढे.

"सर्व ठीक आहे?" वयाची साठी गाठलेल्या त्या गूढ व्यक्तीने आपल्या भरदार आवाजात विचारलं, "कोणाला तिच्या निवडीविषयी काही खटकलं तर नाही ना किंवा कोणाला काही आक्षेप तर नाही ना."

"सर सर्व ठीक आहे सर. तिच्या निवडीबद्दल म्हणाल तर आपण फक्त आयोजन केलं होतं स्पर्धेचं. तिची निवड झाली ती तिच्यातील प्रतिभेमुळेच. तेव्हा कोणी काही आक्षेप घ्यायचा प्रश्नच नाही." त्या गूढ व्यक्तीच्या सहकाऱ्याने त्याला माहिती पुरवली.

"हो हे तर मानावेच लागेल. तिचे ब्लॉग वाचून तिची प्रतिभा लक्षात आली होती माझ्या. म्हणून तर तिला इथे घेऊन येण्यासाठी सर्वात योग्य पर्याय हाच वाटला मला. जसा विचार केला तसंच झालं. पुढेही तसेच होवो. ती तिच्या पायावर, तिच्या आयुष्यात सेटल व्हावी, आत्मनिर्भर व्हावी. इतकंच हवं मला." ती व्यक्ती एक लांब श्वास घेऊन म्हणाली.

" तसंच होईल सर. तुम्ही दिलेले आदेश व्यवस्थित पाळले जात आहेत. फक्त..." त्या व्यक्तीचा सहकारी बोलता बोलता थांबला.

"फक्त काय?" त्या व्यक्तीने काळजीच्या स्वरात विचारलं.

"मिस सु... क... ना... " त्याला सुकन्याचे नावही नीट घेता येत नाही हे बघून तो व्यक्ती म्हणाला,

"मिस सू म्हण. भिंतीलाही कान असतात हे लक्षात ठेवून बोलत जा. आपली कमजोरी आपल्या शत्रूंच्या हाती कधीच लागता कामा नये." ती व्यक्ती कठोर आवाजात म्हणाली.

"ओके बॉस!" सहकारी उत्तरला.

"बोल आता काय झालं?" त्या व्यक्तीने मुद्द्यावर येऊन विचारलं.

"मिस सू च्या डोक्याला छोटे साहेबच्या हातून इजा झाली." सहकारी घाबरतच म्हणाला.

"काय? नक्की यीन की काई? नीट ऐकलंस का तु? कशी आहे ती? मिस मिंग ला सांगितलं होतं ना तिच्याकडे लक्ष द्यायला. तरीही असं झालं कसं?" ती व्यक्ती त्याच्या सहकाऱ्यावर चांगलीच भडकली.

"इतकं काही गंभीर नाही. झालं असं की...." तो सावरासावर करू लागला. त्याने सकाळी झू यीन च्या केबिनमध्ये झालेला पूर्ण किस्सा त्या गूढ व्यक्तीला सांगितला.

" तिच्या कपाळावर जखम झाली त्यातून रक्त आलं, तिथे बेंड आलं आणि तू म्हणतोस इतकं काही गंभीर नाही. तिच्या कपाळावर डाग पडला तर तिला पुढील आयुष्यात किती त्रास होऊ शकतो कळतंय का तुला? इंडिया म्हण की चायना, डाग रहित चेहरा किती महत्वाचा माहितेय ना तुला?" ती गूढ व्यक्ती चांगलीच संतापली.

" सॉरी सर. " सहकारी घाबरून म्हणाला.

" तिला डॉक्टर कडे नेले की नाही? " त्या व्यक्तीने विचारले. सहकाऱ्याने नकारार्थी मान हलवली.

" सर्वच मूर्खांची भरती आहे इथे. पेन स्टीलचा असला तरी काय झालं. जखम झाली ना तिच्या कपाळाला. मग इंजेक्शन द्यायला हवं की नको?" त्या व्यक्तीने टेबलावर हात मारून विचारले.

" द्यायला हवे सर. मी मिस मींगला सांगतो तिला डॉक्टर कडे नेऊन इंजेक्शन द्यायला. " सहकारी बोलला.

"मग फोन करून सांगा लवकर मिस मिंगला तसं." ती व्यक्ती कपाळावर हात ठेवून त्राग्याने बोलली.

त्या गूढ व्यक्तीच्या सहकाऱ्याचा फोन येताच घरी जाणाऱ्या मिंगने कार दवाखान्याकडे वळवली. सुकन्यालाही आश्चर्य वाटले. तेव्हा मिंगने आपण एकदा डॉक्टरचं ओपिनियन घ्यायला हवं. उद्या तुला त्या जखमेमुळे ताप आला काही झालं तर फक्त प्रोजेक्टच लांबणीवर पडणार नाही तर बॉसला ही अपराधी वाटेल. तसं पाहिलं तर थोडंसं खर्चटलच होतं. पण कपाळाच्या हड्डीवर लागल्याने आता तिथे सुजनही आली होती. म्हणून सुकन्यालाही डॉक्टरला दाखवने योग्य वाटलं. डॉक्टरने सुजन लवकरात लवकर उतरन्यासाठी एक मलम दिला. सुकन्याला विचारपूस केल्यावर समजले की मागील चार-पाच वर्षात तिने कधीच टी टी चे इंजेक्शन घेतलेले नाही. म्हणून डॉक्टरने ते इंजेक्शनही दिले. मिंग ला हायसं झालं. आजचे तिचे मिशन विफल होता होता वाचले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच मेई झू यीनला भेटायला नाही, काल जे झालं त्याचा जाब विचारायला ऑफिसमध्ये अवतरली. शिनचॅनला सिसिटीव्ही स्क्रीनवर ती झू यीनच्या केबिनकडेच येतांना दिसली.

"बॉस, मिस मेई येत आहे." शिनचॅन झू यीनला म्हणाला.

" लवकर बाहेर जाऊन तिला सांग मी एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे. " झू यीनला जणू माहीत होतं की ती कशासाठी आली.

शिन चॅन ने तिला थांबवायचा खूप प्रयत्न केला पण तो विफल झाला.

" ही काय पद्धत झाली कोणाच्या ऑफिसमध्ये यायची? " झू यीनने तिला विचारलं.

" बाहेर तू भेटत नाही आहेस मला म्हणून इथे यावं लागलं." मेई तोऱ्यात म्हणाली.

" कारण मी इतक्यात माझ्या कामात खूप बिझी आहे. मला एका नवीन प्रोजेक्टला लाँच करायचं आहे. तुला तर माहीतच आहे मी माझ्या कामाबद्दल किती गंभीर असतो ते." झू यीन तिला स्पष्टपने म्हणाला.

" माहित आहे ना चांगलं माहित आहे मला. पण आज काल तू ज्या कामात जास्त रस घेत आहेस तेही लपून नाही माझ्यापासून. " मेईने त्याला टोमणा मारला .

" माझ्याच ऑफिसमध्ये माझ्यावर पाळत ठेवणारे जासूस सोडलेत तु. तुला खरंच आयुष्यात इतर काहीच नाही करण्यासारखं? " झू यीनने तिला त्रासून विचारलं.

" आहे ना बरच काही आहे माझ्या आयुष्यात करण्यासारखं. पण तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असं काहीच नाही. " मेई त्याच्या शर्टची कॉलर पकडून म्हणाली.

" पण माझ्या आयुष्यात भरपूर काही आहे. " आपल्या शर्टच्या कॉलर वरून तिचे हात दूर करून झू यीन तिला म्हणाला.

"उदाहरणतः मिस सुकू, ती भारतीय मुलगी. बरोबर ना?" मेईने उपहासाने म्हणाली, " ठीक आहे नवीन गोष्टी एन्जॉय करायला सगळ्यांनाच आवडतं. एकदा जुनी झाली की परत माझ्या जवळच येशील. "

" झालं तुझं, हे बघ मेई ती परदेशी आलेली आहे, कामाच्या पहिल्याच दिवशी माझ्या हातून तिच्या कपाळावर इजा झाली. इतर सहकारीही तिला उणे दुणे बोलले. या सगळ्यांचा परिणाम तिच्या कामावर झाला तर आपला प्रोजेक्ट लांबणीवर पडेल म्हणून मी तिला एक कम्फर्टेबल वातावरण द्यायचा प्रयत्न केला बस." झू यीनने गोष्ट जास्त बिघडू नये या इराद्याने तिला स्पष्टीकरण दिले.

"नक्की?" तिचा प्रश्न.

"अजून काय? लहानपणापासून बघत आली आहेस मला तु. एकाहून एक सुंदर, हुशार, श्रीमंत मुली संपर्कात आल्या. बॉयफ्रेंड बनावं म्हणून मला प्रपोज केले. त्यांच्यापैकी कुणाकडेच मी आकर्षित झालो नाही. सुकन्या, एक सावळीशी, सामान्य कांतीची मुलगी तर त्यांच्यापुढे काहीच नाही." तो उत्तरला.

"कदाचित हे काही नसणंच तुला भावलं असेल." मेई थांबायचं नावच घेत नव्हती.

"मेई बस झालं आता. एक मैत्रीण म्हणून पुरेसं स्पष्टीकरण दिलं मी तुला." झू यीनही कंटाळला.

"पण मला तुझी फक्त मैत्रिण बनून राहायचं नाही यीन." ती त्राग्याने म्हणाली.

"ती तुझी समस्या आहे. मी आधीही सांगितलं आहे आणि आताही सांगतोय, मी तुला कधीच त्या नजरेने बघितलं नाही तेव्हा माझ्याकडून उगीच आशा बाळगू नको." झू यीन केबिन बाहेर पडला. सुकन्या दारातच उभी होती. तिने लिहिलेले डायलॉग दाखवायला ती त्याच्याकडे आली होती. दारावर नॉक करणारच तो झू यीनने दार उघडलं.

दोघेही एकमेकांना धडकणार पण सुकन्या लगेच दोन पावलं मागे झाली.

"काय करत आहेस इथे ?" त्याने रागातच तिला विचारलं.

"डायलॉग्ज वाचायला द्यायचे होते तुम्हाला." त्याचा रागाने लालेलाल झालेला चेहरा बघून ती भीतभीतच उत्तरली.

"ई मेल कर मला. यापुढे स्वतःला माझ्या केबिन मधे यायचे कष्ट द्यायची गरज नाही. जे काही असेल ते ई मेल, व्हाट्सअप करायचं." तो बोलून आपल्या मार्गाला लागला.

"यस सर." सुकन्या बोलली तोपर्यंत तो तिथून निघून गेला. त्याच्यापाठोपाठ मेईही बाहेर आली. सुकन्याला बघून तिचं डोकं आणखीन ठणकलं.

"आमच्या गोष्टी ऐकतेय इथे उभी राहून. काही लाज शरम आहे की नाही. मी तर ऐकलंय की भारतीय मुली खूप सोज्वळ असतात. म्हणून तुला हे काम द्यायला तयार झाले. पण तु तर एक नंबरची चतुर आहेस. तुझा काही हिडन अजेन्डा असेल ना तर तो विसरून जा व परत झू यीनच्या जवळ जायचं नाही. तो माझा आहे. कळलं!" मेई भडभडा बोलून निघून गेली.

सुकन्याला मात्र काय सुरु आहे काहीच कळत नव्हतं. सर्व का तिलाच बोलत आहेत, रागवत आहेत? तिचा गुन्हा काय? आपला भूतकाळ विसरण्यासाठी ती तिचं शहर, राज्य, देश सोडून परदेशी आली या आशेने की इथे ती एका नवीन आयुष्याची सुरवात करेल जिथे तिला कोणी उणे दुणे बोलणार नाही, जज करणार नाही. ती कोणाच्या घेण्या देण्यात, लफड्यात पडणार नाही. ती शांततेत तिचं आयुष्य जगेल. पण इथे तर कामाच्या पहिल्या दिवसापासूनच सर्व तिला शत्रू सारखी वागणूक देत आहेत. अगदी आगीतून फुफाट्यात आल्यासारखं तिला वाटलं. ती केविलवाणा चेहरा करून किती वेळ तिथेच उभी होती. शेवटी आवरलं नाही तेव्हा बाथरूम मध्ये जाऊन तिने मनसोक्त रडून घेतलं. ती रडली हे कोणाला कळू नये म्हणून तिने तोंडावर पाणी मारले. टिशू पेपर ने आरशात बघून चेहऱ्यावरील पाणी टिपत असताना तिचं लक्ष तिच्या छोट्या छोट्या केसांकडे गेलं. तिला परत तिच्या लांबसडक, काळ्याभोर, मखमली केसांची आठवण झाली.

लहानपणी त्या वेण्यांना पकडूनच आजी व आत्या मनसोक्त तिला मारायचे. तेव्हापासूनच नको होते तिला ते लांब केस. दिसायला सुंदर, पण कोणाच्या हाती पडले की तितकेच पीडीदायक. स्वतःच्या पायावर उभं झाले की सर्वात आधी त्या केसांवरच कात्री चालवायची असं तिने मनोमन कधीचेच ठरवले होते.

ती गूढ व्यक्ती कोण असेल? सुकन्याशी त्याचं काय घेणं देणं असेल? आणखी काय काय आहे सुकन्याच्या भूतकाळात दडलेलं? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

धन्यवाद!

लेखिका अर्चना सोनाग्रे वसतकार

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you

//