ही वाट दूर आहे...स्वप्नामधील गावा अंतिम भाग १२

एका मुलीची कथा
ही वाट दूर आहे…स्वप्नामधील गावा भाग १२

मागील भागात आपण बघीतलं की वनीताला तिचे आईवडील बेकार सुनीलच्या घरी पाठवायला तयार नसतात.बघू पुढे काय होईल.

काही दिवस होऊन गेले पण सुनीलच्या घरून काहीच उत्तर आलं नाही तेव्हा संजय पुन्हा सुनीलच्या
वडलांना फोन करायचा ठरवतो. त्या आधी संजय सरोज आणि वनिताशी या विषयावर बोलतो.

"वने अजून तरी तुज्या सास-याचा फोन आला नाय.का करायचं? "

"बा मले माहीत हाय.ते नाय काय बोलनार."

"काऊन? त्येनला त्येंच्या मुलांचा संसार नाय सुकाचा कराचा?"

सरोजने विचारलं.

"त्येची मम्मी हाय ती कोटं ऐकते कोनाचं? तिला तिचं पोरगं लानच वाटते. पान्याचा गिलास नाय उचलू देत. त्येचे पप्पा वरडले का हेच बोलते त्यानला. मंग? पप्पांना कोन इचारते?"

"बाय !लईच दिसते तुजी सासू."

सरोज डोळे विस्फारून म्हणाली.

"माजी सासू लय जांबाज हाय. माये भासरे पक्के हाय म्हून ते माज्या जावला काय बोलत नाय. माजा नवरा ! त्येला कशाचीच पडली नाय. त्येला फुकटाचं खायला भेटलं सिगारेट पेयाला भेटली की ते चूप रायते. आपली माय आपल्या बायकोला फालतूचं बोलून राहिली हे दिसत नाय. "

वनिताच्या स्वरात राग होता.

"पयले वाटलं का भली मानसं हाय. शयरात रायते आपली पोरगी शयरात जाऊन सुकी राईल. काई कामधंदा करल पन ये तो सगळं उलटच झालं. वने मले बराबर माहिती नाय भेटली मुलाकडची नायतर आमी तुजं लगीन नसतं करून देल्ल."

संजयच्या बोलण्यात विषाद होता.

"बा तुमी काई वाईट नका वाटुन घेऊ. माया नसीबात व्हतं हे. पन मी डरनार नाय आन् वापीस बी जानार नाय."

"मी का म्हन्तो तुमाले… का आता आपून पुन्यांदा सुनीलच्या पप्पांना फोन कराचा नाय."

सरोज ठाम स्वरात संजयला म्हणाली.

"हो मले बी असंच वाटून रहालं. मंग काडीमोड घेयाचा का?"

"नगं. एकदम काडीमोड घेन्याची भाषा काऊन कराची? बघू नं वनी जानार नाय तिकडं तर सुदरते का तो सुनील."

सरोज घाई घाईने म्हणाली.

"नाय सुदरला आन् त्येन दुसरं लगीन करायचं ठरीवलं तर ?"

संजयच्या आवाजात भीती डोकावली.

"बा थो हाय बेकार मानूस. कोन देन त्येला पोरगी. आपून भेटलो त्येनला. त्येचं चांगलं नसीब. "

"सरोज आता त्या सुनीलच्या घरी आपून पुन्यांदा फोन कराचा नाय. का होईल ते बघून घेऊ. वने आता तुह्या साटी काम शोधू. तू चालते का शेतामंदी?"

संजयने वनिताला विचारलं.

"चालीन नं.पन अगुदर पाटलाले इचार ."

" ते इचारीन. त्यो नाय म्हननार नाय."
संजय म्हणाला.

" हे झालं तर हे बेस राईल. "

सरोज च्या चेहे-यावर आनंद झळकत होते.

***
यानंतर बरेच दिवस झाले पण सुनीलच्या घरून काही फोन आला नाही. हळूहळू या तिघांनी तिकडच्या फोनची वाट बघणं सोडून दिलं. वनिताला आता आपण खूप मोकळा श्वास घेतोय असं वाटायचं.

काही दिवस शेजारच्या लोकांमध्ये कुजबूज झाली पण त्याकडे या तिघांनी लक्ष दिलं नाही. एकदिवस शेजारच्या काकांना संजयने स्पष्टपणे खरी परिस्थिती सांगितली आणि म्हणाला,

" काकाजी वनिताला आणि फुलासारकं वाढिवलय.ती पोरगी हाय म्हनून आगीत नाय ढकलनार. जावई काई कामधंदाच करत नाय. आयुशभर का माजी पोरगी एकेक पैसासाटी तरसल. जावयाला त्या गोष्टीची लाज नाय पन माज्या पोरीला साभीमान हाय. वनिता आता हीथच -हानार हाय.

"काडीमोड घेनार का मंग?"
त्या काकांनी विचारलं

"जावई सुदारते का बघू. आपन काडीमोड मागाचा नाय."

स्पष्ट बोलून संजयने सगळ्यांची तोंडं बंद केली.


***

वनिता माहेरी येऊन वर्ष होऊन गेलं होतं. सुनील मध्ये तिला मनवण्यासाठी येऊन गेला. इथेही तो राजेशाही थाटात राहिला.

सुनील जावई आहे म्हणून संजय त्याची वरवर करत होता. वनिताला मात्र चीड येत होती.

सरोज न बोलता खातीरदारी करत होती.

"वने काऊन इतका माज दाखवून राहिली?"

सुनीलने विचारलं.

"मी माज नाय दाखवत. मी साभीमानाने राहत हाय. काम करून पैका कमावते. याच्या त्याच्याकडू उसने पैसे नाय मागून राहली."

"जादा ज्ञान नको देउ मले. चालनार हाय का नागपूरले?"

सुनीलने विचारलं.

"नाय. थू कामधंदा करनार असलं तर येईन. नायतर मी हीथच बरी हावो."

वनिताने फाटकन ऊत्तर दिलं

"नाय तर राय इथंच. मले बी जरूर नाही तुझी."

'नाय जरूर माजी तर काऊन आल्ता हिकडं? जाय परत. मले बिगर कामधंद्याच्या नव-यासंगट राह्यचं नाय. जाय वापीस नागपूरले."

"जाऊन राहिलो. जादा बोलायचं काम नाय."

" अकड त पाऊन घ्या या बीनकामाच्या माणसाची "

"ऐ…"

ओरडत सुनीलने वनीताला मारायला हात उगारला.तो वरच्या वर पकडत वनिता म्हणाली,

" हात नाय ऊगारायचा. मले माराचा इचार बी करू नग. मी न्हाय ऐकून घेनार. तुजी ही अकड तिकडे नागपूरले दाखव. मी बायको हाय तुजी वस्तू नाय. मन लागलं का उचललं नायतर फेकून देल्लं'

वनिताचं दुर्गेचे रूप बघून संजय आणि सरोज चकीत झाले. सुनीललापण आश्चर्य वाटलं. तो काही न बोलता खाटेवर बसला.

" जवा तू कामधंदा करशीन आन् मले नेशीन तवाच मी येईन. नायतर मले घ्येयाला पुन्यांदा येऊ नगं.समजलं.?

वनिताचं हे उग्र रूप बघून सुनीलने सासूरवाडचा आपला गाशा गुंडाळला आणि तडक त्याच दिवशी नागपूरला निघून गेला.

***
सरोज आणि संजयच्या चेह-यावर समाधान होतं कारण त्यांच्या मुलीत आत्मविश्वास निर्माण झालेला होता. ती मुलगी आहे म्हणून मुळु मुळ रडत बसली नाही. वनिताला तिच्या आईवडिलांना भक्कम पाठींबा असल्यानेच हा आत्मविश्वास वनिताच्या मनात निर्माण होऊ शकला.

********
किती मुलींचे आईवडील आपल्या मुलीच्या पाठीशी उभे राहतात?
उच्चशिक्षित,शहरी संस्कृतीत वाढलेले पालकही मुलीला सांगताना आढळतात की सासर हेच तुझं घर आहे. माहेर आता विसरायचं.

ही कथा मालिका सत्य घटनेवर आधारित आहे. यातील नायिकेला मी जवळून बघितली आहे. कारण ती शेतातील कामाबरोबर धुणंभांड्याचं काम पण करत होती. माझ्याकडे तिने चार वर्ष काम केलं.

तिने खूप संघर्ष केला आणि स्वतःची ओळख निर्माण केली. एका खेड्यातील मुलीने हे करावं हे कौतुकास्पद आहे.

खेड्यात संजय, सरोज सारखे शिक्षणाचा वारा नसल्याने अशिक्षीत म्हणविल्या जाणारी माणसं. पण त्यांनी अनुभवाच्या शाळेतून आपली वैचारिक बैठक किती उत्तम पद्धतीने तयार केली. इथे मुळात सुसंस्कृत पणा आणि विचारांचं सौंदर्य असावं लागतं. हे शाळेत जाऊन शिकता येत नाही.

कशी वाटली तुम्हाला ही कथा मालिका? प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा.
वनीताने तिच्या स्वप्नातील गाव किती संघर्ष करून वसवलं हे वाचायचं असेल तर प्रतिक्रियेमध्ये सांगा.
__________________________________
ही वाट दूर आहे…स्वप्नामधील गावा
ही कथा मालिका समाप्त झाली.

🎭 Series Post

View all