ही वाट दूर आहे... स्वप्नामधील गावा भाग ७

एका मुलीची कथा
ही वाट दूर आहे… स्वप्नामधील गावा भाग ७

वनिता माहेरी आली.तिच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. आपलं मन काय म्हणतय हे आपल्या आईवडिलांना कसं सांगावं या विचारात वनिता होती. बघू पुढे काय होईल?


वनिताला माहेरी येऊन दोन दिवस झाले होते. वनिता आईवडलांशी छान बोलत होती.तिच्या मनात काय गोंधळ चालु आहे याची थोडीही शंका आईवडिलांना येऊ दिली नाही पण सरोज तिची आई होती. तिला मनात सारखं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी चुकतंय. नवीन लग्न झालेल्या मुलीची देहबोली किती आनंदी, लाजरी, रसरसलेली असते वनिताच्या बोलण्यात ऊठण्या बसण्यात कुठेही लाजरे भाव नव्हते. नव-याचं नाव निघाल्यावर तिच्या गालावर गुलाब पाकळ्यांची गुलाबी छटा दिसली नाही. सरोज विचारात असतानाच संजयच्या आवाजाने भानावर आली.

" चाल नं बिगी बिगी. आज काय झालं तुले? कमर दुखत हाय का?"

" नाय जी मले वनिताचं काळजी वाटून राह्यली."

बोलताना सरोज आवाज काळजीने भरला होता.

" बाप्पा! वनिताची काळजी काऊन? बरं नाय लागून राहिलं का तिले? सांगटलं नाय पोरींन!"

" आवो ताप नाय तिले. ती मले नव्या नवरी सारखी दिसून नाय राहिली."

" लग्न होऊन सहा महिने झाले. लगन झालं म्हंजी पोरगी वेगळी कशी दिसनार हाय? "

संजयला सरोजच्या बोलण्याचा अर्थच कळत नव्हता.

" तुमी बाई असाले पायजेल होतं. तवाच तुमाले माझं म्हणणं समजलं असतं.'

" आता नाय हावो मी बाई. तू हाय नं? मंग सांग न मले. तुज्या मनात काय चालू हाय सांग."

संजय गोंधळून गेला. सरोज उगीचच कोणत्याही गोष्टीसाठी चिंता करणा-यातील नाही हे संजयला माहिती होतं. आता ही चिंता करण्यासारखी गोष्ट त्याच्या मुलीशी संबंधित असल्यामुळे तोही विचार करू लागला.

"आवो नवीन लगीन झालेली पोरगी जवा पहिल्यांदा माहेरला येते तवा तिचा चेहरा तिच सुक(सुख) सांगतो. तसं कुट दिसले तुमाले वनीच्या चेहऱ्यावर?"

"मले ना तुमच्या बायकांन एवड समजत नाय. पन ते खूस नाय एवढं मले जानवतं. तू म्हनत हाय तसं असलं तर का करावं?'

"मी आज घरला गेलो का विचारनार हावो तिले का काय खरं हाय ते सांग. आपल्या मायबापालेच खरं सांगेन का नाय थे?"

"हो तुज बी खरय."

"मी का म्हन्तो तिनं काय सांगीतलं तर त्येला एकदम इरोध करू नगा."

"बापा! मी इरोध करन्यासारक ती काय बोलल असं काऊन तुले वाटून रहालं?"

"मी माय व्हय तिची. नऊ महिने पोटात वाढविलं तिला. मले नाय कळणार? पोरीच्या मनात काय चालले हाय? तुमाले आटवतय का या दोन दिसात तिने सुनीलचा इषय तरी काडला का? नवीन लगीन झालेली पोरगी कितीदा तरी नव-याचं घेते.त्याची याद आली की आतभाईर करते. तसं केलं का आपल्या वनिनी?"

'हो. तू खर बोलताय ग. मले धेनात नाय आलं. बरं चाल आता शेतात आलो आपन. बाकी घरला जाताना बोलू."

दोघंही शेतात आले. दोघंही आप्पा पाटलाच्या शेतात काम करायचे.

काम करता करता सरोजच्या डोळ्यापुढे वनिताचा चेहरा तरळत होता. ती बोलत होती नीट पण तिचे डोळे काही वेगळंच बोलतात आहे हे आई असल्याने सरोजच्या लक्षात आलं. आज घरी गेल्यावर तिला स्पष्ट विचारायचं हे सरोजने मनाशी पक्कं ठरवलं.


संजयचा हात शेतात काम करत होते पण डोक्यात मात्र सरोजने वनिताबद्दल बोललेलं फिरत होतं. त्यामुळे संजयच्या हातांची हालचाल मंदावली त्याने कामाची गती पण कमी झाली. बापाचं काळीज भीतीनं लकलक करत होतं.

" संजय आज काय झालं? बरंगिरं नाय का? " आप्पा पाटलांनी विचारलं.

"नाय जी बरं हाय." गडबडीने संजय बोलला.

"मंग काम कर जल्दी."

"व्हय जी."

संजय आणि पाटलांचा संवाद सरोजच्या कानी पडला. तिने मान वळवून संजय कडे बघायला आणि संजयने तिच्याकडे बघायला एकच गाठ पडली. सरोजने बघीतलं संजयचा चेहरा घाबरा झाला होता. त्याला डोळ्यांनीच खूण करून घाबरू नको असं सरोजने सांगीतलं. संजय मान हलवून कामाला लागला.

****

इकडे घरी वनिताच्या मनात पण विचारांची आवर्तनं चालू होती. आज आपण आपल्या आईवडिलांना काहीतरी सांगायला हवं. फार काळ त्यांना अंधारात ठेवणं बरोबर नाही.

वनिताला लक्षात आलं होतं की आपल्या आईला आपण इथे अचानक एकटच कसं काय आलो याचं आश्चर्य वाटतंय. तिने मधून मधून दोन तीनदा विचारलं की सुनील कसा तुला सोडायला आला नाही?तेव्हा आपण तिला उडवाउडवीची उत्तरं दिली पण आता असं करून चालणार नाही.

आपली सासरी कशी बिकट अवस्था होते हे आत्ताच मी सांगीतलं तर ते समजून घेतील. त्यांच्या मनात वेगळ्याच विचारांचं काहूर माजलं तर त्यातून त्यांना आपण बोललेलं नीट समजणार नाही.

आपली बिकट मन:स्थिती ओळखून आपले आईवडील इतर आईवडिलांसारखे आपल्याला सासरी पाठवून आपली घुसमट करणार नाही याची वनिताला खात्री होती. कारण तिच्या आईवडिलांच्या विचारांची बैठक वेगळी होती. ते आजूबाजूच्या लोकांसारखे बुरसटलेले नव्हते. पण.. तरीसुद्धा वेळेवर नेमकं काय होईल याची तिला धाकधूक वाटत होती.

वनिता आपल्याच विचारात होती. तिन्हीसांजा झाल्या पण घरात दिवा लावायचं तिला भान नव्हतं.

तेवढ्यात संजय आणि सरोज घरापाशी आले.तेव्हा त्यांना घर काळोखात बुडलेलं दिसलं आणि त्यांच्या जीवाचा तुकडा त्या काळोखात बुडून गेलेला दिसला. दोघंही घाबरले.

संजय घाई घाईने घरात शिरला आणि त्याने दिवा लावला तरी वनिताला कळलं नाही. सरोज ही संजयच्या पाठोपाठ घरात शिरली. तेव्हा तिला तसे बघून संजय आणि सरोज दोघांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले.
सरोजला आपल्या मनातील भीती खरी ठरते की काय असं वाटून तिच्या डोळ्यात पाणी आलं.

" वने का झालं? अंधारामदी काऊन बसली?"

संजयने वनिताला हरवलं तशी ती भानावर आली. वनिता झटकन उठली आणि तिने सरोजला घट्ट मिठी मारली. वनिताच्या डोळ्यातून घळघळ पाणी येऊ लागलं.

सरोजने तिच्या पाठीवरून हात फिरवला. डोळ्यांनीच संजयला आपल्याला जे वाटलं तेच आहे हे सांगितलं.
संजयने ही वनिताच्या पाठीवर थोपटलं.

_______________________________
पुढे काय होईल? वनिता संजय आणि सरोज ला सगळं सांगू शकेल? बघू पुढील भागात.

🎭 Series Post

View all