ही वाट दूर आहे... स्वप्नामधील गावा भाग ११

एका मुलीची गोष्ट
ही वाट दूर आहे…स्वप्नामधील गावा भाग ११

मागील भागात आपण बघीतलं की सुनील चे वडील त्याला नोकरी कर नाहीतर लग्न मोडेल असं सांगतात.सुनील ऐकेल का? बघू


"काय ठरवलं तू ?"

"मला नोकरी नाय करायची. वनीताची जबरदस्ती काऊन? तिले इथं सुखानी भेटून राह्यलं नं सगळं?"

"जेवण अन् कपडे भेटले का मिळते का सगळं? मानपान काई -हाते का नाय?"

सुनीलच्या आईच्या आवाजात चीड होती.

"तू पन पप्पाच्या सारीक बोलून राहिली. माझं मन नाय रमत नोकरीत."

सुनील चिडून म्हणाला.

"अरं मंग कशामध्ये रमते तुझं मन ते सांग. तुजे पप्पा बोलले ते खरं हाय. आमी किती दिवस पुरनार तुला? सोताचे खर्च काढायला तरी नोकरी कर."

"मले नाय कराची नोकरी."

"मंग काय दीसभर ऊंडारत फिरायचं हाय का? तुझे सगळे मित्र नोकरीला लागले. त्यांच लगन होऊन जिंदगी सुदरली त्यांची. तुजं का झालं? नोकरी नाही म्हनून गेली बायको माहेरी. आता येते का नाय वापीस मालूम नाही. लोकायनी विचारलं तर का सांगणार हावो मी? तुझे पप्पा म्हनतात तसं खरच तू फुकट्या हाय.तू"

"माय … फालतू बोलू नग."

सुनील ओरडला.

"वरडू नको .जे खरं हाय तेच बोलले. खरी गोष्ट बोललो तर एवढं लागतं जिवाला. एवढं अपमान वाटूनं राहिला तर लवकर कामधंदा शोध."

"वनीताले नाय इचारनार तिच्या गावातील लोक. सासरला काऊन गेली न्हाय ते?"

"तिले कोन इचारेल नाय इचारेल हेच्याशी काय मतलब हाय? तुले ही सोयरीक पुड न्यायची हाय का नाय थे सांग.फालतूचं ज्ञान नाको सांगू मले समजलं?"
सुनीलच्या आईचा पारा पण आता चढला होता.

सुनीलला त्याच्या आईच्या रागाशी काही देणं घेणं नव्हतं. त्याला ही ऐशोआरामाची आणि फुकटची जिंदगी आवडतं होती. डोक्याला कटकट नाही. जे काम पडेल ते करायचं आणि थोडे पैसे घ्यायचे.हे त्याला नोकरीपेक्षा छान वाटायचं.


***
"वने तुज्या पप्पांनी फोन केल्ता सुनीलच्या पप्पांना."
सरोज वनिताला जेवताना म्हणाली.

"मंग काय बोलले?"

"सांगतो गिंगतो काय म्हनलं नाय म्हने सुनीलचे पप्पा."

"माय थो सुनील लय आळशी हाय त्येला मेहनत करायला नाय आवडत.सा महिने व्हती नं म्या तिथं तवा बघीतलं. घरातल काम सांगटल कोनी की ते करते त्या बदल्यात वैनी अन् प्रकाश भाव काय पैशे देते."

"असे पैशे किती देत आसतील?"
सरोजने विचारलं.

"त्येला हे अशेच फुकट पैशे पायजेल.कितीबी मिळाले तरी चालते.सिगारेट फुकाले भेटते. तितलेच पैशे देते वैनी आन् प्रकाश भाव."

बराच वेळाने संजय बोलला.

"वने मले हे त्याचं वागन बिलकुल पसंद नाय."

"मले बी नाय पप्पा. मले नाय वाटत का तो कदी काम करल."

"सरोज तू काय म्हन्ते? का कराचं आपन.?"

"पप्पा मायला काऊन इचारते मी सांगतो की मले अश्या बिनकामाचा माणसाची बायको व्हाची नाय."

"मंग? का कराचं?" सरोजने संजयला प्रश्न केला.

"मी हिकडच राईन अन् काम शोधन." वनीता म्हणाली त्यावर सरोजने होकारार्थी मान डोलावत म्हटलं.

" मला बी हेच वाटतंय. "

"वने तू राय इथं. काम बी शोध पन इथले लोक कसे हाय मालूम हाय नं? ते बोलतील तर तू समजदारीने राय जो."

"हो पप्पा. मी ध्येनात ठेवीन."

"हं पयले वाटलं शयरातील लोक हाय बरे राहतील."
सरोजने आपल्या मनातील विचार बोलून दाखवला.

"आरं शयरायातले हाय म्हून का त्येंना सिंग आले? जाऊ दे वने तू तुज्या मायबापावर इस्वास ठेऊनश्यानी येळेवर घरला आली हे छान झालं."

"पप्पा मले मालूम होतं का बाकीच्या मायबापासारकं मले तुमी जबरदस्ती नाय पाठवनार सासरी म्हून मिनी हिंमत केली."

"जाऊ दे फार इचार करू नग. जेवन कर. आता मी त्यानला फोन करनार नाय."
संजय ठामपणे म्हणाला.

" नग. बघू त्ये काय म्हनते? त्यांचा फोन आला तरी बी त्येंचं म्हनन ऐकून हो म्हनून नग. विचार करावे टाईम घे जो."

सरोजने संजयला सांगितलं.तिला संजयचा मऊ स्वभाव माहिती होता.

सरोजच्या बोलण्यावर

" नाय करनार असं. इस्वास नाय का माझ्यावर?"

" तुज्यावर इस्वास हाय पन तुजं बापाचं काळीज हाय त्येंच्या भरवसा नाय वाटत मले."

सरोज तिरकस स्वरात म्हणाली.

" माय राहू दे थो इषय. आपण जेवण करू."
"हं"
तिघंजण जेवायला बसले.
_________________________________

🎭 Series Post

View all