ही वाट दूर आहे... स्वप्नामधील गावा भाग ६

एका मुलीची कथा
ही वाट दूर आहे… स्वप्नामधील गावा भाग ६

मागील भागात आपण बघीतलं की वनिता खूप उत्साहात माहेरी जायला निघाली. तिने मुद्दाम घरी कळवलं नव्हतं.तिला तिच्या आईवडिलांना सरप्राईज भेट द्यायची होती.पुढे काय होईल बघू.


वनितामाहेरी आली पण तिला घराला कुलूप दिसलं पण वनिताला याचं आश्चर्य वाटलं नाही कारण तिने ती येते आहे हे कळवलं असतं तर तिची आई डोळ्यांचं निरांजन करून तिची वाट बघत दारातच बसून राहिली असतीअन् बा तर स्टॅंड वरच धावतपळत आला असता.

वनिता हसतच शेजारच्या काकूंच्या घरात डोकावली.

" शालूकाकी हाईस का?"

वनिताने ओरडूनच विचारलं.

" कोन हाय?"
स्वयंपाकघरात भाकरीच्या पिठात बरबटलेले हात घेऊन शालू काकी बाहेर आली.

" अरं तू कसं काय आली? तुजी माय तर काही बोलली नाही का भूलून गेली मले सांगायला?"

शालूकाकीच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं.

" शालू काकी मिनं मुद्दामच नाय फोन केला.मले बघून माय बाच्या चेहऱ्यावरचा आनंद पायचा हाय मले."

एवढं बोलून वनिता खुदकन हसली.

" लई साजरी हाय तू. बस अंदरच. तुझे मायबाप येतीलच.सांज झाली आता."

वनिता मान डोलवत शालू काकीच्या घरात शिरली.


थोड्यावेळाने संजय सरोज घरी आले.अचानक सरोज म्हणाली,

" ओजी, तुमाले वनीचा आवाज येऊन राहिला का?"

नाय तर." संजय म्हणाला.

"नाय जी मले येत हाय आवाज तिचा. वने.."

सरोज ने जोरात हाक मारली

"अरं भयताडवानी काऊन करते? वनी आली असती तर आदी मले फोन आला असता."

"नाय हां आवाज वनीचा होय. ए वने तू आली का व?

सरोज पुन्हा जोरात ओरडली.

"ए माय मी आलो वं.."

शालूकाकीच्या घरातून धावत ओरडतच वनिता बाहेर आली.

वनिता ला समोर बघताच दोघांच्या डोळ्यांतून अश्रू वाह्यला लागले.

वनिताने धावत येऊन आईला मिठी मारली.
कितीतरी वेळ दोघींना बोलणं सुधरत नव्हतं.संजयची परिस्थिती काही वेगळी नव्हती.
बराच वेळ हा भेटीचा कार्यक्रम रंगला.

****

सरोजला लेकीसाठी काय करू काय नको असं झालं होतं.

"वने काल मला सपान पडलं होतं का तू इकडं आली म्हणून." संजय म्हणाला.

"बा काही बी सांगतो." वनिता म्हणाली.

"नाय वने. तुज्या बाला खरच सपान पडलं का तू इकडं आली ते." सरोज भाकरीचं पीठ मळताना म्हणाली.

"व्हय!" वनिताला आश्चर्य वाटलं.


"मंग खरच पडलं म्हून तर मीनं तुले आवडते म्हून फलावर आनला."
फ्लाॅवरची भाजी चिरता चिरता संजय म्हणाला. आज तोही आनंदाने सरोजला मदत करत होता.एरवी त्याला या कामाची सवय होती.तो नेहमीच सरोजला कामात मदत करत असे.

"व्हय ग वने तुजा बा खरं बोलून राहला. एक दिस असा नाय जात का त्याले तुजी याद येत नाय."

आईवडिलांचं प्रेम बघून वनिताने डोळे ओलावले. मन गहिवरून आलं.

"मी का म्हन्तो सरोज तू चार दिस कामाले येऊ नगं."

"बा काऊन? म्या हाय नं ! घरचं समदं काम करीन."

"अरं तू अन् तुजी माय करा थोडं मायलेकीच्या गप्पा. चार दिस आली तू. तू जाशील तवा पुन्ह्यांदा येईल सरोज कामाले."

वडिलांचं हे बोलणं ऐकून वनिता खाडकन वर्तमान स्थितीत आली. ती हे माहेर आहे जिथे ती आता चार दिवस येऊ शकते. हे विसरली होती. मग तिच्या मनात प्रश्न आला. माझी अवस्था माझे आईवडील समजून घेतील की इतरांसारखे सासर हेच तुझं घर आहे म्हणून सासरी पाठवतील.

वनिताला एकदम गप्प झालेलं बघून सरोजने तिचं मन ओळखलं.ती म्हणाली,

"तुमाले बी का बोलायला पाइजेल कळत नाय.आत्तातर आली नं वो ते माहेरी आन तुमी सांगता चार दिवस आली म्हून" सरोज फटकन संजयला बोलली.

"म्यां असं नाय बोललो." संजय गडबडून म्हणाला.

"बा तू काऊन तरास करून घेतो.म्याच इसरून गेली का मी माहेरी आली. बा पन मायले कामावर घेऊन जा. पाच दिसांची मजुरी बुडल. तुमी घरला आल्यावर आम्ही बोलू."

"बाय माजे किती काळजी करते वो तू. हे बघ ऊद्या का कराचं ते ऊद्या बघू. आत्ता नीट जेवन कर बाय. सासरी कोन गरम जेवन वाढतं.जेव

जेवताना वनीताचा प्रत्येक घास घशात अडकत
होता. आपला विचार,आपली परिस्थिती कधी सांगावी याचा ती विचार करू लागली. आईवडिलांना तिचं म्हणणं कितपत पटेल? आपण जो निर्णय घ्यायचा ठरवला आहे तो त्यांना कितपत पटेल हे विचार तिच्या मनात येत होते त्यामुळे सहाजिकच तिचं जेवण रेंगाळलं.हे सरोजच्या लक्षात आलं.

"वने जेवन कर नं कायचा इचार करून राहिली? पयले जेवन कर मंग इचार कर. कळलं ?"

"हो माय" वनिताने मान हलवली.
स्वतःला सावरून वनिता जेवू लागली. ऊरलेलं जेवण तिघांच्या थट्टामस्करीत चालू झालं.
__________________________________
वनिताच्या डोक्यात काय विचार चालू आहे? तिने कोणता निर्णय घ्यायचा ठरवला आहे? बघू पुढील

🎭 Series Post

View all