ही वाट दूर आहे... स्वप्नामधील गावा भाग ५

एका मुलीची कथा
ही वाट दूर आहे…स्वप्नमधील गावा भाग ५


मागच्या भागात आपण बघितलं की वनिता आपल्या आयुष्याला काहीतरी दिशा देण्यासाठी ती विचार करते. बघू पुढे काय होईल ते.


वानीताच्या लग्नाला आता सहा महिने झाले होते. या सहा महिन्यात तिने सासरच्या सगळ्या लोकांना चांगलं ओळखलं होत. सुनीलला तर पुरेपूर ओळखलं होतं.

हा माणूस आयुष्यभर फुकटा राहील पण काम करणार नाही. एकवेळ तो लोकांनी त्याचा अपमान केला तर तो सहन करेल पण आपल्या शरीराला काम करून त्रास देणार नाही.

बायको म्हणजे हवी तेव्हा वापरायला मिळालेली हक्काची वस्तू आहे हे त्याचे विचार होते. बायकोत भावनिक गुंतवणूक करण्याची काही गरज नाही ही त्याची बायकोबद्दलची भावना होती.

वानीताच्या कधी कधी मनात येई की वेश्येकडे जायला कोणी पैसे देणार नाही म्हणून ती गरज भागवयाला हक्काची बायको आणून ठेवली. वनीताच्या मनात हा विचार येणं चुकीचं नव्हतं. सुनीलचं वागणं असच होतं.

वनिताला आता सुनीलच्या स्पर्शा बरोबर त्याचं दर्शनही नको वाटे. रोज ती कत्तलखान्यात निघाल्या सारखी सुनीलच्या स्वाधीन होत असे.


वनिताला प्रकर्षाने माहेरची आठवण येऊ लागली. आपल्या सैरभैर मन: स्थितीत आपले आई वडील मार्ग दाखवतील याची तिला खात्री होती.

तिने आपल्या मनातील विचार सासू जवळ बोलून दाखवायचं ठरवलं.

सासूला समोरच्या खोलीत निवांत बसलेलं बघून वनिता म्हणाली,

" सासूबाई मला माज्या माय बा ची याद येऊन रहाली. सहा महिने झाले नाही भेटलो त्यांना. मी जाऊ काय गावी?"

" जायला काय नाय पन इथ कोन करल सगळ काम? माजे गुडघे दुखतात. सगळं काम तुझ्या जावेला करावं लागेल. ती बी कामावर जाते."

हे बोलणं म्हणजे वनिताच्या बोलण्याकडे सासूने जवळ जवळ दुर्लक्षच केलं.

आपलं लग्न व्हायच्या आधी आपली जाऊ कामाला जायची आणि घरचं पण काम करायची. तेव्हा कसं करायची? हा प्रश्न वनिताला पडला आणि ती निराश झाली.

वनिता थकल्या मनाने स्वयंपाक घरात शिरली.
***

वनिता केविलवाण्या चेहे-याने सगळं काम करत होती. ती स्वयंपाक घरात असताना जाऊ पाणी प्यायला आली तशी हातातील काम थांबवून वनिताने धीर करून जावेला विचारलं

" वैनी मले जावं वाटते माय कडे. तुमी काही दिवस करा काम मी आल्यावर घेईल सगळं सांभाळुन."

बोलताना वनिताच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागलं. तिच्या जावेला ते बघवलं नाही. शेवटी तीही सासूरवाशीणच होती.

" वने रडू नको. जाय तू. मी हाय."

हे ऐकल्यावर वनिताच्या चेहे-यावर हसू आलं. तशी तिची जाऊ हसत म्हणाली,

" मला कळते ग माहेरची आठवण कशी तरास देते.तू जा बीनघोर."


जावेचं पुढचं बोलणं वनिताच्या कानात शिरलं नाही.ती केव्हाच तिच्या माहेरच्या अंगणात जाऊन पोचली होती.

****

दुस-या दिवशी वनिता सासूला म्हणाली,

" सासूबाई वैनी बघणार हाय समदी कामं. मी कदी जाऊ गावी?"

" मला का विचारते? सुनीलला टाईम नाही आत्ता."

सासूने उगीचच फाटे फोडले. सासूला भिती वाटली की ही फुकटची मोलकरीण गेली तर आपल्याला पण काम करावं लागेल. कारण मोठ्या सुनेला खूप काम पडलं तर मोठा मुलगा आईलाच ओरडायचा.

" यांनी नाय आलं तो बी चालते. माह्याच गावी जानार हावो. मले फक्त बसस्टॅंडवर जायचं कसं ते नाई माहिती. थे सांगीतलं का होते काम."

वनिताच्या मनात धाकधूक चालू होती.जाऊ हो म्हणाली आता सासूने मध्येच फाटे फोडायला नको. एकेक क्षण तिचा जीव कासावीस करत होता.

सुनील तर आता क्षणभरही तिला डोळ्यासमोर नको वाटायचा.खूप वेळ वाट बघून वनिताने सासूला विचारलं.

" सासूबाई सांगा नं कवा जाऊ?"

" आजपन गेली तरी चालते.दुपारच्या एशटीनं जा. स्टॅंडवर पाठवते सुनीलला."

" होय जी"

वनिताच्या चेहे-यावर आनंद फुलांचा ताटवा बहरला. सासूला ते कळलं पण तिने त्याची दखल घेतली नाही. जावेला मात्र मनापासून बरं वाटलं.

लग्न झाल्यावर काही दिवस वनिताशी तिची जाऊ आढ्यतेने बोलायची. नंतर तिला वनीताचा स्वभाव कळला तशी ती वनिताशी प्रेमानं वागू लागली. वनिताच्या संसाराची तिलाही चिंता वाटे.वनितासारखी भोळी भाबडी पोरं आपल्या सासरच्या लोकांच्या कृत्रिम वागण्याने फसली. आपला नवरा सुनील सारखा नाही यात तिला खूप समाधान वाटलं.

वनिता वासरा सारखी ऊंडारत माहेरच्या वाटेने निघाली. तिला बसस्टँडवर सोडायला सुनील चीडचीड करत गेला. त्याच्या चिडचिडीकडे वनिताचं लक्षच गेलं नाही कारण ती मनाने केव्हाच माहेरच्या कल्पवृक्षाखाली जाऊन बसली होती.
________________________________
वनिता अचानक माहेरी चालली आहे.तिचं दु:आ तिचे आईवडील समजून घेतील का?


🎭 Series Post

View all