ही वाट दूर जाते..

ललित लेखन...वैचारिक लिखाण

हि वाट दूर जाते.........
©®राधिका कुलकर्णी.

झपझप वेगाने तिची पावले दरवाज्याच्या दिशेने वाटचाल करत होती.आनंद अाणि हुरहूर अशा संमिश्र भावना एकाच वेळी दाटुन आल्या होत्या.कधी एकदा त्या दरवाजातुन आत प्रवेश करतेय असे झालेले.
स्वर्ग अन् दरवाजा फक्त दोन पावलावर उरला होता आता.
अचानक हे काय झाले???? 
प्रवेश करणार तोच तोंडावर दरवाजा धाडकन बंद झाला.
केविलवाण्या नजरेनेच तीने कडी ठोठावली.
पण आतुन भयाण शांतता....
हाताने दरवाजा बडवला.,पण काहीच हालचाल जाणवत नव्हती.दरवाज्याच्या फटीतुन डोकावुन पाहीले कोणी आहे का???
पण काहीच प्रतिक्रीया नाही.
आता ती खूपच सैरभैर झाली.धावत मागल्या दिशेची खिडकी ठोठावली.खिडकीच्या फटीतुन आत बघण्याचा व्यर्थ प्रयत्नही केला.रडवेल्या चेहऱ्याने मागील परसदार ठोठावले.तिकडुन काही दिसते का बघितले.पण निराशाच पदरी.
तरीही धीर सोडला तर #ती कसची?..
ती माळवदावर गेली.छताच्या झरोक्यातुन आतील हालचालीचा मागोवा घेउ पाहिला पण तिचीच सावली तिला दिसत होती.

पुन्हा खाली आली आणि भिंतीला कान लावुन आतल्या आवाजाचा कानोसा   घ्यायचा प्रयत्न केला.आपल्याच कानातील प्रतिध्वनी सोडता कुठल्याही सजिव हालचालीचा मागमुसही जाणवत नव्हता.कुठुनच कोणतेच ऊत्तर मिळत नव्हते ति ला.
त्या आतल्या विश्वाशी एकरूप होण्यास आतुर #ती आता त्याच जगापासुन दूर फेकली गेली होती..
पाण्याचा पटल नजर धुसर करत होता.त्याही अवस्थेत चालत पुढे जात होती..खचलेली थकलेली ,समोरचा दगड दिसलाच नाही.आंगठ्यातुन रक्ताची धार लागलेली..मन आणि अंगठा एकाचवेळी भळभळुन वाहत होते.दोन बोटाच्या चिमटीत जखम दाबुन त्यावर माती चोळुन रक्त प्रवाह थांबवला  तीने..पण मन अजुनही.....
तशीच खिन्न छिन्न भिन्न अवस्थेत पुन्हा दरवाज्याकडे आली...
पण आता मात्र नजरेत एक वेगळी चमक होती..करारी बाण्याने त्या बंद दरवाज्या कडे, त्या आतील ठोकरल्या विश्वाकडे पाठ फिरवत ती दिमाखाने चालली होती.
कदाचित हाच निर्धार जखमी मनाने केला असावा की ,,,,
आता मी नाही हा बंद दरवाजा मला शोधत येईल....
एक एक पावलागणिक हि वाट दुर जात होती ...
मनातुन,आठवणीतुन ,आयुष्यातुन....

ललित
©®राधिका कुलकर्णी.

🎭 Series Post

View all