हात दोस्तीचा..

रक्ताची नाती जन्माने मिळतात पण मैत्रीचे नाते स्वतः निर्माण करायचे असते. जपायचे असते.

शर्वरी तिच्या नवऱ्यासोबत शहरामध्ये खरेदीसाठी आली होती. तिचा नवरा हा गावचा सरपंच होता. गावाकडे छोटासाच पण प्रेमळ माणसांनी भरलेला असा तिचा एकत्र कुटुंबातील बंगला "वात्सल्य" या नावाने ओळखला जात होता. घरची परिस्थिती अतिशय चांगली होती. शहरात वाढलेली शर्वरी गावाकडील वातावरणात अगदी मनापासून रुळली होती. तिच्या घरामध्ये सर्व सोयीसुविधा अगदी शहरातल्या सारख्याच असल्यामुळे तिला शहर आणि खेडेगाव यात फारस फरक वाटत नव्हता. शर्वरीचा नवरा जास्त शिकलेला नव्हता पण माणूस म्हणून अतिशय योग्य होता. राहणीमान साधे असले तरी विचार मात्र उच्च होते त्याचे. 


शहरात पोहोचल्यावर मनसोक्त खरेदी करून शर्वरी आणि तिचा नवरा गावी जायला निघाले होते. तेवढ्यात शर्वरीला गाडीच्या काचेतून तिची बालमैत्रीण दिव्या दिसली. शर्वरीला मनापासून आनंद झाला होता.

ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, "अहो दोन मिनिट गाडी थांबवता का ? मी लगेच माझ्या मैत्रिणीला भेटून आले. आज खूप दिवसांनी ती मला दिसतेय." 


"अग ती खूप स्टॅंडर्ड दिसतेय. ती तुझी मैत्रीण नसेल." शर्वरीचा पती म्हणाला. 


"नाही हो, मला पूर्ण खात्रीय. ती माझी मैत्रीणच आहे दिव्या. आलेच बघा मी." लगबगीने गाडीतून उतरून शर्वरी "दिव्या, दिव्या" करत दिव्याजवळ गेली. 


दिव्याचा नवरा क्लासवन अधिकारी होता. \"जीन्स-टॉप घातलेली दिव्या गावाकडच्या साडीत आलेल्या शर्वरीला ओळखेल की नाही ?\" हा प्रश्न शर्वरीच्या मिस्टरांना पडला होता. पण क्षणाचाही विलंब न करता दिव्याने शर्वरीला मिठी मारली. दिव्याच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र आठ्या उमटल्या होत्या.  


"अहो पाहिलंत का ? ही माझी बाल मैत्रीण शर्वरी. शाळेत असतानापासून कॉलेजपर्यंत रोज एकाच बेंचवर बसायचो आम्ही दोघी." दिव्या तिच्या पतीला म्हणाली.


काही न कळल्यासारखे दाखवत दिव्याचा नवरा त्याच्या शानदार गाडीत जाऊन बसला. शर्वरी नाराज झाली. पण आपण आपल्या बालमित्रिणीला भेटलो यातच तिला समाधान वाटत होतं. शर्वरीचा नवरा गाडीतून खाली उतरून दिव्याजवळ आला. 


दिव्या म्हणाली, "चला या ना भावोजी, तुम्हाला आमच्या यांची ओळख करून देते." 


पण दिव्याच्या नवऱ्याने शर्वरीच्या नवऱ्याकडे दुर्लक्ष केले. तो "आलोच मी, मला थोडे काम आहे."असे म्हणून भरधाव वेगाने निघून गेला.


"जाऊ दे. तू लक्ष नको देऊ. चल आपण तुझ्या गाडीने माझ्या घरी जाऊ." म्हणून दिव्या शर्वरीला घेऊन घरी आली. चहा, नाष्टा कितीतरी आग्रहाने आणि प्रेमाने मैत्रिणीला खायला घातल्यावर आता अखेर निरोप घ्यायची वेळ आली. पुन्हा भेटण्याच्या प्रॉमिसवर दोघी मैत्रिणींनी निरोप घेतला. 


शर्वरीच्या मिस्टरांना आपण अडाणी आहोत म्हणूनच दिव्याचे मिस्टर आपल्याशी तसे वागले हे उमगले होते. पण शर्वरीने त्यांची समजूत काढली. स्वभावाला औषध नसते असे म्हणून ते दोघेही घरी परतले. पुढे दिव्याच्या मिस्टरांची लांब कुठेतरी बदली झाली. 


पंचवीस वर्षानंतर एक अधिकारी गेटजवळ वॉचमनकडे विनंती करत होता हे शर्वरीच्या मिस्टरांनी पाहिले.  त्यांनी आपल्या पी. ए. ला काय झाले ? ते पाहायला खाली पाठवले. 


"साहेब तो अधिकारी तुमची मदत मागतोय?" असे  पी. ए. म्हणाला. 


"ठीक आहे. जनतेची सेवा करणे हेच तर आमदारांचे काम असते. द्या त्यांना आत पाठवून." शर्वरीचे मिस्टर म्हणाले. तो व्यक्ती आत आला पण शर्वरीच्या मिस्टरांना पाहून लाजरा बुजरा झाला.  कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून दिव्याचा नवरा होता. त्याच्यावरती खोटे आरोप झाले होते म्हणून त्याची नोकरी धोक्यात आली होती. आमदार साहेबांनी यात लक्ष घालावे अशी त्याची इच्छा होती. पण हे कुठल्या तोंडाने बोलावे ? हेच त्याला कळत नव्हते. 


तेवढ्यात शर्वरीची नजर दिव्याच्या मिस्टरांवर पडली. आमदाराची बायको असूनही कोणताही गर्व किंवा अभिमान न बाळगता शर्वरी "भावोजी, तुम्ही इथे कसे?" म्हणून पाणी घेऊन आली. 


"मला माफ करा त्यादिवशी मी तुमच्याशी खूप चुकीचं वागलो होतो. पण आज मला खूप गरज आहे तुमची." दिव्याचा नवरा म्हणाला. 


"अहो मला फक्त माझी मैत्रीण महत्त्वाची होती. ती माझ्याशी माझ्या नवऱ्याशी चांगली वागली हे महत्त्वाचे. तुम्ही कसे वागलात? हे आम्ही विसरूनही गेलोय." शर्वरी म्हणाली.


"सांगा काय झालेय ?" शर्वरीचे मिस्टर म्हणाले. 


दिव्याच्या मिस्टरांनी सगळी खरी हकीकत सांगितली. शर्वरीच्या मिस्टरांनी त्यांना मदत केली. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर मिठाई आणि दिव्याला सोबत घेऊन दिव्याचे मिस्टर शर्वरीच्या घरी आले. 


"कुठे आलोय आपण ? हा कोणाचा बंगला आहे?" दिव्या म्हणाली. 


"तेच तर सरप्राईज आहे." दिव्याचे मिस्टर म्हणाले. 


आत गेल्यावर शर्वरीला पाहून दिव्याने पुन्हा तिला मिठी मारली. तिला आपल्या मिस्टरांची नोकरी शर्वरीच्या मिस्टरांमुळेच वाचली हे समजले आणि ती म्हणाली, "आले ना लक्षात ? कुणाच्याही परिस्थितीवर कधीही हसायचे नसते.  कधी कोणाची गरज पडेल ? हे सांगता येत नसते. आणि मैत्री ही काही गरीब श्रीमंती बघून होत नसते. आम्ही दोघी लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहोत आणि कायम अशाच राहू." 


दिव्याच्या मिस्टरांना त्यांची चूक समजली होती. त्यांनी खाली मान घातली. 


"सॉरी! यापुढे माझ्याकडून अशी चूक कधीच होणार नाही. मैत्री सर्वश्रेष्ठ असते. ती चुकाही माफ करते. मैत्रीत सगळ्या बाबी गौण असतात. हे आज मला माझ्या बायकोने आणि शर्वरी वहिनीने दाखवून दिले. खरी मैत्री काय असते? हे मला चांगले समजलेय."  दिव्याच्या मिस्टरांनी मनापासून आपल्या बायकोची आणि शर्वरीची माफी मागितली.

"ही दोस्ती तुटायची नाय! सुटेल का रे हात दोस्तीचा..अरे नाय, नाय, नाय.." हा त्यांचा कॉलेजमधला फेमस डायलॉग मारत शर्वरीने आणि दिव्याने एकमेकींना टाळी दिली.


सौ. प्राजक्ता पाटील.

# नाते मैत्रीचे 

#गोष्ट छोटी डोंगराएवढी