ही दोस्ती तुटायची नाय!

एका अनोख्या मैत्रीची हृदयस्पर्शी कथा.

विषय :- नाते मैत्रीचे.

शीर्षक :-ही दोस्ती तुटायची नाय!



"रियाऽऽ, ये ना गं मला भेटायला." प्राजक्ताच्या क्षीण आवाजाने माझ्या हृदयात कालवाकालव झाली.


"आता मी नाही, तुच लवकर बरी हो आणि पटकन मला भेटायला ये." डोळ्यातील पाण्याला थोपवत उसने अवसान आणत मी बोलले.

तिच्याच्याने जास्त बोलवत नाहीये याची कल्पना आल्याने थोड्या गप्पा मरून मी कॉल कट केला नि इतका वेळ थोपवून धरलेला हुंदका उसळून बाहेर पडला.


प्राजक्ता आणि मी, जीवाभावाच्या मैत्रिणी. नर्सिंगची साडेतीन वर्षे एकत्र काढली आणि दोन वेगळे टोक असलेल्या आम्ही दोघी अगदी घट्ट मैत्रिणी झालो. ती निमगोरी, सदैव आनंदी असणारी, हसली की शुभ्र दंतकळ्यांनी भुरळ पडणारी. मी तिच्यापेक्षा जरा जास्तच उजळ, चुळबुळी, मस्तीखोर. ती आनंदात असली की खूप गोड अशी शीळ वाजवायची. आमच्या होस्टेलची विंग त्या आवाजाने गुंजून उठायची.

शिक्षण झाले तरी ही मैत्री तुटली नाही उलटपक्षी मैत्रीचा धागा अधिकच घट्ट होत गेला. साडेतीन वर्षाच्या मैत्रीचे लोणचे अधिकच मुरत गेले. दोघींची पोस्टिंगची ऑर्डरही एकत्र आली, आणि नोकरीदेखील एकाच शहरात मिळाली. 


माझ्या प्रेग्नसीच्या शेवटच्या काळात तिचीही गुडन्यूज कानावर आली. त्या काळात आम्ही एकमेकींना कंपनी दिली. तिच्या प्रेग्नसीची सुरुवातीचे तीन महिने ती माझ्या सोबत होती. जॉब सांभाळून माझे डोहाळे ती पुरवायची तर तिची काळजी मी घ्यायचे. किती मंतरलेले दिवस होते ते. सहा महिन्याच्या फरकाने दोघी बाळंत झालो आणि दोघीही मुलीच्या आई झालो.

नोकरी, आयुष्य सारे काही सुरळीत चालू होते. एका शहरात असलो तरी आता आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होतो. तिने सेकंड चान्स घ्यायचे ठरवले पण नियतीच्या मनात निराळेच होते.

पोटात वाढणारे बाळ तिच्या मातृसुलभ भावनांना चेतना देत होते आणि त्याच काळात शरीराचे दुखणे बळावत होते. पाय, कंबर सारेच दुखायचे. सुरुवातीला वाटले, गरोदरपणातील दुखणे असेल पण दुखणे जास्तच वाढले. तपासणी केली आणि रिपोर्ट बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला बोन कॅन्सरचे निदान झाले होते.

पोटात सहा महिन्याचे बाळ आणि हातात असलेला तिच्या मृत्यूचा दाखला, तरी ती डगमगली नाही.


कॉम्प्लिकेशन्समुळे वेळेआधीच सिजेरिअन करून काढावे लागलेले तिचे बाळ आणि दुसऱ्याच आठवड्यात तिचे ऑपरेशन. इतके दिवस बाळासाठी आसूसलेली ती, स्वतःच्या लेकराला हातातही घेऊ शकत नव्हती. डॉक्टरांनी ग्लासभर पाण्याच्या वजनापेक्षा जास्त भार उचलायला सक्त मनाई केली होती.


कोविड काळ असल्यामुळे प्राजक्ताशी जास्त भेटणेही होत नव्हते. ड्युटीमुळे वेळही मिळत नव्हता. काही दिवसांनी ती माहेरी गेली. तिची ट्रीटमेंट सुरू होती. ती बेडवर नुसती पडून रहायची. पडल्या पडल्या छोट्याच्या बाळलीलेत रमायची. मनात कदाचित प्रत्येक क्षण ती मृत्यू जगत असेल पण ओठावरचे हसू मात्र तिने हरवले नव्हते. कायम आनंदी रहायचा प्रयत्न करायची. त्यामुळे तिची तब्येत फार ढासळली असेल असे कधी जाणवले नाही. माझेही दुसरे लहान लेकरू, त्यामुळे तिला भेटायला जाणे नाही जमले. आता अगदी अंथरुणात खिळली होती. तिची स्मृतीही कमीजास्त होत होती.


मला हे कळले त्यासरशी मी तिला फोन लावला तेव्हा तिने मला भेटायची गळ घातली.

"रियाऽऽ, ये ना गं मला भेटायला." तिच्या क्षीण आवाजातील अर्जव माझे काळीज चिरत होते पण तितक्या लांबच्या शहरात तिला भेटायला जाणे अशक्य होते.

"आता मी नाही, तुच लवकर बरी हो आणि पटकन मला भेटायला ये." स्वतःला सावरत मी म्हटले. त्यावर तिचे उत्तर आले नाही. कदाचित हे कधीच शक्य होणार नाही हे तिला जाणवले असावे.


 कोविडची साथ ओसरली. प्राजक्ताला भेटायला जावे असे मनात होते, त्याच काळात माझी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला ड्युटी लागली. तिथले बिझी शेड्युल, सिनिअर म्हणून असलेली जबाबदारी.. सुट्टी मिळणे अवघड होते.


"अगं,प्राजू तुझ्या हॉस्पिटलला ऍडमिट आहे." मैत्रिणीच्या फोनने नाकावर मास्क चढवून मी प्राजक्ता असलेल्या वार्डमध्ये धाव घेतली. तिला चेस्ट इन्फेकशनमुळे तिथे शिफ्ट केले होते.

"प्राजू, मला ओळखलंस?" तिच्या डोक्याशेजारी उभे राहून मी विचारले.

किलकिल्या नजरेने ती माझ्याकडे बघत होती. नजरेत अनोळखीपणा होता. मी हळूच मास्क खाली केला आणि तिची अनोळखी नजर ओळखीत बदलली.


"रिया, तू?" तिच्या डोळ्यात पाणी आणि ओठावर ओळखीचे हसू होते.


"हो अगं. शेजारच्या वार्डमध्ये माझी ड्युटी आहे. मी म्हटलं होतं ना, की तूच मला भेटायला येशील. आलीस बघ."

मी उसने हसून म्हणाले. तीही हसली. खिन्नशी.


"काही हवे का तुला?" तिच्या शोधक नजरेकडे बघत मी म्हणाले.


"हे.. हे नाही आलेत का गं?" तिची नजर तिच्या नवऱ्याला शोधत होती. तिथल्या नर्सशी बोलल्यावर कळले की सकाळपासून तिला भेटायला कोणीही आले नव्हते.


"अगं, ते येतंच असतील. तुला काही हवेय का?" तिच्या डोक्यावरून हात फिरवत मी.


"पाणी.. पाणी देतेस का?" तिला दिलेले पाणी ती अधाशासारखे प्यायली. जणू केव्हाची ती तहानलेली असावी.

पाणी पिऊन चेहरा तृप्त झाला होता.


"रिया, पाय चेपतेस का गं?" ती म्हणाली. पायावर पांघरून असल्यामुळे मला अंदाज आला नाही. हात लावताच मी पटकन पांघरून बाजूला केले. पायाच्या नावाखाली दोन वाळलेल्या काटक्या बघून डोळ्यातले पाणी तिच्या त पायावर पडले. चेहऱ्याकडे बघून तिची अवस्था इतकी बिकट झाली असेल हा अंदाजच मला बांधता आला नव्हता.


तिचा चढलेला ताप, वाढलेले दुखणे बघून तिला इंजेक्शन लावले. इंजेक्शन द्यायच्या जागेवर मांस तरी कुठे होते?


माझे ड्युटी अवर्स संपले, तसे तिला मी 'जाऊ का?' म्हणून विचारले.

तिने माझा हात घट्ट पकडला. "रिया, नको जाऊस ना. थांब ना जरा वेळ." तिच्या डोळ्यातील अर्जव बघून माझा पाय निघत नव्हता.

"प्राजू, तुला सकाळी काही खायला घेऊन येऊ का गं?"


"मला ना शिरा आणशील का गं? थोडा जास्तीच गोड करशील." गोड म्हणजे तिचा जीव की प्राण. मी हुंकार भरून तिथून निघाले.


दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्यासाठी डबाभर शिरा घेऊन गेले तेव्हा ती झोपली होती. खाऊन खाऊन काय दोन घास तेवढे तिने खाल्ले असते. तिला उठवायचा प्रयत्न केला पण ती गाढ झोपली होती. मी सिनिअर, त्यात नाईट ड्युटीवरच्या नर्सला घरी जायला होत असलेला उशीर. मी डबा तिच्याजवळ थांबलेल्या तिच्या जावेच्या हवाली करून ड्युटीवर गेले. नवीन आणि जुन्या पेशंटनी माझा वॉर्ड अगदी खचाखच भरला होता, त्यामुळे मला प्राजक्ताला भेटताच आले नाही. ड्युटी संपली नी मी धावतच तिच्याकडे गेले. ती अजूनही झोपलीच होती. शिऱ्याचा डबा तसाच होता.


ऑक्सिजनवर असूनही तिची श्वसनक्रिया मंदावली होती.


"भावोजी, मुलांना घेऊन या ना. कदाचित मुलांना भेटायचे तिच्या मनात असेल." अश्रू पुसून मी तिच्या नवऱ्याला म्हटले. त्यानेही तात्काळ मुलांना बोलावून घेतले.


"मम्मीऽऽ" तिच्या मुलीने साद घातली आणि अक्षरशः तिथून रडत मी बाहेर पडले. तिच्याठिकाणी मला माझी मुलगी दिसत होती. मुलांना आईची किती गरज आहे हे त्या एका क्षणात मला जाणवले.


घरी गेल्यावरही त्या मायलेकीचा चेहरा सारखा नजरेसमोर तरळत होता. काल माझ्याशी बोललेली माझी मैत्रीण आज दिवसभर ग्लानीत होती. रात्री दिड वाजता फोन खणाणला. प्राजक्ता हे जग सोडून गेली होती.


माझ्या डोळ्यातील पाणी ओघळत होते. शिकत असताना झालेली आमची मैत्री, लग्न, नोकरी, बाळ.. तिच्या सुखाच्या प्रत्येक क्षणाची मी साक्षीदार होते आणि आज तिच्या शेवटच्या काळातही माझी सोबत होती.


डोळे मिटले तरी तिचा हसरा चेहरा डोळ्यासमोरून हलत नव्हता. आनंदाने ती वाजवत असलेल्या शीळेचा आवाज कानात गुंजत होता.. 'ही दोस्ती तुटायची नाय!'


****समाप्त. ***

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)