Login

निरोप तुला देताना

हे बा रायगडा, निरोप तुला देताना...


हे बा रायगडा,
निरोप तुला देताना,
अश्रू हि अनावर होतात.

मावळ्यांच्या रक्तानं पावन झालेले,
तुझे तट-बुरुंज, इथला हर एक दगड नि चिरा,
गेली कित्येक वर्षे तू अभिमानानं नि निष्ठेनं मिरवतोयस...

जरी ढासळल्यात तुझ्या तटबंद्या, कोसळलेत तुझे बुरुंज,
पचवलेस हजारो तोफांचे गोळे, अन कित्येकांनी फोडली तुझी छाती,
तरी अजूनही अजिंक्य, अभेद्य, बेलाग, नी दुर्गम असाच तू राहिलास...

किती रे किती सोसलंस आजवर,
तुझ्या छाताडावर नाचले ते मोगल, ते सिद्दी, ते इंग्रज,
ना कधी मोडलास ना वाकलास, अन ना कधी कुणासमोर झुकलास...

काय काय पाहिलं नसशील रे तू,
अभिमानानं मिरवलास ना तू महाराजांचा राज्याभिषेक...
नि भरल्या डोळ्यांनी अनुभवलंस महाराजांचं महानिर्वाण...
मावळ्यांची निष्ठा अन गद्दारांचा कडेलोट हि पाहिलास...

झालीत कित्येक बंड तुझ्या पोटात,
छाती फुटून वाहिलेत इथं रक्ताचे पाट,
राहिलास तू दुर्लक्षित, कधी अज्ञातवासात तर कधी बंदीवासात..

वर्षानुवर्षे लढ़त राहिलास..
परकीय आक्रमकांशी, गद्दारांशी नि इथल्या माणसांशी...
ऊन - थंडी, वारा - पाऊस, लढत राहिलास निसर्गाशी...
तरीही ताट मानेनं, माझ्या राजाची आठवण सांभाळत अभेद्य राहिलास...

हर हर महादेव गर्जना ऐकल्यावर जसं अंग अंग शहारतं...
तसंच तुझ्या माथ्यावर आलं, कि रोमा रोमांतून एकच किलकारी उठते,
"जय भवानी जय शिवाजी "

हे बा रायगडा,
निरोप तुला देताना,
अश्रू हि अनावर होतात...