Login

इथे भूतकाळ अजून जिवंत आहे..भाग 1

Story Of Four Friends Who Accidentally Reach In A Jungle Where They Found Very Strange Things
सुनसान रिकामा रस्त्यावरून वाऱ्याच्या वेगाने दोन बाईक्स येत होत्या. आजूबाजूला फक्त शांतता, रस्ता रिकामा पण खडबडीत असल्याने खरंतर जपून जायची गरज होती पण त्या चौघांना कशाचीही पर्वा जाणवत नव्हती. सुसाट धावणाऱ्या बाईक्स, तो निर्जन रस्ता आणि आजूबाजूला जंगल असे वेगळेच कॉम्बिनेशन वाटत होते. रात्र झाली होती आणि त्यात आज अमावस्या त्यामुळे आणखीच अंधार जाणवायला लागला होता. जणू काहीतरी गुढ त्या वातावरणात निर्माण होत होते.

दोन्ही स्पोर्ट्स बाईक्स होत्या. त्यावरची चार मुले जी एकंदर टपोरी याच वर्गात मोडणारे असे जाणवत होते. जगाची पर्वा नाही अशा मस्तीत जे जात होते.

"जय, थांब लेका मला जोराची लागली आहे" समोरील बाईक वरचा मुलगा म्हणाला तसे गचकन ब्रेक दाबत त्याने अचानक थोडी बाजूला घेत बाईक थांबवली. पण मागच्याला काहीच अंदाज नसल्याने खूप प्रयत्न करूनही त्याला त्याची बाईक काही आवरता आली नाही आणि समोरची बाईक वाचविण्याच्या नादात त्याची बाईक बाजूच्या खडकावर धडकली. दोघेही खाली पडले तसे पडलेला लक्ष्य ओरडून म्हणाला " जय, तुला कळत नाही का कशी बाईक चालवायची? गाडीला इंडिकेटर वगैरे आहेत की नाही. तुझ्यामुळे पडलो आम्ही" कसातरी उठत हात दाबत तो ओरडत म्हणाला. त्याच्या हातातून रक्त वाहायला लागले होते.
त्याच्या मागचा तर अजूनही खाली पडून होता त्याच्या डोक्याला मार लागला होता.
"यात माझी काही चूक नाही ....या विकी मुळे झाले.याला जोराची लागली म्हणाला म्हणून मी थांबलो" जय तसंच ओरडत बोलला.

त्यांच्यात थोडी बाचाबाची सुरू झाली. तितक्यात लक्ष्य च्या मागे बसलेल्या जितूने हालचाल केली आणि तो उठून बसला. उठल्या उठल्या त्याला काहीतरी जाणवले, एकंदरीत बराच अंधार पडला होता त्यामुळे त्याची थोडी घाबरगुंडी उडाली.

" जय, लक्ष्य आपण नंतर भांडू... मला विचित्र काही वाटत आहे. आधीच हे जंगल, त्यात रात्र आणि आज तर अमावस्या!"

तसे विकी चेकाळून म्हणाला " बघ बाबा, भूत येईल" तसे तिघे वैतागत त्याच्याकडे बघून " गप्पं बैस" ओरडले.

"आता उठा, आणि पुढच्या मार्गाला लागूयात.
आज रात्री जे काही गाव दिसेल तिथे थांबू आणि पहाटेला पुढे निघू. अजून 300 किलोमिटर जायचे आहे आपल्याला." जितू म्हणाला.

"तरी मी सांगत होतो आज नको निघायला,पण तुम्ही.." असे जय म्हणतच होता की विचित्र प्राण्याचे आवाज यायला लागले.

ती जागा, आजूबाजूचे वातावरण काहीतरी गूढ आहे हे जाणवायला लागले होते. क्षणा क्षणाला काहीतरी बदल घडतोय, कोणीतरी आपल्याला बघतेय याची जाणीव ला व्हायला लागली होती त्यामुळे त्याचा घसा कोरडा पडायला लागला होता.

"जय, विकी, लक्ष्य काहीतरी गोंधळ आहे इथे" जितू कळवळत होता तरी म्हणाला.

त्याला आणि लक्ष्य ला बऱ्यापैकी मार लागला होता. जय ने पुढे होत बाईक उचलायला प्रयत्न केला पण एकट्याला जमत नव्हते शेवटी, विकी ने त्याला मदत केली.
बाईकचा हेडलाईट पूर्ण तुटला होता, मडगार्ड मोडले होते .
त्या दोघांना आता बाईक चालवणे जमणार नाही म्हणून विकी ने हात पुढे करत बाईक घेतली त्याच्यामागे जितू बसला आणि जय मागे लक्ष्य बसला.

लक्ष्यची गाडी काही स्टार्ट होईना तसे आता मात्र यांची घाबरगुंडी उडाली. रात्र पडायला आलेली, सर्वत्र किरर्र अंधार, मदतीसाठी मागमूस नाही त्यात एका गाडीवर चौघे कसे बसणार? शिवाय या बाईकचे काय करायचे? सगळे वैतागले आणि थोडे घाबरले पण विकी मात्र आपल्याच नादात होता.

"काही नाही होणार, मी चालवतो बाईक....पुढे जिथे मदत मिळेल तिथे थांबू आणि बघू काय ते" बेदरकारपणे तो म्हणाला. तसे चिडून तिघांनी त्याला मारायला हात वर केला पण त्या नादात लक्ष एकदम किंचाळलाच कारण त्याच्या हातालाच मारबसला होता.

इथून चालत जाणे तर शक्य नव्हते, कोणी प्राणी दिसला कुठे याची भीती होतीच...
पुन्हा जंगलातला रस्ता त्यामुळे सगळीच गडबड.

जितू ने एकदम वळून पहिले आणि ओरडला "कोण आहे तिकडे झाडामागे?" तसे बाकी तिघे दचकले.
"काय झाले?" लक्ष्य ने विचारले.
"मला वाटतं आहे की कोणीतरी आपल्याला बघतेय, आपल्या मागे येतंय"
"भित्रट कुठला" असे म्हणत विकी हसायला लागला आणि बाईक वर बसून जी चांगली वाली बाईक होती ती स्टार्ट करायला गेला तर इथेही तेच झाले! गाडी सुरूच होईना!

शेवटी पाय दुखेस्तोवर किक मारल्यावर गाडी तर सुरू झाली, तसे अचानक झाडाच्या पानाची सळसळ सुरू झाली, जणू झाडामागून कोणीतरी हसत होते.

आता मात्र तिघेही घाबरले, पश्चात्तापा झाला आज निघण्याचा, पण वेळ निघून गेली होती आता काही पर्याय नव्हता.

जीवाचा हिय्या करत ते कसे बसे विकीच्या मागे बसले.
विकी खूपच निवांत दिसतो होता. तो जणू पेट्रोल टाकीवर बसूनच बाईक चालवणार होता इतका कुल अँगलने टाकी वरती बसून हँडल धरून होता.

अडखळत कशीबशी बाईक निघाली. संपूर्ण अंधारा रस्ता, ज्यावर चिटपाखरूही नाही...आवाज होते फक्त सुसाट वाहणाऱ्या वाऱ्याचे आणि प्राण्याचे आणि सोबत काहीतरी गूढ असल्याची जाणीव होती.

जशी गाडी जागेवरून हलली तसे त्या झाडामागून काजव्यासारखे काहीतरी चकाकले, जणू ते दोन डोळेच होते!

संथ गतीने त्यांची बाईक पुढे जात होती, लक्ष्य चा हात दुखत होता तर जितू चे डोके ठणकायला लागले होते. त्या अंधाऱ्या रस्त्यात दुतर्फा झाडी होती आणि त्यात चमकणारे त्यांच्या सोबतीने जाणारे ते दोन डोळे सुद्धा होते.

काही अंतरावर पुढे जाताच पाण्यासारखा आवाज आला तसे विकी ने गाडी थांबवली. तसे ते तिघे एकदम रागाने म्हणले "काय वेड लागले आहे का तुला? आधीच इथे भीतीने जीव चालला आहे आणि त्यात तू थांबत आहेस?"

त्यांच्याकडे न बघता तो पाण्याच्या आवाजाच्या दिशेने जायला लागला तसे ईच्छा नसूनही ते तिघे सुद्धा त्याच्या पाठीमागे निघाले.

"तुला तर धरून मारला पाहिजे विकी...आता बास झाले...आपण आपली बाईक घेऊन इथून पुढे जाऊयात" जितू चिडून म्हणाला पण विकीच्या कानापर्यंत तो आवाजच पोहचत नव्हता.

त्याच्यावर मोहिनी घातल्या प्रमाणे तो फक्त पुढे चालत होता आणि हे तिघे त्याच्या मागे जात होते.

आडवाटेने चालताना काटे, झाडी त्यांना ओरबडत होती पण याची जाणीव जणू ते विसरत होते. पाण्याच्या आवाजा नुसार त्यांचे चालणे होते. दूरवर कुठेतरी उजेड त्यांना दिसायला लागला तसे ते आणखी वेगाने चालायला लागले.

लांबूनच त्यांना दिसले ते एक बैठे घर! ज्याला भलेमोठे कुंपण आणि उंच दरवाजा होता जो त्यांना आता स्पष्ट दिसत होता.

क्रमशः
©®डॉ. अमित मेढेकर

🎭 Series Post

View all