फेरी - द्वितीय
विषय - तिचं जग
विषय - तिचं जग
(कथा शीर्षक - अनाहिता )
लेखिका - ©® स्वाती बालूरकर, सखी
( भाग -१)
( भाग -१)
संध्याकाळची वेळ , ती समुद्रकाठी बसलेली आहे एकटीच.
समुद्राला भरतं आलं होतं....
किनाऱ्यावर उधाणणाऱ्या लाटा आणि खारा वारा तिला भूतकाळात घेऊन जात होता . .. तिकडेच , जिथे तिला.... या लाटांनी कधीतरी नेलं होतं. . त्या लाटा जणु त्या क्षणिक सुखाची क्षणभंगुरता दाखवून देत होत्या.
अशीच लाट तिच्याही आयुष्यात आली होती जिने तिच्या जीवनाची दिशाच बदलून टाकली होती.
भविष्य तर अजूनही अंधारात होतं!
आयुष्याचं रूप कधी कधी खूप अनाकलनीय होवून जातं, काय हवं होतं अन काय पदरी पडलं कळतंच नाही. ती नव्या जगात हरवून, थकून पुन्हा परत तिच्याच जगात परत आली होती.
बसल्या बसल्या मन भूतकाळात डोकावून आठवणींना ताजं करू लागलं.
आज ती येवून पुन्हा त्याच जागी बसली होती. . ज्या जागी "कधीतरी " संध्याकाळ घालवल्यानेच तिच्या आयुष्याला अनपेक्षित कलाटणी मिळाली होती.
तिच्यासारख्या अशिक्षित मुलीचं काय करीयर किंवा काय सामाजिक जीवन? पण तिने असेही जीवन पाहिले . . अंधारातले , निनावी, . . आणि तिने ते चमकणारे लाईट आणि प्रसिद्धी पण पाहिली.
ज्या प्रसिध्दीची तिला कधी कल्पनाही नव्हती किंवा गरजही नव्हती, आशाही नव्हती, आवडही नव्हती.
पण आताशा या सगळ्या घटनांनंतर. . तिला अंधारच प्रिय वाटू लागला होता किंवा मग हे अनोळखी, अप्रसिद्ध किंवा निनावी आयुष्य आवडायला लागलं , जिथे ती कोणावरच अवलंबून नाही!
पोटाची खळगी भरून. . मरण येईपर्यंत जगायचं एवढाच उद्देश्य घेवून ती आता यापुढे जगणार होती.
दुसरं काहिच नको होतं. . पण हे इतकं सोपं नव्हतं !
दुर्दैव माणसाच्या पाठिशी उभंच असतं जणु. . ते प्रतिक्षेत असतं की जेव्हा माणूस काहीतरी निर्धार करेल तेव्हा घाव कसा घालायचा ?
कदाचित दुर्दैव एखाद्या खलनायका प्रमाणेही असतं जिथे. . . माणूस दुबळा पडला की ते जोर पकडतं आणि दुप्पट तयारीने हल्ला करतं.
त्या लाटा जणु तिला पुन्हा पुन्हा त्या भूतकाळातल्या प्रसंगात घेवून जात होत्या-
असं काय घडलं होतं तिच्या भूतकाळात?
लहानपणीही ती तितकीच सुंदर दिसायची.
वस्तीत सगळेच तिला म्हणायचे. . "तू अप्सरेगत सुंदर हायस !" म्हणून .
आई तर सतत तिचा चेहरा झाकण्याच्या प्रयत्नात असायची. इतक्या दैवी सौंदर्याला कुणाची नजर लागू नये किंवा कुणाची नियत ढळू नये म्हणून काळजी करायची.
तिला आठवायला लागलं की तिच्या लहानपणी तर आई सतत तिला धूळीची व माती-शेणातली कामं सांगायची म्हणजे त्या मळकट , कळकट चेहर्यांमुळे कुणाचे तिच्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून.
आईला वाटायचे ही अप्सरा गरीबाच्या पोटी का जन्मली असेल म्हणून . . सतत देवाकडे मागायची. . हिचं रक्षण कर!
आज एक -एक लाट जुने एक एक प्रसंग नजरे समोर आणत होती.
गरीब आदिवासी भटक्या जमातीतल्या त्या भोळ्या व सरळमार्गी मुलीला त्या लाटा किंवा सुमद्राचे सौंदर्य वगैरे काही कळायचं नाही. पण तिथे रोज जावून बसायची जरा वेळ!
फक्त संध्याकाळी तिथे बसल्यावर मनाला शांत वाटते आणि दिवसभराचा शीण जातो एवढंच तिला कळत होतं.
दिवसभर जंगलातल्या काटक्या तोडून , कधी मोळी विकून तर कधी झाडपाला पुरवून पोटाची खळगी भरणार्या तिला. . कला,प्रतिभा किंवा कलात्मकता कशाशी खातात हे कुठलं कळणार!
पण सुदैव की दुर्दैव जणु तिच्या मागावरच होतं !
त्या एका संध्याकाळीही ती अशीच समुद्रकिनारी शांत बसलेली!
कुण्या एका तरूणपणाच्या नशील्या संध्याकाळी ती तिथे बसलेली व "तो"- हो, तिच्या जीवनातला नायकच जणु , असाच तर तिथे- तो तिला भेटला होता.
तो पण समुद्र किनारी यायचा , दूर खडकावर बसायचा.
एकदा त्याने तिला तिकडे शांत बसलेली पाहिली.
मग काय त्याला जणु नादच लागला , समुद्र किनारी बसून तिला फक्त एकटक बघायचा. . त्या स्वर्गीय सुंदर , निरागस मुलीला. . मुलगी काय आता तरूणीच होती ती. . अठराव्या वर्षात पदार्पण केलेली.
एकदा त्याने तिला तिकडे शांत बसलेली पाहिली.
मग काय त्याला जणु नादच लागला , समुद्र किनारी बसून तिला फक्त एकटक बघायचा. . त्या स्वर्गीय सुंदर , निरागस मुलीला. . मुलगी काय आता तरूणीच होती ती. . अठराव्या वर्षात पदार्पण केलेली.
त्याचं ते अपलक निहारणं जणु तिला लक्षात आलं कधीतरी आणि आत कुठेतरी चुभत राहिलं.
ती भेदक नजर मूकपणे खूप काही सांगून जायची.
ती समुद्रकिनारी खडकावर बसलेली आणि तिच्या भूतकाळात हरवलेली होती
असं आठ दहा -दिवस चालत राहिलं.
आणि त्या संध्याकाळी काहितरी घडलं. . .
म्हणजे -
त्याच संध्याकाळी एका लाटेने अचानक तिला भिजवलं . .अन तिने चेहरा वळवून हाताने लाट थांबवण्याचा प्रयत्न केला. . . अन तो मूक चाहता. . . . तो कलाकार जणु स्वप्नातून वास्तवात आला . . अचानक बोलला. .
"म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात आहात तर. . जिवंत. . तरूणी?"
" अं?". तिला काहीच कळालं नाही.
"मी तर तुम्हाला एखादी मूर्ति समजलो , एक अप्रतिम कलाकृती किंवा मग . . जिवंत चित्र!. . तुम्हाला कळतंय का, मी काय बोलतोय ते ? "
"मंजी?"
"असो . . तर गेल्या दहा दिवसांपासून केवळ तुम्हाला पाहण्यासाठी शहरापासून दूर या समुद्रकिनारी २५ कि.मी. प्रवास करून मी येतोय. . . तुम्हाला पाहून निघून जातो. . त्यावेळी कधीच तुम्ही काही हालचाल केली नाही. ! पण आज एकदम हात हलवलात. . . काय सांगू तो क्षण माझ्या डोळ्यांनी असा टिपून घेतलाय."
तो मनातलं घड घड बोलून गेला पण ती मात्र कोर्या चेहर्याने उभी होती.
"अरे देवा! हिला मराठी समजत नाही , येत नाही की काय. . पण ती राहते महाराष्ट्रात ना मग . . मराठी. .?"
त्याने निरखून पाहिलं तर ती बहुतेक आदिवासी असावी किंवा मग अशिक्षित असावी. . हा अंदाज तर त्याला आला होता.
मग त्याने तिला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न केला तो शुद्ध मराठीत समजावत होता आणि ती नुसतीच त्याच्या डोळ्यात पाहत होती.
त्याच्या एकंदर सांगण्यावरून तिला एवढं तरी कळालं की \"ती सुंदर आहे आणि ती त्याला आवडली\" असं काहीतरी तो म्हणत असावा.
पण काहीही उत्तर न देता ती परत निघाली. पुढे गेली तर तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीला आवाज देत राहिला.
पुढच्या क्षणी त्या जंगलात लुप्त होण्यापूर्वी वेळूच्या झाडांजवळ ती थांबली , अन हळूच तिने पळता पळता वळूनही पाहिल.
आता मात्र त्याच्यातला जातिवंत चित्रकार जागी झाला होता.
पळताना वळून मागे बघतानाची मुद्रा जणू त्याच्या डोळ्याच्या कॅमेरात कैद झाली होती.
यापूर्वीची एक मुद्रा डोळ्यात कैद होती-
जेव्हा तिच्या अंगावरती एक मोठी लाट आली होती आणि तिने हाताने थांबवण्याचा प्रयत्न केला होता एक ती मुद्रा आणि आताची ही . . . दोन्ही मुद्रा. . ! मनात खोलवर रुतल्या. अप्रतिम सौंदर्य!
तो परतला पण आज तो नेहमीप्रमाणे हताश किंवा उदास नव्हता.
त्याच्यात कुठल्यातरी ऊर्जेने संचार घेतला होता.
परत आल्या आल्या तो आपल्या आर्ट स्टुडिओत म्हणजे त्याच्या खोलीत गेला आणि त्याने सरळ पेंटिंग बनवायला घेतलं.
भान हरपून तो तिचं पोट्रेट बनवत होता. ती समोर नव्हती तरीही!
लांबून पळतानाची, पण वळून पाहतानाची मुद्रा खूप सुंदर टिपता आली होती.
कारण ती दूर गेल्यावरची होती त्यात तिच्या चेहऱ्यावरचे भाव दुरून समजत नव्हते पण तिचा कमनीय बांधा , तिची ती वळून बघण्यातली निरागसता सगळंच कसं जिवंत चित्रित झालं होतं. एकंदर काय तर एक अप्रतिम पेंटिंग त्याच्यातून तयार झालं होतं.
आता ते सगळंच विसरून तो पुढची पेंटिंग करायलाही बसला.
कारण हे कठिण होतं . . .
त्याचा आवडता समुद्र, दहा दिवसांपासून तो पाहतच होता . . आणि तिची पण एका मूर्तीप्रमाणे समुद्राच्या लाटांना मुग्ध होवून पाहत बसलेली मुद्रा त्याने नजरेत कैद करून ठेवली होती.
परंतु स्केच चं आऊटलाईन बनविताना तिची हवी ती मुद्रा आठवेचना.
अंगावर लाट आली तेव्हा तिने उचललेला हात आणि फिरवलेला चेहरा मात्र तो पुन्हा पुन्हा आठवू लागला.
तिच्या विचारात मग्न असणार्या दिग्विजयला तिच्या चेहऱ्याची बारीकी टिपता येईना.
त्याने कंटाळून ते चित्र अर्धवट सोडलं होतं.
डोळ्या वसलेला तो समुद्र व तो सुर्यास्त मात्र खूप सुरेख उतरले होते पण त्या खडकावर बसलेली ती केवळ एक आकृती होती.
ही पेंटिंग पूर्ण करणं हे जणु त्याच्या आयुष्याचं ध्येय झालं होतं.
इतके दिवस तिला पाहिल्यावर बनवावं वाटलेलं पेंटिंग !
एव्हाना रात्रीचे साडेअकरा वाजत आले होते.
ब्रेड बटर भाजून खाण्याशिवाय पर्याय नव्हता.
त्या रात्री तिची ती पळताना वळून पाहिलेले मुद्रा पुन्हा पुन्हा त्याच्या समोर येत होती आणि समुद्रकिनारी बसलेलं तिचं चित्र तो पूर्ण करू शकला नाही याची एक बेचैनी पण होती.
त्याने ठरवलं दुसऱ्या दिवशी सगळ्या सामानसहित रंगांसहित तिथे जायचं आणि तिला पाहतानाच चित्र बनवायचं . . समोरासमोर!
पण ती येईल का?
हा ही एक अवघड प्रश्न मनात होता.
तो जोपर्यंत बोलला नव्हता तेव्हा तिला कल्पनाही नव्हती की तो लांबून रोज तिला पाहतोय किंवा तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं.
परंतु आज तो तिच्याशी बोलला होता आणि काहीतरी तिला सांगू पाहत होता
त्यामुळे कदाचित ती उद्या येईल की नाही , ही शंका देखील होती.
सकाळ झाली .
मनात सतत तिचाच विचार!
दिवसभर त्यांने त्याच्या स्टुडिओमध्ये काम केलं लोकांच्या भेटी घेतल्या , पण मन फक्त संध्याकाळची वाट पाहत होतं.
संध्याकाळी गाडी घेऊन तो तिकडेच निघाला.
शांत समुद्राचा किनारा, बाजूला घनदाट जंगल व संध्याकाळ !
हा किनारा शहरापासून वीस पंचवीस किलोमीटर दूर असला तरीही इकडे कुणाचीच वर्दळ नव्हती कारण कुणाला हा भाग माहित नव्हता.
आनंदी मनाने व खूप दबक्या पावलाने तो आला.
ती येण्याच्या अगोदरच तो येऊन बसला होता.
त्याची ठरलेली वेळ झाली , ती नेहमीप्रमाणे आली पण लगेच खडकावर बसली नाही.
आज तिने सगळीकडे नजर फिरवली. यापूर्वी ती सरळ येऊन एका खडकावरती बसून जायची आणि एक टक ध्यान लावून समुद्राला पाहत राहायची. मग ती शांतपणे तिथे बसली. बुडणार्या सूर्याशी जणु कसलं हितगुज करत होती.
आज कदाचित तिथेच चित्र बनवावे लागेल या विचाराने तो गाडीतून हळूच उतरला, आपलं स्टॅन्ड आणि कालचा अर्धवट पेंटिंग त्याच्यावर ठेवलं आणि एकटक तिला पाहू लागला.
एक बदल होता की आजची तिची मुद्रा स्थिर होत नव्हती. ती चंचलपणे सतत हालचाल करत होती.
त्याच क्षणी कालच्या प्रमाणे खूप मोठी लाट तिच्या अंगावर आली व तिने हाताने तिला थांबवलं !
हेच तर हवं होतं!
क्रमशः
लेखिका - ©® स्वाती बालूरकर, सखी
दिनांक १३.०२ .२०२३
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा