Jan 26, 2022
नारीवादी

'ती'चा संघर्षमय प्रवास भाग १

Read Later
'ती'चा संघर्षमय प्रवास भाग १
\"ती\"चा संघर्षमय प्रवास भाग १

कांचन ताईंची मुलाखत घेण्यासाठी सारिका त्यांच्या घरी बरोबर सकाळी ९ वाजता पोहोचली होती. कांचन ताई वेळेच्या बाबतीत खूप काटेकोर होत्या, याची कल्पना सारिकाला असल्याने ती वेळेत त्यांच्या घरी गेली होती. सारिकाला आपल्या घरी वेळेत बघून कांचन ताई हसून म्हणाल्या,
"सारिका ९ चा काटा मागेपुढे होऊ दिला नाहीस, बरोबर वेळेत आलीस."

यावर सारिका म्हणाली,
"ताई तुम्ही वेळेच्या बाबत किती काटेकोर आहात, याची कल्पना मला आहे. तुमची मुलाखत घ्यायची असल्याने तशीही रात्रभर मला झोप आलीच नाहीये."

कांचन ताई पुढे म्हणाल्या,
"तु मला घाबरते की काय?"

सारिका म्हणाली,
"तसं नाही ताई, पण तुमच्या सारख्या एवढ्या मोठ्या लेखिकेची मुलाखत घेणं म्हणजे सोपं काम नाहीये, त्यासाठी संपूर्ण गृहपाठ करुन यावा लागतो. तुमच्या हजरजबाबी स्वभावाची कल्पना मला आहेच. शिवाय तुम्ही स्वतःहून फोन करुन मला मुलाखत घेण्यासाठी बोलावलं आहे."

कांचन ताई म्हणाल्या,
"तु आजवर घेतलेल्या मुलाखतींचे लेख मी वाचले आहे आणि म्हणूनच मी तुला बोलावून घेतले आहे. तु जे आहे ते लिहितेस. बाकीच्या पत्रकारांसारखं वाढवून लिहीत नाहीस. बरं आपण आता मुलाखतीला सुरुवात करुयात का?"

सारिका म्हणाली,
"हो ताई, आपण मुलाखतीला सुरवात करुयात. ताई माझा पहिला प्रश्न असा आहे की, आजवर तुम्ही अनेक पुस्तकं लिहिली आहेत,पण ते पुस्तक प्रकाशित होण्याआधी त्या पुस्तकाची माहिती वर्तमानपत्रात छापून यावी असं तुम्हाला कधीच वाटलं नाही. आता जे तुमचं पुढील पुस्तक प्रकाशित होणार आहे, त्याबद्दल वर्तमानपत्रात त्याचा सारांश छापावा असं तुम्हाला का वाटत आहे? असं या पुस्तकात वेगळं काय आहे?"

कांचन ताई म्हणाल्या,
"तुझा हाच पहिला प्रश्न असेल, याची कल्पना मला होतीच. आजवर मी अनेक पुस्तके लिहिली पण ती सगळी काल्पनिक होती, त्यात कमीत कमी वास्तवदर्शी घटना होत्या. मात्र हे पुस्तक जे लिहिलं आहे, ते वास्तवदर्शी आहे. सारिका ह्या पुस्तकातील सर्व घटना एका व्यक्तीच्या आयुष्यात घडून गेलेल्या आहेत. या पुस्तकाच्या नावावरुन सर्वांच्या लक्षात येईलच की, हे पुस्तक एका स्त्रीच्या आयुष्यावर लिहिलं गेलेलं आहे. या पुस्तकाचे नाव आहे, \"ती\"चा संघर्षमय प्रवास.

ह्या पुस्तकाचा सारांश वर्तमानपत्रात का छापून यावा? असा तुझा प्रश्न होता. तर याचे उत्तर आहे की,मुलाला मोबाईल घेईन दिला नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. मुलीला तिच्या आवडत्या मुलासोबत लग्न करण्यास घरच्यांनी नकार दिल्याने आत्महत्या केली. सासरच्या जाचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली. अशा अनेक बातम्या आजकाल आपल्याला ऐकायला मिळतात.

माझी एक समुपदेशन करणारी मैत्रीण आहे, ती मला अनेक घटना सांगत असते. आयुष्यात थोडं काही मनाविरुद्ध घडलं की हल्लीची तरुण पिढी डिप्रेशन मध्ये जाते, त्यांचे असे म्हणणे असते की, आमच्या सोबत सगळं वाईट का घडतं? आम्हीच हा सगळा त्रास का सहन करायचा?

सारिका माझ्यामते हल्लीच्या तरुण पिढीमध्ये परिस्थिती विरोधात संघर्ष करण्याची तयारीच नाहीये ग, आपलं सगळं काही व्यवस्थित आणि वेळेतच व्हायला पाहिजे असं सर्वांना वाटत असते. आयुष्यात जर सर्व गोष्टी वेळच्या वेळी मिळाल्या तर ते आयुष्य जगण्यात तरी काय अर्थ असेल? 

सारिका माझी आई मला नेहमी म्हणायची ग, कांचन तुझ्या आयुष्यात कधी कठीण प्रसंग आला ना, तर त्यावेळी आपल्या खालच्या लोकांकडे बघायचं, ते किती व कसा संघर्ष करतात हे बघायचं, तेव्हा आपल्या पुढ्यात उभे असलेले संकट आपल्याला काहीच वाटत नाही.

माझ्या या पुस्तकात अश्याच एका स्त्रीची संघर्ष कथा आहे, ती स्त्री अजूनही हयातीत आहे. आजही ती स्त्री जगण्यासाठी संघर्ष करत आहे. आज ती जे आयुष्य जगत आहे, तिच्याकडे बघून असं वाटणार सुद्धा नाही की ह्या स्त्रीला तिच्या आयुष्यात इतक्या संघर्षाला सामोरे जावे लागले असेल.

मला वाटतं की आजच्या तरुण पिढीतील मुलींना, स्त्रियांना ज्यांना कोणाला वाटेल की आपण खूप कठीण आयुष्य जगत आहोत, तर त्यांनी सर्वांनी हे पुस्तक नक्की वाचावे, त्या सर्वांना यातून त्यांचं आयुष्य जगण्यासाठी नक्की उमेद मिळेल."

सारिका पुढे म्हणाली,
"ताई तुम्ही जे सांगितलंत ते अगदी बरोबर आहे. आमच्या पिढीत संयम नावाची गोष्टच राहिली नाहीये. हल्ली धावपळीच्या जगात वाट बघणे हे कोणालाच आवडत नाही.

तुम्ही ज्याप्रमाणे या पुस्तकातील स्त्रीचं वर्णन केलं आहे, ते ऐकून मला पुस्तक लगेच वाचायची इच्छा झाली आहे. पण ताई तुम्ही जर या पुस्तकातील कथा तुमच्या तोंडून सांगितलीत तर मला त्याबद्दल लिहिणे अधिक सोपे जाईल."

कांचन ताई म्हणाल्या,
"नक्कीच मी ह्या पुस्तकातील \"ती\"च्या संघर्षमय प्रवासाची कथा तुला सांगते. अगदी सुरुवातीपासून मी या कथेला सुरुवात करते.

ह्या पुस्तकातील तिचे नाव आहे, \"नर्मदा\". नर्मदाचा जन्म १९८३ साली झाला. नर्मदा एका गरीब कुटुंबात जन्माला आली. नर्मदा हे तिच्या आई वडिलांचं पहिलं अपत्य होती. नर्मदाचा जन्म झाला, त्यावेळी तिचे आई वडील एकत्र कुटुंबात गावी राहत होते. नर्मदाचे वडील शेतीत रोजाने कामाला जायचे. नर्मदा लहान असल्याने तिच्या आईला कामाला जाणे जमत नव्हते, त्यामुळे घरातील इतर बायका म्हणजे नर्मदाची आजी, काकू ह्या तिच्या आईला सतत टोमणे मारायच्या. नर्मदाची आई आयतं खाते असं त्या सतत म्हणायच्या. नर्मदाची आई घरातील सर्व कामे करायची तरीही त्यांचे टोमणे चालूच असायचे. 

नर्मदाचे वडील शांत स्वभावाचे असल्याने त्यांचं त्यांच्या आई वडीलांसमोर काहीच चालायचं नाही. दररोज करुन आणलेली कमाई ते आई वडिलांच्या ताब्यात देऊन टाकायचे, हे नर्मदाच्या आईला पटत नव्हते. नर्मदा सहा महिन्यांची झाल्यावर तिची आई शेतात रोजाने कामाला जायला लागली. झाडाच्या सावलीला साडीची झोळी बांधून नर्मदाची आई तिला त्यात झोपवत असे. कामाच्या नादात बऱ्याचदा तिच्या आईचे तिच्याकडे दुर्लक्ष व्हायचे. नर्मदा झोपेतून उठून भुकेने व्याकूळ व्हायची, रडून रडून थकून पुन्हा झोपून जायची तरी तिच्या आईचे तिच्याकडे लक्ष जात नव्हते. नर्मदाचा संघर्ष इथूनच सुरु झाला असा म्हणावा लागेल.

नर्मदा दोन वर्षांची झाल्यावर तिला एक लहान बहीण झाली. दुसरी मुलगी जन्माला आल्याने नर्मदाचे आजी आजोबा तिच्या आईचा रागराग करायला लागले, त्यांना वंशाला दिवा म्हणून नातू पाहीजे होता. नर्मदाचे आजी आजोबा यावरुन तिच्या आईला सतत घालून पडून बोलत असायचे. नर्मदाच्या वडिलांचा स्वभाव शांत असल्याने ते आपल्या बायकोच्या बाजूने कधी काहीच बोलत नव्हते. नर्मदाच्या आईचा संयम संपल्याने ती आपल्या लहान बाळाला घेऊन माहेरी निघून गेली. नर्मदाला मात्र तिच्या वडिलांकडेच सोडून गेली. 

बिचारी तीन वर्षांची पोरं नर्मदा आईच्या मायेविना वाढली. नर्मदाची आजी तिचा सतत रागराग करायची, तिला वेळेत जेवायला द्यायची नाही. नर्मदाचे होणारे हाल बघून तिची आत्या आपल्या सोबत तिला घेऊन गेली. पुढील काही वर्ष नर्मदा तिच्या आत्याकडे राहिली. नर्मदाच्या आत्त्याने तिला शाळेत टाकले. त्यानंतर पुढील काही वर्ष नर्मदा तिच्या काका काकूंकडे राहिली.

नर्मदाचे आई वडील जवळजवळ चार वर्ष वेगळे राहत होते. चार वर्षांनंतर नर्मदाचे आई वडील गाव सोडून पिंपरीत रहायला गेले, त्यांनी त्यांचा वेगळा संसार थाटला होता. नर्मदाला आई शिवाय रहाण्याची सवय लागल्याने ती आई वडिलांकडे जायला तयार नव्हती. नर्मदाचे वडील तिला अनेकदा घ्यायला यायचे,पण ती सरळसरळ नकार द्यायची. 

एकदा असेच नर्मदाचे वडील तिला घरी येण्यासाठी आग्रह करत होते, तर तिने उलट त्यांनाच प्रश्न विचारला,
"बाबा इतक्या दिवस तुम्ही मला तुमच्या पासून वेगळे ठेवले, तर आज मला तुम्ही घरी येण्यासाठी आग्रह का करत आहात? माझी आई मला भेटायला सुद्धा नाही तर मी का घरी परत येऊ?"

यावर नर्मदाचे वडील काय बोलणार होते? त्या एवढ्याशा जीवाला काय सांगणार होते? म्हणून ते नर्मदाला न घेता निघून गेले. नर्मदाला तिच्या काका काकूंकडे रहायची सवय लागली होती. नर्मदाची काकू तिला आपल्या सख्ख्या मुली प्रमाणे प्रेम देत होती. नर्मदाची काकू तिला घरातील कोणत्याही कामाला हात लावू देत नव्हती. 

नर्मदाच्या आयुष्यात अजून काय घडले असेल? हे बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now