'ती'चा संघर्षमय प्रवास भाग ८

Prakash's Real Face Comes In Front Of Narmada

'ती'चा संघर्षमय प्रवास भाग ८


आपण मागील भागात बघितले की, नर्मदाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी प्रकाश तिच्या माहेरी येतो. नर्मदाच्या आई वडिलांनी आग्रह केल्याने तो तिच्या घरी मुक्काम करायला तयार होतो. नर्मदाची आई तिला चार समजुतीच्या गोष्टी सांगते. नर्मदाला माहेरुन निघताना डोळयात आलेलं पाणी बघून प्रकाशने तिला आश्वासन दिले की, तुला आपल्या घरी मी कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. नर्मदा सासरी गेल्यावर तिची सासूबाई घरातील नियम तिला सांगते, तसेच सकाळचा स्वयंपाक करण्याची जबाबदारी नर्मदाला देण्यात येते.


आता बघूया पुढे….


नर्मदा सकाळी लवकर उठून अंघोळ करुन स्वयंपाक घरात जाऊन सासऱ्यांसाठी चहा तयार करते व नर्मदा चहा घेऊन सासऱ्यांना द्यायला जाते. सासऱ्यांचा चहा पिऊन होईपर्यंत नर्मदा तिथेच उभी राहते. आपण केलेला चहा त्यांना आवडतो की नाही, हे बघण्यासाठी ती तिथेच उभी राहिली होती. सासऱ्यांचा चहा पिऊन झाल्यावर नर्मदा म्हणाली,


"आप्पा चहा कसा झाला होता? तुम्हाला आवडला का?"


आप्पा तोंड वाकडं करुन म्हणाले,

"बरा होता, उद्यापासून माझ्यासाठी चहा करु नकोस."


नर्मदा मान हलवून त्यांच्या समोरुन स्वयंपाक घरात निघून गेली, कारण वडीलधाऱ्या व्यक्तींना उलट प्रश्न विचारण्याची मुभा त्यांच्या घरी नव्हती. आपल्या हातचा चहा आप्पांना आवडलेला दिसत नाही, हे नर्मदाच्या डोक्यात चालू होते. स्वयंपाक करायचा असल्याने नर्मदा पुढच्या कामाला लागली. घरातील एवढ्या माणसांसाठी नर्मदाला वीस ते पंचवीस भाकरी कराव्या लागल्या. दोन मोठ्या कढई भरुन दोन प्रकारच्या भाज्या तिने बनवल्या. सासूबाई स्वयंपाक घरात येईपर्यंत नर्मदाचा सगळा स्वयंपाक तयार होता. सासूबाई स्वयंपाक घरात आल्यावर नर्मदा म्हणाली,


"ताई पूर्ण स्वयंपाक झाला आहे."


नर्मदाच्या सासूबाईने भाकरी हातात घेऊन बघितल्या, तसेच कढईतील भाज्या कितीतरी वेळ न्याहाळल्या. नर्मदाला वाटलं होतं की, ताई माझं कौतुक करतील, पण त्या काहीच बोलल्या नाही. स्वयंपाक घरातून बाहेर पडता पडता तिच्या सासूबाई म्हणाल्या, 


"तुझं इथलं काम आवरलं असेल, तर प्रकाशला चहा घेऊन जा, तो केव्हाचाच उठला आहे. प्रकाशला उठल्या उठल्या चहा पिण्याची सवय आहे."


नर्मदाने घाईघाईने प्रकाश साठी चहा तयार केला व प्रकाशला चहा देण्यासाठी आपल्या खोलीत गेली. नर्मदा खोलीत गेल्यावर प्रकाशकडे बघून गालातल्या गालात हसली, पण प्रकाश मात्र तिच्याकडे रागाने बघत होता. नर्मदाने प्रकाशच्या हातात चहाचा कप दिला आणि अंथरुण पांघरुणाच्या घड्या घालत बसली. चहा पिऊन झाल्यावर प्रकाशने रिकामा कप नर्मदाच्या हातात टेकवला. प्रकाशच्या चेहऱ्यावरील राग बघून नर्मदा म्हणाली,


"तुम्हाला चहा आवडला नाही का? माझ्याकडे असे रागाने का बघत आहात?"


प्रकाश मोठ्या आवाजात म्हणाला,

"झोपेतून उठल्या उठल्या मला चहा पिण्याची सवय आहे. झोपेतून उठून मला अर्धा तास झाल्यावर तु चहा घेऊन आलीस."


यावर नर्मदा म्हणाली,

"अहो सकाळपासून माझा हात रिकामा आहे. एवढ्या माणसांसाठी स्वयंपाक करायचा म्हणजे भरपूर वेळ लागतो. कामामध्ये मला तुम्ही उठले की नाही हे कसं समजणार? तुम्ही झोपेतून उठल्यावर स्वयंपाक घरात चहा घेण्यासाठी आला असतात, तरी चाललं असतं."


नर्मदाचं बोलून पूर्ण होत पण नाही, तोच प्रकाश तिच्याजवळ गेला आणि जोरात तिच्या कानफटात मारली. नर्मदाच्या हातातून कप जमिनीवर पडून फुटला. प्रकाशचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. नर्मदाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या.

प्रकाश मोठ्या आवाजात म्हणाला,

"नवऱ्याला उलट उत्तर द्यायचं नसतं, हे तुला तुझ्या आई बापाने शिकवलं नाही का? माझ्याकडे बघत काय बसलीस? कपाचे तुकडे उचल आणि घरातील काम कर, ते करायला तुझी आई येणार नाहीये." 


नर्मदा डोळे पुसत पुसत कपाचे तुकडे गोळा करुन खोलीबाहेर निघून गेली. नर्मदा स्वयंपाक घरात गेल्यावर तिची जाऊबाई सुमन तिथेच बसलेली होती. नर्मदाच्या डोळ्यातील पाणी बघून ती म्हणाली,


"नर्मदा ह्या घरातील सगळयाच पुरुषांचा राग डोक्यात जातो. प्रकाश भाऊजी सगळयात जास्त रागीट आहेत. आता हे रोजचंच असेल, अशी मनाची तयारी करुन घे."


नर्मदा काही न बोलता आपलं काम करत राहिली. कपडे धुत असताना नर्मदाच्या मनात विचार आला की, हा तोच प्रकाश आहे का? ज्याने आपल्याला या घरात काही त्रास होणार नाही, हे आश्वासन दिले होते. लग्न झाल्यापासून प्रकाश आपल्या सोबत किती व्यवस्थित वागत होता. प्रकाश जे आज वागला, हे त्याचे खरे रुप आहे की, कालपर्यंत जे वागत होता, ते खरे रुप होते. नर्मदाने हा विचार करता करताच कपडे धुतले आणि भांडी घासली. नर्मदा जेवण न करता आपल्या खोलीत निघून गेली. नर्मदा जेवली की नाही, याची घरातील इतर कोणी चौकशी सुद्धा केली नाही. 


खोलीत एकटी जाऊन बसल्यावर नर्मदाला खूप रडायला येत होते, तिला तिच्या आई वडिलांची आठवण येत होती. लग्न करताना नर्मदाने जी स्वप्नं पाहिली होती, ती एका क्षणात मोडल्यासारखी तिला जाणवली. प्रकाश दिवसभर घरी आलेला नव्हता. संध्याकाळी सासूबाईने जी कामं सांगितली, ती नर्मदाने केली. दिवसभर अन्नाचा एक कण पोटात न गेल्याने तिला खूप भूक लागली होती, म्हणून ती इच्छा नसताना सुद्धा रात्री जेवली. 


रात्रीचे दहा वाजून गेले होते, तरी प्रकाशचा पत्ता नव्हता. प्रकाश कुठे गेलाय? हे नर्मदा कोणाला विचारु शकत नव्हती. घराजवळ दारुची भट्टी असल्याने सगळे दारुडे तिथं येऊन दारु पित होते. प्रकाशचा भाऊ आणि वडील दोघांनी दारु प्यायलेली होती. नर्मदासाठी ते वातावरण नवीन होते, तिला त्या दारुच्या वासात गुदमरत होते. घरातील कामं आवरुन नर्मदा आपल्या खोलीत जाऊन बसली. प्रकाशची वाट बघत तिला कधी झोप लागली हे कळालेच नाही. 


रात्री बाराच्या दरम्यान नर्मदाला आपल्या खोलीत कोणीतरी आलंय, याचा भास झाला म्हणून तिने डोळे उघडून बघितले, तर प्रकाश दारुच्या नशेत बडबडत तिच्या शेजारी येऊन झोपला होता. प्रकाशचा दारुचा वास तिला नकोसा झाला होता. साडीचा पदर नाकाला पक्का गुंडाळून ती झोपण्याचा प्रयत्न करु लागली. दिवसभर थकल्याने नर्मदाला काही वेळाने झोप लागली.


दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर प्रकाशने असा आव आणला की, रात्री जणू काही झालेच नव्हते. नर्मदाला प्रकाश सोबत बोलण्याची भीती वाटायला लागल्याने ती त्याच्या सोबत काहीच बोलायची नाही. प्रकाश दिवसभर कुठे जायचा? हे नर्मदाला कोणीच सांगितले नव्हते. प्रकाश दररोज रात्री दारु पिऊन निम्म्या रात्री घरी यायचा. नर्मदाला दारुच्या वासात झोपण्याची जणू काय सवय लागून गेली होती. निम्म्या रात्री आल्यावर प्रकाश नर्मदावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करायचा. एवढीशी पंधरा- सोळा वर्षांची ती मुलगी प्रकाशचा कसा प्रतिकार करु शकणार होती? नर्मदाला काय वाटतं? याच्याबद्दल प्रकाशला काहीच देणंघेणं नव्हतं. 


दिवसभर नर्मदाला सासू व जाऊबाईची बडबड, टोमणे ऐकावे लागायचे आणि रात्री प्रकाशचा अत्याचार सहन करायचा. प्रकाश ज्या दिवशी दिवसभर घरी असेल, त्यादिवशी तो सतत झोपून असायचा. प्रकाश काही काम करताना नर्मदाला कधीच आढळला नाही. प्रकाश त्याच्या तीन चार टवाळखोर मित्रांबरोबर गावभर उंडारत बसायचा. 


आपल्याला प्रकाशच्या घरच्यांनी फसवले आहे, हे नर्मदाला आतापर्यंत कळून चुकले होते. नर्मदा सोबत घरातील कोणीच प्रेमाने बोलत नव्हते. नर्मदाने केलेलं कोणतंच काम तिच्या सासूबाईला पटत नव्हते. नर्मदाला हे सगळं तिच्या आई वडिलांना सांगायची इच्छा होत होती, पण नर्मदाच्या सासरी व माहेरी दोन्हीकडे फोन नव्हता, तेव्हा तिला तिच्या आई वडिलांसोबत कसं बोलायचं? हा प्रश्न तिला पडला होता. नर्मदाला एकटीला घराबाहेर पडायला मनाई होती, त्यामुळे गावातील कोणाच्या मदतीने तिला तिच्या आई वडिलांपर्यंत निरोप पोहचवता येत नव्हता.


नर्मदाचं एक मन म्हणायचं की, आपल्या आई वडिलांना सगळं खरं सांगून द्यावं आणि दुसरं मन म्हणायचं की, त्यांना खरं ऐकून किती त्रास होईल? नर्मदा स्वतःचं मन मारुन जगायला शिकली होती.


नर्मदाच्या आयुष्यात पुढे काय होईल? हे बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe







🎭 Series Post

View all