'ती'चा संघर्षमय प्रवास भाग ७

Real Struggle Story Of One Woman

'ती'चा संघर्षमय प्रवास भाग ७


आपण मागील भागात बघितले की, हरी काकांनी समजावून सांगितल्यावर नर्मदाचे बाबा नर्मदासाठी मुलगा बघायला जायला तयार झाले. मुलाच्या घरी गेल्यावर नर्मदाच्या बाबांना मुलगा पसंत पडला. सगळयांच्या पसंतीने नर्मदा व प्रकाशचे लग्न पार पडले. प्रकाश नर्मदाच्या आयुष्यात नवीन पहाट घेऊन आला होता. नर्मदाने तिच्या आयुष्यात आजवर जे सुख अनुभवले नव्हते, ते तिला प्रकाश सोबत अनुभवायला मिळाले होते. प्रकाश सोबत लग्न करुन नर्मदा एकदम सुखात होती.


आता बघूया पुढे….


प्रकाश नर्मदाला घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी आला होता. नर्मदाच्या वडिलांनी खूप आग्रह केल्याने तो नर्मदाच्या घरी मुक्काम करायला तयार झाला होता. रात्री सर्वांची जेवणं झाल्यावर नर्मदाचे वडिल व प्रकाश फेरफटका मारायला बाहेर गेले होते. नर्मदा आईला स्वयंपाकघरातील पसारा आवरायला मदत करत होती.


आई नर्मदाला म्हणाली,

"नर्मदा उद्या तु तुझ्या सासरी जाणार आहेस. आता सारखं सारखं इकडे येण्याचा हट्ट करायचा नाही. तुझे नव्याचे नऊ दिवस संपले आहेत. उद्यापासून तुझ्या संसाराला खरी सुरुवात होईल. सासूबाई जे सांगतील ते गुपचूप ऐकून घ्यायचं, त्यांना उलट उत्तर द्यायचं नाही. घरातील सगळयांच्या आवडीनिवडी जपायच्या. घरातील वडीलधाऱ्या माणसांसमोर जातांना डोक्यावर पदर घेऊन जायचा. नवऱ्याचं मन जपायचं. प्रकाशराव कामावरुन आल्यावर त्यांची तुझ्यावर चिडचिड होऊ शकेल, तर ते सहन करायचं. पुरुषांच्या डोक्यात अनेक विचार चालू असतात, म्हणून त्यांची चिडचिड होऊ शकते. आपलं हक्काचं माणूसचं आपल्यावर रागावतं, चिडतं. 


घरातील चार कामं करावी लागली, तर काही बिघडत नाही. जाऊबाईला धरुन रहायचं. सगळ्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न कर. आपलं एकदा लग्न झाल्यावर आपल्याला माघारी फिरता येत नाही. सासर कसंही असलं तरी आपल्या आयुष्याचा शेवट आपल्याला तिथेच करावा लागतो."


नर्मदा म्हणाली,

"आई माझ्या जाऊबाईने व सासूबाईने मला घरातील कोणत्याच कामाला हात लावू दिला नव्हता, त्या दोघीही स्वभावाने चांगल्या वाटल्या."


नर्मदाची आई म्हणाली,

"अग त्या दोघी चांगल्याचं आहेत, पण एका घरात रहायचं म्हणजे भांडयाला भांड लागणारचं ना. मी हे सगळं तुला का सांगत आहे? याचा अर्थ तुला पुढे जाऊन कळेल."


नर्मदा म्हणाली,

"आई माझी तक्रार तुमच्यापर्यंत येणार नाही, याची काळजी मी घेईल."


दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण करुन प्रकाश व नर्मदा आपल्या गावी जायला निघाले. आपल्या घरुन निघताना नर्मदाचे डोळे पाणावले होते. गाडीत बसल्यावर प्रकाश नर्मदाला म्हणाला,


"तुला अजून काही दिवस माहेरी रहायचं होतं का?"


नर्मदा म्हणाली,

"नाही."


"मग घरुन निघताना तुझ्या डोळयात पाणी का आलं होतं?" प्रकाशने विचारलं.


नर्मदा म्हणाली,

"आपल्या आईवडिलांच्या घरुन निघताना थोडंफार तर वाईट वाटतंच ना. ज्या घरी आपण इतके वर्ष राहिलेलो असतो, तेथून जाताना आपसूकच डोळ्यातून पाणी येतं."


प्रकाश म्हणाला,

"मी तुला तुझ्या घरच्यांची आठवण येऊ देणार नाही. तुला आपल्या घरी काहीच त्रास होणार नाही."


प्रकाशचं हे आश्वासक बोलणं नर्मदाला खूप आवडलं होतं. प्रकाश आपल्या सोबत असताना आता आपल्याला काहीच अडचण येणार नाही, ही खात्री नर्मदाला झाली होती.


नर्मदा व प्रकाश त्यांच्या घरी पोहोचल्यावर नर्मदाच्या सासूबाईने त्यांचे हसून स्वागत केले. नर्मदाच्या सासूबाईंना घरातील सर्वजण 'ताई' म्हणायचे. नर्मदाच्या सासऱ्यांना सर्वजण 'आप्पा' म्हणायचे. घरी गेल्यागेल्या नर्मदा तिच्या सासू सासऱ्यांच्या पाया पडली. नर्मदाची सासूबाई तिला म्हणाली,


"नर्मदा तुझं सामान खोलीत ठेऊन ये आणि हातपाय धुऊन स्वयंपाक घरात माझ्या मदतीला ये."


सासूबाईने सांगितल्याप्रमाणे नर्मदा आपल्या खोलीत जाऊन सामान ठेऊन, हातपाय धुऊन स्वयंपाक घरात गेली. नर्मदाला स्वयंपाक घरात गेल्यावर तिच्या सासूबाई म्हणाल्या,


"नर्मदा मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे."


नर्मदा म्हणाली,

"ताई बोला ना."


नर्मदाची सासूबाई म्हणाली,

"तुझी जाऊबाई घरात नाहीये, म्हणून मी तुला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगून ठेवते. तुला नेमून दिलेली सर्व कामे तुला करावी लागतील, त्याबद्दल काही तक्रार खपवून घेतली जाणार नाही. तुझ्या जाऊबाईचा म्हणजे सुमनचा स्वभाव थोडा तापट आहे, तिला कामावरुन सतत कटकट करायची सवय आहे, तिच्या बोलण्याकडे तु जास्त लक्ष देऊ नकोस. प्रकाश आचाऱ्याचं काम करतो, हे तुला माहीत आहेच. प्रकाश लग्न किंवा इतर मोठ्या कार्यक्रमात जाऊन स्वयंपाक करण्याचे काम करतो. जेव्हा ते कार्यक्रम असतील, तेव्हा तो तिकडे जातो. दररोज त्याला ते काम नसतं, म्हणून तो दररोज कामावर का जात नाही? हा प्रश्न त्याला किंवा घरातील कोणालाही विचारायचा नाही.


इतरवेळी प्रकाश शेतातील कामे करतो. ज्यावेळी शेतात कामं असतील, त्यावेळी तुला शेतात कामं करावी लागतील. तुला शेतीची कामे येत नसतील तर ती हळूहळू शिकून घे. दररोज सकाळी अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक घरात आलेलं मला आवडतं नाही. सकाळी सहा वाजेपर्यंत अंघोळ करुन स्वयंपाक घरात यायचं. आप्पांना सव्वा सहाला चहा पिण्याची सवय आहे. आप्पांना गोड चहा आवडतो, त्यामुळे चहात साखर भरपूर घालायची.


सकाळी नऊ वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक करुन झाला पाहिजे. स्वयंपाक झाल्यावर सगळयांचे कपडे धुवायचे आणि खरकटी भांडी घासायची. घरातील सर्व काम आवरल्यावर आपल्या घरातील सुना जेवण करतात. झाडलोट करायचं काम सुमन करेल, तिला वाटलं तर ती बाकी कामात तुझी मदत करेल. रात्रीचा स्वयंपाक करण्याचं काम मी सुमनला सांगते. 


प्रकाश झोपेतून उठल्यावर त्याच्या चहा नाश्त्याचं तु पाहून घ्यायचं. घरातील काम करताना काही अडचण आली तर मला येऊन विचारायचं. आमच्या भाज्या तुमच्यापेक्षा थोड्या वेगळ्या असतात, त्या शिकून घे."


नर्मदाने मान हलवून होकार दिला. रात्री नर्मदाची जाऊबाई सुमन स्वयंपाक घरात भाकरी करत होती. नर्मदा तिच्या शेजारी बसून ती कसं काम करते? याच निरीक्षण करत होती.


सुमन नर्मदाला म्हणाली,

"नर्मदा तुला स्वयंपाक करता येतो ना?"


नर्मदा म्हणाली,

"हो, मी ज्या घरी स्वयंपाकाचं काम करायचे, त्या घरातील सर्वांना माझ्या हातचं जेवण खूप आवडायचं, त्यांच्याकडे येणारे पाहुणे पण माझ्या हातच्या जेवणाचं भरभरुन कौतुक करायचे."


सुमन म्हणाली,

"तिथे तुला तुझ्या कामाचे पैसे मिळायचे, म्हणून तु नीट करत असशील. आपल्याकडे जास्त सुगरणपणा केलेला चालत नाही. आपल्या घरात खाण्याचे सर्वांत जास्त नाटकं प्रकाश भाऊजी करतात. प्रकाश भाऊजींना त्यांच्या मनासारखं जेवायला मिळालं नाही तर ते घर डोक्यावर उचलतात. प्रकाश भाऊजींचं पोट भरलं नाहीतर ताईंना ते अजिबात चालत नाही. आपल्या घरातील मंडळी जेवढी प्रेमळ तेवढीच बोलून तिखट आहेत."


नर्मदा म्हणाली,

"ताई मला सगळयांच्या खाण्याच्या आवडीनिवडी लगेच कश्या समजतील?"


सुमन म्हणाली,

"हळूहळू सगळं समजेल. तुला ताईंनी सकाळचा स्वयंपाक करायला सांगितला आहे ना?"


"हो" नर्मदाने उत्तर दिले.


सुमन म्हणाली,

"रात्री झोपताना उद्या काय स्वयंपाक करायचा? हे ताईंना विचारुन घे. स्वतःच्या मनाने काही करायला जाऊ नकोस."


रात्री झोपण्याच्या आधी नर्मदाने तिच्या सासूबाईंना सकाळी काय स्वयंपाक करायचा? हे विचारुन घेतले. घरातील सर्व कामे आटोपल्यावर नर्मदा आपल्या खोलीत गेली. प्रकाश खोलीत बसलेला होता. नर्मदाचा चिंताग्रस्त चेहरा बघून प्रकाश म्हणाला,


"नर्मदा तुझा चेहरा पडला का आहे? तुला कोणी काही बोललं का?"


नर्मदा म्हणाली,

"नाही."


प्रकाश म्हणाला,

"मग काय झालं?"


नर्मदा म्हणाली,

"ताईंनी उद्या सकाळी मला स्वयंपाक करायला सांगितला आहे. सुमन ताई सांगत होत्या की, घरातील सगळ्यांना जेवण व्यवस्थित लागतं. तुम्हाला जेवण मनासारखं मिळालं नाहीतर तुम्ही घर डोक्यावर घेतात. मी उद्या पहिल्यांदाच इथे स्वयंपाक करणार आहे. मला जाम टेन्शन आलं आहे."


प्रकाश हसून म्हणाला,

"तु सुमन वहिनीचं बोलणं मनावर का घेत आहेस? तिचं काही ऐकू नकोस. वहिनी लग्न करुन आली, तेव्हा तिला चहा सुद्धा नीट बनवता येत नव्हता, मग स्वयंपाक तर दूरची गोष्ट राहिली. वहिनीला अजून पण स्वयंपाक चांगला बनवता येत नाही. मला वहिनीच्या हातचं जेवण अजिबात आवडतं नाही. तुझी गोष्ट वेगळी आहे. तुला खूप आधीपासून स्वयंपाक करण्याची सवय आहे. तु काही काळजी करु नकोस. तुला कोणी काहीच बोलणार नाही."


नर्मदा म्हणाली,

"माझ्या हातचं जेवण कोणाला आवडलं नाही तर काय करायचं? स्वयंपाक करताना माझ्या हातून काही चूक झाली तर मी काय करु?"


प्रकाश म्हणाला,

"नर्मदा माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे. स्वयंपाक करताना तुझ्याकडून काहीच चूक होणार नाही. समजा थोडंफार काही चुकलं तर मी घरच्यांना समजावून सांगेल."


प्रकाशच्या या बोलण्याने नर्मदाचा आत्मविश्वास दृढ झाला होता. प्रकाशच्या बोलण्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील चिंता दूर झाली होती.


नर्मदाने केलेला स्वयंपाक घरातील सगळ्यांना आवडेल का? बघूया पुढील भागात...


©®Dr Supriya Dighe







🎭 Series Post

View all