'ती'चा संघर्षमय प्रवास भाग ५

Narmada's Mother Apologize To Her

'ती'चा संघर्षमय प्रवास भाग ५


आपण मागील भागात बघितले की, नर्मदा एका घरी काम करण्यासाठी गेली होती, ती त्या घरीच राहत होती. नर्मदा तेथूनच शाळेत जात होती. नर्मदाचे शिक्षण आठवी पर्यंत पूर्ण झाल्यावर ती पुढे शाळेत गेली नाही. शाळा सोडल्यानंतर ती आपल्या घरी राहण्यास गेली. नर्मदा घरुनच जाऊन येऊन त्या घरातील कामं करत होती.


आता बघूया पुढे….


एके दिवशी नर्मदाचे आजोबा त्यांच्या घरी आले, त्यांना सर्वजण 'आण्णा' म्हणायचे,त्यांनी नर्मदाच्या लग्नाचा विषय काढला, त्यावेळी नर्मदाचे वडील म्हणाले,


"आण्णा मला माझ्या पोरीचं एवढ्या लवकर लग्न करायचं नाहीये. अजून एक दोन वर्ष जाऊद्यात, मग तिच्या लग्नाचं बघूयात."


यावर नर्मदाचे आजोबा तिच्या आईकडे बघून म्हणाले,

"शांता तुच राजारामला काहीतरी समजावून सांग. आपल्यामध्ये चौदा पंधरा वर्षाच्या पोरी झाल्या की लगेच त्यांचे लग्न लावून देतात. वयात आलेल्या पोरीला असं किती दिवस घरात ठेवणार आहात. नर्मदाच्या नशिबाने एक चांगलं स्थळ सांगून आलं आहे. मुलगा आचारी आहे,मुलाला शेती आहे. आपल्या पोरीला दुसऱ्याच्या घरी जाऊन धुणीभांडी करण्याची गरज पडणार नाही. लग्न आपल्या ऐपतीप्रमाणे केलं तरी चालणार आहे."


नर्मदाचे आजोबा बोलत असतानाच तिचे वडील तेथून उठून निघून गेले.


नर्मदाची आई म्हणाली,

"आण्णा आता हे तुमचंच ऐकत नाहीत, तर माझं काय ऐकतील? संध्याकाळी मी त्यांच्यासोबत बोलून पाहते, त्यांचा विचार बदलला तर बरंच होईल."


नर्मदाचे आजोबा म्हणाले,

"एवढं चांगलं स्थळ आपल्या हातून जायला नको, ही एवढीच माझी इच्छा आहे."


काही वेळाने नर्मदाचे आजोबा निघून गेले. संध्याकाळी नर्मदाचे वडील घरी परतले. सगळ्यांची जेवणं उरकल्यावर नर्मदा व तिची भावंडे शेजारच्या घरी खेळायला गेले होते. घरात नर्मदाचे आई वडील दोघेच होते. 


नर्मदाची आई हळूच तिच्या वडिलांना म्हणाली,

"आण्णांनी आणलेलं स्थळ एकदा नजरेखालून घालायला काय अडचण आहे? आपलं लग्न झालं, त्यावेळी माझं वय नर्मदापेक्षा दोन वर्षांनी लहान होतं, तेव्हा तुम्ही माझ्यासोबत लग्न करायला बरं तयार होता. आता नर्मदाच्या वेळी तुम्ही नाही का म्हणत आहात? नर्मदाच्या लग्नाला उशीर झाल्यावर रमाचंही लग्न उशिरा होईल. एकीचा खो दुसरीला बसत जाईल."


नर्मदाच्या वडिलांनी रागाने तिच्या आईकडे बघितले व ते अतिशय चिडून म्हणाले,

"लहानपणापासून नर्मदा तुझ्याजवळ राहत नसल्याने तुला तिच्याप्रती मायाचं राहिलेली नाहीये. तु कुठल्याच वेळी नर्मदाच्या मनाचा विचार केला नाहीस. नर्मदाला तु प्रेमाने जवळ घेतलेलं तरी तुला आठवतंय का? आई नावाला तु काळीमा आहेस."


नर्मदाची आई म्हणाली,

"मी नेहमी नर्मदाच्या भल्याचाच विचार केला आहे. तुम्ही माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज करुन घेतला आहे. मी हे सगळं नर्मदाच्या काळजीपायी बोलत आहे. तुम्हाला स्वतःची शेती असते, तर आपल्याला असं लोकांच्या इथे जाऊन आपल्याला कामं करण्याची गरज पडली नसते."


नर्मदाचे वडील म्हणाले,

"तुला आण्णांनी एवढंच सांगितलं की त्या मुलाला शेती आहे, पण त्यांनी हे सांगितलं नाही की त्या मुलाच्या घरी दारुची भट्टी आहे, तो मुलगा नक्कीच व्यसनी असेल असं मला वाटतं. अश्या व्यसनी मुलाला माझी मुलगी देऊन मला तिचे नुकसान करायचे नाहीये."


यावर नर्मदाची आई म्हणाली,

"तुमचं कावीळ झालेल्या माणसासारखं झालं आहे, त्याला जसं सगळं जग पिवळं दिसत ना, तसं तुमचं झालंय. तुम्हाला त्या मुलामध्ये काहीच चांगलं बघायचं नाहीये, त्याच्या घरी दारुची भट्टी आहे,म्हणजे तो व्यसनी असेल असं नाही ना. समजा आपण नर्मदासाठी दुसरा मुलगा बघितला, त्याच्या घरी दारुची भट्टी नसेल तरीही तो व्यसनी असेल तर मग काय करायचं?"


नर्मदाचे वडील वैतागून म्हणाले,

"तुझ्यासोबत बोलून काही उपयोगचं नाहीये."


दुसऱ्या दिवशी नर्मदाचे वडील कामावर निघून गेले होते. नर्मदाही कामाला जायच्या तयारीतचं होती. तेवढ्यात तिची आई म्हणाली,

"नर्मदा मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे."


यावर नर्मदा म्हणाली,

"आई मी कामावरुन परत आल्यावर आपण बोलूयात का? मला कामावर जायला आधीच उशीर झाला आहे."


नर्मदाची आई म्हणाली,

"कामावर जायला अजून थोडा उशीर झाला तर काही बिघडणार नाही."


नर्मदा म्हणाली,

"ठीक आहे, आई पटकन बोल."


नर्मदाची आई म्हणाली,

"काल तुझे बाबा म्हणत होते की मी तुझा विचार करत नाही म्हणून. मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. मी आई नावाला काळीमा आहे. तुला पण असंच वाटतं का?"


नर्मदा म्हणाली,

"आई मला काय वाटतंय? हे तु आजपर्यंत विचारलं आहेस का? मी लहान असताना तुझं आणि बाबांचं भांडण झालं होतं, तेव्हा तु मला एकटीला तिकडे सोडून निघून गेलीस, त्यावेळी तु माझा विचार केलास का? त्यानंतर कधीही तु मला भेटायला आलीस का? तुझ्याशिवाय मी कशी लहानाची मोठी झाले, याचा तु विचार केलास का? 

मी पाचवीला असताना मला बाबा इकडे घेऊन आले, त्यावेळी तुझी इच्छा होती की मी शाळेत जाऊ नये, तसेच घरातील प्रत्येक कामाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीस, तेव्हा तु माझा विचार केलास का? 

आई तुला बाबा हे सगळं का म्हणाले? हे मला माहित नाही. आई प्रत्येक गोष्ट मला बोलून दाखवायची नाहीये, मुळात तो माझा स्वभावचं नाहीये, पण आई माझ्यापासून माझे बालपणचं हिरावून घेतले आहेस."


नर्मदाचं बोलणं ऐकून तिच्या आईच्या डोळयात पाणी आलं, तिची आई म्हणाली,

"बाळा माझ्याबद्दल असा गैरसमज करुन घेऊ नकोस. तुझ्या मनात इतकं साचलं आहे, याची मला कल्पनाचं नव्हती. बघायला गेलं तर माझंच चुकलं आहे. मीच तुझ्यासोबत कधी बोलण्याचा प्रयत्न केला नाही.

नर्मदा तु लहान असताना मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार होते, पण तुझ्या आजी आजोबांनी मला तुला घेऊन जाऊ दिले नाही. राहिला प्रश्न तुला भेटायला यायचा, तर तुझी काकू व आत्या मला नेहमी घालून पाडून बोलायच्या, म्हणून मी त्यांच्या घरी तुला भेटायला येऊ शकले नाही. 

तु इकडे आली आपली परिस्थिती अतिशय बिकट होती, त्यामुळे तुला शाळेत जाऊ देऊ नये, असं मी म्हणत होते. मी तेव्हा गरोदर होते आणि माझे दिवस भरत आल्याने माझ्याकडून घरातील कामे होत नव्हती, म्हणून मी घरातील कामांची जबाबदारी तुझ्यावर सोपवली.

आपल्या कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळेच तुला दुसऱ्याच्या इथं काम करायला जावे लागले. आपलं लेकरु असं दुसऱ्याच्या इथं काम करत आहे, हे बघून माझ्या मनाला खूप यातना व्हायच्या, पण परिस्थितीपुढे मी लाचार झाले होते.


लग्न होऊन तु एका चांगल्या घरात जावंस, हीच माझी इच्छा आहे. आण्णांनी जे तुझ्यासाठी स्थळ आणलं आहे, तो मुलगा आचारी आहे, तशीच त्याच्याकडे स्वतःची शेती आहे, त्यांच्या घरची परिस्थिती आपल्यापेक्षा चांगली आहे. लग्न झाल्यावर तुला दुसऱ्याच्या घरची धुणीभांडी करावी लागणार नाही. माझ्या नशिबी जे अठराविश्व दारिद्र्य आलं आहे, ते तुझ्या नशिबी येऊ नये, असं मला वाटतं."


नर्मदा म्हणाली,

"आई तु माझं काही वाईट होऊ देणार नाहीस, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. एक आई आपल्या मुलीच्या नेहमी चांगल्याचाच विचार करेल, हे मला ठाऊक आहे. माझ्या लग्नाच्या बाबतीत जो निर्णय तु आणि बाबा मिळून घ्याल, तो मला मान्य असेल."


नर्मदाची आई म्हणाली,

"अग पण तुझे बाबा या स्थळाच्या बाबतीत काही ऐकून घ्यायला तयारचं नाहीयेत, त्यांचा नाहीचा पाढा चालू आहे."


नर्मदा म्हणाली,

"आई बाबांना कसं समजावून सांगायचं? हे तुझ्यापेक्षा जास्त कोणालाच माहीत नसेल. बाबा आपल्या हरी काकांचं सगळंच ऐकतात ना, तर त्यांना बाबांना समजावून सांगायला लाव."


नर्मदाची आई म्हणाली,

"तु म्हणते ते अगदी खरं आहे, हे मला आधी कसं सुचलं नाही. मी उद्याचा हरी भाऊजींना बोलावून घेते."


नर्मदा म्हणाली,

"बरं आई, मी आता जाऊ का?"


नर्मदाची आई हसून म्हणाली,

"हो."


©®Dr Supriya Dighe






🎭 Series Post

View all