'ती'चा संघर्षमय प्रवास भाग ३

Narmada's Struggle Story
'ती'चा संघर्षमय प्रवास भाग ३

आपण मागील भागात बघितले की, रमा नर्मदाला आपल्या घरी येण्यासाठी खूप आग्रह करते. आपल्या लहान बहिणीचा आग्रह नर्मदा मोडत नाही आणि ती तिच्या वडील व बहिणीसोबत घरी जाण्यास तयार होते. आपल्या आई वडिलांचं छोटंसं घर बघून नर्मदा थोडी नाराज होते, पण काही वेळाने तिला आपल्या आई वडिलांच्या तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीची कल्पना येते. नर्मदाच्या आईचे म्हणणे असते की तिला शाळेत पाठवू नये पण नर्मदाला शाळेत जाऊ द्यावे असा तिच्या वडिलांचा पक्का निर्धार असतो 

आता बघूया पुढे…

नर्मदा व रमा शाळेचा गणवेश घालून, पाठीवर दप्तर अटकवून, एकमेकींच्या हातात हात घालून शाळेत जात असतात आणि तेवढ्यात नर्मदाला तिची आई आवाज देत असते,

"नर्मदा पोरी उठ, उशीर झाला तर आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही."

आईच्या आवाजाने नर्मदा खडबडून झोपेतून जागी होते आणि मग तिच्या लक्षात येते की, रमा सोबत शाळेत जाण्याचे आपल्याला स्वप्न पडले होते.
नर्मदा व रमा डोळे चोळत झोपेतून उठल्या, दोघींनी हंडे कळश्या हातात घेतल्या आणि त्या पाणी आणण्यासाठी गेल्या. रस्त्याने चालता चालता नर्मदाचे डोळे झाकत होते, तिच्याकडे बघून रमा म्हणाली,

"आक्का पुढे बघून चल नाहीतर दगडाला पाय अडकून खाली पडशील. आपल्यासाठी हे रोजचं असणार आहे."

पाणवठ्याच्या जागेवर पोहोचल्यावर तिथे असणारी लोकांची गर्दी नर्मदाच्या नजरेस पडली. रमाने स्वतःकडील व नर्मदाकडील हंडे कळश्या पाणी मिळण्यासाठी एका ओळीत लावली. बरोबर साडेसहाला नळाला पाणी आले. एकेकजण आपल्या भांडयात पाणी भरुन घेऊन जात होते. रमा व नर्मदाचा नंबर आल्यावर त्यांनी पाणी भरले व त्या निघाल्या. घरी जात असताना नर्मदा म्हणाली,

"रमा सगळ्यांना पाणी मिळतं, मग आपण इतक्या लवकर येऊन का बसतो?"

यावर रमा म्हणाली,
"अग आक्का आपल्याला यायला उशीर झाल्यावर आपला नंबर उशीरा लागेल, त्या नळाला पाणी फक्त एक तास असतं. कधीकधी नळाचं पाणी लवकर पण जातं."

घरी गेल्यावर नर्मदाच्या वडिलांनी दोघींकडील हंडे, कळशी घेऊन बाजूला ठेवले. आईने नर्मदा व रमाला तोंड धुवून घ्यायला सांगितले. मग आईने दोघींना कमी दुधाचा चहा त्या दोघींना दिला. चहा पिऊन झाल्यावर रमा अंघोळीला गेली, त्यानंतर नर्मदाने पण अंघोळ केली. रमा शाळेचा गणवेश घालून तयार झाली. आईने तीन चार भाकरी थापल्या. एक भाकरी आणि कांदा नर्मदाच्या वडिलांना एका फडक्यात बांधून दिला. दुसरी भाकरी व ठेचा रमाला एका फडक्यात बांधून दिला. नर्मदाचे वडील हे सगळं बघत होते, मग ते तिच्या आईला म्हणाले,

"शांता नर्मदासाठी भाकरी का बांधली नाही?"

नर्मदाची आई म्हणाली,
"ती घरीच तर राहणार आहे, मग भाकरी का बांधायची?"

नर्मदाचे वडील म्हणाले,
"शांता उगाच सकाळी सकाळी डोकं गरम करु नकोस. आजपासून नर्मदा सुद्धा रमासोबत शाळेत जाणार आहे. मी स्वतः दोघींना शाळेत सोडायला जाणार आहे."

नर्मदाच्या आईने रागारागात एक भाकरी व ठेचा एका फडक्यात बांधून दिला. नर्मदाचे वडील रमा व नर्मदाला घेऊन शाळेत गेले. रमा तिच्या वर्गात जाऊन बसली. नर्मदाला घेऊन तिचे वडील शाळेच्या हेडमास्तरांकडे गेले. हेडमास्तरांनी नर्मदाला पाढे म्हणायला सांगितले, नर्मदाने सर्व पाढे अचूक म्हणून दाखवले. मग हेडमास्तर म्हणाले,

"राजाराम हा शाळेत प्रवेश घेण्याचा अर्ज आहे, याच्यावर सही कर. पुढच्या आठवड्यात नर्मदाला शाळेचा गणवेश मिळून जाईल. नर्मदाला आजपासून पाचवीच्या वर्गात बसता येईल."

नर्मदा पाचवीच्या वर्गात बसल्यावर तिचे वडील आपल्या कामासाठी निघून गेले. नर्मदाचे वडील वेठबिगारीचे काम करायचे. वेठबिगारी म्हणजे दररोज एका ठिकाणी मोलमजुरी करणारे कामगार गोळा व्हायचे. ज्यांना काम करण्यासाठी माणसांची गरज असायची, ते त्या ठिकाणी येऊन त्या कामगारांना घेऊन जायचे.

नर्मदाचे घर हे शाळेपासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर होते, हे अंतर रमा व नर्मदा पायी चालत पार करायच्या. शाळा सुटल्यावर नर्मदा रमासोबत घरी गेली, त्यावेळी तिची आई झोपलेली होती. रमा व नर्मदा आल्याची चाहूल आईला लागल्यावर आई नर्मदाला आवाज देऊन म्हणाली,

"नर्मदा माझी तब्येत काही बरी नाहीये. रमासोबत नदीवर जाऊन तेवढं धुणं धुवून ये."

नर्मदाला शाळेतून आल्यावर नदीवर जाण्याचा कंटाळा आला होता, पण ती आपल्या आईला नाही म्हणू शकली नाही. धुण्याची बादली घेऊन नर्मदा धुणं धुण्यासाठी रमासोबत नदीवर गेली. नदीवरुन परत येताना नर्मदाला खूप जोराची भूक लागली होती, तिला वाटलं होतं की घरी पोहोचल्यावर आपल्याला गरमागरम भाकरी खायला मिळणार. नर्मदा घरी आल्यावर तिचे वडील कामावरुन परत आलेले होते. नर्मदाच्या हातात धुण्याची बादली बघून नर्मदाचे वडील म्हणाले,

"रमा आज धुणं धुण्यासाठी तुम्ही दोघी नदीवर का गेल्या होत्या?"

यावर रमा म्हणाली,
"बाबा आईची तब्येत बरी नाहीये म्हणून आम्ही दोघी धुणं धुवायला गेलो होतो."

आपण धुणं धुवायला गेलेलं आपल्या बाबांना आवडलं नाही, हे नर्मदाला तिच्या बाबांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरुन जाणवलं होतं. नर्मदाच्या बाबांनी तिच्या आईला आवाज दिला,

"शांता अग पोरींना भूक लागली असेल. गरमागरम भाकरी करुन त्यांना वाढ बरं."

नर्मदाची आई म्हणाली,
"मला चक्कर येत आहे आणि अशक्तपणा आला आहे. मला भाकरी करायला जमणार नाही. नर्मदाला भाकरी करायला सांगा."

यावर नर्मदाचे वडील चिडून म्हणाले,
"अग ती एवढीशी पोरं, तिला भाकरी करायला कश्या जमणार?"

नर्मदाची आई म्हणाली,
"मी तिच्या वयात असतानाच भाकरी करायला शिकले होते, हळूहळू तिलाही जमेल."

आपल्यावरुन आपल्या आई वडिलांमध्ये वाद व्हायला नको म्हणून नर्मदा म्हणाली,
"बाबा आईला बरं वाटतं नाहीये तर तिला झोपूद्यात. मी भाकरी बनवण्याचा प्रयत्न करते."

नर्मदाला चूल पेटवण्यात तिचे वडील मदत करतात. नर्मदा भाकरी तयार करत असताना तिचे वडील तिच्याजवळ बसून तिच्याकडे कौतुकाने बघत असतात. नर्मदाला गोल भाकरी जमली नाहीच पण ती भाजायला सुद्धा जमत नव्हती. हाताला चटके बसत असल्याने काही भाकऱ्या कच्च्या राहिल्या तर काही भाकऱ्या जळाल्या होत्या. नर्मदाच्या वडिलांनी काहीही तक्रार न करता आपल्या लेकीच्या हातची जळालेली भाकरी कौतुकाने खाल्ली.

 नर्मदाची सकाळ पाणी भरण्याने होत होती, पाणी भरुन आल्यावर ती घरातील सगळ्यांसाठी स्वयंपाक करायची. शाळेत जायला उशीर व्हायला नको म्हणून घरातील थोडीफार कामं आवरुन नर्मदा धावतपळत शाळेत जायची. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत नर्मदा घरी येऊन राहिलेली कामं आवरायची. शाळेत जायला उशीर व्हायला नको म्हणून ती रस्त्याने जाताजाता भाकरी खात जायची. शाळेतून घरी आल्यावर घरातील काम आवरायची आणि स्वयंपाक करायची.

नर्मदाला असे वाटायचे की आपल्याला आपल्या आई बाबांनी घरातील कामे करण्यासाठीच आणलं असेल. रमासोबत खेळायला मिळेल हे स्वप्न डोळयात घेऊन नर्मदा आली होती, पण घरातील कामांमुळे नर्मदाला रमासोबत खेळायला वेळच मिळत नव्हता. 

पुढील एक आठवड्यानंतर नर्मदाच्या आईची सरकारी दवाखान्यात डिलेवरी झाली, नर्मदाला भाऊ झाला होता. मुलगा झाल्याने सर्वांनाच आनंद झाला होता. नर्मदाची आजी तीन चार दिवसांसाठी येऊन त्यांच्या घरी राहिली. घरातील सर्व कामाचा भार नर्मदावर येऊन पडला होता. नर्मदा तिला जमेल तसा कच्चा पक्का स्वयंपाक ती करायची. नर्मदाला लहान भावासोबत खेळायला आवडायचे पण घरातील कामांमधून तिला फारसा मोकळा वेळ मिळत नव्हता.

नर्मदाच्या घरात ती धरुन पाचजण राहत होते पण कमवणारे फक्त तिचे वडील एकटेच होते, त्यामुळे घरातील खर्चाचा मेळ जमवताना तिच्या वडिलांची ओढाताण होत होती. बाळ लहान असल्याने नर्मदाच्या आईला कामावर जाणे शक्य नव्हते. वडिलांची होणारी ओढाताण नर्मदाला बघवत नव्हती, म्हणून तिने वडिलांना हातभार लावायचा ठरवला, त्याबद्दल ती एक दिवस तिच्या वडिलांसोबत बोलली तेव्हा तिचे वडील म्हणाले,

"नर्मदा पोरी इतक्या कमी वयात तुला कामाला पाठवणे,माझ्या मनाला पटत नाहीये. पुढे जाऊन आयुष्यभर तुला काम करावंच लागणार आहे."

यावर नर्मदा म्हणाली,
"बाबा तुमची होणारी ओढाताण मला बघवत नाहीये. मी पडेल ते काम करुन तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन."
नर्मदाला तिचे वडील काम करण्यासाठी पाठवतील का? बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe












🎭 Series Post

View all