'ती'चा संघर्षमय प्रवास भाग २

Narmada come back to her parents house.

'ती'चा संघर्षमय प्रवास भाग २

आपण मागील भागात बघितलं की, 'ती'चा संघर्षमय प्रवास हे पुस्तक कांचन ताईंनी लिहिले, या पुस्तकाबद्दल वर्तमानपत्रात छापून यावे म्हणून त्यांनी त्यांची मुलाखत घेण्यासाठी सारिकाला बोलावून घेतले होते. कांचन ताईंनी या पुस्तकात एक नर्मदा नावाच्या स्त्रीची वास्तववादी संघर्ष कथा लिहिली होती. कांचन ताई नर्मदाच्या आयुष्याची कथा सारिकाला सांगत होत्या.

आता बघूया पुढे…

नर्मदा काका काकूंकडे रुळली असताना एक दिवस तिचे वडील तिला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आले. यावेळी त्यांनी आपल्या सोबत आपल्या दुसऱ्या मुलीला म्हणजेच रमाला घेऊन आले होते. रमा नर्मदा पेक्षा तीन वर्षांनी लहान होती. नर्मदाने आजवर रमाला बघितले नव्हते. आई वडिलांच्या वाद विवादामुळे या दोघी बहिणींची ताटातूट झाली होती. नर्मदाने रमाला ओळखले नव्हते, कारण रमा खूपच लहान असताना तिची आई रमाला घेऊन घर सोडून गेली होती. रमाने सुद्धा नर्मदाला ओळखले नव्हते, हे तिच्या बाबांच्या लक्षात आल्याने ते नर्मदाला म्हणाले,

"नर्मदा तु रमाला ओळखले नाही का? अग ही तुझी लहान बहीण आहे."

बाबांच्या तोंडून हे ऐकल्यावर नर्मदा घाईघाईने रमाच्या चेहऱ्यावरुन हात फिरवत म्हणाली,

"बापरे रमा तु किती मोठी झालीस!, मी तुला ओळखले पण नाही."

यावर रमा म्हणाली,

"नर्मदा आक्का तु आपल्या घरी का येत नाहीस? माझ्या सोबत आपल्या घरी खेळायला कोणीच नाहीये. आई बाबा दिवसभर कामाला गेल्यावर मला एकटीलाच घरी राहावं लागतं. शाळेत मला एकटीलाच जावं लागतं. तु घरी आल्यावर खूप मज्जा येईल."

नर्मदा म्हणाली,

"अग रमा मला काका काकूंकडे रहाण्याची सवय लागली आहे. मला तिकडे करमणार नाही."

रमा म्हणाली,

"आक्का मी तुझ्यासोबत असल्यावर तुला करमेल आणि तुला एक माहिती आहे का? काही दिवसांनी आपल्याला लहान बहीण किंवा भाऊ होणार आहे."

नर्मदा खुष होऊन म्हणाली,

"खरंच? आपल्या आईला बाळ होणार आहे का? लहान बाळ घरी आलं की किती मज्जा येईल ना, मला लहान बाळासोबत खेळायला खूप आवडतं."

रमा म्हणाली,

"मग आतातरी आपल्या घरी चल."

नर्मदाने तिच्या काकूकडे बघितले, तेव्हा तिची काकू म्हणाली,

"नर्मदा तु तुझ्या घरी जा. मी तुला भेटायला येत जाईल. रमाला तुझी सोबत होईल."

नर्मदाचे बाबा म्हणाले,

"पोरी आतातरी राग सोड आणि आपल्या घरी चल."

नर्मदाने मान हलवून होकार दिला. नर्मदाने आपले वह्या पुस्तकं एका फाटक्या कापडी पिशवीत भरले आणि कपडे एका गाठोड्यात बांधले. नर्मदा आपल्या कपड्यांचं गाठोडं घेऊन रमा व वडिलांसोबत निघाली. 

पिंपरीला जाण्यासाठी नर्मदा, रमा व तिचे बाबा एका टमटम रिक्षामध्ये बसले. नर्मदा कधी गावाबाहेर गेलीच नसल्याने तिला रिक्षात बसल्यावर खूप भारी वाटलं. रिक्षातून जाताना नर्मदाच्या डोक्यात अनेक विचार चालू होते, रमासोबत आपल्याला दररोज खेळायला भेटेल, आई आपल्याला गरमागरम स्वयंपाक करुन जेवायला वाढेल. काही दिवसांनी लहान बाळ घरात आल्यावर त्याच्या सोबत खेळता येईल, अश्याप्रकारचे अनेक विचार तिच्या डोक्यात येत होते. पण नर्मदाला हे कुठे माहीत होतं की तिच्या नशिबात वेगळंच काहीतरी लिहून ठेवलेलं होतं.

रिक्षातून उतरल्यावर नर्मदाने आजूबाजूला पाहिले की उंचच उंच इमारती होत्या. नर्मदाला वाटले की आपलं घर अशाच एखाद्या इमारतीत असेल. नर्मदा आपल्या वडिलांच्या मागेमागे चालत होती. दोन इमारतींच्या मधून एक बोळ होती, त्या बोळीतून नर्मदाच्या घराचा रस्ता होता. थोडं पुढे गेल्यावर चाळीसारखे घर नर्मदाला दिसली आणि तेव्हा तिला जाणवले की आपलंही घर असंच असेल. घरापुढे आल्यावर नर्मदाच्या वडिलांनी तिच्या आईला आवाज दिला, तेव्हा तिची आई घराबाहेर आली.

नर्मदाला आपल्या घरी पहिल्यांदाच आलेलं बघून तिच्या आईला गहिवरुन आलं होतं. नर्मदाला तिच्या आईने आपल्याजवळ घेतलं, पुढचे कितीतरी वेळ तिने नर्मदाला आपल्या पोटाशी कुरवाळून धरलं होतं. आईच्या स्पर्शामुळे नर्मदाचे डोळे पाणावले होते. नर्मदाच्या आईने तिचे डोळे पुसले. घरात जाऊन नर्मदा व तिच्या वडिलांसाठी रमा पाणी घेऊन आली. 

पाणी पिऊन झाल्यावर नर्मदा घर बघण्यासाठी आत गेली तर, एका खोलीत तिच्या आई वडिलांनी आपला संसार थाटला होता. खोलीत एका बाजूला एक जुना स्टोव्ह होता, त्याच्या शेजारी ताटल्या, वाट्या, पातेले, ग्लास,तांबे असे सगळे मोजून नऊ ते दहा भांडे नर्मदाच्या नजरेस पडले. खोलीच्या एका कोपऱ्यात मळकट दोन तीन गोधड्या होत्या, त्याच्या शेजारी बसण्यासाठी एक दोन फाटके पोते अंथरलेले होते. खोलीच्या एका कोपऱ्यात कपड्यांचे दोन तीन गाठोडे होते. नर्मदाच्या काका काकूंचं घर तीन चार खोल्यांचं होतं, त्यांच्याकडे भांडी जास्त होती. नर्मदाला तिच्या आई वडिलांचं घर आवडलं नव्हतं, हे तिच्या चेहऱ्यावरुन तिच्या आई वडिलांना जाणवलं होतं, म्हणून तिचे वडील तिला म्हणाले,

"नर्मदा बाळा तुला आपली खोली आवडलेली दिसत नाही. तुझ्या काकाचं घर यापेक्षा बरंच मोठं आहे. बाळा आपली परिस्थिती बेताची आहे. दररोज काम केलं तरचं पोटाला पोटभर भाकर मिळते. तुझी आई इतके दिवस कामाला जात होती, तेव्हा दोन जास्तीचे रुपये तरी मिळायचे,पण तिचे दिवस भरत आल्याने तिला काम होत नाही. सगळं काही माझ्या एकट्यावर येऊन पडलं आहे. तुझी आई कामाला जायला लागली की आपण दोन खोलींचं घर भाड्याने घेऊ, तोपर्यंत याच खोलीत रहावं लागलं."

नर्मदाला आपल्या वडिलांच्या डोळ्यातील अगतिकता समजली होती. यावर ती म्हणाली,

"बाबा मला आपलं घर खूप आवडलं आहे, हे घर छोटं असलं म्हणून काय झालं? पण इथे रमा, तुम्ही दोघे राहतात आणि काही दिवसांनी एक छोटंसं बाळ सुद्धा याच घरात येईल."

नर्मदाचे समजूतदारपणाचे बोलणे ऐकून तिच्या आई बाबांच्या डोळयात पाणी आले. नर्मदाची आई पुढे म्हणाली,

"रमा नर्मदाला आपली गल्ली फिरवून आण, तोपर्यंत मी गरमागरम भाकरी बनवते. नर्मदाला आपल्या पाणवठ्याची जागा दाखवून आण. उद्यापासून दररोज सकाळी तुमच्या दोघींनाच पाणी आणायला जावे लागेल."

आईने सांगितल्याप्रमाणे रमा नर्मदाला घेऊन गल्ली फिरवायला घेऊन गेली. गल्लीतील सर्वांसोबत रमाने नर्मदाची ओळख करुन दिली. पाणवठ्याची जागा बघून नर्मदा रमाला म्हणाली,

"रमा सकाळी पाणी आणण्यासाठी आपल्याला किती वाजता यावं लागेल?"

रमा म्हणाली,

"दररोज सकाळी सहा वाजता आलं तरंच आपल्याला दोन तीन हंडे पाणी मिळतं. थोडा जरी उशीर केला तरी मग रिकाम्या हाताने आपल्याला परत जावे लागेल."

नर्मदा म्हणाली,

"म्हणजे दिवसभर फक्त हे दोन तीन हंडेचं पाणी वापरायचं असतं का?"

रमा म्हणाली,

"हो, इथे सगळ्यांना एवढंच पाणी मिळतं."

नर्मदा व रमा बोलत बोलत आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचल्या. नर्मदाची आई घराबाहेरील ओट्यावर एका चुलीवर भाकरी भाजत होती, ते बघून नर्मदा तिच्याजवळ जाऊन बसली. नर्मदाला बघून तिची आई म्हणाली,

"नर्मदा मी भाकरी कश्या करते? हे बघून घे. तुला थोडाफार स्वयंपाक करता यायला पाहिजे. माझे दिवस भरल्यावर काही दिवस मला स्वयंपाक करता येणार नाही."

नर्मदाने मान हलवून होकार दिला. गरमागरम भाकरी आणि ठेचा खाऊन नर्मदा झोपून गेली. नर्मदा झोपेत असताना तिला तिच्या आई वडिलांचे बोलणे ऐकू येत होते. नर्मदाचे वडील तिच्या आईला म्हणाले,

"नर्मदाला उद्या पासून रमासोबत शाळेत पाठवावं लागेल. उद्या मी कामाला जायच्या आधी नर्मदाला घेऊन शाळेत जातो आणि गुरुजींसोबत बोलून घेतो."

यावर नर्मदाची आई म्हणाली,

"मी काय म्हणते, नर्मदा चौथीपर्यंत शिकली आहे, तिला अक्षर ओळख झाली आहे. पोरीच्या जातीला अजून शिकून काय करायचं आहे? घरी राहिली तर घरातील कामं शिकलं."

नर्मदाच्या आईचे बोलणे अर्धवट तोडत तिचे वडील म्हणाले,

"मी याबाबतीत तुझं काही ऐकून घेणार नाही. आपली नर्मदा उद्यापासून शाळेत जाईल. आपल्या गरिबीचा परिणाम तिच्या शिक्षणावर का होऊ द्यायचा?"

नर्मदाची आई चिडून म्हणाली,

"तुम्हाला जे करायचं ते करा. मला जे वाटलं ते मी बोलले. शाळा शिकून ती काय कलेक्टर थोडीच होणार आहे."

यावर नर्मदाचे वडील काही न बोलता झोपून गेले. आपल्या आई वडिलांचं बोलणं ऐकून नर्मदाला तिचे वडील तिच्या जवळचे वाटायला लागले होते. नर्मदाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला होता, आपल्या आईचं बोलणं ऐकून आपल्याला वडिलांनी शाळेत जाऊ दिले नाहीतर काय करायचे?

नर्मदा शाळेत जाईल की नाही? हे बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all