'ती'चा संघर्षमय प्रवास भाग २० (अंतिम)

Real Struggle Story Of A Woman
'ती'चा संघर्षमय प्रवास भाग २० (अंतिम)

आपण मागील भागात बघितले की, रुबीना मॅडम एका देवसारख्या तिच्या आयुष्यात येतात. नर्मदाला प्रकाशपासून वाचवण्यासाठी रुबीना मॅडम पुरेपूर मदत करतात. नर्मदाचा अपघात होतो, तिला सतरा टाके पडतात. नर्मदाची तब्येत खालावते.

आता बघूया पुढे….

ससून हॉस्पिटल मधून नर्मदाला डिस्चार्ज देताना डॉक्टर नर्मदाच्या नवऱ्याला बोलवायला सांगतात. प्रकाश नर्मदाचा अपघात झाल्यापासून कुठेतरी गायब झालेला असतो. नर्मदाचा भाऊ प्रकाशला शोधून डॉक्टर पर्यंत घेऊन जातो. डॉक्टर प्रकाशला सांगतात की,

"नर्मदाची परिस्थिती खूप नाजूक आहे. तिच्या गुप्तांगामध्ये लोखंडी पत्रा घुसला होता, त्यामुळे तो भाग चिरला गेलेला आहे. इथून पुढे तुम्ही तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेऊ शकत नाही. मला तुम्हाला हेच समजावून सांगायचे होते."

प्रकाशने डॉक्टरांचं सर्व बोलणं त्यावेळी ऐकून घेतलं. नर्मदाला डिस्चार्ज मिळाल्यावर ती थोडे दिवस तिच्या आईच्या घरी राहिली. नर्मदाला थोडं बरं वाटल्यावर ती आपल्या घरी परतली. एके दिवशी प्रकाश दारु पिऊन घरी आला व नर्मदाला म्हणाला,

"तो डॉक्टर तुझ्याबद्दल जे सांगत होता, ते तुम्हीच त्याला सांगायला लावलं होतं ना. असं कधी असतं का? तो डॉक्टर खोटं बोलत होता."

नर्मदा अजून पूर्ण बरी नव्हती झाली, तिला नीट उभं राहता येत नव्हतं. प्रकाशला नर्मदा नाटकी वागत आहे, असेच वाटायचे. प्रकाशने नर्मदाला जोराचा हिसका देऊन ढकललं, तर सुरज व अर्जुनने येऊन तिला सावरलं. सुरजने नर्मदाला एका जागेवर बसवलं आणि प्रकाशच्या हाताला धरुन बाहेर काढलं. प्रकाश रागाने त्याच्याकडे बघत होता, तेव्हा सुरज म्हणाला,

"इथून पुढे माझ्या आईच्या अंगाला हात लावाल, तर माझ्याशी गाठ आहे. लहानपणापासून तुमचं हे रौद्ररूप बघत आलो आहे, तेव्हा तुमची भीती वाटायची. पण आत्ता नाही. इथून पुढे तुमची मनमानी चालणार नाही. दारु प्यायची असेल तर तिकडे गावाला जाऊन रहायचं. आमच्या घरात तुम्हाला जागा नाहीये. तुमची आम्हाला काही गरज पण नाहीये. गुपचूप इथून चालत व्हायचं. परत जर आमच्या घराच्या आजूबाजूला जरी दिसलात, तर मी सरळ पोलिस स्टेशनला जाऊन तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करेल."

सुरजच्या डोळ्यातील राग बघून प्रकाश तेथून निघून गेला. प्रकाश गेल्यावर सुरज व अर्जुन नर्मदाच्या खुशीत शिरुन खूप रडले. नर्मदाच्या डोळ्यातील पाणी पुसत सुरज म्हणाला,

"आई इथून पुढं आम्ही तुला कोणत्याच प्रकारचा त्रास होऊन देणार नाही."

नर्मदा म्हणाली,
"बाळांनो मला वचन द्या की, तुम्ही तुमच्या बापाच्या पाऊलावर पाऊल ठेवणार नाही."

सुरज व अर्जुनने नर्मदाला वचन दिले. त्या दिवसापासून प्रकाश नर्मदाच्या घरी फिरकला नाही. रुबीना मॅडमने घरखर्चासाठी नर्मदाला पैसे पाठवून दिले. पुढील जवळपास एक महिना नर्मदा घरीच होती. त्यानंतर ती पुन्हा रुबीना मॅडमकडे कामाला जाऊ लागली. प्रकाश नावाची कीड नर्मदाच्या आयुष्यातून निघून गेल्याने तिचं जगणं सुखकर झालं होतं. 

रुबीना मॅडम काही महिन्यांनी दुसऱ्या एरियात रहायला निघून गेल्या. जाताना आपल्या घरातील फर्निचर देऊन गेल्या. नर्मदाच्या हातच्या स्वयंपाकाची स्तुती ऐकून तिला दोन तीन घरी काम मिळालं. दिवसामागून दिवस जात होते. एका घरी नर्मदाला पगार भरपूर मिळत होता, पण त्याघरी दररोज नर्मदाला नॉनव्हेज जेवण बनवावं लागत होतं. नॉनव्हेजच्या मसाल्यांमुळे नर्मदाच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला होता, म्हणून नर्मदाने त्या एरियातील काम सोडण्याचा निर्णय घेतला तसेच नर्मदाचं शरीर तिला साथ देत नव्हतं. नर्मदाची सर्व कामे तिच्या घरापासून लांब होती. नर्मदाला एवढं लांब ये जा करणं जमत नव्हतं. 

नर्मदाने तिच्या आईला तिच्यासाठी आसपासच्या एरियात काम शोधायला सांगितले. नर्मदाची आई एका ठिकाणी भांडी व फरशीचं काम करायची, शिंदे मॅडम इंजिनीअर होत्या, त्यांना तीन वर्षांची मुलगी होती, त्या मुलीला सांभाळण्यासाठी कोणाला तरी शोधतच होत्या. नर्मदाच्या आईमध्ये व शिंदे मॅडममध्ये त्यांच्या मुलीला सांभाळण्यावरून चर्चा झाली असता नर्मदाच्या आईने नर्मदाचं नाव त्यांना सुचवलं. शिंदे मॅडमने नर्मदाला भेटायला बोलावून घेतले.

शिंदे मॅडमचं व नर्मदाचं बोलणं झाल्यावर नर्मदाकडून शिंदे मॅडमला समजले की, 
"नर्मदाला मुली खूप आवडतात, तिला दोन मुलेच असल्याने तिची मुलीची हौस बाकी राहिली होती. शिंदे मॅडमच्या मुलीला सांभाळून तिला मुलगी सांभाळण्याचा आनंद मिळणार होता."

शिंदे मॅडमला नर्मदाची खात्री पटल्यावर त्यांनी तिला आपली मुलगी सांभाळायला ठेवले. नर्मदा शिंदे मॅडमच्या घरी स्वतःच घर असल्यासारखं काम करायची, त्यांच्या मुलीलाही स्वतःची मुलगी असल्यासारखं सांभाळायची. नर्मदा कामाला यायला लागल्यापासून शिंदे मॅडम निश्चिन्त झाल्या होत्या. नर्मदा शिंदे मॅडमचं घर एकदम चकाचक ठेवत असे. 

शिंदे मॅडमची मुलगी आता पुढच्या वर्गात गेली होती, तिला शाळेत सोडवण्याची जबाबदारी नर्मदाच्या अंगावर येऊन पडली होती. दररोज रिक्षाने जाण्यापेक्षा शिंदे मॅडमने नर्मदाला गाडी चालवायला शिकण्यास सांगितले. नर्मदाने ड्रायव्हिंग क्लास लावला तसेच शिंदे मॅडमने पण तिला गाडी चालवायला शिकवले. 

शिंदे मॅडमने नर्मदाला एक सेकंड हॅन्ड स्कुटी घेऊन दिली. नर्मदा आता स्कुटी चालवायला शिकली होती. शिंदे मॅडमच्या मुलीसाठी नर्मदा स्कुटी चालवायला शिकली होती. नर्मदाचे आधीचे आयुष्य बघता तिला कधीच वाटले नव्हते की, ती स्कुटी चालवायला शिकेल म्हणून. रुबीना मॅडम आणि त्यानंतर शिंदे मॅडमची साथ लाभल्यामुळे नर्मदाच्या आयुष्यात बदल झाले होते.

नर्मदाचे दोन्ही मुलं सुरज आणि अर्जुन कंपनीत कामाला लागले होते. दोघेजण आपापल्या परीने कमवत होते. सुरज व अर्जुन हे दोघेही निर्व्यसनी होते. कंपनीच्या कामाव्यतिरिक्त रिकाम्या वेळेत इतर छोटीमोठी कामं ते दोघेही करतात.

कोरोना काळात कामवाल्या बायांना सोसायटीत येण्यास मनाई केल्याने नर्मदाला घरीच बसावे लागले. या काळात शिंदे मॅडम व रुबीना मॅडमने नर्मदाला आर्थिक मदत केली. शिंदे मॅडम घरुनच काम करत असल्याने नर्मदाला त्यांच्या घरी जास्त वेळ थांबण्याची आवश्यकता नव्हती, तसेच शिंदे मॅडमची मुलगी सुद्धा मोठी झाली होती.

नर्मदा शिंदे मॅडमच्या घरचं काम करुन मेसचे डबे पुरवण्याचं काम करु लागली होती. नर्मदाच्या हाताला चव असल्याने दररोज ६० ते ७० डब्यांची नर्मदाला ऑर्डर येऊ लागली होती. नर्मदाची आता एकच इच्छा बाकी राहिली होती, तिला एक फ्लॅट घ्यायचा होता, त्यासाठी नर्मदा व तिचे दोन्ही मुलं कष्ट करत होते. रुबीना मॅडम व शिंदे मॅडम नर्मदाला हवी ती मदत करतात.

प्रकाश गावाकडेच राहत होता, तो आजारी पडल्यावर त्याच्या दवाखान्याचा खर्च नर्मदा करत होती. नर्मदा बायकोचं कर्तव्य अजूनही निभावत होती. नर्मदाने आपल्या मुलांना प्रकाश सारखं होऊ दिलं नाही. नर्मदाच्या आयुष्यातील संघर्ष बघून अंगाला काटा येतो.

नर्मदा ही अस्तित्वात आहे. नर्मदाबद्दल मी जे काही प्रसंग लिहिले आहे, ते जसेच्या तसे घडलेले आहेत. मी नर्मदाला अगदी जवळून बघितले आहे. मी जेव्हा पहिल्यांदा नर्मदाची कथा तिच्या तोंडून ऐकल्यावर माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता, तसेच तिच्या धैर्य व चिकाटीचं कौतुक वाटलं होतं.

आयुष्य म्हणजे संघर्ष हा आलाच. आपल्या सर्वांच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात संघर्ष असतोच. अनेकदा असं होतं की, आपण आयुष्यात येणाऱ्या सतत संघर्षामुळे दुःखी होतो, आपल्यातील आत्मविश्वास कमी होतो. अशा सर्वांनी नर्मदाची संघर्षकथा वाचली तर आपल्याला आपला संघर्ष काहीच वाटणार नाही. वाटेत येणाऱ्या संकटांचा सामना करुन पुढे चालण्यासच आयुष्य म्हणतात.

©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all