'ती'चा संघर्षमय प्रवास भाग १९

Real Struggle Story Of One Woman

'ती'चा संघर्षमय प्रवास भाग १९


आपण मागील भागात बघितले की, नर्मदाने उंदराचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. नर्मदाच्या वडिलांनी तिला वेळेत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यामुळे नर्मदाचा जीव वाचला. काही महिन्यांनी नर्मदा व प्रकाश तिच्या आईवडिलांजवळ खोली घेऊन राहू लागले. प्रकाशच्या वागण्यात काहीच बदल झाला नव्हता. नर्मदा आपल्या मुलांना आईकडे ठेऊन कामाला जात होती. प्रकाशने एकदा नर्मदाला मारहाण केल्यामुळे तिचा हात फ्रॅक्चर झाला होता.


आता बघूया पुढे….


नर्मदाला कामावरुन यायला उशीर झाला की, प्रकाश तिला मारहाण करायचा. दिवसभर कामावर गेल्याने घरातील काम करायला नर्मदाला रात्रीचे दहा अकरा वाजायचे. नर्मदा आपला संसार चालवण्यासाठी खूप कष्ट करत होती, पण प्रकाशला त्याचं काही देणंघेणं नव्हतं, तो आपल्या दारुच्या नशेत धुंद राहत होता. घरभाडे वेळेवर न दिल्यामुळे नर्मदाला दुसरी खोली शोधावी लागली. दुसरी खोली शोधण्यासाठी नर्मदाला कामावरुन सुट्ट्या घ्याव्या लागल्या. नर्मदाच्या इतक्या सुट्ट्या झाल्या की, तिला कामावरुन काढून टाकण्यात आले. 


नर्मदा नवीन कामाच्या शोधात असतानाच तिला रुबीना मॅडमचा फोन आला, त्यांची कामवाली दोन दिवसाच्या सुट्टीवर गेली असल्याने त्यांनी नर्मदाला कामावर येण्याबद्दल विचारणा केली. नर्मदाला कामाची गरज असल्याने नर्मदा त्यांच्या घरी गेली. नर्मदाच्या हातचा स्वयंपाक रुबीना मॅडम व त्यांच्या नवऱ्याला खूप आवडला होता. नर्मदाच्या कामाची पद्धत त्यांना मनापासून आवडली होती. रुबीना मॅडम ह्या एक लेखिका होत्या तर त्यांचा नवरा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. रुबीना मॅडमचा स्वभाव खूप चांगला होता.


रुबीना मॅडमची पहिली कामवाली बाई आठ दिवस न आल्याने नर्मदा त्यांच्याकडे काम करत होती. आठ दिवसांनंतर रुबीना मॅडम कडील पहिली कामवाली बाई परत आल्याने नर्मदाला घरी बसण्याची वेळ आली होती. 


प्रकाशला दारु प्यायला पैसे न दिल्याने तो नर्मदाला दररोज मारहाण करु लागला होता. दोन आठवड्यांनी रुबीना मॅडमची कामवाली बाई काम सोडून गेल्यावर त्यांनी नर्मदाला फोन करुन कामावर बोलावून घेतले. कामावर रुजू होण्याच्या आधीच रुबीना मॅडमने नर्मदाला स्पष्टपणे सांगितले,


"तुला कामावर वेळेत यावे लागेल. न सांगता सुट्ट्या घेतलेल्या मला चालणार नाही. वेळेत कामावर यायला जमत असेल तरच कामावर हजर हो, नाहीतर मी दुसरी बाई शोधते."


नर्मदाला कामाची गरज असल्याने नर्मदाने रुबीना मॅडमच्या अटी मान्य केल्या. रुबीना मॅडम नर्मदाच्या घरापासून लांब रहायला असल्याने तिला घरी यायला उशीर व्हायचा, त्यावरुन प्रकाश नर्मदाला मारहाण करायचा. रुबीना मॅडमच्या घरी दोन दिवस काम केल्यानंतर त्या रात्री प्रकाशने नर्मदाला इतकं मारलं की तिला दुसऱ्या दिवशी चालता सुद्धा येत नव्हतं. नर्मदा दुसऱ्या दिवशी रुबीना मॅडमच्या घरी जाऊ शकली नाही. नेमकं त्याच दिवशी रुबीना मॅडमच्या घरी पाव्हणे आले होते. नर्मदा कामावर गेली नसल्याने मॅडमची फजिती झाली.


नर्मदा दुसऱ्या दिवशी रुबीना मॅडमच्या घरी गेल्यावर त्या म्हणाल्या,

"नर्मदा दोन दिवसांच्या कामाचे पैसे तू घेऊन जा. उद्यापासून कामाला येण्याची काही आवश्यकता नाहीये. मी तुझा प्रामाणिकपणा बघून तुला कामाला ठेवले होते, पण तू त्या पात्रतेची नाहीयेस. काल माझ्या घरी पाव्हणे आले होते. माझी किती धांदल उडाली याची तुला कल्पना तरी आहे का? तू येणार नाही, हे सुद्धा कळवलं नाही. तुझ्या नवऱ्याच्या फोनवर फोन केला, तर त्याने उचलला सुद्धा नाही."


नर्मदा पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली,

"मॅडम मला कामावरुन काढून टाकू नका. मला माझ्या नवऱ्याने खूप मारलं होतं, जागेवरुन हलता सुद्धा येत नव्हतं. तुम्हाला फोन करण्यासाठी तो मोबाईल पण देत नव्हता."


नर्मदाने रडतरडत रुबीना मॅडमला तिची कर्मकहाणी सविस्तरपणे सांगितली. नर्मदाची कथा ऐकल्यावर रुबीना मॅडम म्हणाल्या,


"नर्मदा तू काम केलं नाहीस, तर तुझा उदरनिर्वाह कसा चालेल. तुझ्या मुलांच्या भविष्याचं काय होईल? तू कष्टाळू स्त्री आहेस. तुझा नवरा जर तुला प्राण्याप्रमाणे वागवत असेल तर, त्याच्यासोबत राहू नकोस. नवऱ्याला सोडून दे. तू एक काम कर. पुढील काही दिवस माझ्याकडेच रहा."


यावर नर्मदा म्हणाली,

"मॅडम मी इथे राहिले, हे जर त्याला कळले तर तो इथे तुमच्या घरी येऊन तमाशा घालेल. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला मला आवडणार नाही."


रुबीना मॅडमने नर्मदाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती त्यांच्या घरी रहायला तयार नव्हती. शेवटी त्या वैतागून म्हणाल्या,


"तू थोड्यावेळ माझ्या घरी थांब. माझं एक काम आहे, तेवढं मी करुन येते."


रुबीना मॅडम पुढील दोन ते तीन तासांनी घरी परतल्या, त्या नर्मदाला आपल्यासोबत एका ठिकाणी घेऊन गेल्या, तिथे त्यांनी नर्मदासाठी एक खोली भाड्याने घेऊन दिली. दररोज स्वयंपाकासाठी लागणारी भांडी त्यांनी घेऊन दिली. नर्मदासाठी एक मोबाईल फोन घेऊन दिला, तसेच एक महिन्याचा किराणा भरुन दिला.


रुबीना मॅडमने नर्मदाला ठणकावून सांगितले,

"आता यापुढे इथंच रहायचं. तुला काही लागलं तर माझ्याकडे मागून घे. तुझ्या मुलांना इकडे बोलावून घे."


नर्मदाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ज्या रुबीना मॅडमसोबत नर्मदाचं काहीच नातं नव्हतं, फारशी ओळख नव्हती, त्या रुबीना मॅडमने नर्मदासाठी खूप काही केले होते. पुढील काही दिवस नर्मदा आपल्या मुलांना घेऊन त्या खोलीवर राहिली. मुलांना शाळेत जायला लांब पडत होते, तसेच त्यांना व नर्मदाला त्या एरियात करमत नव्हते. नर्मदाने विचार केला की, 'आपण इथे राहिलो नाहीतरी रुबीना मॅडमला थोडीच कळणार आहे.'

नर्मदा रुबीना मॅडमला न सांगताच तिच्या जुन्या खोलीवर रहायला निघून गेली. दोन दिवसांनंतर प्रकाशने तिला पुन्हा मारहाण केली. एके दिवशी रुबीना मॅडम नर्मदाला न सांगता तिच्या खोलीवर गेल्या. खोलीला कुलूप बघून त्यांनी नर्मदाला फोन लावला, तेव्हा नर्मदाला कळून चुकलं होतं की, आपली चोरी पकडली गेली आहे.


रुबीना मॅडम म्हणाल्या,

"नर्मदा मी तुला त्या नरकातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, पण तुलाच त्या नरकातून बाहेर पडण्याची इच्छा नाहीये. आता तुला तिथेच रहावे लागेल आणि यात मी तुझी काहीच मदत करु शकणार नाही."


रुबीना मॅडमला नर्मदाचा राग आला होता. पण नर्मदा तिच्याच खोलीत राहून रुबीना मॅडमच्या घरी जाऊन येऊन काम करत होती. दिवसामागून दिवस जात होते. नर्मदा अशक्त होत चालली होती. नर्मदाचे वजन तीस किलो झाले होते. नर्मदाची आई तिला घेऊन डॉक्टरांकडे गेली तर डॉक्टरांनी तिला ऍडमिट होण्यास सांगितले. नर्मदाच्या आईने त्यांना सांगितले की,

"आम्ही आज ऍडमिट होण्याच्या तयारीने आलो नाहीये. घरी जाऊन उद्या सकाळी तयारी करुन येतो."


नर्मदा व तिची आई घरी परतल्या. नर्मदाने आपल्या घरातील पसारा आवरला. रुबीना मॅडमला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची कल्पना दिली. रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान नर्मदाने कपडे धुतले, ते दोरीवर वाळत घालण्यासाठी नर्मदा एका लोखंडी खुर्चीवर उभी राहिली. नर्मदाचा तोल गेला आणि ती खुर्चीवरुन खाली पडली, तिच्या मांडीमध्ये त्या लोखंडी खुर्चीचा कोपरा घुसला. प्रमाणाच्या बाहेर रक्तस्राव सुरु झाला. 


नर्मदाच्या भावाने व तिच्या वडिलांनी एका रिक्षात नर्मदाला बसवून हॉस्पिटलमध्ये नेलं, पण जवळपासचे एकही हॉस्पिटल नर्मदाला ऍडमिट करुन घेण्यास तयार नव्हते. शेवटी नर्मदाला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. नर्मदाला तिथे ऍडमिट करुन घेण्यात आले होते. डॉक्टरांनी नर्मदाची नो गॅरंटी सांगितली होती. नर्मदाचा बीपी खूप जास्त कमी झाला होता. रात्री अर्जंट नर्मदाचे ऑपरेशन करावे लागणार होते. 


नर्मदाच्या भावाने रुबीना मॅडमला फोन करुन तिची परिस्थिती कळवली. रुबीना मॅडमने लगेच पैसे पाठवून दिले. नर्मदाचं ऑपरेशन करण्यात आलं, तिच्या मांडीला सतरा टाके पडले होते. पुढील आठ ते दहा दिवस नर्मदाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट रहावे लागले. दरम्यानच्या काळात तिच्या छातीत पाणी झाले होते, तेही काढण्यात आले. नर्मदा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली होती.


नर्मदाला आयुष्य जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागणार आहे? बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe









🎭 Series Post

View all