'ती'चा संघर्षमय प्रवास भाग१८

Real Struggle Story Of One Woman

'ती'चा संघर्षमय प्रवास भाग १८


आपण मागील भागात बघितले की, नर्मदाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. बचत गटाचे कर्ज फेडल्यावर नर्मदा व प्रकाश आपल्या मुलांना घेऊन पुण्यात आले. प्रकाश दररोज कामावर जाऊ लागला, तो निम्मा पगार दारुत उडवायचा, उरलेल्या पगारात नर्मदा कशीबशी घरखर्च भागवायची. गावाकडे दुष्काळ पडल्याने नर्मदाचे जाऊ आणि भाया त्यांच्याकडे रहायला आले. नर्मदाच्या जाऊबाईने प्रकाशला तिच्या विरोधात चुकीचं सांगितल्याने प्रकाशने तिला खूप मारले, म्हणून रागाच्या भरात नर्मदाने उंदीर मारण्याचे औषध खाल्ले.


आता बघूया पुढे….


नर्मदाला रक्ताच्या उलट्या का होत आहेत? हे तिच्या वडिलांना समजत नव्हते. नर्मदाच्या वडिलांना तिची खूप काळजी वाटू लागली होती. घराजवळील चौकात नर्मदा, तिचे वडील आणि दोन्ही मुलं उतरली. नर्मदाच्या वडिलांना त्यांच्या शेजारी राहणारे एक गृहस्थ भेटले, त्यांच्याकडे सुरज व अर्जुनला देऊन मुलांना घरी पोहचवण्यास सांगितले. नर्मदाचे वडील तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत नर्मदाची अवस्था खूप बिघडली होती. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी नर्मदाने विष घेतल्याचे तिच्या वडिलांना सांगितले.


हॉस्पिटलमध्ये वेळेवर नेल्याने नर्मदाचा जीव तर वाचला होता. नर्मदा शुद्धीत आल्यावर तिच्या वडिलांनी तिला विष घेण्यामागील कारण विचारल्यावर नर्मदाने त्यांना घडलेला प्रकार सविस्तरपणे सांगितला, हे सगळं ऐकल्यावर तिच्या वडिलांनी ठरविले की, नर्मदाला आता परत सासरी पाठवायचे नाही. दोन तीन दिवसांनी नर्मदाला हॉस्पिटल मधून घरी नेण्यात आले. 


नर्मदाच्या नवऱ्याने किंवा तिच्या जाऊ भायाने तिची चौकशी केली नाही. नर्मदाला पूर्ववत होण्यास बराच वेळ लागला. आजूबाजूचे लोक येऊन नर्मदाच्या आई वडिलांना समजवायला लागले की, असं किती दिवस पोरीला घरी ठेऊन घेणार आहात? पोरगी आपल्या घरी ठेऊन घेण्याची गोष्ट असते का?


नर्मदाला दररोजच्या लोकांच्या बोलण्याचा कंटाळा आला होता. नर्मदाने जवळपास चार महिन्यांनी प्रकाशला फोन करुन आपल्या आई वडिलांच्या घरी बोलावून घेतले. प्रकाश घरी आल्यावर तिची आई म्हणाली,


"तुम्हाला तुमच्या बायका मुलांची काही गरज आहे की नाही? तुम्ही साधी त्यांची चौकशी सुद्धा केली नाही."


यावर प्रकाश म्हणाला,

"तुमची पोरगी जर माझ्या भाऊ भावजायीला घराबाहेर काढून द्यायला निघाली होती, तिला ते जड झाले होते. मला नर्मदाचं हे वागणं बिलकुल पटलं नव्हतं. नर्मदाला जर बरं वाटतं नव्हतं,तर तिने मला तसं सांगायला पाहिजे होतं, तिला तुम्हाला फोन करण्याची काय गरज होती? नर्मदाने उंदीर मारण्याचं औषध काही खाल्लं नसेल, तिने ते फक्त नाटक केलं होतं."


नर्मदाचे वडील म्हणाले,

"हे बघा प्रकाशराव तुम्हाला जर माझ्या मुलीला व्यवस्थित नांदवायचं असेल तर तिला घेऊन जा, नाहीतर माझी मुलगी मला जड नाही."


प्रकाश रागाने म्हणाला,

"तुमच्या मुलीने फोन करुन मला बोलावून घेतले. मी स्वतःहून येथे आलो नव्हतो. माझा अपमान करुन घ्यायला मला इथे बोलावून घेतले होते का?"


नर्मदाची आई सावरासावर करत म्हणाली,

"प्रकाशराव तुम्ही असा डोक्यात राग घालून घेऊ नका. ह्यांचं बोलणं मनावर घेऊ नका. तुमच्या पदरात एवढे सोन्यासारखे दोन मुलं आहेत. असा भरलेला संसार मोडू नका. मी तुम्हाला आमच्या एरियात खोली शोधून देते. आमच्या जवळ राहिले म्हणजे मुलांवर आमचं लक्ष राहिलं."


हो नाही म्हणता म्हणता प्रकाश नर्मदाच्या आई वडिलांच्या एरियात रहाण्यास तयार झाला. नर्मदाच्या आईने त्यांच्या एरियात नर्मदाला एक खोली पाहून दिली. नर्मदाची इच्छा नसताना सुद्धा तिला प्रकाश सोबत रहावे लागत होते. प्रकाश दररोज दारुच्या नशेत धुंद रहायचा. नर्मदा आपल्या दोन्ही मुलांना सुरज व अर्जुनला आपल्या आईच्या घरी ठेवून कामाला जाऊ लागली. एका हाऊस किपिंगच्या टीममध्ये तिला काम लागले होते. त्या कामातून नर्मदाला महिन्याला पंधराशे ते दोन हजार रुपये मिळायचे, त्यात नर्मदा पूर्ण महिना भागवायची.


नर्मदाला प्रकाशचे तिच्याजवळ जाणे पटायचे नाही. प्रकाश दारु पिऊन रात्री घरी आल्यावर नर्मदावर जबरदस्ती करायचा. शेजारी पाजारी आपला तमाशा नको म्हणून नर्मदा प्रकाशचा अत्याचार गुपचूप सहन करायची. प्रकाश काहीच कामधंदा करत नव्हता.


वर्षामागून वर्षे जात होते. प्रकाश सुधारण्याचं काही नाव घेत नव्हता. मुलं मोठी होत चालली होती, त्यांचा खर्चही वाढत चालला होता. नर्मदाने आपल्या मोठ्या मुलाला म्युनिसिपालटीच्या शाळेत घातले होते. नर्मदा घरोघरी जाऊन स्वयंपाक करण्याची कामे घेऊ लागली होती. नर्मदाला सर्व कामे करुन घरी यायला उशीर व्हायचा, त्यामुळे प्रकाश नर्मदावर संशय घेऊ लागला होता. नर्मदाला कामावरुन यायला उशीर व्हायचा, म्हणून तिला स्वयंपाक बनवायला सुद्धा उशीर होत होता. नर्मदा वेळेवर स्वयंपाक करत नसल्याचे कारण देऊन प्रकाशने बाहेर मेस लावली आणि त्या मेसचे पैसे सुद्धा नर्मदालाच द्यावे लागायचे.


एकदा मेसचे पैसे देण्यावरुन नर्मदा व प्रकाशमध्ये भांडण झाले. प्रकाशने तिला खूप मारहाण केली, त्यात नर्मदाच्या हाताला दुखापत झाली. नर्मदाचा हात वळत नव्हता, तिच्या हाताला खूप सूज आली होती. दुसऱ्या दिवशी नर्मदाची आई तिला घेऊन डॉक्टरकडे गेली, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना हाताचा एक्सरे काढायला सांगितला. एक्सरे काढण्यासाठी नर्मदा व तिच्या आईकडे पुरेसे पैसे नसल्याने तात्पुरत्या ठणक बंद होण्याच्या गोळ्या घेऊन त्या घरी गेल्या. पुढील दोन दिवस नर्मदाला हाताने काहीच काम करता आले नाही, तसेच हाताचा ठणक सतत चालूच होता. 


नर्मदाच्या वडिलांनी त्यांच्या मालकाकडून उसने पैसे घेतले आणि नर्मदाला एक्सरे काढण्यासाठी घेऊन गेले. एक्सरे काढल्यावर असे निदर्शनास आले की, नर्मदाचा हात फ्रॅक्चर झाला आहे आणि तिच्या हाताचे त्वरित ऑपरेशन करावे लागेल. डॉक्टरांनी नर्मदाला सरकारी दवाखान्यात जाऊन ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. 


ऑपरेशन करण्याआधी नर्मदाच्या काही तपासण्या करण्यात आल्या, त्यात तिला रक्त कमी असल्याचे आढळून आले. नर्मदाला डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पुढील एका महिन्यासाठी ऍडमिट रहाण्यास सांगितले, कारण नर्मदाच्या हाताचे ऑपरेशन करणे महत्त्वाचे होतेच, परंतु तिच्यात रक्ताची कमतरता असल्याने तिला घरी गेल्यावर काही त्रास झाला तर काय करायचे? म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये रहावे लागले. नर्मदाच्या हाताचे ऑपरेशन झाले. पुढील एक महिना ती हॉस्पिटलमध्येच राहिली. दरम्यानच्या काळात प्रकाश कुठेतरी गायब झाला होता. नर्मदाची काय परिस्थिती होती? याची त्याला काहीच कल्पना नव्हती.


नर्मदा प्लास्टर केलेल्या हाताने घरी परतली. पुढील दोन तीन दिवसांनी प्रकाश घरी परतला, तेव्हा नर्मदाने त्याला हाताच्या ऑपरेशनबद्दल सांगितले. प्रकाशचे म्हणणे होते की, ते ऑपरेशन पण खोटे आहे आणि हाताचे प्लास्टर सुद्धा खोटं आहे. हाताचे प्लास्टर काढून टाकण्याचा प्रकाशचा आग्रह होता. नर्मदाचे आई वडील तिच्याजवळ राहत असल्याने प्रकाशच्या तावडीतून त्यांनी नर्मदाला सोडवले. 


नर्मदाला पुढील महिनाभर तरी कुठलेही काम करता आले नाही,त्यामुळे घरभाडे थकले. घरमालकने खोली सोडण्यास सांगितल्यावर नर्मदाच्या वडिलांनी कुठून तरी पैसे आणून नर्मदाचे घरभाडे भरले. काही दिवसांनी हात बरा झाल्यावर नर्मदा कामावर जाऊ लागली. नर्मदाचे दोन्ही मुले शाळेत जाऊ लागली होती. नर्मदाने दोन तीन घरी स्वयंपाकाची कामे करत होती. नर्मदाला आपल्या मुलांना शिकवून सरळमार्गी बनवायचे होते. प्रकाश प्रमाणे दोन्ही मुलांनी वागू नये, अशी तिची मनापासून इच्छा होती.


संध्याकाळी नर्मदा कामावरुन परत यायची, तेव्हा प्रकाश दारु पिऊन तिला चौकातून मारत मारत घरी न्यायचा. प्रकाशला नर्मदाचे आईवडील समजावून सांगायचे, पण तो काही सुधारत नव्हता. प्रकाशने पुन्हा जेवणासाठी मेस लावली होती. प्रकाश निम्म्या दिवस गावाला तर निम्म्या दिवस पुण्यात रहायचा. नर्मदाला प्रकाशचा खूप राग यायचा, पण ती आपल्या अशक्त शरीरामुळे त्याचा प्रतिकार करु शकत नव्हती. 


प्रकाशला दारुच्या व्यसनापुढे आपली दोन्ही मुलं किंवा नर्मदा दिसत नव्हती. प्रकाशला दारु पिण्यास नर्मदाने पैसे द्यायला नकार दिला की तो तिला मारहाण करायचा. सुरज व अर्जुन हे दोघे सुद्धा प्रकाश जवळ जायला घाबरत होते. दारुच्या नशेतील त्याच रुद्र रुप पाहून मुलं त्याला घाबरु लागली होती.


नर्मदाच्या आयुष्यात पुढे काय होते? ते बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all