'ती'चा संघर्षमय प्रवास भाग १४

Real Struggle Story Of One Woman

\"ती\"चा संघर्षमय प्रवास भाग १४


आपण मागील भागात बघितले की,नर्मदाच्या वडिलांनी हरीला बोलावून घेतले होते. हरीला प्रकाशच्या घरच्यांनी आपल्याला कसं फसवलं आहे? याबद्दल नर्मदाच्या वडिलांनी सविस्तर सांगितलं. सगळं ऐकून घेतल्यावर हरीने नर्मदाच्या वडिलांना त्याच्या दोन मुलींच्या व्यथांबद्दल सांगितलं. हरीने नर्मदाच्या वडिलांना सांगितले की, प्रकाशच्या घरच्यांसोबत वादविवाद करुन काहीच साध्य होणार नाही. नर्मदाच्या वडिलांना हरीच्या डोळयात एका बापाचा हतबलपणा दिसून आला.


आता बघूया पुढे…


नर्मदाचे वडील दुकानात जाऊन रवा घेऊन आले. नर्मदाच्या आईने पटकन शिरा तयार केला. नर्मदाचे आईवडील दोघेजण शिऱ्याची ताटली घेऊन नर्मदा जवळ गेले. नर्मदा एका खोलीत बसलेली होती. आईवडील रुममध्ये आल्याचं तिला समजलं नाही.

नर्मदाची आई म्हणाली,


"नर्मदा पोरी तुला काही त्रास होत आहे का?"


आईचा आवाज आल्याने ती आईकडे वळून म्हणाली,

"नाही ग."


आई म्हणाली,

"हे बघ मी तुझ्यासाठी गरमागरम शिरा केला आहे. तुला आवडतो ना, अगदी तसा केला आहे."


नर्मदाने शिऱ्याची ताटली आपल्या हातात घेऊन खायला सुरुवात केली. नर्मदा गुपचूप खाली मान घालून खात होती. नर्मदाचे वडील म्हणाले,


"पोरी तुला खरंच बरं वाटतं आहे ना?"


नर्मदा म्हणाली,

"हो बाबा. मी एकदम बरी आहे. बाबा मी तुमचं आणि हरी काकांचं बोलणं ऐकलं. तुम्ही ह्यांना फोन करुन मला घ्यायला बोलावून घ्या. माझ्या नशिबात जे असेल त्याला सामोरे जायला मी तयार आहे."


नर्मदाचे वडील म्हणाले,

"तुला अजून थोड्या दिवस इथे रहायचं असेल तर राहू शकतेस. दोन तीन दिवसांनी मी प्रकाश रावांना बोलावून घेतो."


नर्मदा म्हणाली,

"नाही बाबा. तुम्ही उद्याच त्यांना यायला सांगा. मी ह्या घरची पाहुणी आहे. माझं खरं घर तेच आहे. मी इथे जास्त दिवस राहणं, बरं वाटत नाही."


नर्मदाचे वडील तिच्या आईकडे बघून म्हणाले,

"शांता तु नर्मदाला काही बोललीस का?"


नर्मदा म्हणाली,

"बाबा आई मला काहीच बोलली नाही. मीच सत्य परिस्थिती स्विकारायची ठरवली आहे."


नर्मदाचे वडील म्हणाले,

"ठीक आहे. मी प्रकाश रावांना फोन करुन उद्या येण्याचा निरोप देतो."


नर्मदाचे वडील निघून गेल्यावर तिची आई म्हणाली,

"नर्मदा तु अशी एकदम मोठी झाल्यासारखी का बोलत आहेस? कालपर्यंत तुला सासरी जायचं नव्हतं आणि आज लगेच अचानक जायला स्वतःहून तयार झालीस."


नर्मदा म्हणाली,

"आई मला मोठं तर व्हावं लागणारच ना. काही महिन्यांनी मी एका बाळाची आई होईल.मला मोठं तर व्हावंच लागेल. आई बाबांच्या डोळ्यांतील अगतिकता मला बघवली गेली नाही. मी स्वत:हून जायला तयार नसते झाले तर, त्यांना जास्त वाईट वाटलं असतं."


नर्मदाच्या वडिलांनी प्रकाशला फोनवर नर्मदा गरोदर असल्याचे सांगितले, तसेच तिला घरी यायचे आहे, असेही सांगितले. दुसऱ्या दिवशी प्रकाश नर्मदाला घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी गेला. प्रकाश आपल्या सोबत जिलेबी घेऊन गेला. प्रकाश नर्मदाच्या माहेरी गेल्यावर नेहमी प्रमाणे त्याच स्वागत करण्यात आलं. चहापाणी पिऊन झाल्यावर प्रकाश म्हणाला,


"नर्मदाची तयारी झाली आहे ना? आम्हाला निघायला हवं. घरी जाण्याआधी मावशीकडे पण जायचं आहे. मावशीकडे गेलो नाही तर ती माझ्यावर रुसून बसेल."


नर्मदाचे वडील म्हणाले,

"प्रकाशराव नर्मदाची तयारी झालेली आहे. तुम्हाला राग येणार नसेल तर, मला तुमच्यासोबत थोडं बोलायचं होतं."


प्रकाश म्हणाला,

"बाबा तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे आहात. मला तुमच्या बोलण्याचा राग का येईल? बोला ना."


नर्मदाचे वडील म्हणाले,

"प्रकाशराव आता काही दिवसांनी तुम्ही बाप व्हाल. तुम्हाला आता जबाबदारीने वागायला पाहिजे. तुमची जबाबदारी वाढणार आहे. नर्मदा म्हणत होती की, तुमच्या कामाचं काही अजून खरं नाहीये."


प्रकाश म्हणाला,

"बाबा मला माहित आहे की, मी कळत नकळतपणे नर्मदाला दुखावले आहे. मित्रांच्या साथीने कधीतरी दारु पण प्यायला लागलो होतो. बाबा काल गोड बातमी ऐकल्यापासून ठरवलं की, दारुच्या घोटाला स्पर्श करायचा नाही. मी पडेल ते काम करुन नर्मदाला सुखात ठेवेन. पुन्हा तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही."


नर्मदाचे वडील हात जोडून म्हणाले,

"प्रकाशराव मी माझ्या जीवाचा तुकडा तुमच्या ताब्यात दिला आहे. आता ती दोन जीवाशी आहे, तिचा सांभाळ करा, तिला दुखावू नका. नर्मदाला सोन्याच्या महालात ठेवा,असं मी कधीच म्हणणार नाही, पण दोन वेळा सुखाची भाकरी तिला खायला द्या म्हणजे झालं."


प्रकाश म्हणाला,

"बाबा माझ्यासमोर हात जोडून मला लाजवू नका. मी इथून पुढे नर्मदाला अजिबात दुखावणार नाही. मला एक संधी द्या."


काही वेळानंतर नर्मदा प्रकाश सोबत आपल्या सासरी जाण्यासाठी निघून गेली. प्रकाशने वाटेत नर्मदा सोबत अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण नर्मदा त्याच्यासोबत काहीच बोलत नव्हती. प्रकाश नर्मदाला आपल्या मावशीच्या घरी घेऊन गेला. 


नर्मदा व प्रकाशला आपल्या घरी आलेलं बघून मावशीला खूप आनंद झाला. मावशीने प्रकाश व नर्मदा दोघांना घरात बोलावून पाणी दिले.


मावशी म्हणाली,

"नर्मदा एवढ्यात तुझं माहेरपण संपलं पण का?"


यावर प्रकाश म्हणाला,

"अग मावशी, काही महिन्यांनी तुझ्या सुनेला बऱ्याच दिवस माहेरी रहायला मिळणार आहे."


मावशी म्हणाली,

"म्हणजे?"


प्रकाश म्हणाला,

"अग मावशी, तु आजी होणार आहेस."


हे ऐकल्यावर प्रकाशच्या मावशीचा चेहरा पडला. मावशी नर्मदाकडे बघून म्हणाली,

"नर्मदा प्रकाश बोलत आहे, ते खरं आहे का?"


नर्मदाने मान हलवून होकार दिला. प्रकाश मावशीकडे बघून म्हणाला,

"मावशी तुला गोडबातमी ऐकून आनंद नाही झाला का?"


मावशी म्हणाली,

"प्रकाश मला आता सध्या नर्मदाची काळजी वाटत आहे. अरे ह्या पोरीचं वय तरी काय आहे? हसण्या बागडण्याचे दिवस आणि त्यात आता एका पोराची जबाबदारी तिच्या अंगावर येऊन पडेल. तुला तर तुझी जबाबदारी पण कळत नाही."


प्रकाश म्हणाला,

"मावशी तुला काय म्हणायचं आहे?"


मावशी म्हणाली,

"मला तर तुझ्यासोबत त्याच दिवशी बोलायचं होतं, पण नर्मदाच्या बाबांसमोर बोलता आलं नाही. नर्मदाला बघितलं की, मला माझी आठवण येते. नर्मदा एवढी असताना माझं लग्न तुझ्या काकासोबत झालं. लग्नाआधी सगळे सांगत होते की, हे कष्टाळू आहेत, तुला सुखात ठेवतील. लग्न झाल्यावर पंधरा दिवसांत हे मला इकडे घेऊन आले. दररोज रात्री दारु पिऊन घरी यायचे. कामधंदा करायचे पण सगळा पैसा दारुत घालवायचे. 


दारुच्या नशेत ते मला मारहाण करायचे. काही दिवसांनी मी कामाला जायला सुरुवात केली. दारु पिण्यासाठी माझ्याकडचे पैसे मागून घ्यायचे. लग्नानंतर वर्षभराच्या आतच किशोरचा जन्म झाला. किशोर सहा महिन्यांचा असताना हे खूप आजारी पडले होते. मला वाटलं होतं की, दारुच्या व्यसनापायी ते आजारी पडले असतील. 


सरकारी दवाखान्यात जाऊन तपासण्या केल्या, तेव्हा समजलं की ह्यांना एड्सची लागण झाली आहे. डॉक्टरांनी माझी तपासणी करुन घ्यायला सांगितली, तर मलाही एड्सची लागण झाली होती.


तुझ्या काकाला बाटली सोबत बाईचाही नाद होता, हे त्यावेळी मला समजले. डॉक्टरांनी सांगितले होते की, औषधं वेळेवर घेत जा. तुम्हाला काही होणार नाही. ह्यांनी पथ्यपाणी काही पाळलं नाही. किशोर चार वर्षांचा असताना ह्यांचा मृत्यू झाला.


ह्या सगळ्यात प्रकाश माझा काय दोष होता? लग्न झालं, त्यादिवसापासून नशीबासोबत लढत आहे. चार वर्षांचं पोरगं आणि हा आजार देऊन तो त्याच्या वाटेला निघून गेला. दररोज लोकाच्या घरी जाऊन धुणीभांडी करायची आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून पोराला मोठं करु राहिले आहे.


नर्मदाचं आयुष्य माझ्यासारखं होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. प्रकाश दारु पिऊन शरीराचा नास करु नको. दारु पिऊन कोणाचं भलं होतं नाही. तुझ्या बापाने दारुमुळे सगळी शेतजमीन सावकाराच्या ताब्यात देऊन टाकली. प्रकाश उद्या तु एक पोराचा बाप होणार आहेस. असं आठ आठ दिवस घरातून न सांगता जाणं, हे कितपत योग्य आहे. तु काही कामधंदा सुद्धा करत नाहीस. तुझ्या आईला तर काही अक्कलचं नाहीये, ती तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे. प्रकाश अजून वेळ निघून गेलेली नाहीये. तुझ्यात सुधारणा कर. नर्मदाच्या चेहऱ्याकडे बघ."


प्रकाशला मावशीचे बोलणे पटेल का? बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe











🎭 Series Post

View all