'ती'चा संघर्षमय प्रवास भाग १०

Real Struggle Story Of One Woman

\"ती\"चा संघर्षमय प्रवास भाग १०


आपण मागील भागात बघितले की, नर्मदाला आपली सर्व शेतजमीन सावकाराच्या ताब्यात असल्याचे तिच्या जाऊबाई कडून समजते. नर्मदाला हे कळून चुकले असते की, आपल्याला व आपल्या घरच्यांना प्रकाशच्या घरच्यांनी पुरते फसवले आहे. एके दिवशी नर्मदाची काकू तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेली होती.घरी कोणी नसल्याने नर्मदाने आपल्या काकूला प्रकाश व त्याच्या घरच्यांबद्दल सर्व काही सांगितले.


आता बघूया पुढे….


काकू गेल्यापासून नर्मदा दररोज आपल्या वडिलांची वाट बघत होती. काकूने वडिलांपर्यंत निरोप पोहचवला की तिचे वडील लगेच तिला भेटायला येतील, याची खात्री नर्मदाला होती. नर्मदाची काकू जाऊन एक आठवडा होत आला होता, तरी अजून तिचे वडील तिला भेटायला आले नव्हते. 


एके दिवशी नर्मदाची मावस सासूबाई त्यांच्या घरी आली होती. नर्मदाच्या सासूबाईने सांगितल्याप्रमाणे नर्मदा पाहुण्यांसाठी पाणी, चहा घेऊन गेली. नर्मदाला बघितल्यावर तिची मावस सासूबाई म्हणाली,


"तुम्ही सगळे घरी दिसत आहात, पण प्रकाश नजरेस पडत नाहीये. तो कुठे कामावर गेला आहे का?"


यावर नर्मदाची सासूबाई म्हणाली,

"ही अवदसा घरात घातली आणि त्या दिवसापासून माझ्या प्रकाशला कोणाची तरी नजरच लागली. दररोज रात्री दारु पिऊन घरी यायचा. दिवसभर कुठे फिरायचा? काय माहीत? आता तर आठ दिवस उलटून गेलेत तरी त्याचा काही पत्ता नाही."


नर्मदा मनातल्या मनात म्हणाली,

"ह्यांचा मुलगा धड वागत नाही आणि ह्या सर्व दोष मला का देत आहेत? मला आणि माझ्या आई वडिलांना धडधडीत फसवलं आहे."


नर्मदाची मावस सासूबाई म्हणाली,

"अग ताई, या सगळयात या पोरीचा काय दोष? तुझा प्रकाश तुझ्या लाडापायी बिघडला आहे. लग्न करायचं होतं, म्हणून तेवढ्यापुरतं सुधारायचं नाटक त्याने केलं होतं. सगळा दोष तुझ्या पोराचा आणि तु नर्मदाला चुकीची ठरवत आहेस, ती घरातील सर्व कामे चांगल्या पद्धतीने करत आहे, तिचं काय चुकलं आहे? तुम्ही तिला अन तिच्या घरच्यांना फसवलं आहे."


नर्मदाची सासूबाई म्हणाली,

"आपले नवरे एवढे साधे होते का? आपल्याला अजून सुद्धा त्यांचा मार खावा लागतो. एवढं सगळं असून सुद्धा आपण त्यांना आपल्या मुठीत ठेवलंच आहे ना?"


नर्मदाची मावस सासूबाई म्हणाली,

"तु तुझ्या नवऱ्याला मुठीत ठेवलं, कारण तुला नर्मदासारखी सासू नव्हती. नर्मदा लग्न होऊन आल्यापासून तु तिच्यासोबत दोन शब्द चांगले बोलली आहेस का? तु नवऱ्याचा मार खाल्ला, म्हणून तुझ्या सुनेने मार खावा असं गरजेचे आहे का? नर्मदाच्या जागी तुझी पोरगी असती तर तुला कसं वाटलं असतं?"


आपल्या मावस सासूबाईचं बोलणं ऐकून नर्मदाच्या डोळयात पाणी आलं. नर्मदाच्या मावस सासूबाईने नर्मदाला जवळ घेऊन तिच्या डोळ्यातील पाणी पुसले. नर्मदाच्या सासूबाईने मान खाली घातली, तिला आपली चूक कळाली होती. 


नर्मदाची सासूबाई म्हणाली,

"तु अगदी खरं बोललीस. आपलंच नाणं खोटं निघालं आणि मी त्यासाठी नर्मदाला जबाबदार धरत होते. मला वाटलं होतं की, लग्न झाल्यावर प्रकाश सुधारेल, असं मला वाटलं होतं. लग्न झाल्यावर त्याला त्याची जबाबदारी कळेल, मग तो सुधारेल, असा माझा समज झाला होता. बायकोचा लळा लागल्यावर टपोरी मित्रांची संगत तो सोडून देईल, असं मला वाटलं होतं. लग्न होऊन प्रकाश सुधारला नाही, म्हणून मी त्यासाठी नर्मदाला जबाबदार धरत होते."


नर्मदाची मावस सासूबाई रागात म्हणाली,

"अग तुम्ही त्याला जन्माला घातलं, वाढवलं. तुम्ही त्याच्या सोबत इतक्या वर्ष राहत आहात, तुम्ही त्याला सुधारु शकले नाही, तर ही एवढीशी काल आलेली पोरं प्रकाशला कशी काय सुधारु शकेल? याचा विचार केला आहेस का? लग्न करुन आलेली मुलगी म्हणजे तुम्हाला स्वतःचा मुलगा सुधारण्याचं यंत्र वाटली का?"


नर्मदा म्हणाली,

"मावशी तुम्हाला एक प्रश्न विचारु का?"


नर्मदाची मावस सासूबाई म्हणाली,

"अग विचार ना, त्यासाठी परवानगी का मागत आहेस? मी कोणी परकी आहे का?"


नर्मदा म्हणाली,

"मावशी आमच्या घरात वडीलधाऱ्या व्यक्तींना उलट प्रश्न विचारलेला आवडत नाही, म्हणून मी आधी परवानगी मागितली. ह्यांना सुद्धा प्रश्न विचारलेला आवडत नाही. मावशी तुम्ही आणि ताई सख्ख्या बहिणी आहात, तरी तुमच्या दोघींच्या विचारांमध्ये एवढा फरक कसा?"


नर्मदाची मावस सासूबाई हसून म्हणाली,

"मी लग्न करुन शहरात रहायला गेले आणि तुझी सासू एका खेडेगावात रहायला आली. मी दररोज चार घरी जाऊन धुणीभांडी करते, म्हणून माझे विचार बदलले. तुझी सासू खेड्यात राहिल्यामुळे तिचे विचार असे झाले. प्रकाश येईपर्यंत मी इथेच थांबते, तो आल्यावर त्याला चांगलं खडसावते. तुझ्या सासू सासऱ्यांना त्याला बदलवणे जमणार नाही, मी शेवटचा प्रयत्न करुन बघते."


पुढील दोन दिवसांनी रात्रीच्या दहाच्या सुमारास प्रकाश दारु पिऊन घरी आला. प्रकाश झोकांडे देत घराबाहेर असलेल्या बाजेवर येऊन बसला आणि जोरात नर्मदाला आवाज दिला. नर्मदा, तिची सासूबाई, जाऊबाई आणि मावस सासूबाई स्वयंपाक घरात बसलेल्या होत्या. प्रकाशचा आवाज ऐकून सगळ्याजणी बाहेर आल्या.


प्रकाश मावशीकडे बघून म्हणाला,

"अरे मावशी तु कधी आलीस?"


यावर मावशी म्हणाली,

"मला येऊन दोन दिवस झाले. मी तु येण्याची वाट बघत होते."


प्रकाश म्हणाला,

"तुला माझी इतकी आठवण आली होती का?"


मावशी म्हणाली,

"तु मोठा पराक्रम गाजवायला गेला होतास, तुझी आठवण तर मला येणारच ना."


तेवढ्यात नर्मदाची सासूबाई नर्मदाला म्हणाली,

"नर्मदा प्रकाशसाठी पाणी आणि जेवणाचं ताट घेऊन ये."


प्रकाशची मावशी जोरात ओरडून म्हणाली,

"ताई तुझं इथंच चुकलं आहे. आठ ते दहा दिवसांनी हा प्रकाश दारु पिऊन घरी आला आहे, तो इतक्या दिवस कुठे होता? घरी कोणाला न सांगता कुठे गायब झाला होता? याचा जाब न विचारता, तु त्याला जेवायला देत आहेस. तु आई म्हणून चुकते आहेस. नर्मदा प्रकाशला जेवण किंवा पाणी यातील काहीच द्यायचं नाही, त्याला पाहिजे असेल तर तो स्वतः वाढून घेईल."


प्रकाश म्हणाला,

"मावशी तुला यामध्ये पडण्याची गरज नाहीये."


नर्मदा म्हणाली,

"मावशी ह्यांना जेवायला नाही दिलं तर, ते मला खूप मारहाण करतील."


प्रकाशची मावशी म्हणाली,

"प्रकाशला आज खोलीत घ्यायचे नाही, इथे बाहेर थंडीत कुडकुडत पडूदेत. मी तुझ्या सोबत तुझ्या खोलीत झोपते. आज बघतेच हा तुझ्या अंगाला कसा हात लावतो?"


प्रकाशची मावशी नर्मदाला हात धरुन तिच्या खोलीत घेऊन गेली. प्रकाश दारुच्या नशेत मावशी व नर्मदाच्या नावाने शिवीगाळ करत बसला होता. प्रकाशच्या मावशीने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते. प्रकाशच्या मावशीने बडबड केल्यामुळे त्याच्या आईने त्याला जेवायला दिले नाही. प्रकाश उपाशी पोटी झोपून गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळचे सात वाजले तरी प्रकाश उठला नव्हता, म्हणून त्याचा मावशीने कळशीभर थंड पाणी त्याच्या अंगावर ओतले. थंड पाणी अंगावर पडल्यावर प्रकाशने खाडकन डोळे उघडले. मावशीच्या हातात कळशी बघून तो म्हणाला,


"मावशी एवढं पाणी कोणी अंगावर टाकतं का?"


मावशी म्हणाली,

"तुझी रात्रीची उतरण्याकरता एवढं पाणी टाकणं आवश्यक होतं."


प्रकाश म्हणाला,

"नर्मदा माझ्यासाठी चहा घेऊन ये, डोकं फुटायला लागलं आहे."


प्रकाशच्या बोलण्याचा सूर ऐकून मावशी म्हणाली,

"नर्मदा म्हणजे तु कामाला ठेवलेली दासी आहे का? झोपेतून उठल्यावर ब्रश करणे, तोंड धुणे, हे तुला माहीत नाही का? बेड टी घ्यायला तु इंग्रजांची औलाद आहेस का?"


प्रकाश म्हणाला,

"मावशी तु इतकी वायफळ बडबड का करत आहेस? इथं माझं डोकं भणभणत आहे आणि तुझी आपली काहीतरी बडबड चालू आहे."


यावर मावशी म्हणाली,

"नर्मदा ह्याला कोरा चहा आणून दे, म्हणजे याचं डोकं शांत होईल आणि मला ह्याच्यासोबत थोडं बोलता येईल."


नर्मदाने प्रकाशला कोरा चहा आणून दिला. प्रकाशला कोरा चहा आवडत नव्हता, पण मावशी समोर बसल्याने त्याने काही न बोलता चहा पिऊन घेतला.


मावशी प्रकाश कडे बघून म्हणाली,

"प्रकाश चहा पिऊन झाला की अंघोळ करुन ये. मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे."


प्रकाशने मान हलवून होकार दिला.


प्रकाशची मावशी त्याला कश्या पद्धतीने समजावते? प्रकाश मावशीचं ऐकेल का? हे बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe










🎭 Series Post

View all