ती....!!

It's a suspense story. One incident occurred on a rainy day and story will drive you through it...

पावसाळ्याचे दिवस होतें. संध्याकाळी ५ वाजता सुद्धा अंधारून आलं होतं. गजाभाऊ त्यांच्या टपरीवजा हॉटेल मध्ये बसले होते. तसाही बुधवार आहे. एवढ्या पावसात कोणी येणार नाही. उरलेला हिशोब पूर्ण करून लवकर निघावं.. असा विचार करत चहाचा घोट घेत त्यांनी हिशोबाची वही उघडली. मागे देवानंद ची गाणी चालू होती. ती ऐकत गजाभाऊ कामाला लागले.

तेवढ्यात एक साधारण २५-२६ वर्षाची मुलगी दारात घुटमळताना त्यांना दिसली. तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती, अस्वस्थता वाटत होती. " काही हवंय का?" गाजभाऊनी  उठत तिला विचारलं.. " ते.. माझी .. माझी गाडी बंद पडली आहे.. इथेच थोडी मागे.. घरी जात होते.एक तर पाऊस इतका आहे. कोणी आहे का पहात होते. तेवढ्यात तुमचं हॉटेल दिसलं..." एका दमात तीने सांगून टाकलं. " गाडी बंद पडली? अरे देवा.. आता इकडे कोण मिळायचं दुरुस्त करायला म्हणजे मागच्या गावात जावं लागेल ताई. तुम्ही इकडं आला तर तुमच्या ओळखीचं कोण असलं तर बघा की ते फ़ोन करून" गजाभाऊ तिला पाणी देत म्हणाले.. पुढची १०-१५ मिनिटं मग ती इकडे तिकडे फोन करत राहिली. शेवटचा फोन झाला तसं तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.. " झालं काय ताई काम.. आज नेमका माझा पोरगा नाही इकडे आणि माझा बी फोन बंद झालाय पाणी जाऊन.. नाहीतर आम्ही आणलं असतं कोणाला तरी पकडून" " नाही काका असुदेत.. मी इकडे महाबळेश्वर ला आले होते त्या मैत्रणीचा नवरा घेऊन येतो म्हणाला कोणाला तरी घेऊन.. " " महाबळेश्वर इथून ताई पाऊण तास लागतोय..लै पाऊस आहे.. तासभर तरी लागेल बघा त्यांना यायला..बसा ताई चहा आणतो मी तोवर..." असं म्हणत गजाभाऊ चहाचं आधण ठेवायला गेले..

ती बसली एक खुर्ची पुढे ओढून. हातातली छत्री बाजूला ठेवली. हातातल्या बॅग मधून रुमाल काढून ओला चेहरा पुसला आणि थोडी स्वस्थ झाली. हातातल्या मोबाईल मध्ये पहात चेहरा ठीक केला ..छत्री असून देखील थोडी भिजली होती ती. गजाभाऊ चहा घेऊन आले. गरम चहाचा वाफाळता कप हातात घेऊन तीने तीचे थंड पडलेले हात शेकून घेतले. चहा आणि खारी खाऊन जरा तरतरी आली तिला. मधेच घड्याळ बघत तिने परत फोन करून पाहिला.. " काका तुमचं हॉटेल कधी बंद करता ? अजून आहे ना थोडा वेळ.." " तसा मी आज लवकर निघणार होतो पण तुम्ही काही काळजी नका करू ताई... तुमचे पाहुणे आले की मग जातो मी.. तुम्ही बसा निवांत.."

ती तशीच बसून राहिली थोडा वेळ. गजाभाऊ त्यांचा हिशोब करत होते. त्यांचं काम झालं तसं त्यांनी तिला विचारलं.. " आज सकाळ पासून जोर धरलाय बघा पावसानं.. गेले 2 आठवडे दांडी मारून बसला होता.. आणि आज बघा.. आभाळ फाटल्यागत पडतोय... तुम्ही एवढ्या उशिराच कुठं चालला ताई.. ते बी एवढ्या पावसात.. नाही म्हणजे माझ्या पोरीच्या वयाच्या तुम्ही.. त्यात गाडी बंद पडली तुमची..तुम्हा पोरांना नाही कळत हो ताई..आई बापाला किती घोर लागतोय तो.. तुम्ही आपल्याच मस्तीत.." " नाही हो काका.. मैत्रिणीच्या एका कार्यक्रमाला आले होते.. आज काल सगळे डेस्टिनशन सेलिब्रेशन करतात ना.. उद्या सकाळी निघणार होते पण नेमका ऑफीस मधून फोन आला .. त्यामुळे निघाले मग तशीच.. पुण्याला जायचं आहे मला.. पण आता वाटतंय सातारा ला पोचले तरी खूप झालं.. " ती परत घड्याळ बघून अस्वस्थ झाली.. " बघा ना आता 6 वाजत आले.. फोन पण नाही लागत तिच्या नवऱ्याचा.." " येतील ते.. तुम्ही लै काळजी करू नका..बाकी पुणे मुंबई वरून लै लोक येतात इकडे फिरायला.. माझ्या हॉटेल मध्ये पण गर्दी असती बघा शनिवार रविवारी.." " हो ना.. छान आहे इकडे.. आम्हाला शहरात नाही मिळत एवढी मोकळी हवा.. मी येताना तोच विचार करत होते.. ती मागे नदी पण दिसली..छोटी आहे पण किती सुंदर आहे तो परिसर.. एव्हढा पाऊस होता म्हणून ; नाही तर मी नक्की फोटो काढायला उतरले असते..." तो विषय निघाला तसा गजाभाऊनचा चेहरा बदलला.. " बरं झालं ताई तुम्ही नाही उतरला.. अहो तिकडं 2 खून झाले की हो .. पाप साधी गावातली माणसं हो ती.. कोण कशाला मारलं त्यासनी काय कळलं नाही बघा अजून.. पोलीस बी शोध घेतायत अजून.. घाबरून गेले सगळे.." " काय ? 2 खून झाले आणि अजून पकडलं नाही कोणाला? काय करतात पोलीस मग? असतात हो काही विकृत माणसं.. काय करायचं.." 

त्यांच्या गप्पा सुरु होत्या तेवढ्यात अजून एका गाडीच्या आवाजाने दोघे बोलायचे थांबले.. तिला वाटलं तिच्या साठीच गाडी आलीये.. ती लगबगीने पुढे गेली.. पण गाडीतून भलताच कोणी तरी उतरला.. त्याला पाहून ती मागे सरकली.. तो देखील तिला निरखून पाहू लागला.. ती नजर वळवून परत आपल्या जागी जाऊन बसली. घड्याळ बघत तिने परत फोन कानाला लावला.. तो देखील तिच्या कडे बघत समोरच्या टेबलावर जाऊन बसला.. आता ती त्याच्या समोरच अंग चोरून बसली होती.. जवळपास 6 फूट उंच, सावळा रंग आणि धिप्पाड म्हणता येईल असा तो आत येतानाच गाजभाऊनी पहिला.. पहिल्या नजरेतच त्यांना तो फारसा आवडला नाही.. पण आता गिऱ्हाईक आलं म्हणजे आपण उठावं असा विचार करत ते त्याच्या टेबल वर गेले " काय घेणार साहेब? " गजाभाऊ विचारते झाले.. त्याने अंगावर घातलेले जाकीट काढले तसे त्याचे कमावलेले शरीर दिसले.. एका हातावर कोपरा पासून खाली टाके पडल्याच्या खुणा होत्या.. कपाळावर पण कसली तरी जखमेची खूण होती.. त्याचे थोडे खोल गेलेले पिंगट डोळे आणि रोखून बघणारी नजर पाहून गजाभाऊ देखील क्षणभर घाबरले.. पण लगेच स्वतःला सावरत त्यांनी पुन्हा त्याला विचारले " काय आणू साहेब? " " एक चहा आणि मिसळ पाव आणा..मिसळ गरम पाहिजे हा.." हातातल्या किल्लीशी खेळत तो बोलला.. थोड्या नाराजीनेच गजाभाऊ चहा करायला वळले.. 5 मिनिटांनी त्याच्या टेबल वर चहा आणि मिसळ ठेवत ते म्हणाले " अजून काही लागलं तर आवाज द्या " तिच्या टेबल वर देखील गजाभाऊ चहाचा कप ठेवत बोलले " हे घ्या ताई.. " आवाज ऐकून तिने वर पाहिले.. मगाशी तरतरी आलेला तिचा चेहरा आता काळजीने झाकोळून गेला होता.. काहीही न बोलता तिने चहाचा कप उचलला.. तिच्या कडे रोखून बघत त्याने त्याची पेटपूजा केली.. तिने देखील एक दोनदा त्याच्या कडे पाहिले पण तो आपल्या कडेच पाहतोय कळल्यावर तिने नजर फिरवली.. गाजभाऊनी घडयाळ पाहिले.. आता 7 वाजत आले होते.. त्यांनी बसल्या जागेवरून विचारले.. " ताई.. लागला का फोन.. कुठवर आले पाहुणे ? " " नाही लागत फोन काका.. मैत्रीण म्हणतीये तो अलीकडच्या गावात पोचलाय.. कोणी माणूस मिळतोय का बघत होता..पण आता फोन बंद येतोय म्हणतीये.. " तिचा आवाज आता रडवेला झाला होता.. 5 मिनिटे अशीच शांतता होती.. त्याच्या कडे पाहताच तिने बॅगेतून तिचा काळा स्कार्फ काढला आणि अंगभर ओढून घेतला..

 त्याचे खाऊन झाले होते.. पैसे देण्यासाठी तो गजाभाऊ बसले होते तिथे गेला.. खिशातून पाकीट काढत तो गजाभाउना म्हणाला " काय झालं ? काय अडचण ? " त्याचा दमदार आवाज ऐकून तिने देखील नजर वर केली.. " त्याचं काय की या ताई पुण्याला जात होत्या.. पण इथं मागं गाडी बंद पडली ना त्यांची.. आता या टाईम ला कोण माणूस बी येईना.. त्यांचे पाहुणे येणार होते पण आता त्यांचा बी फोन लागेना.. म्हणून विचारत होतो त्यांना .. " " या एवढ्या पावसात कोण mechanic मिळणार.. आणि मिळाला तरी एवढा पाऊस आणि अंधार आहे.. काय दिसावं त्याला.. " तो तिच्या कडे पाहत बोलला.. " ते अलीकडच्या गावात पोचले म्हणतीये मैत्रीण.. तिथं कोणी मिळतंय का ते बघत आहेत ते.. " ती कसंतरी त्याच्या कडे बघत बोलली.. " बघा मॅडम.. आता तरी कोणी मिळणं अवघड आहे .. मी महाबळेश्वर ला जातोय.. वाटेत तुम्हाला हवं तर सोडतो.. त्या गावात तुमचे पाहुणे आले असतील तर भेटतील की आपल्याला.. आता इकडं तुम्हाला कोणती बस किंवा गाडी नाही मिळायची.. " त्याचं बोलणं तिला पटत होतं पण थोडी भीती पण वाटत होती.. 2 मिनिटे ती परत परत फोन लावून बघत होती.. पण फोन काही लागला नाही.. शेवटी कोणताच पर्याय नाही हे कळताच ती उठली.."  ठीक आहे.. सोडा मला " असं म्हणत तिने एका हातात तिची बॅग आणि मोबाईल पकडला आणि दुसऱ्या हाताने अंगावरचा काळा  स्कार्फ लपेटून घेतला... त्याच्या पिंगट डोळ्यात एक चमक आली.. ओठांवर एक विचित्र हास्य उमटलं..ठीक आहे म्हणत तो त्याच्या गाडीकडे वळला.. ती गजाभाऊ बसले होते तिथे आली.. ती पैसे काढू लागताच गजाभाऊ म्हणाले.. " पैसे नको ताई.. तुम्ही नीट जावा.. " त्यांना धन्यवाद देऊन ती त्याच्या गाडीत जाऊन बसली.. गाडी निघून गेली तसं गजाभाऊ हॉटेल बंद करायला उठले.. त्या पोरीची काळजी घे रे देवा ...असं म्हणत त्यांनी कुलूप लावले..

दोन दिवस उलटून गेले.. गजाभाऊ आणि त्यांचा मुलगा हॉटेल साफ करत होते.. तेवढ्यात पोलीस गाडीतून उतरताना दिसले.. गजाभाऊ आणि त्यांचा मुलगा काही न कळता एकमेकांना बघत होते.. गाजभाऊनी डोळ्यांनी खूण करताच त्याने चहाचे 2 कप भरले.. " गजाभाऊ पाटील तुम्ही का ? ही जाहिरात तुमच्या हॉटेल ची वाटतं.. " हवालदाराने एक छापील कागद त्यांच्या कडे फेकत विचारले.. " होय साहेब.. मीच गजाभाऊ आणि ही जाहिरात बी आपल्याच हॉटेलची .. पण काय झालं.. " चहाचा कप पुढे करत गजाभाऊ बोलले.. " कोणाला दिली ही जाहिरात ? " दुसऱ्या हवालदारने चहा पीत विचारले.. " जे कोण हॉटेल मध्ये येईल त्या सगळ्यांना देतो साहेब... तेवढीच जाहिरात होते ना.. पण झालं काय साहेब..गजाभाऊच्या घशाला आता कोरड पडली.. " काय झालं ? नदीच्या जवळ आता डेड बॉडी सापडली.. तिसरा खून झालाय.. आणि झाडीत लपलेली गाडी पण सापडली.. त्या गाडीत होती तुमची ही जाहिरात.. याला ओळखता का.. पाहिलंय का ... " एक फोटो दाखवत हवालदार विचारता झाला.. तो फोटो त्याचाच होता.. तोच होता तो.. पिंगट डोळे.. कपाळावर जखमेची खूण.. " साहेब.. हाच.. हाच तो हरामखोर.. २ दिवसापूर्वी संध्याकाळी आला होता इकडं.. गोड पोरगी होती हो साहेब..ती त्याच्या गाडीतून जायलाच नको होती.. पकडा.. पकडा त्याला... " " पोरगी ? कोण पोरगी.. याचा खुन झालाय गजाभाऊ.. हा बघा पंचनामा केल्याचा फोटो.. फ़ोटोत त्याचा धिप्पाड देह नदी काठच्या मातीत पसरला होता.. आणि गळ्या भोवती काळा  स्कार्फ खुन झाल्याचं दिसत होतं.. काळा ..स्कार्फ असतात हो काही विकृत माणसं.. कशासाठी कोणाचा खून करतील काही सांगता येत नाही.. तिचे शब्द गजाभाऊच्या कानात घुमू लागले आणि दुसऱ्याच क्षणी ते भोवळ येऊन पडले...