तिची कहाणी

She buys something from sale and what happens next... go through the story ????

आज तिला एका ठिकाणी जायचे होते. एकटीच जाणार असल्याने तिने पायीच जाण्याचा विचार केला.
बाहेर जाण्याची मस्त तयारी केली आणि निघाली.
पावसाळा चालू झाला होता म्हणायला.... पण ऊन मी म्हणत होते.
रणरणत्या उन्हातून चटचट पावले टाकत ती निघाली.
तेवढ्यात पावसाची एक जोरदार सर आली. वातावरणात अचानक सुखद बदल झाला. थोडा वेळ आडोश्याला थांबून ती निघाली. तेवढ्याशा
जोरदार सरीने रस्त्यावर चिखल झालेला होता. वेगळ्याच उत्साहाने ती निघाली.

पण अचानक काय बिनसले कुणास ठाऊक !! ती अचानक खच्कन थांबली..
आणि थोड्याच वेळापूर्वीचा तिचा आनंदी चेहरा एकदम सुकला !! खुप वाईट वाटत होते मनातल्या मनात !!
आपला विश्वासघात झालाय ही जाणीव काळीज पोखरत होती.

अजुनही आपल्याला चांगल्या वाईटातला फरक कसा नाही कळत याचे शल्य बोचु लागले.. आणि नकळतच ती "त्या" ला शोधु लागली.केवळ तो आणि तोच तिला या संकटातून सोडवू शकणार होता.


तो जर दिसला नाही तर... तिची अस्वस्थता अधिकच वाढली.. एक एक पाऊल टाकणे तिला जिकिरीचे वाटू लागले.अचानकच रस्ता खूप लांबच लांब पसरल्यागत वाटू लागला.. ते वळण कधी एकदा येतेय असे तिला झाले.
शेवटी कसेबसे तिने ते वळण गाठले .. आता आस होती ती तो दिसण्याची... डोळ्यात प्रचंड अगतिकता घेउन ती पाहु लागली... आणि हो... तो दिसला !!!!!




त्याला पाहताच तिला हुरूप आला .. जड पावलानी ती त्याच्या दिशेने निघाली. एव्हाना त्यालाही अंदाजा आलाच होता की ती आपल्या कडेच येते आहे.. ती पोचली त्याच्याजवळ .........



आणि म्हणाली .......

" काका....ही चप्पल  शिवून द्या !!! "



.......... आणि मान्सुन सेल मध्ये कालच घेतलेल्या "२००० ची चप्पल ५००  ला "या स्कीम वर आपण कसे मस्त  फसले गेलो यावर  विचार करत चडफडत राहिली....