तिची व्यथा भाग तीन अंतीम

Feelings Of Married Old Woman

जलद कथा मालिका लेखन स्पर्धा. 

विषय - अरे संसार संसार. 




यापूर्वी आपण पाहिल की, मधुकरराव आणि रमाताई हे एक वृद्ध दाम्पत्य. मधुकरराव सेवानिवृत्त झाले आहेत आणि त्यांना आपला हा निवृत्तीचा काळ त्यांची पत्नी रमाताई यांच्याबरोबर घालवायचा आहे, परंतु रमाताई नेहमीच काही ना काही कारण काढून त्यांना सतत टाळतात. ही गोष्ट मधुकर रावांच्या लक्षात आल्याने ते रमाताईंना विचारतात की, रमाताई त्यांना का टाळत आहेत? चला तर जाणून घेऊया रमाताईंनी मधुकर रावांना टाळण्याची काय कारण आहेत ती…


रमा -"लग्नानंतर नवे नवे एकमेकांना जाणून घ्यायची ओढ प्रत्येक नवदांपत्याच्या मनात असते. निदान मला तरी ती होती. पण तुम्ही कधीच संध्याकाळी लवकर घरी येत नव्हते. तुमचं ऑफिस झालं की, मित्रमंडळी, गप्पा टप्पा यांच्यातच वेळ घालवून आरामात रात्री आठ नऊ वाजता तुम्ही घरी यायचात. मलाही तेव्हा खूप वाटे.. एखाद्या संध्याकाळी घरी लवकर येऊन तुम्ही मला चकित करावं, बाहेर कुठेतरी फिरायला न्यावं, एकत्र भेळ किंवा पाणीपुरी खावी, मोगऱ्याचा गजरा तुम्ही माझ्या केसात माळावा. पण एकदाही तुम्ही घरी लवकर आला नाहीत."


"मी पण सहजीवनाची खूप स्वप्न पाहिली होती. वाटलं होतं, हिवाळ्याच्या चांदण्या रात्री शेकोटी पेटवून, जुनी मराठी भावगीत ऐकत, आपण एकमेकांच्या डोळ्यात हरवून जावं. किंवा उन्हाळ्यात उकडा वाढला म्हणून आईस्क्रीम खायला किंवा विनाकारणच भटकंती करावी. पावसाळ्यात तुमच्या गाडीवर तुम्हाला घट्ट बिलगुन बसावं, पावसाचे असंख्य टपोरे थेंब चेहऱ्यावर झेलावे, टपरीवरच्या चहाचा तुम्ही आस्वाद घ्यावा आणि मी मक्याच्या कणसाचा. पण ते सगळं स्वप्नातच राहिलं. तुम्ही सांगा बरं खूप मोठी किंवा महागडी स्वप्न होती का हो ती माझी? तुम्हाला दुखवण्याची माझी अजिबात इच्छा किंवा हेतू नाही. पण आज ती स्वप्न, त्या इच्छा, त्या मनोकामना अपूर्ण राहिल्या म्हणून माझ्या मनातील बोच मला तुमच्याजवळ काही सांगायला, व्यक्त व्हायला नेहमी अडवत राहते.


बाळंतपणानंतर मुलांची दुखणी खूपणी ही मलाच बघायला लागायची. त्यांच्या आजारपणात तुमचा किंवा घरातल्यांचा जराही आधार नसायचा. बाळ रात्रभर रडलं कींवा झोपलं नाही तरी त्याला सांभाळायची जबाबदारी माझ्या एकटीवरच असायची, आणि परत दुसऱ्या दिवशीच ठरलेलं वेळापत्रक अजिबात बिघडता कामा नये असा तुमच्या घरचा नियम होता. माझ्या झोपेशी, माझ्या स्वास्थ्याशी, माझ्या आहाराशी कुणालाही काहीही घेणं देणं नव्हतं. सगळ्यांना सगळं अगदी वेळेवर लागायचं. एवढेच नाही हो मुलांच्या पालक सभा, त्यांचा अभ्यास, त्यांची शाळेतील प्रगती हेही जणू माझ्या एकटीचीच जवाबदारी होती. मुलांना चांगले गुण मिळाले तर सासूबाई लगेच म्हणायच्या, "माझा मधु हुशार तशी त्याची लेकही हुशार!"

पण जर कधी त्यांना अभ्यासात कमी गुण पडले तर मात्र माझी खैर नसायची. तुमचे वडील आणि मीना वंन्स मला अगदी फाडून खायच्या.

मीना -"दुपारी झोपा काढण्याऐवजी वहिनी तूला मुलांचा अभ्यास घ्यायला काय होतो?"

रमा-"खरच सांगा हो तो संसार, ती मुलं, त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांची दुखणी-खुपणी, अभ्यासातली प्रगती, केवळ माझ्या एकटीची जबाबदारी होती का? असे कसे तुम्ही सगळे लोक प्रत्येक गोष्टीला मला जबाबदार धरत होते?"

"असू द्या हो! आता मुलं त्यांच्या संसारात रमली आहेत. आपलेही वय निघून गेलं आहे. आता ह्या जुन्या दुखऱ्या जखमा कुर्तडण्यात काही अर्थ नाही. मला आता एकटंच जगायची इतकी सवय झाली आहे ना की, तुमच्या सोबत वेळ घालवणे मला शक्य होईल की नाही माहित नाही! माझी ही शेवटची चूक समजून तुम्ही मला माफ करा."

एवढं बोलून रमाताई घरात निघून गेल्या. त्या त्यांच्या कामाला लागल्या आणि मधुकरराव शून्यात हरवून गेले. त्यांना आता हे कळून चुकलं होतं की, आपण आयुष्यातला एक महत्त्वाचा आणि मोठा काळ आपल्या पत्नीच्या आयुष्यातून अगदी हेतू पुरस्सर  हिरावून घेतला आहे आणि तो आता परत कधीच येणार नाही. आपल्या पत्नीने आपला संसार अगदी एकटीने सांभाळला आहे.

समाप्त.

©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.




🎭 Series Post

View all