जलद कथा मालिका लेखन स्पर्धा.
विषय- अरे संसार संसार.
मागच्या भागात आपण पाहिलं की मधुकरराव आणि रमा हे एक वृद्ध दाम्पत्य आहे आणि मधुकरराव जेव्हा जेव्हा आपली पत्नी रमाला स्वतः सोबत वेळ घालवायच म्हणतात तेव्हा तेव्हा रमा त्यांना टाळते. चला तर या भागात जाणून घेऊया कि रमा त्यांना का टाळते..
मधुकरराव -"रमा अग बैस ना माझ्या बाजूला. तू पण गरम गरम पोहे खा."
रमा -"नको गॅसच्या ओट्यावर पसरला तसाच पडला आहे. तो आवरायचा आहे."
मधुकरराव (जरा रागावून) -"रमा काय झालं?मला निवृत्त होऊन सहाच महिने झालेत आणि या सहा महिन्यात तू सहा वेळा देखील माझ्यासोबत कधी वेळ घालवत नाही, कधी गप्पा मारत नाहीस. तुझं आपलं सतत घर काम. हे कर, ते निवड, ते वाळव, घरची सफाई, इकडची वस्तू तिकडे हेच चाललेल असत. अग मलाही वाटतं तुझ्याशी बोलावं, चार-दोन प्रेमाच्या गोष्टी आठव्यात. पण तू चक्क मला टाळतेस! का रमा का? सांग माझं काय चुकलं?
रमा(गहीवरून)-"नाही हो! तुमचं कुठे काय चुकलं? आणि तसंही तुमचं कधी काय चुकतं? नेहमी तर माझीच चूक असायची आणि वेळ घालवायचे म्हणाल तर मलाही वाटायचं तुमच्याबरोबर वेळ घालवावा, सुखदुःखाच्या, प्रेमाच्या दोन-चार गोष्टी तुम्हाला सांगाव्यात. मला काय वाटतं ते सांगावं, पण तेव्हा तुम्हाला माझ्यासाठी वेळच नसायचा.
तुम्हाला आठवतं का हो… आपलं नवीन लग्न झालं होतं… अशीच हिवाळ्यातली एक प्रसन्न सकाळ होती, रविवार असल्याने तुम्ही आणि मी पण निवांत होते. तुमच्यासाठी चहा करून आणला होता छान अद्रक घालून आणि तुमच्या शेजारीच बसले होते. तेवढ्यात मीना वन्स (मधुकर रावांची लहान बहिण) तिथे आल्या आणि लागल्या बडबड करायला."
मीना -"छान इथे वहिनी तू दादाशी गप्पा मारत बसली आहे आणि तिकडे स्वयंपाक घरात आई एकटीच सगळ्यांसाठी सांबार वडी बनवत आहे. तिला मदत करायची सोडून, फरशी पुसायची सोडून तू इथे दादाशी बोलत बसलीये!"
मधुकरराव -"रमा काय ऐकतोय मी हे? जा आईला मदत कर. सकाळची काम सोडून तुला माझ्याशी गप्पा मारायच्या आहेत?"
रमा -"त्या क्षणी माझं मन इतकं दुखावलं तुम्ही! रविवार असूनही तुमच्या घरी लवकर उठायचा नेम असल्याने मी लवकर उठून, अंगण झाडून, सडा रांगोळी करून,मग घर ही झाडलं होतं. पण तुमच्या आईच्या आदेशानुसार पोछा लावायचा सोडून सगळ्यांसाठी चहा केला होता. त्यांनीच मला तुमच्याकडे चहा घेऊन पाठवलं होतं, आणि मागून मीना वन्सना असो..आता काय फायदा त्या आठवणींचा? अशा कितीतरी रविवारच्या सकाळी मनात तुमच्याशी गप्पा मारायच्या असूनही मी घरातलं काहीतरी काम काढून करत राही. भर थंडीच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातही तुमच्या आईचा नियम म्हणून सिझरियन होऊनही दोन महिन्यात मी कामाला लागे. तुमचं ते एवढं मोठं अंगण झाडून, सडा टाकून, रांगोळी काढे पण त्यावेळी ना त्यांना कधी काही वाटलं ना तुम्हाला. तेव्हा नाही हो कोणी मला म्हणालं की, \"जरा उशीर झाला तरी चालेल.\" कदाचित थंडीत काम केल्याने मला वाताचा विकार जडला असेल असो…
रमाताईंची ही जुनी आठवण ऐकून मधुकर रावांना एक क्षण कसंतरीत झालं, पण आता ते गेलेला काळ परत आणू शकत नव्हते.
पुढच्या भागात बघूया रमाताई मधुकर रावांजवळ आणखीन त्यांच्या कुठल्या आठवणी सांगतात.