तिची व्यथा भाग एक

Feelings Of Married Old Woman


तिची व्यथा 



नोव्हेंबरच्या हिवाळ्यातली ती एक प्रसन्न सकाळ होती. मधुकरराव घराच्या व्हरांड्यात कोवळी उन्ह अंगावर घेत,आराम खुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचत होते. खरंतर वर्तमानपत्र वाचण्याचं ते नुसतं नाटकच करत होते, कारण रमाताई-मधुकर रावांच्या पत्नी, घरात नव्हत्या, त्यामुळे एवढ्या सकाळी सकाळी रमा कुठे गेली असेल असा प्रश्न मधुकर रावांना पडणे अगदी साहजिकच होते. रमाताई घरी परते पर्यंत त्यांची वाट पाहण्याशिवाय मधुकरराव काहीच करू शकत नव्हते, आणि तेवढ्यात रमाताई फाटकाची कडी लावून घरी परतताना मधुकररावां दिसल्या आणि त्यांना हायसं वाटलं.

मधुकरराव -"एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेली होतीस?"

रमा -"अहो असं काय करताय, कार्तिक महिना सुरू आहे ना म्हणून मग विठ्ठल मंदिरात काकडा आरतीला गेले होते."

मधुकरराव - अगं पण एवढ्या थंडीत आंघोळ करून काकडा आरतीला जायची काही गरज आहे का? वाताचा त्रास होतो मग तुला!"

रमा (किंचितस हसून) -"आता हा वात, गुडघेदुखी, सांधेदुखी माझ्याबरोबरच जाणार!"

मधुकरराव -"सकाळी सकाळी झालं का तुझं सुरू? अंगावर शाल तरी न्यायचीस ना!"

रमा (चाचपून)-"अरे विसरलेच मी शाल पांघरायला! उद्या नक्की शाल पांघरून जाईल हो मंदिरात."


मधुकरराव -"पण मी काय म्हणतो, खरंच एवढा देवधर्म करायची काही आवश्यकता आहे का?"


रमा -"जीवनात प्रत्येक गोष्ट गरज किंवा आवश्यकता म्हणूनच करायची असते का?"
(विषय बदलत) "बर जाऊ द्या! चला तुमच्यासाठी चहा करते साडेसात कसे वाजले ते कळलेच नाही."


मधुकरराव -"असू दे ग! आता मला कुठे ऑफिसला जायला वेळ होतोय? बस जरा निवांत माझ्याजवळ."

रमा -"खरंच मलाही आवडलं असतं तुमच्या जवळ बसून निवांत गप्पा मारायला पण, साडेआठला तुमची बी.पी.च्या गोळीची वेळ असते आणि डॉक्टरांनी ती गोळी उपाशीपोटी घ्यायची नाही असं बजावला आहे ना! पटकन पोहे करते आलेच मी."

आणि रमाताई चहा नाश्ता बनवण्यासाठी स्वयंपाक घरात निघून गेल्या…

तर वाचक हो! हे आहेत मधुकर जोशी आणि रमा जोशी दाम्पत्य. मधुकरराव बँकेतून निवृत्त झाले आहेत आणि रमाताई गृहिणी आहेत. या दोघांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. सर्व अपत्यांची लग्न झाली आहेत आणि ते आपापल्या संसारात अगदी सुखी आहेत पण, मधुकर रावांना त्यांचं निवृत्ती नंतरचा वेळ अंगावर अगदी धावून येतो. त्यांना सतत वाटतं की रमाताईंनी त्यांच्यासोबत वेळ घालवावा, गप्पा माराव्यात, दोघांनी आता हे निवृत्ती नंतरचे आयुष्य एकत्र घालवावं. पण तसं होत नाहीये. रमाताई काही ना काही कारण काढून सतत गृहकार्यात व्यस्त असतात, आणि ही गोष्ट मधुकर रावांना फार टोचतेय.

चला तर बघूया रमाताई असं का वागतात?

बरोबर सव्वा आठला रमाताई गरम गरम पोह्याची प्लेट घेऊन मधुकर रावांना द्यायला आल्या.

मधुकरराव -"रमा तुझं कसं ग प्रत्येक काम इतकं वक्तशीर आणि पद्धतशीर आहे! आता बरोबर सव्वा आठ वाजे वाजलेत आणि तू गरमागरम पोहे घेऊन माझ्यासमोर उभी."


रमा -"साडेआठला गोळी घ्यायची आहे ना म्हणून!"

मधुकरराव (पोहे खाता खाता) -"पोहे मस्त झालेत हां रमा. अगदी मला आवडतात तस्से! पोहे, त्यावर थोडा खोबरा कीस, थोडी बारीक शेव, थोडी कोथिंबीर चिरून टाकलेली आणि बाजूलाच ठेवलेली ही लिंबाची फोड.आहाहा! मजा आ गया!"

रमा (मंद हसुन)-"तुम्हाला आवडले ना मग झालं तर."

रमा आत जायला निघाल्याचे बघून मधुकर रावांनी त्यांना थांबवलं.





पुढच्या भागात बघूया की रमाताई मधुकर रावांना टाळून घरकाम करायला घरात का निघून गेल्या?



©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.



 

🎭 Series Post

View all