
तिचा स्वाभिमान
सिद्धी भुरके ©®
स्वातीला आज शनिवार असल्याने सुट्टी होती.काल रात्री बरेच उशीरापर्यंत जागून तिने ऑफिसचे काम केले होते आणि आज प्रसादला सुद्धा सुट्टी असल्याने ती थोडी उशिरापर्यंत झोपली होती. मात्र आठच्या ठोक्याला तिला स्वयंपाकघरातून भांड्याच्या आदळआपट केल्याचा आवाज ऐकू आला. तिच्या लक्षात आले आपण आज उशिरापर्यंत झोपलेले सासूबाईंना काही पटलेलं नाही. बिचारी पटकन उठून आवरून थेट स्वयंपाकघरात गेली.
"अगं काय हे स्वाती.. ही काय वेळ आहे का उठायची? सुट्टी फक्त ऑफिसला आहे.. घरकामाला नाही.."सासूबाई म्हणाल्या.
"काल जरा जागून ऑफिसचे काम केल्याने उठायला उशीर झाला...."स्वाती म्हणाली.
"अगं जा... ते बेडरूमचे दार लावून घे... प्रसाद झोपला आहे ना.. बिचारा आठवडाभर काम करून दमतो.. आज तरी निवांत झोपू दे त्याला.. आपल्या आवाजाने जाग येईल त्याला.. दार ओढून घे बघू..."सासूबाई बोलल्या.. स्वातीने दार ओढून घेतले पण मनोमन तिला फार वाईट वाटत होते. प्रसादची हक्काची सुट्टी आणि स्वातीच्या सुट्टीची मात्र किंमत नाही.
प्रसाद आणि स्वाती यांचे गेल्या वर्षी लग्न झाले होते. दोघेही इंजिनिअर असून मोठ्या कंपनीत कामाला होते. गेल्या वर्षभरात स्वातीने पाहिले होते कि तिचं काम, तिचं करियर याची फारशी किंमत नाहीये सासूबाईंना. स्वातीने फक्त त्यांच्या आदर्श सूनेच्या व्याखेत बसलं पाहिजे.आदर्श सून अशी कि जी घर आणि ऑफिस दोन्ही व्यवस्थित सांभाळते, कितीही ऑफिसच्या कामात हुशार असली तरी तिला सगळं घरकाम हे आलंच पाहिजे, रांगोळी काढणे, मेहंदी काढणे, घर अगदी स्वच्छ आणि टापटीप ठेवणे ही सगळी कामं तिला जमली पाहिजे.गेल्या वर्षभरात स्वाती या व्याख्येत बसण्याचा बराच प्रयत्न करत होती मात्र अजून काही ती 'आदर्श सून ' बनू शकली नव्हती.
स्वातीला स्वयंपाकाची आवड होती. मात्र तिला घर आवरणे, रांगोळी, मेहंदी या गोष्टी काही जमत नव्हत्या. बऱ्याचदा या गोष्टींवरून तिला सासूबाईं टोमणे मारत पण ती दुर्लक्ष करे. "मुलीच्या जातीला या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे... भले मग तू मोठी ऑफिसर बन.. पण या गोष्टी नाहीत तर आदर्श सून नाही "हे सासूबाईंचं ठरलेलं वाक्य होतं. या सगळ्यात प्रसाद सुद्धा कधी तिची बाजू घेऊन बोलला नव्हता.जणू काही बायकोचा असा होणारा अपमान त्याला दिसत नव्हता.स्वातीला सुद्धा गेल्या वर्षभरात या सगळ्या गोष्टींची सवय झाली होती.
दुपारी स्वाती प्रसाद आणि तिचे कपडे इस्त्रीला टाकण्यासाठी निघाली. तितक्यात सासूबाईंनी तिला अडवलं.
"अगं काय हे किती कपडे टाकत आहेस इस्त्रीला? आणि आता जरा शिकून घे.. नवऱ्याचे कपडे इस्त्री करून दिले पाहिजेस.. आणि हे काय तुझे कुर्ते.. इतके लहान तर असतात.. त्यांना तरी स्वतःच इस्त्री करत जा.."
"आई अहो मला इस्त्री करता येत नाही.. मला सवयही नाही.. मग भले माझे कपडे असो किंवा प्रसादचे.. मला नाही जमणार..."स्वातीने आज वैतागून उत्तर दिलेच.
संध्याकाळी स्वाती जरा निवांत टीव्ही बघत बसली होती. तेव्हा पुन्हा सासूबाईंनी तिला उठवलं,
"अगं स्वाती.. काय गं ती तुझ्या रूमची अवस्था? सगळं सामान इकडे -तिकडे पसरलेलं आहे.. जरा व्यवस्थितपणा अंगात नाही तुझ्या..."
आता स्वातीचा बांध सुटला आणि ती म्हणाली, "हो नाहीये माझ्या अंगात व्यवस्थितपणा... आणि ती रूम माझ्या एकटीची नाहीये.. तुमचा मुलगा सुद्धा तिथे राहतो.. त्याने आवरली तर काय बिघडणार आहे का? "
स्वातीचा आवेश पाहून प्रसाद तिच्यावर चिडला, "स्वाती आईसोबत बोलायची ही काय पद्धत आहे? काय वाईट सांगतीये ती तुला? खरचं जाऊन रूम बघ.. मला तर नकोच वाटतं तिथे बसायला..."
"नकोच वाटतं बसायला तर मग स्वतःहून का नाही करत तू साफ सफाई?मी आवरून ठेवेल सगळं याची वाट का बघायची? आणि तुझी सुट्टी, तुझं काम, तू दमणार आराम करणार.. आणि माझं काय? सुट्टीच्या दिवशी सुद्धा जरा निवांतपणा नाही.. मी सुद्धा आठवडाभर ऑफिसचं काम करून दमते.. आणि नुसतं ऑफिसचं काम नाही तर हे घरकाम असतंच.. पण आईंच्या व्याख्येतील आदर्श सून कधी कामं करून दमतच नाही.. ती सतत कामाचा गाढा ओढत असते... बास मला नाही जमणार आता.. मला नाही बनायचं आदर्श सून..."स्वाती बोलली.
"अगं मी जे काही सांगते ते तुझ्या चांगल्या साठीच सांगत आहे... आत्ता कामाची सवय नाही लागली तर पुढे मुलबाळ झाल्यावर, जबाबदाऱ्या वाढल्यावर कसं होणार तुझं?" सासूबाई म्हणाल्या.
"वा.. म्हणजे तेव्हा पण मी घर सांभाळायचं, बाळाकडे बघायचं आणि ऑफिसला सुद्धा जायचं.. आणि या सगळ्यात प्रसाद काय करणार? नुसतं बसून राहणार का?"स्वाती म्हणाली.
प्रसादला आता राग अनावर झाला आणि तो जोरात स्वातीवर ओरडला,"स्वाती...... बास झालं... हेच का तुझे संस्कार.. तुम्ही मुली बाहेर पडून चार पैसे कमवून आणता म्हणजे काय आमच्या डोक्यावर बसून नाचणार का?? ही काय भाषा तुझी बोलायची...?आत्ताच्या आत्ता माफी माग आईची.. बास झालं...."
प्रसादचा राग बघून स्वातीला आता रडू कोसळलं, ती रडत रडत तिच्या रूममध्ये गेली. थोड्या वेळाने स्वाती बॅग घेऊन बाहेर आली. सासूबाई आणि प्रसाद तिच्या हातातील बॅग बघून आश्चर्यचकित झाले. इतक्या छोट्या वादावरून स्वाती घर सोडून निघाली याची त्यांना कमाल वाटत होती.
"स्वाती अगं, संसारात छोटे मोठे वाद होतात गं.. म्हणून लगेच का असे बॅग भरून निघून जायचं का?" सासूबाई म्हणाल्या.
"अगं स्वाती काय हा वेडेपणा.. जा ती बॅग आधी ठेवून ये.. चल झालं गेलं विसरून जा..."प्रसादसुद्धा म्हणाला.
"नाही.. नका थांबवू मला.. मला थोडे दिवस जाऊ दे माझ्या आईच्या घरी.. मला आता सगळं असह्य झालं हे सगळं...."स्वातीने उत्तर दिले.
"अगं काय बोलतीये तू?? इतका छोटासा वाद.. त्याचा इतका बाऊ कशासाठी?"सासूबाई म्हणाल्या.
"छोटासा वाद?? इतके दिवस जाऊदे म्हणत मी दुर्लक्ष केले पण आता माझ्या स्वाभिमानावर बोट ठेवले गेले.. ते सहन नाही होणार मला...."स्वातीने उत्तर दिले.
"स्वाती काय बरळत आहेस? पुरे झालं आता.. जा ती बॅग ठेऊन ये " प्रसाद बोलला.
"नाही.... प्रत्येक वेळेस माझा जॉब, करिअर आणि शिक्षणाचा उद्धार झालेला मी नाही सहन करणार.. मी सुद्धा दमून जाते याची कोणाला पर्वा नाहीये..आज मी सुद्धा तुझ्याप्रमाणे इंजिनिअर आहे... माझ्या हाताखाली 40 जणांची टीम काम करते.. पण कसं आहे ना.. बाहेर मी कितीही कर्तृत्व गाजवून आले तरी घरी येऊन मी गप गुमाने सगळी कामं करायची.. आणि मुद्दा इथे कामं करायचा नाहीये.. जर तू आणि मी शिक्षणात बरोबरीचे आहोत, करिअर मध्ये एकसमान आहोत.. आपल्याला पगार सुद्धा सारखाच आहे मग फक्त माझी गुणवत्ता ही घरकामावर का ठरवली जाते? तुला या सगळ्यातून सूट का? घर दोघांचं, संसार दोघांचा, दोघेही नोकरी करणारे मग फक्त मीच दमून भागून घरी आले तरी माझ्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पदर खोचून कामाला लागायचं? आणि तू मात्र ऑफिस मधून येऊन निवांत बसून राहायचं.. का?? तर तू या घरचा मुलगा आहेस आणि मी सून आहे म्हणून? आणि मी अजिबात म्हणत नाहीये तू घरातील धुणं भांडी कर पण चहा करणे, स्वतःची रूम आवरणे आणि हो स्वतःचे कपडे इस्त्री करणे ही कामं तू नक्कीच करू शकतोस..."
"मी असताना माझ्या मुलाने ही कामं करणे मला अजिबात पटणार नाही...."सासूबाई पटकन बोलल्या.
"मी सुद्धा लग्नाच्या आधी ही कुठलीच कामं केली नव्हती... मी सुद्धा कित्येक रात्री अभ्यासासाठी जागून काढल्या आहेत, आज करिअर मध्ये या पोझिशनला पोहोचण्यासाठी मी सुद्धा खूप मेहनत केली.. मला हे घरकाम लग्नानंतर नवीनच आहे... मग माझ्या आईवडिलांनी बोलायचं का आम्ही असताना आमच्या मुलीने हे काम करू नये...?जशी तुमची आदर्श सूनेची व्याख्या आहे ना.. तशी माझ्या मनात सुद्धा आदर्श नवऱ्याची व्याख्या आहे...नाही बनायचं मला तुमची आदर्श सून.. एवढे शिक्षण घेऊन, घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळून सुद्धा माझी गुणवत्ता ही रांगोळी काढणे आणि पसारा आवरणे यावरून ठरवली जात असेल तर मला नाही राहायचं इथे...."असं म्हणून स्वाती निघाली...
प्रसादला त्याची चूक उमगली. स्वातीच्या बोलण्याने त्याचे डोळे उघडले.नवरा म्हणून आपण कधीच स्वातीच्या शिक्षणाचा, नोकरीतील तिच्या प्रगतीचे कौतुक केले नाही.. तिच्या इच्छा, आकांक्षा जाणून घेतल्याच नाहीत हे त्याच्या लक्षात येतं..तसं प्रसाद तिला थांबवायचा प्रयत्न करतो,"स्वाती अगं थांब ना.. माझी चूक आली लक्षात.. नको जाऊस.. प्लीज.. मला माहित आहे मी तुझं मन दुखवल आहे.. पण आता काय करू मी कि ज्यामुळे तुझ्या मनात डोकवायची किल्ली मला सापडेल.. कशी मनधरणी करू? तूच सांग..."
"माझ्या मनाची किल्ली तू कधीच हरवून बसलास.. माझा स्वाभिमान, माझ्या शिक्षणाचा आदर, कोणत्या आदर्शतेच्या तराजूत मला न तोलता माझा आहे तसा स्वीकार ही माझ्या मनापर्यंत पोहचायची किल्ली आहे.. माझ्या गुणवत्तेचा मान ठेवला असतास, मला घरातील कामाची बाई समजला नसतास आणि जेव्हा कधी आई मला बोलायच्या त्यावेळी माझ्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला असतास ना तर नक्कीच हे कुलूप उघडलं गेलं असतं.. तू माझ्या मनातून उतरला आहेस... जाऊ दे मला... थोडे दिवस का होईना जिथे माझ्या शिक्षणाची किंमत आहे तिथे राहू दे मला..."असं म्हणून स्वाती घराबाहेर पडली. आता मात्र सासूबाई आणि प्रसाद हताश होऊन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसले होते.
वाचकहो कथा काल्पनिक आहे पण बऱ्याच घरात दिसलं जाणारं चित्र आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते नक्की मला सांगा. कथा आवडली तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.
सिद्धी भुरके ©®