तिचे विलक्षण विश्व भाग ३

Story Of Her Miraculous World ..!!

#भाग३

मागील भागात आपण बघितले की, सुनीलराव व कल्पनाताई विश्वा ला घरी घेऊन येतात. तिने आपल्या मनाप्रमाणे सजविलेल्या घराकडे बघून ती खूप आनंदित झालेली असते. तेवढ्यात ते तिघेही असे काहीतरी बघता की ज्यामुळे त्यांना खूप धक्का बसतो. बघुयात आता पुढे...

विश्वा, सुनीलराव नि कल्पनाताई तिघेही आ वासून दरवाजाकडे बघत उभे राहिले होते. कल्पनाताईंचा आवाज ऐकून पळत आलेले गार्ड मात्र संभ्रमात पडले. त्यांना समजेनासे झाले की काय करावे..!! त्यांनी एखाद्या संकटाची अपेक्षा केली होती, परंतु इथे तर असे काहीच नव्हते. शेवटी त्यातील एका गार्ड ने सुनीलरावांनी हाथ लावला तेव्हा ते दचकून भानावर आले. गार्ड काही बोलायच्या आतच "सॉरी सॉरी, काही प्रॉब्लेम नाहीये. जाऊ शकता तुम्ही." बिचारे ते गोंधळलेले गार्ड तसेच माघारी फिरले.

तेवढ्यात समोरून एक मुलगा पळत पळत आला नि विश्वाच्या गळ्यातच पडला. विश्वा जवळपास तोल जाऊन फक्त पडायचीच राहिली होती. तश्या कल्पनाताई पण भानावर आल्या. ते दोघे मात्र हसत होते. तो कल्पेश होता. विश्वाचा धाकटा भाऊ. अचानक त्याने विश्वाच्या डोक्यात जोरात टपली मारली अन तो कल्पनाताईंच्या मागे जाऊन उभा राहिला.

"काय करतोय रे कल्पेश आत्ताच तर आली ती. अजून दारात पाऊल नाही ठेवलं तिने की झाला तू लगेच सुरू!!" -कल्पनाताई.

"बघा न बाबा, कसा करतोय हा...याला काही सांगून ठेवा बर का तुम्ही..!!" -विश्वा नाक फेंगारत म्हणाली.

तसे सुनीलराव काही बोलायला लागलेच होते की, कल्पेशने परत तोंड उघडले.

"ए रडुबाई... सुधारली नाही का ग अजून तू..!! अजूनपन तशीच रडतेय...माझ्याकडे बघ जरा..तुझापेक्षा दुप्पट उंची झालीये अन रोज जिम पण करतो मी...त्यामुळे माझ्याशी आता पंगा घेऊच नकोस तू...खूप महागात पडेल तुला" -कल्पेश हसत हसत म्हणाला.

विश्वा आता खरंच चिडायला लागली होती. का नाही चिडणार. राग तर तिच्या नाकाच्या शेंड्यावरच असायचा. जसा पळत-पळत यायचा तसा धावत धावत निघून देखील जायचा. तेवढ्यात कल्पनाताईंनी तिचा सूर ओळखून मध्ये पडल्या. "बस बस..पुरे झालं तुमच्या दोघांचं आता. खूप वेळ आहे आपल्याकडे. मनसोक्त भांडा नंतर पण आता सध्या घरात चला तुम्ही सगळे." सगळ्यांना हे पटलं नि सगळे घरात जायला निघाले.

दरवाजा जवळ पोहचता नाहीतर "थांबा तुम्ही सगळे मी आलेच" असा वटहुकूम कल्पनाताईंनी सोडला. सगळे अगदी चिडीचूप जागच्या जागी उभे राहिले. त्या आत गेल्या नि आरतीची थाळी अन एक काठाचे असणारे पण छुमछुम वाजणाऱ्या घुंगराणी सजविले सुंदर तबक आणले. त्या चालताना त्या घुंगरांचा नाजूक निनाद होत होता. विश्वा ला तो जाम आवडला. कारण लहानपणापासूनच नाजूक घुंगरांचे पैंजण हा तिच्या जिव्हाळ्याचा विषय होता. मगाशी आलेला राग तर तिचा कुठच्या कुठे पळून गेला होता. पण ती विचारात पडली होती. आरतीची थाळी ठीक आहे पण या तबकात आहे तरी काय बुवा..!!

कल्पनाताईंना तिच्या चेहऱ्यावरून तिला पडलेल्या प्रश्नाचा अंदाज आला असावा. परंतु त्या फक्त हसल्या. त्यांनी ते तबक उंबरठ्याच्या पलीकडे घराच्या बाहेरील बाजूने विश्वाच्या पायाजवळ ठेवले. ते बघून विश्वाला जरा धक्काच बसला. बिचारीला कदाचित आज फक्त धक्केच खायला मिळणार होते वाटत..त्या सुंदर तबकात लालभडक कुंकू पाण्यात घट्ट मिसळलेले होते. अगदी नववधू च्या गृहप्रवेशावेळी करता अगदी तसेच!! तिला काही समजेनासे झाले. ती फक्त काही क्षण त्या कुंकवाकडे बघत राहिली. गर्द लाल रंगाचे कुंकू ते पाण्यात मिसळल्यामुळे छान एकदम मऊ-मऊ भासत होते. त्याला जणू काचेसारखा थर आला होता नि त्यात विश्वाला स्वतःचे प्रतिबिंब अस्पष्ट दिसत होते...

"हे काय आहे आई...?? आणि हे इथे अस का ठेवलंय तू..??" -विश्वा.

कल्पनाताई तिचे औक्षण करता करता बोलल्या. "काही नाही ग राणी..!! त्यात पाय ठेव तुझे नि ये घरात." -कल्पनाताई.

"अगं आई...पण हे तर लग्न झाल्यावर नवरीच्या गृहप्रवेशावेळी करता ना..?? माझं कुठं लग्न झालंय..??" -विश्वा.

"नाही ग बाळा..त्यावेळी ती मुलगी घराची लक्ष्मी बनून आलेली असते. त्यामुळे आपण आपल्या घराच्या लक्ष्मीचा प्रवेश या पद्धतीने करतो..." शेजारी उभे असलेले सुनीलराव मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलले.

"कुंकू हे सौभाग्याची खूण आहे. त्या उमटणारऱ्या लक्ष्मीच्या पाऊलांनी सौभाग्य सदैव नांदावे नि लक्ष्मीचा वास नेहमी रहावा म्हणून गृहप्रवेशावेळी कुंकू वापरता." -कल्पनाताई.

"आणि आमचं सौभाग्य या घराची लक्ष्मी तूच तर आहेस दिदी..!! त्यामुळे हे सगळं तुझ्यासाठी..!!" मागे उभा असलेला कल्पेश म्हणाला.

विश्वाला हसावे की रडावे तेच समजत नव्हते. तिच्या डोळ्यांत पाणी तरळले. तिची ती अवस्था बघून एक हाथ सुनिलरावांनी नि दुसरा हाथ कल्पनाताईंनी हातात घेतला. तिने हळूच त्या तबकात पाय ठेवले. तो थंडगार स्पर्श तिला सुखावून गेला....तिने घरात पाऊल टाकले. विश्वकल्प सदनामध्ये विश्वाचे पाहिले पाउल पडले. ते सर्व तसेच देवघरात दर्शनासाठी गेले. विश्वाची ठळक उठणारी पाऊले आता जरा फिकी होत गेली. परंतु शुभ्र फरशीवर तिचे लालभडक पाऊले लक्ष्य वेधून घेत होती. आज एका सुनेचा नाही तर एका मुलीचा गृहप्रवेश झाला होता. जणू काही खरंच लक्ष्मीने प्रवेश केला, असाच भास होत होता.

देवघरात दर्शन घेतल्यावर सर्वांचे चित्त शांत झाले. पण तितक्यात सुनिरावांनी कलपेशचा कान जोरात पिरगळाला. तो जवळपास मोठयाने ओरडलाच.

"काय ओ बाबा... मी काय केलं..सोडा न दुखतंय खूप..!!" कल्पेश वेदनेने कळवळत बोलत होता.

"तू वेडा आहेस का जरा!! एकतर तू केरळ वरून एकटा आलास तेही न सांगता न कळविता...!! आपण काल बोललो तेव्हा सुद्धा तू नाही बोललास काही की तू येणार आहेस..!!"

"हो बाबा सॉरी...चुकलं माझं..!! पण मी तुम्हांला सांगितलं असतं तर तुम्ही तिघे सकाळी असे मेणाचे पुतळे झाला असता का..!!" -कल्पेश हसत हसत म्हणाला.

"अच्छा...त्यामुळे तू काल सगळं डिटेल मध्ये टाइम वैगेरे विचारून घेत होतास तर.." सुनीलराव जरा अजून कान पिरगाळत बोलले.

"सोडा न बाबा खरंच खूप दुखतंय...सांग ना ग दीदी तू बाबांना.. तुझं ऐकता सगळं ते..!!" -कल्पेश.

"मी नाही सांगत जा...बाबा अजून जोरात...आणि चांगले फटके पण द्या ४-५...खूपच बिघडलाय हा..!!" -विश्वा तिचा मघाशीचा सूड पूर्ण करत होती.

"आई.....सांग ना ग तू तरी..!!" -कल्पेश.

"सोडा हो लाल झालाय बघा कसा तो पण आणि त्याचा कान पण....जाऊद्या सहीसलामत आला तो हीच बाप्पांची कृपा..!!" -कल्पनाताई.

"चल आज विश्वा आलीये म्हणून वाचल्यास तू...पुन्हा अस केलंस तर बघ...जीव टांगणीला लागतो आमचा..!!" -सुनीलराव.

"चला पुरे झालं. फ्रेश व्हा सगळ्यांनी. जेवायला वाढते मी."-कल्पनाताई असे बोलताक्षणी सगळे बाहेर निघाले तितक्यात कल्पनाताईंच्या मोबाईलवर एक मेसेज आला. 'मला लेट होईल कदाचित यायला. खूप ट्राफिक आहे. विश्वाला काही संशय नाही आला पाहिजे अजिबात..' हा मेसेज वाचून त्यांच्या चेहऱ्यावर एक चिंतेची लकेर उमटली. काही क्षण त्या विचारात मग्न झाल्या पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी तो मेसेज डिलिट केला नि मोबाईल सायलेंट करून कंबरेला खोचलेला मोबाईलच्या बटव्यात टाकला नि आपल्याच विचारात किचनकडे निघाल्या.



कुणाचा मेसेज असेल तो? त्यांनी तो डिलिट का केला? कोण असावा तो मेसेज करणारा की ज्यामुळे कल्पनाताईंना चिंतेने ग्रासले.? काय लपविणार होत्या त्या विश्वापासून? जमेल का त्यांना ते लपवायला? बघुयात पुढच्या भागात...!!

©️Sweety-Aishwarya Deshmukh????

#भाग१ ची लिंक-
https://www.irablogging.com/blog/her-miraculous-world_2990

#भाग२ ची लिंक-
https://www.irablogging.com/blog/her-miraculous-world-part-2_3045

टीप- कृपया तुमचा अभिप्राय कमेंटद्वारे अथवा फेसबुक वर Sweety-Aishwarya Deshmukh या अकाउंट द्वारे नक्की कळवा. तुमचे मोलाचे शब्द माझा उत्साह वाढविण्यास नक्कीच मदत करतील.

तसेच मी स्वतः देखील वाचक-लेखक असून जो सन्मान मी बाकी लेखकांचा करते तेवढीच तुम्हां सर्वांकडून माझ्याप्रति देखील माफक अपेक्षा ठेवते. माझी कथा माझ्या नावासकट शेअर करायला माझी हरकत नाही.????

अधिक संपर्क-
Facebook- Sweety-Aishwarya Deshmukh.
Gmail-
aishwarya.deshmukh2000@gmail.com



●○●○●○●○●○●○●○●○●○

🎭 Series Post

View all