Nov 23, 2020
कथामालिका

तिचे विलक्षण विश्व भाग २

Read Later
तिचे विलक्षण विश्व भाग २


#भाग२

मागील भागात आपण बघितले की सुनीलराव नि कल्पनाताई खूप वर्षांनी आपल्या परदेशात असणाऱ्या आपल्या लेकीला भेटण्यासाठी खूप उत्सुक असतात. त्यासाठी त्यांनी खूप तयारी करून ठेवलेली असते. विमानतळावरून तिला घेऊन निघताना एक अज्ञात माणूस सतत तिला बघत असतो. आता पुढे-

#भाग१ ची लिंक-
https://www.irablogging.com/blog/her-miraculous-world_2990


विश्वा ला घेऊन सुनीलराव आणि कल्पनाताईंची गाडी त्यांच्या गेट वर थांबली. गाडी बघितल्या बघितल्या वोचमन गेट उघडायला धावला. गेट शेजारील बंगल्याच्या पाटीकडे लक्ष्य जाताच विश्वाचा उर भरून आला आणि चेहऱ्यावर समाधान पसरून एक हास्याची लकेर तिच्या चेहऱ्यावर उमटली. काळ्या रंगाचा मऊशार मार्बल फरशीवर सुवर्णाक्षरात कोरलेले "विश्वासकल्प सदन" नाव दिमाखात झळकत होते. त्याखाली छोट्याश्या अर्धवर्तुळाकार आकारामध्ये लावलेले गवत आणि फुलझाडे व त्याच्या रंगीबेरंगी फुलांनी त्या पाटीला अजूनच शोभा आणली होती. जणू हिरव्या रंगाचा अन रंगीबेरंगी हिऱ्यांचा मुकुट परिधान केल्याचा एक भासच होत होता. गाडी गेट मधून आत प्रवेश करताना वोचमन ने मस्त एकदम कडक मध्ये सलाम ठोकला. मागे बसलेल्या विश्वाने देखील स्मितहास्य करत अन जराशी मान झुकवून जणू त्या अभिवादनाचा स्वीकार केला. त्यासरशी त्या वोचमनच्या चेहऱ्यावर देखील आश्चर्य अन समाधानाचे भाव उमटले.

"विश्वासकल्प सदन !" एक टुमदार अन आलिशान गृह. यातील प्रत्येक वस्तू विश्वा ने जणू आपल्या हाताने घडविली होती अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही .आजपर्यंत जे सगळं ती फक्त व्हिडीओ कॉल, फोटोज, व्हिडीओ द्वारे बघत होती, ते सर्वकाही आज प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी अनुभवत होती. हो!! कारण २ वर्षे परदेशात असताना तिने या घराचे काम पूर्ण करून घेतले होते. स्वतः अगदी जातीने लक्ष्य देऊन!! अगदी घराबाहेरील बागेत कोण कोणती झाडे असावीत, कशी लावायची इथपासून तर घरातील कोपऱ्यात कोणता फ्लॉवरपॉट ठेवायचा, भिंतींवर कुठे अन कोणत्या फ्रेम लावायच्या इथपर्यंत तिनेच ठरविले होते. घराचे डिझाईन तर तिच्याच पसंतीचे होते, परंतु, एवढ्या सातासमुद्रापार असूनही तिने जणू अक्षरशः या कामी तिचा जीव ओतला होता. हेच कारण होते की त्यामुळे घराचे बांधकाम करणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा विश्वा ला ओळखत होता. ऋणानुबंध जपण्याची अगदी पहिल्यापासूनच तिला सवय होतीच, तीच तिने सरत्या वर्षांत प्रत्यक्षात आणल्यामुळे एवढ्या दूर असूनही अन प्रत्यक्ष न भेटता देखील तिने प्रत्येकाच्या मनाला जणू स्पर्श केला होता.

विश्वा आज तिचे सर्व कष्ट अनुभवत होती. तिच्या अगदी जिवाभावाच्या सोनचाफ्याने सर्वप्रथम तिचे स्वागत केले. दुतर्फा लावलेली दोन सोनचाफ्याची झाडे जणू तिला लवून अभिवादनच करत होती. गर्द हिरव्यागार पानांमधून डोकावणारी पिवळीधमक सोनचाफ्याची पिवळीधमक फुले मनाला अतिशय प्रसन्न करून गेली. त्यांच्या दरवळणाऱ्या सुगंधाने तर विश्वा चा संपूर्ण प्रवासाचा शीण कुठच्या कुठे पळून गेला. याच सुगंधामुळे विश्वा चाफ्याची प्रेमवेडी होती. डाव्या बाजूने सर्वात कडेला अगदी दरवाज्यापर्यंत शो-ची झाडे व्यवस्थित रित्या चौकोनी आकारात कापलेली होती अन त्याच्या आतून तर कंपाउंड च्या भिंतींपर्यंत चौरासकृती आकारात टप्प्या-टप्प्याने सफेद, पिवळी, गुलाबी, लाल, जांभळी, चॉकलेटी, नारंगी अशी विविधरंगी फुले फुललेली होती. त्यांना बघून तर तिला दिल्लीला होणारी परेड च आठवली अन स्वतःच्या कल्पनेवर हसू देखील आले!! जरासं उजवीकडे बघितलं तर हिरवागार गालिचा पसरलेला होता. मध्यभागी पांढरेशुभ्र एक टेबल आणि ४ खुर्च्या व्यवस्थित ठेवलेल्या होत्या. बाजूने विविधरंगी फुलझाडे फुललेली होती. इतक्यात सुनीलरावांनी हॉर्न वाजविला आणि आजूबाजूला बघण्यात गुंग झालेल्या विश्वा ला भानावर आणले. ती जराशी दचकलीच!! बघितले तर सुनीलराव अन कल्पनाताई तिच्याकडे बघून हसत होते.

"काय हो पप्पा, काय झालं? तुम्ही दोघे असे माझ्याकडे बघून का हसताय??" -विश्वा.

"राजकुमारी जी, हसणार नाही तर काय करणार!! अहो गाडी थांबवून किती वेळ झालाय पण तुमचं लक्ष्यचं नाही!! सर्वकाही गाडीतच बसून बघायचं आहे का तुम्हांला?? नाहीतर तुमची आज्ञा असेल तर आम्ही गाडी पार्क करून येतो तोवर तुमचे चरणस्पर्श करा जरा धरणीमातेला. धन्य होतील त्या!!" -सुनीलराव

"काय हो... झाले का तुम्ही सुरू लगेच. आताशी कुठं आलंय माझं लेकरू नाही तर झाले लगेच सुरु तुम्ही!!" -कल्पनाताई.

"बघ ना ग आई..!! या पप्पा तुम्ही जरावेळाने मैदानात मग बघुयात कोण हैं बाजीगर..!!" असे विश्वा नेहमीप्रमाणे तिचे नाक उडवत म्हणाली तसा तिघांचाही हशा पिकला.

"हो राजकुमारी जी. नक्कीच. पण तुम्ही दोघी पायउतार व्हाल तेव्हा ना..!!" - सुनीलराव.

तत्क्षणी कल्पनाताई अन विश्वा गाडीतून उतरल्या. एक थंड मंद हवेची झुळूक हळूच तिला स्पर्शून गेली की काय अस तिला उगाचच वाटलं. परंतु दुसऱ्याच क्षणी आईच्या ओरडण्यामुळे ती घाबरली. त्या आवाजाने सुनीलराव देखील पळत आले आणि गेट वरील गार्ड देखील. तिने बघितलं तर कल्पनाताई फक्त दरवाज्याकडे बघून ओरडल्या होत्या अन अजूनही त्या डोळे विस्फारून बघतच होत्या. विश्वा अन सुनीलरावांनी तिकडे बघितलं तर ते दोघे देखील आश्चर्यचकित झाले अन बघतच राहिले. जणू या तिघांनाही कोणी जादू करून एका जागेवर खिळवून ठेवलेय की काय अशी अवस्था झाली होती.


काय वाटते, काय झालं असेल? काय दिसलं असेल ह्या सगळ्यांना? पुढे काय होईल आता? एखाद्या संकटाची चाहूल तर नसेल ना ही? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधुयात पुढील भागात..!!

©️Sweety-Aishwarya Deshmukh????
#भाग१ ची लिंक*
https://www.irablogging.com/blog/her-miraculous-world_2990

टीप- कृपया तुमचा अभिप्राय कमेंटद्वारे अथवा फेसबुक वर Sweety-Aishwarya Deshmukh या अकाउंट द्वारे नक्की कळवा. तुमचे मोलाचे शब्द माझा उत्साह वाढविण्यास नक्कीच मदत करतील.

तसेच मी स्वतः देखील वाचक-लेखक असून जो सन्मान मी बाकी लेखकांचा करते तेवढीच तुम्हां सर्वांकडून माझ्याप्रति देखील माफक अपेक्षा ठेवते. माझी कथा माझ्या नावासकट शेअर करायला माझी हरकत नाही.????

अधिक संपर्क-
Facebook- Sweety-Aishwarya Deshmukh.
Gmail-
[email protected]●○●○●○●○●○●○●○●○●○

Circle Image

Aishwarya Vijay Deshmukh

Student

I'm Engineering Student.