तिचे विलक्षण विश्व भाग १

Story About Her World.

तिचे विलक्षण विश्व
Her Miraculous World 

#भाग१

नमस्कार.
मी ऐश्वर्या विजय देशमुख. IT इंजिनिअरिंग ची विद्यार्थिनी आहे. इंजिनिअर हा इंजिनिअरिंग सोडून सर्वकाही करू शकतो, ही आख्यायिका मुळातच प्रसिद्धच आहे. याचा थोडा-फार अनुभव मी देखील घेतला. परंतु असे नाही की लिखाणाची सवय त्यामुळे लागली. शाळेत असल्यापासूनच लिखाण अन वाचनाची सवय होती. शाळा सुटली अन दैनंदिन धावपळीत लिखाण देखील सुटले. परंतु वाचन मी सुटू नाही दिले. दुसर्यांना लिखाणाची मदत करताना आता परत वाटू लागलंय लिखाणाला सुरुवात करावी. परंतु कशी करावी अन कोठून करावी हे सुचत नव्हते. तसेच आत्तापर्यंत लिहिलेल सर्वकाही मी माझ्यापर्यंतच मर्यादित ठेवलेलं. ते समोर आणावे की नाही हा देखील एक मोठा प्रश्न!

शेवटी माझं मन जिंकले. करतेय एक छोटीशी सुरुवात. आशा आहे तुम्हां सर्वांची साथ मला नक्कीच मिळेल!!

●○●○●○●○●○●○●○●○●○●○

आज सुनीलराव आणि कल्पना ताईंसाठी खूप खास दिवस होता. इतका खास होता की त्याची गणती ते दोघेही करू शकत नव्हते. त्या दोघांचा अभिमान नि स्वाभिमान, त्या दोघांचे सोनपाखरू त्यांची लाडकी थोरली लेक "विश्वा" आज तब्बल २ वर्षांनी परदेशातून परतत होती. कधीही स्वतःजवळून दूर राहू न दिलेलं त्यांचं पाखरू गरुडभरारी घेऊन साता समुद्रापार झेपावलं होत ते आज परतत होतं. नव्या दुनियेच्या तंत्रज्ञानाने माणूस जवळ आला, पण त्यात त्या मायेच्या स्पर्शाची सर नक्कीच नव्हती. व्हिडीओ कॉल वर फक्त दिसणारे चेहरे होते परंतु, पाठीवरून मायेने फिरणारे अन बोटं मोडून कौतुकाने दृष्ट काढणारे हाथ हातात घेण्याचे सौभाग्य नक्कीच अजूनतरी लाभले नाही..!!

रोज सतत होणाऱ्या व्हिडीओ कॉल मुळे अंतर नक्कीच कमी झाले होते परंतु विश्वा गेल्यापासून जी सुनीलराव आणि कल्पना ताईंना ओढ लागली होती, जी हुरहूर लागली होती त्यात तसूभर सुद्धा फरक पडला नव्हता. दुपारी 12.00 वाजता विश्वाची फ्लाईट मुंबई एअरपोर्ट वर पोहचणार होती. हे दोघेही तिला घ्यायला जाणार होते. घरापासून प्रवास किमान एक तासाचा होता अन एक तास तरी आधी तेथे हजर रहावे लागणार होते.

तिकडे सुनीलरावांची घरातून निघण्यासाठी तणतण चालू होती. कारण सकाळच्या या वेळेस असणाऱ्या मुंबईच्या ट्राफिकची त्यांना चांगलीच ओळख झालेली होती तर दुसरीकडे कल्पनाताईंची पहाटेपासूनच सुरू असलेल्या लेकीच्या स्वागताची पुन्हा पुन्हा खात्री करून घेत होत्या. सरतेशेवटी दरवाजाला कुलूप लावून दोघेही घराबाहेर पडले. मजल दरमजल करत शेवटी ते एअरपोर्ट वर पोहचले. कदाचित आज त्यांचे नशीब सुद्धा जोरात होते. कारण चिक्कार ट्राफिक जाम असणाऱ्या या वेळेत मात्र त्यांचा प्रवास एकदम सुरळीत झाला होता.

तब्बल एक तासापेक्षा जास्त वाट बघितल्या नंतर सरतेशेवटी त्यांना त्यांच्या सानुकलीच दर्शन झालं तेव्हा दोघांचा जीव भांड्यात पडला.

इकडे विश्वाची नजर देखील तिच्या आई-बाबांना शोधत होती. तिने तिचा मोबाईल चेक करून बघितला पण तिला नेटवर्कचं मिळत नव्हतं. ती सारखी इकडे तिकडे बघत होती, मधूनच मोबाईल चेक करत होती.

गोंधळात असलेली विश्वा मात्र एका गोष्टीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होती की, ज्याप्रमाणे तिचे आई-बाबा तिच्यावर नजर खिळवून गर्दीतून वाट काढत तिच्यापर्यंत पोहचण्यासाठी धडपड करत होते; अजून एक व्यक्ती होता जो तिच्या जवळच मागे उभा होता. विश्वाशी बोलावं की नाही या संभ्रमात कदाचित तो असावा. त्याने तिला मागून हाथ लावण्याचा देखील प्रयत्न केला. पण काही केल्या त्याची हिम्मत होईना. तो विचारात गढलेला असतानाच सुनीलराव अन कल्पनाताई विश्वा जवळ पोहचल्या आणि तिघांनीही अत्यानंदाने एकमेकांना मिठी मारली. काही क्षण या मिठीत विसावून झाल्यावर विश्वा त्या दोघांच्या पाया पडली. बॅग वैगेरे उचलून ते निघाले तितक्यात विश्वाने मागे वळून बघितले. तो व्यक्ती तिच्या पाठमोरा उभा होता. तिला वाटून गेलं की ह्या व्यक्तीला ओळखतो कदाचित आपण. तितक्यात आईने तिचा हात पकडला अन तिला भानावर आणले. "काय ग बाळा विशु, काय झालं? काही विसरलं का?" -कल्पनाताई. "नाही गं आई... पण तो जरा ओळखीचा वाटला म्हणून बघत होते"-विशु. "अगं किती गर्दी आहे इथे. भास झाला असेल तुला. चल पाहू आता. वेळ झालाय खूप इथेच. निघुयात आपण." असे बोलत कल्पनाताईंनी एक नजर विश्वा बोलत होती त्या व्यक्तीकडे बघितलं तर तो देखील आपलं संभाषण ऐकतोय अस त्यांना वाटून गेलं. परंतु कल्पनाताईंनी नजर जाताच त्याने तोंड फिरवून घेतलं अन तो चालू लागला. कल्पनाताईंना देखील जरा विचित्रच वाटलं थोडंस. पण कदाचित भास झाला असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं अन विश्वा चा हाथ पकडून त्या देखील चालू लागल्या.

इकडे तो व्यक्ती मात्र थांबला. परत तो त्या तिघांकडे एकटक बघू लागला. अगदी नजरेआड होईपर्यंत. त्यांचा पाठलाग करण्याचे देखील त्याच्या मनात आले होते. परंतु त्याने ते टाळले. त्याला असे नक्कीच समोर नव्हते यायचे.

कोण असेल हा व्यक्ती? काही संबंध असेल का त्याचा या कुटुंबाशी? असेल तर तो समोर का नाही आला? अन नसेल संबंध तर तो विश्वा अन तिच्या कुटुंबाला कसे काय ओळखत होता? शोधुयात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील भागात.

©️Sweety-Aishwarya Deshmukh????

टीप- कृपया तुमचा अभिप्राय कमेंटद्वारे अथवा फेसबुक वर Sweety-Aishwarya Deshmukh या अकाउंट द्वारे नक्की कळवा. तुमचे मोलाचे शब्द माझा उत्साह वाढविण्यास नक्कीच मदत करतील.

तसेच मी स्वतः देखील वाचक-लेखक असून जो सन्मान मी बाकी लेखकांचा करते तेवढीच तुम्हां सर्वांकडून माझ्याप्रति देखील माफक अपेक्षा ठेवते. माझी कथा माझ्या नावासकट शेअर करायला माझी हरकत नाही.????

अधिक संपर्क-
Facebook- Sweety-Aishwarya Deshmukh.
Gmail-
aishwarya.deshmukh2000@gmail.com


●○●○●○●○●○●○●○●○●○●○

🎭 Series Post

View all