आईचा निरोप
मानवी मनही किती अनाकलनीय आहे नाही? त्यापेक्षा काकणभर जास्त मानवाचं आयुष्य. कधी कधी वाटतं आपलं आयुष्य खरंच आपलं नसतच कधी! ते तर नियती शरण असतं. उन्हाळ्याच्या वावटळीत सुकलेलं पान जसं उंच उंच गरगर, भिरभिरत जाऊन आकाशाला स्पर्श करण्याचा उगाच असफल प्रयत्न करत, पण आकाशाला हात लावता येत नाही आणि त्या धुळीच्या वावटळीत इतर पाला पाचोळ्या सोबत तेही भरकट जातं, म्हणूनच मनाच्या उधळणाऱ्या घोड्यांना लगाम लावायचा तो कर्तव्यांने, निष्ठेने, आणि अलिप्ततेने. कुंतीने मनाशी विचार पक्का केला आणि ती वानप्रस्थाला जायला निघाली.
कुंती (सासू-गांधारी, सासरे-धृतराष्ट्र) यांच्याबरोबर वानप्रस्थाला निघाली, पण सारे पांडव, सुना तिला थांबवत होते. धर्माने तर डोळ्यात पाणी आणून तिला अडवले. मनातली खदखद बोलून दाखवली.
धर्म -"अग आम्ही तह करू पाहत होतो तर आम्हाला वासुदेवा करवी विदुलेची गोष्ट ऐकवलीस. तुझे म्हणणे मनावर घेऊन आम्ही राज्य जिंकले. आता तुझी क्षात्रवृत्ति कुठे गेली? की मिळवलेले राज्य, मुले, सुना सर्वांना सोडून रानात जायला निघालीस?" पण कुंतीने धर्माला उत्तर दिले नाही. ती अश्रू ढाळीत चालतच होती. हे आता भीमालाही असह्य झाले. शेवटी न राहून भीमही बोललाच.
भीम -"मुलांनी मिळवलेलं राज्य उपभोगायचे सोडून कुठे निघालीस? तुला जर असेच करायचे होते तर आमच्याकडून पृथ्वीचा क्षय होईल असे युद्ध का खेळवलेस? माद्रीच्या या दोन मुलांना आणि आम्हाला वनातून हस्तीनापुरला आणलेच कशाला?"
मुले बडबडत होती. द्रोपदी अश्रू गाळीत कुंतीच्या मागे मागे जात होती,आणि कुंती काहीही न बोलता वनाकडे निघाली होती. मुले काही केल्या पाठ सोडत नाहीत. हे पाहून तिने अश्रू पुसले आणि ती म्हणाली-
कुंती -"धर्मा तू म्हणालास ते सर्व खरे आहे. तुम्ही खचला होता, धैर्य गमावून बसला होतात. म्हणून मी तुम्हाला शब्द बाणांनी उठवले, द्यूतात राज्य गमावले होते, अपमानित जीवन जगत होतात. आप्तस्वकीय, नातलग कोणीही तुम्हाला विचारीत नव्हते. तेव्हा मी तुम्हाला वरती काढले. पांडूची संतती नष्ट होऊ नये. तुमचा पराक्रम, शौर्य नष्ट होऊ नये म्हणून मी तुम्हाला डिवचून जागे केले, द्रोपदीचा परत अपमान होऊ नये म्हणून मी तुम्हाला फटकारले. माझ्यासाठी काही हवे होते म्हणून काही मी वासुदेवाबरोबर निरोप पाठविला नव्हता. पुत्रांनी मिळवलेल्या राज्याच्या फळाची-वैभवाची- मला मुळीच इच्छा नाही. आता मला पुण्यप्रद अशा पतीलोकाला जाऊ द्या. तुम्ही क्षत्रिय धर्म, राजधर्म पाळून न्यायानं राज्य करा."
कुंतीचे शब्द ऐकून पांडव द्रोपदीला घेऊन परत फिरले. कुंतीने गांधारीचा हात आपल्या हातात घेतला. धृतराष्ट्राने गांधारीच्या खांद्यावर हात ठेवला व ती तिघेजण एका माळेत हस्तीनापुरच्या रस्त्यावरून चालत होती.