निरागस ती

निरागस ती

आठवणींची उबदार शाल
अंगाखांद्यावर पांघरुन
रातीच्या अंधारात ती
स्वप्नांच्या गावी बागडते

ती पुन्हा सान होते
फुलातला मकरंद चाखते
फुलपाखराचे पंख लेते
मुक्त हवेत भिरभिरते

ती पुन्हा लपंडाव खेळते
बर्फाचा गार गोळा चोखते
चिंचा,बोरांनी खिसा भरते
दोन वेण्यांना रिबिनी लावते

तिला तिची शाळा खुणावते
बाकावरती जाऊन बसते
नेमकी तेव्हाच परीक्षा असते
पेपर पाहून तिची तंतरते

इतक्यात कोठुनशी पहाट होते
तिच्या मिटल्या पापण्यांवर
वेल्हाळ उजेड पसरते
अरे यार स्वप्न होतं म्हणत
ती सुटकेचा नि:श्वास सोडते

------सौ.गीता गजानन गरुड.