Aug 09, 2022
नारीवादी

नवऱ्याने टाकलेय तिला

Read Later
नवऱ्याने टाकलेय तिला

नवऱ्याने टाकलेय तिला

मी आज चिटणीसांच्या घरी त्यांच्या लेकीच्या डोहाळजेवणाला गेले होते. हिरवीकंच पैठणी,फुलांची वाडी ल्यालेली प्रियांका खरंच फार सुंदर दिसत होती. फुलांच्या झुल्यावर बसलेली ती तिच्यामागे तिला कौतुकाने पहात उभा असलेला तिचा अहो. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा. 

प्रियांका, सभोवार रांगोळी रेखलेल्या पाटावर बसली. पहिली ओटी तिच्या सासूबाईंनी भरली. त्यानंतर एकेकजणी पुढे होऊन प्रियांकाची ओटी भरु लागल्या. मी माझ्याच विचारात उभी होते. कुणीतरी साद घालताच भानावर आले. मी प्रियांकाला हत्ळदीकुंकू लावलं. पाच फळं,खणनारळ घालून तिची ओटी भरली व तिला आशीर्वाद दिला. माझं काम झालं तसं मी मागे सतरंजीवर जाऊन बसले.

प्रियांकाच्या आईने मला हळदीकुंकू लावलं,खुशाली विचारली न् पुढे सरकल्या. कुणीतरी एक झिपलॉकची थैली आणून माझ्या हातात दिली. वेफर,लाडू,चिवडा,कचोरी,बर्फी असं बरंच काही होतं त्यात. मागे इतर बायकांच्या गप्पा चालू होत्या. कानाला कितीही आवरलं तरी त्यांचे शब्द न् शब्द ऐकू येत होते मला.

 हो,माझ्याबद्दल,माझ्या लेकीबद्दल चर्चा चालू होती त्यांची. आवाजावरुन माणूस ओळखता येत होतं मला. विसपुते वहिनी म्हणत होत्या..या पिठेवहिनींची अर्चना इथेच रहाते वाटते..हो तर अहो लग्नानंतर साताठ महिनेच काय ती सासरी राहिली. मग जी आली ती आलीच.. पण नक्की काय प्रॉब्लेम काय म्हणायचा..अहो एका हाताने टाळी वाजते का..तिचं पटलं नसेल नवऱ्याशी,घरातल्या माणसांशी..आजकालच्या मुली म्हणजे नं जरा हूं म्हणायला नको..फिसकन अंगावर येतात मांजरीसारख्या. 

मी हे सगळं ऐकत होते.. का मला ऐकू यावं म्हणून त्या बोलत होत्या कोण जाणे पण विसपुते वहिनी जेव्हा बोलल्या, नवऱ्याने टाकली वाटतं तिला तेव्हा मात्र धरती दुभंगावी नि सीतामाईसारखं तिनेही मला पोटात घ्यावसं वाटलं. प्रियांकाची आई जेवायचा आग्रह करीत होती पण मी जरा घाई असल्याचं कारण सांगत तिथून निसटले.

घरी आले,माझी अर्चना ऑफिसचं काम करत बसली होती. कुरळ्या केसांचा बॉब,नाजुकसं नाक,गालावर खोल खळी..किती नाजूकशी अर्चू माझी पण या सहा महिन्यांत जणू तिच्या शरीरातला जीवनरसच कुणी शोषून घेतला होता. पार उसाच्या चिपाडासारखी दिसत होती. निस्तेज चेहरा अधिकच दिनवाणा दिसत होता. 

गेल्याच वर्षी तर लग्न लावून दिलं होतं पोरीचं. मुलगा अमेरिकेत रहायचा. काही महिन्यांत विसा मिळाल्यावर अर्चुला घेऊन गेला. औरंगाबादेत त्याचे आईवडील रहातात. मला अर्चु अधनामधना फोन लावायची. माझी व तिच्या वडीलांची चौकशी करायची. तिच्या लहान भावाची,अमेयची चौकशी करायची आणि चार महिन्यांनी ती इथे परत आली ती परत न जाण्यासाठीच. 

आधी चारेक दिवस तर कोंडून घेतलेलन स्वतःला. काहीच सांगत नव्हती. मग हळूहळू अमेयने तिच्या मनावर फुंकर घातली. लहान का असेना दादाच ना तो तिचा!

 तिच्या नवऱ्याला पार्थला म्हणे मुलींत इंटरेस्ट नव्हता. केवळ आईच्या हट्टापायी त्याने लग्न करून अर्चनाला त्याच्यासोबत अमेरिकेला न्हेलं होतं. पहिलंपहिलं अर्चनाला वाटलं..असेल त्याला काही स्ट्रेस वगैरे म्हणून ती त्याला त्याची स्पेस देत होती पण दोनेक महिन्यांत तिला त्याच्यातला विक्षिप्तपणा जाणवू लागला.

 पतीपत्नीसारखे संबंधच नको होते त्याला. असं रहाणं अर्चुला अवघड जाऊ लागलं. तिला वाटलं तीच आता डिप्रेशनमधे जाते की काय आणि तिने परत घरी यायचा निर्णय घेतला.

पार्थला वाटत होतं की त्याच्या ह्या अशा विचित्र वागण्याला कंटाळून अर्चना त्याला घटस्फोटाची नोटीस देईल व सुंठीवाचून खोकला जाईल..त्याला त्याच्या आईवडिलांची सहानुभूती मिळेल व काय ते खापर अर्चनाच्या डोक्यावर फुटेल पण तसं अजुनतरी झालं नाही. अर्चनाने त्याला डिव्होर्स पेपर्स पाठवले नाहीत. आम्ही तो निर्णय तिच्यावर सोडला. 

पण ती लवकरात लवकर यातून मोकळी होईल तितकी बरं. तिची अवस्था पायात दोर अडकलेल्या फुलपाखरासारखी झाली होती तरी बरं इथे आल्याबरोबर तिच्या वडिलांच्या ओळखीवर तिला नोकरी मिळाली. 

किती हौसेने मंगळसुत्राचं डिझाईन सिलेक्ट केलेलं तिने. का..का माझ्याच पोरीच्या नशिबी हे भोग यावेत? तो पार्थपण कसा ना त्याच्या आईवडिलांना खूष ठेवण्यासाठी त्याने माझ्या आर्चुला बळीचा बकरा बनवला. 

तिचा भाऊ तिच्यासाठी पुन्हा स्थळं शोधतोय पण आता तिची आयडेंटिटी बदललीय. जरी तिला नवऱ्याने पतीसुख दिलं नव्हतं तरी ती त्याच्यासोबत राहिल्याने समाज तिला आता एक परित्यक्ता म्हणूनच बघणार व त्याच केटेगरीतली स्थळं तिच्यासाठी येणार. 

सध्या सगळं ठीक चालू आहे पण अमेयची बायको आली की तिला आयुष्यभर इथेच असलेली नणंद आवडेल का? का तीही अर्चनाला नवऱ्याने टाकलेली म्हणून हिणवेल? प्रश्नच प्रश्न ..डोकं नुसतं बधीर होऊन जातं. 

वाटतं..वाटतं पोरीला घेऊन लांब कुठेतरी निघून जावं जिथे या प्रश्न विचारणाऱ्या नजरा नसतील. चांगली शिकलीसवरलेली आहे. आर्थिकद्रुष्ट्या स्वतंत्र आहे माझी अर्चु पण तीही माणूस आहे नं. तिने कितीही लपवलं तरी मला कळतात तिच्या भावना. आई आहे नं मी तिची! आयुष्यभर मनाला,शरीराला उपाशी कशी ठेवेल ती? आणि का? तिचा काही दोष नसताना. 

सेकण्डहँडचा शिक्का पडलाचेय तिच्यावर, ते मेरेज ब्र्युरोमधले कॉलम बघताना जाणवतं. काल अर्चुचे सासूसासरे येऊन गेले. अगदीच दीनवाणे वाटत होते. किती ठरवलेलं मी त्या दोघांशी पुष्कळ भांडावं..त्यांना जाब विचारावा..माझी मुलगी खेळणं वाटली का तुमच्या मुलाला? असं बरच विचारावसं ठरवलेलं पण त्यांचे ते लाचार चेहरे पाहून मलाच दया आली त्यांची. 

एक वर्षानंतर....

अर्चुने घटस्फोटाची नोटीस पाठवली त्याला. ठराविक कालावधीनंतर त्यांचा घटस्फोट झाला. आता ती लग्न करायला स्वतंत्र आहे पण नकोच म्हणते. त्यापेक्षा एकटं राहिन म्हणते. 
काल शिफॉनची साडी नेसून गेलेली ऑफिसमधे. किती गोड दिसत होती! मला आपलं उगाच वाटतय की ऑफिसात तिला कोणतरी आवडू लागलय. थोडा हलकासा मेकअपही करते हल्ली. गाणी गुणगुणते. मी मग धीर करुन विचारलच तिला,"कोण आवडलं असेल,तुझ्या मनात भरलं असेल तर सांग बाई."

अर्चु कोड्यात हसली,म्हणाली.."आई,स्वतःसाठी नाही का गं मी नटू शकत! मी ठरवलय खूष रहायचं." मला खूप बरं वाटलं तिचं उत्तर ऐकून. 

मधे एकदोन स्थळं येवून गेली तिच्यासाठी..नुकतेच घटस्फोट घेतलेले,कुणाची बायको बाळंतपणात गेलेली असे..अर्चुने नकार दिला. तिचे वडील डाफरले तिच्यावर,"अर्चु,तू परत लग्न केलं नाहीस तर अमेयचं लग्न जमवताना आम्हाला फार त्रास होईल. तुझ्याबद्दल पाहुणेमंडळी विचारणारच.आयुष्यभर भावाच्या घरी आश्रितासारखी पडून रहाणार आहेस का?" अर्चु शांत राहिली.

******
आज रविवार होता. अर्चु मला,तिच्या वडिलांना व अमेयला घेऊन एका ठिकाणी गेली. मोठी सोसायटी होती ती. अर्चुने बिल्डरच्या ऑफिसमधून  फ्लेटची चावी घेतली. आम्ही लिफ्टने सहाव्या मजल्यावर आलो. अर्चुने मला चावी दिली व दार उघडायला सांगितलं. 

दारावर अर्चना वसंत पिठे अशी अक्षरं कोरलेली पाटी होती. मी दार उघडून घरात प्रवेश केला. खूपच हवेशीर वनबीएचकीचा फ्लेट अर्चुने स्वकमाईने घेतलेला. आता इथे तिला कोणी हिणवणार नव्हतं. तिचं स्वतःच्या मालकीचं घर होतं ते. पुढेमागे एखादा तिला साजेसा राजकुमार भेटावा,नाही का! असो. तो निर्णय आता तिच्यावरच. मीही आता प्रगल्भ झालेय. 

मुलीने लग्न केलच पाहिजे असा अट्टाहास मी तरी करणार नाही. तरी वाटतंच ओ माझ्यानंतर तिच्यासोबत तिचं असं हक्काचं कोणतरी असावं असं. शेवटी आई आहे हो मी माझ्या लेकीची.

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now