तिचा संघर्ष भाग -11

Every Woman Wants Love,respect And Support.
घर जवळ येत होतं तसं दीपाच्या काळजाचा जणू ठोकाच वाढत होता. घर जवळ आले आणि दीपा गाडीवरून खाली उतरली. दीपा दरवाज्याजवळ गेली पण तिथेच तिची पावले थांबली. तिने मागे वळून पाहिले. संतोषने मात्र दीपा का थांबली ? हे बरोबर हेरले. संतोष दीपाच्या पाठोपाठ गेला आणि दीपाला म्हणाला, "शाळेत असताना विचारलेल्या प्रश्नांची अचुक उत्तरे देणारी आणि शाबासकी मिळवणारी दीपा, आज मात्र विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना काय सांगावे ? म्हणून घाबरली वाटतं. मला माहित आहे दीपा तुला खोटं बोलता येत नाही. चल घाबरू नकोस. मी आहे ना! तू शांत उभी रहा. मी सांगेन, काय सांगायचं ते !"


'देव जोड्या स्वर्गात बांधतो हे अगदी खरं आहे आणि या जोड्या नेहमी परस्परविरोधी स्वभावाच्या असतात म्हणजेच एकमेकांच्या साथीने दोघांमधील उणिवा भरत संसार सुखाचा व्हावा हाच हेतू असेल कदाचित देवाचा.  खरंच देवा, खूप आभारी आहे तुझी. खूप चांगला जोडीदार निवडला आहेस तू माझ्यासाठी.' दीपा मनात म्हणाली.


"ये जोशना,ऊट- सूट काय मोबाईल घेऊन बसलेली असती गं तू ." संतोष तावातावाने म्हणाला.

आईला संतोष चा आवाज आला आणि ती लगबगीनं बाहेर आली आणि संतोष वर ओरडली.

"तुला यायला का उशीर झाला हे आम्ही विचारू नये म्हणून उगाच जोशनाच्या चुका काढत बसू नको." 

"अग विचारल्यावर सांगतोच की, मी काय सांगणार नव्हतो का ? विचार की तू , का उशीर झाला म्हणून ? आई आहेस तु माझी. पण मी आधी कितीतरी वेळा तिला मोबाईलवर मैत्रिणींबरोबर गप्पा मारताना पाहिलेय म्हणून म्हणालो." संतोष म्हणाला.

"आणि बायकोने ही बाहेर गेल्यावर काही बाई सांगितलं असेल." आत्या म्हणाली.

"आत्या, दीपा शिकलेली मुलगी आहे. तू अशी, जोशना तशी किंवा आई अशी,आजी तशी हे मला सांगावं, असले विचार तिच्या डोक्यात येत नाहीत बघ. पण हो, तिला पुढं किती शिकायचं होतं हे तिने मला सांगितलं बघ." संतोष म्हणाला.

'कशाला म्हणाला असेल संतोष माझ्या शिक्षणाचं, ते तर यांना अजिबात आवडत नाही' दीपाच्या मनात विचार आला.

"ये दीपा, जा तू तोंड, हात-पाय धुऊ अन् आराम कर." संतोष म्हणाला.

"सकाळपासून हाताला हात नाही माझ्या आणि हे आजचं नाही, तुम्ही लहान असल्या पासून शेतात राब राब राबले मी. पण आजारी पडल्यावर असं काय कोणीही आराम कर म्हणून मला नाही सांगितलं." दीपाच्या सासूबाई रागारागाने म्हणाल्या.

"मग तू आता दीपाला म्हणून बघ, आराम कर म्हणून. म्हणजे दीपा, सासू होईल तेंव्हा आवर्जून तुझं नाव घेईल तिच्या सुनेसमोर की एकदा मी आजारी पडल्यावर माझ्या सासूबाई नी मला आराम कर म्हणून सांगितलं होतं म्हणून." संतोष म्हणाला.

आईला काय हा मुद्दा बिलकुल पटला नाही.  

"तुझ्या तोंडाला लागायला मला वेळ नाही." म्हणून आई स्वयंपाक घरात निघून गेली.

आजी,आई ,आत्या,अजय,विजय जोशना आणि जया सगळे आतल्या खोलीत गप्पा मारत होते.

दीपा खोलीत जाऊन आराम करत होती. संतोष दीपा जवळ गेला.

संतोष दीपा ला म्हणाला, " दीपा, घरातलं कुणीही काही बोललं तरी मनावर घेऊ नकोस. कारण या घरात आजी, आई त्यांच्या जागी राहून विचार करतात पण तू शिकलेली आहेस त्यामुळे तुला सासु-सुन हा पूर्वीपासून चालत आलेला पायंडा मोडून काढावा लागेल."

दीपा ने होकारार्थी मान हलवली.

संतोष म्हणाला, "आणि हो आणखी एक, नवरात्र झाली की आपण तुझ्या ॲडमिशन साठी कॉलेजमध्ये जायचंय हे लक्षात असू दे."

"संतोष माझं ऐकशील का ?" दीपा म्हणाली.

"बोल ना." संतोष म्हणाला.

"मी सकाळी ही तुला सांगितलं, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं आणि तु ही मला सांगितलं की, ज्या गोष्टी मध्ये मला आवड आहे त्या गोष्टी केल्यावर माझं मन प्रसन्न राहील. आत्ताच तू म्हणालास की, मला सासू-सून हा पायंडा मोडून काढावा लागेल आणि हे सर्व करण्यासाठी मला सर्व घरातल्यांची मन जिंकावी लागतील. आणि घरच्या कोणालाही माझं शिक्षण मान्य नाही. मग त्यांची मनं दुखावून मी कॉलेजमध्ये गेले तर आणखीनच नात्यांमध्ये दरी निर्माण होईल. आणि वरील कोणत्याच गोष्टी साध्य होणार नाहीत त्यापेक्षा या सर्वांचा सुवर्णमध्य म्हणजे मी घरी मुलांच्या शिकवण्या घेईन. त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडेल आणि मला आनंद होईल की, मी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहे आणि अरे, फक्त बाहेर जाऊन नोकरी केल्यावरच एक स्त्री स्वावलंबी किंवा स्वतःच्या पायावर उभी आहे असं नाही ना, घरी बसून तिच्या अंगी असणारी कला आणि त्या कलेतून मिळणारा आर्थिक मोबदला यातूनही ती स्वावलंबी होऊ शकतेच की.आणि यासाठी घरच्यांचा विरोधही नसेल बघ तू." दीपा म्हणाली.

" किती गुणाची आहे माझी बायको! खरंच दीपा, तू आज सगळ्यांचा विचार करून हा सुवर्णमध्य काढलास तो ऐकून मला खूप आनंद झाला. तू तुझा पत्नी धर्म निभावलास. तुझा पती म्हणून मी ही नेहमी गरज असेल तेंव्हा पतीधर्म निभावणार हे आश्वासन देतो." संतोष म्हणाला.

दोघांनी एकमेकांकडे बघून स्मितहास्य केले. तेवढ्यात

" दीपा, ये दीपा." असा आवाज आला.

दीपाच्या अंगावर शहारा आला. डोळ्यांतून अश्रू ओघळले. आज कितीतरी दिवसांनी ही प्रेमळ हाक तिच्या कानावर पडली होती.

दीपा संतोषला म्हणाली, " माझ्या आबांचा आवाज आहे हा. माझे आबा बाहेर आले आहेत वाटतं संतोष."

संतोष आणि दीपा बाहेर आले. खरचं केविलवाणा चेहरा करून आबा दारात उभे होते.

"या आबा, आत या." संतोष म्हणाला.

"नाही जावईबापू ,नको. " आबा म्हणाले.

दीपा ने आबांना कडकडून मिठी मारली.आबांच्या ही डोळ्यात पाणी आले.

"कशी आहेस पोरी ? सकाळी तुझ्या मॅडम भेटल्या आणि त्यांनी सांगितल्यावर कळलं की तू आजारी आहेस ते."

संतोषला ही आज खूप आनंद होता. मुलीच्या काळजी पोटी आज आबा संतोष च्या घरी आले होते.

"मी ठीक आहे आबा, पण तुम्ही या ना आबा आतमध्ये." दीपा म्हणाली.

"नाही, नको. हयोक ही बिस्कीटाचे पूडे आणले होते ठेव आतमधे." आबा म्हणाले.

"बघा आबा तुम्हाला नुसतं बघितलं, तरी चेहरा खुलला आहे दीपाचा. पेशंटला खायला नाही आणलं तरी चालतय फक्त मायेची माणसं दिसली तरी आजार 'छू मंतर' होतोय पेशंटचा." संतोष म्हणाला.

"हो अरे खरंच, आबा तुम्हांला बघून लय भारी वाटलं." दीपा म्हणाली.

जोशना ला फोन आला म्हणून बाहेर आली होती. तिने पाहिले बाहेर दीपाचे वडील आले होते. तिने आत जाऊन सांगितले. सगळे बाहेर आले. 

दीपाच्या सासूबाईंना दीपाचे वडील म्हणाले, " तुम्हालाच बोलवायला सांगणार होतो आता मी दीपाला. दीपाला चार दिवस माहेरी घेऊन जावं म्हणतोय."

दीपाच्या सासुबाई कपाळावर आठ्या उमटवत म्हणाल्या, "नवरात्रीच्या उत्सवात आमच्या घरी पाहुणे आवर्जून येतात आणि तुम्ही दीपाला घेऊन जायचं म्हणताय ?" उत्सव झाल्याशिवाय आम्ही दीपाला पाठवणार नाही.

"नाही दीपा आजारी होती म्हणून म्हटलं, चार दिवस आली असती तर तिच्या आईच्या ही जिवाला घोर लागला नसता."

"इथे तर काय आम्ही तिला आरामच करायला सांगितलं आहे. कशालाही हात लावू देत नाहीत. इकडची काडी तिकडे हलवत नाही दीपा. काळजी करू नको म्हणावं तिच्या आईला. "

"हो बाबा, खरंच आराम करते मी. होईल लगेच बरी." दीपा म्हणाली.

"आणि हो नवरात्री चा उत्सव झाला की, मी स्वतः दीपाला घेऊन येईल तुमच्या घरी." संतोष म्हणाला.

'आबांचा आनंद आज गगनात मावला नाही. लग्न झाल्यानंतर तिन्ही मुलींच्या घरी गेल्यावर आबांना आलेले कटू अनुभव आज दीपा च्या घरी आले नाहीत म्हणून आबा देवाचे आभार मानत होते.' या विचारातच आबा घरी पोहोचले.


"शांता, अगं ये शांता." म्हणून आबांनी दीपाच्या आईला हाक मारली.

दीपा च्या आईला मात्र मनात हुरहूर लागली. 'आज पुन्हा आम्ही गरीब म्हणून लेकीच्या घरी दीपाच्या आबांचा जावई बापू आणि त्यांच्या घरच्यांनी अपमान तर केला नसेल ना!' म्हणून त्या भीतभीतच बाहेर आल्या.


सदाशिवराव म्हणजे दीपाचे आबा काय सांगतील बरं दीपाच्या आईला ?

पाहुया पुढील भागात क्रमशः

सौ. प्राजक्ता पाटील ✍? 

लेख आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा.

मनापासून लेख वाचला त्याबद्दल आभार.


🎭 Series Post

View all