Jan 26, 2022
नारीवादी

तिचा संघर्ष. भाग-7

Read Later
तिचा संघर्ष. भाग-7

आजीसासूबाई : ये दीपा बघ कुणाचा आहे फोन?दीपा : हॅलो. मी दीपा बोलतेय आपण कोण?शालिनी : काय विसरली की काय गं नवऱ्याच्या आत्याला?दीपा : नाही ओळखलं खरंच. तुम्ही आमच्या लग्नाला आलात लग्न लागण्यापूर्वी अर्धा तास आधी आणि लगेच गेलात असं आजी म्हणाल्या. मग मी लग्नात \"नाव घ्या\" एवढा तुमचा शब्द ऐकलेला त्यानंतर आजच तुम्हांला बोलतेय मग कशी ओळखणार तुम्हाला तुम्हीच सांगा?शालिनी : बाई रत्ना वहिनी मनली ती अगदीच खरंय बाई दीपा. तु लयच आगाव आहेस. शब्द पडू देत नाहीस माणसाचा.दीपा : मला तुम्ही विचारलं, म्हणून मी सांगितलं यावरून तुम्हाला आगाऊ कशी वाटू शकते ?शालिनी : बरं, बरं मी उद्या येणार आहे, म्हणून सांग वहिनीला. यात्रा चार दिवसांवर आलीय पण आईचा, वहिनीचा फोन करायचा पत्ता नाही मग मनलं आपणच करावा येणार हाय म्हणून.दीपा : बरं सांगते. 


(दीपाने फोन ठेवला. दीपा स्वयंपाक घरात गेली. आजीसासूबाईही जेवलेलं ताठ तिथेच ठेवून, हात धुवून खोलीत गेल्या होत्या.)तेवढ्यात अजय विजय नी मावशीचा अन् आमचा डबा शेतात बांधून द्या म्हणून सांगितलं.


मग दीपानं डबा भरून अजय विजय जवळ दिला.आजी सासूबाईंनी दीपाला फोन कोणाचा होता ? म्हणून विचारलं.दीपा : फोन शालिनी आत्याचा होता. उदया येणार आहेत म्हणाल्या .आजीसासूबाईनी : अगं मला बोलवायच होतं की बोलले असते तिला जरा.


 


"अगं आता उद्या येणार हाय तुझी लेक मग मार की हव्या तेवढ्या गप्पा." संतोष म्हणाला.

आजी सासुबाई : तु रे कधी आलास ?

संतोष : तु तुझ्या नातसुनेला कुणाचा फोन आलता ? ते विचारत होती तेव्हाच आलोय आहे मी.

आजीसासूबाई: होय रं बाबा. तु गुडघ्याला बाशिंग बांधून , मामाला सांगून लग्न जमवून दोन दिवसात अन् पंचवीस माणसात उरकून रिकामा झालास. तवाच शालिनी च्या शाम्याचा पाय मोडला होता. पोराला उठायला बी येत नव्हतं. सगळं हातात द्यावं लागत व्हत. म्हणून तासातच तिला परत जावं लागलं व्हतं. पण आता राहिल माझी पोर चार दिवस.  


दीपाने विचार केला," हेच वाक्य मी म्हणाले असते तर, किती बोलल्या असत्या नातवाने म्हटल्यावर ऐकून घेतलं."संतोष : ये दीपा वाढ मला जेवायला.दीपाला वाटलं आता तर संतोष बरोबर मनमोकळेपणे बोलता येईल. दीपा संतोषला म्हणाली, "तुला काहीच वाटत नाही का रे ! शेतात झोपतोस. मी तर किचनमध्ये झोपते सध्या."संतोष दीपाला रागाने म्हणाला, " म्हणजे काय म्हणायचे तुला ? पाहुण्यांना किचनमध्ये झोपवायला पाहिजे होतं का? ही तुमच्याकडे पद्धत असेल पण आमच्याकडं पाहुण्यांना देवाचा दर्जा दिला जातो. आणि पाहुणे आपल्याकडे थोडीच कायमच राहणार असतात. अगं लग्न झालं म्हणजे फक्त नवरा बायको असं नसतं, त्या कुटुंबातील प्रत्येक माणसाशी नातं जोडलं गेलेलं असतं. मला सुदधा तुझ्या आबांनी मुलगा मानावा अशी इच्छा होती. पण साधा फोनही केला नाही लग्न झाल्यापासून मला. कधी- कधी आई म्हणते ते ही खरचं वाटतं, ओझंच समजत होते वाटतं तुला. पण माझी बहीण आमच्यासाठी ओझं नाही हे लक्षात असू दे.लग्नातही माझ्याकडे काहीच नाही फक्त मुलगी आणि नारळ आहे म्हणाले.तेही मी मान्य केले.


लग्नाचा सगळा खर्चही केला गं मी, पण तुझ्या वडिलांच्या प्रथा बघ. साधं मुलीला येती-जातीला ही नेलं नाही त्यांनी. आता तुझ्या सासरीही पाळणा हलल्या शिवाय तुझे वडील पाऊल ठेवणार नाहीत ही असली नाती निभावतात तुझ्या माहेरी.


तुझ्या त्या मोठ्या बहिणीला गौरीला एकाही बाळंतपणाला माहेरी नेलं नाही म्हणून कितीतरी त्रास देतात पण तुझ्या वडीलांना काहीच कसं वाटत नाही . माझ्या घरचे बघ जोशना वर किती प्रेम करतात. पण तुझ्या वडिलांना मुलगा हवा असल्यामुळे त्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केले.आणि मी माझ्या बहिणी सोबत तुला या घरात तसं करावं असं वाटत असेल तर तसं होणार नाही हे लक्षात ठेव."दीपाला रडू कोसळलं. माझं ऐकून तरी घे. मला तसं नव्हतं म्हणायचं.जेवण न करताच संतोष निघून गेला. आजीसासूबाई आणि जोशना ने तोंडाचा पट्टा चालू केला. काय भरवत होतीस गं माझ्या नातवाला ? न जेवता नवरा गेला पण हिचं बोलून पोट भरलं असेल नवऱ्याला. आजी सासुबाई तावातावानं म्हणाल्या.दीपाला वाटलं होतं, " संतोष तिला रोमॅन्टिक मुडमध्ये मलाही आठवण येते तुझी असं म्हणेल कारण दीपाचा रोमॅन्टिक टोन होता " तुला काहीच वाटत नाही का रे…!" म्हणताना." पण सहा महिन्यांत एकदाही संतोष तिच्याशी लग्नापूर्वी वागायचा तसा वागला नव्हता. दीपाला संतोष च्या बोलण्याने खूप म्हणजे खूप दुःख झाले होते . दीपा विचार करत होती, जर संतोष च्या बहिणीला कमी किंमत द्यायची असती किंवा मला पाहुणे आवडत नसते तर मी त्यादिवशी तुला जोशना ताईला घेऊन ये असं सांगितलं असतं का ? तुझे घरचे माझ्याशी कसेही वागतात ते सहन केलं असतं का ? इतकच काय मी लहानपणापासून पाहिलेले स्वप्न केवळ तुझी शपथ घातली म्हणून पुसून टाकलं . तरीही किती तोडून बोललास तू संतोष. मला तुझ्या बोलण्याचं आज खूप वाईट वाटतंय. दिपाने संतोष चे बोलणे खूपच मनाला लावून घेतले होते.(दीपालाच काय प्रत्येक स्त्रीला सासरचे लोक कसेही वागले तरी काही फरक पडत नसतो, कारण आयुष्याच्या शेवटी आपल्या सोबत आपला जोडीदाराचं उभा असतो. पण इथे तेही नव्हते, संतोष ही अगदी त्याच्या आई-बाबा प्रमाणे, आजी प्रमाणे दीपाच्या बाबतीत विचार करत होता.)दीपा चक्कर येऊन खाली पडली.आजी सासूबाई संतोषला फोन करून बोलावून घेतले. संतोष आला , तोपर्यंत जोशना ने दीपाला पाणी टाकून उठवले होते."दीपा चक्कर येण्याचं नाटक तर केलं नाहीस ना !" संतोष रागाने म्हणाला.\"हो मगाशी लेकराला जेवणाच्या ताटावरून उठवलं. आणि आता अजून आरी घेत होती बघ तुला." आजी सासुबाई तोऱ्यात बोलल्या. दीपाने उठून उभं राहण्याचा प्रयत्न करत केला आणि ती पुन्हा खाली पडली. मोठ्याने आवाज आला. सर्वजण पळतच स्वयंपाक घरात आले. संतोष पळत दीपा जवळ गेला आणि तिला उचलण्यासाठी त्याने तिला हात लावला."बापरे ! किती ताप चढला आहे हिला !" संतोष घाबरून म्हणाला. त्याने दीपाला अलगद उचलून बेडवर ठेवलं आणि


"मी पटकन गावातल्य डॉक्टरला घेऊन येतो." म्हणून तो डॉक्टरला बोलवायला गेला.आजी सासूबाई आणि जोशना दीपा ची प्रेमानं विचारपूस करण्याऐवजी तिच्याजवळ बसून दीपा नुसती नाटकं करतीये म्हणून उलट दीपा बद्दलच वाईट बोलू लागल्या.तेवढ्यात सासुबाई शेतातून घरी आल्या होत्या, दीपाला झोपलेली पाहून त्यांच पित्तच खवळलं.सासूबाई : हिला काय झालं झोपायला ?आजी सासुबाई : चक्कर आली तुझ्या सुनंला म्हणून पडलीय. नवरा दिवसभर राब राब राबतो शेतात. पोटात अन्नाचा कण असू किंवा नसू. अन् हिला घरी बसून चक्रा येतात.सासुबाई : दिवस तर नसतील की गेले तिला. हिचा खर्च बघता बघता, नाकी नऊ आला. अन् परत लेकरू झाल्यावर तर कामाला बी हात नाही लावायची. बसेल त्या लेकरालाच घेऊन.  अन् लेकराचा तर थोडा खर्च असतयं व्हय दवाखाना पाणी ही न ती.आजीसासूबाई : काय माहित बाई ! हाय तसली लेकराला घेऊन बसण्यासारखी.जोशना : अग आई, सकाळपासून जेवली नाही बघ ती. म्हणून चक्कर आलीय तिला. बाकी काही नाही. तुम्ही तर लई चर्चा रंगवायला लागलात बघ.सासुबाई : जोशना तुझ्या तोंडात साखर पडो बाई.अन् ह्या बयेला दिवस गेलेलं नसावं बाई. आजी सासुबाई : माझी जोशना बोलती ते खरं होते बघ.  काय दिवस बिवस गेले नाहीत बग त्या दीपाला.दीपा हे सर्व झोपून ऐकत होती. दीपाला वडिलांच्या घरी चौथी ही मुलगी झाली म्हणून मान मिळाला नव्हताच, अन् सासरीही गृहलक्ष्मी म्हणून मान मिळाला नाही याची खंत होती; पण आज तिचा मातृत्वाचा हक्कही तिला मिळू नये म्हणून प्रार्थना करणारी माणसं आपलीच आहेत याचं खूप दुःख वाटलं. मी इतकी दुर्दैवी आहे म्हणून आजारी असणारी दीपा जास्तच हळवी झाली.संतोष डॉक्टरला घेऊन आत आला..काय सांगतील डॉक्टर ? 


पाहूया पुढील भागात क्रमशः सौ. प्राजक्ता पाटील ✍?


लेख आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा..


आवर्जून लेख वाचल्याबद्दल खूप खूप आभार.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

प्राजक्ता पाटील

Teacher

Reading And Writing is my Passion....