Jan 26, 2022
नारीवादी

तिचा संघर्ष भाग -10.

Read Later
तिचा संघर्ष भाग -10.

तिचा संघर्ष भाग-10.

पिंजऱ्यातून एखादा पक्षी आझाद झाल्यावर ,जसा तो मुक्तपणे गगन भरारी घेण्यासाठी आसुसलेला असतो. तसेच सतत चार महिने या ना त्या कारणावरुन टोचून बोलणारी लोक काही काळ का असेना आपल्यासोबत नाहीत, या विचाराने ही दीपाला खूप भारी वाटत होतं. संतोष पण आता दीपाला समजून घेत होता. आज तर संतोषने पाहुण्यांसमोर ही दीपा ची बाजू घेतली होती. दीपाला संतोष सोबतचा हा प्रवास संपूच नये असं वाटत होतं. आणि 'हे काय ? आलं लगेच हॉस्पिटल.'  हा दीपाच्या मनात विचार आला. दीपा गाडीवरून उतरली.


संतोष ही दीपाच्या मागोमाग हॉस्पिटल मध्ये गेला. त्याने डॉक्टरांनी लिहून दिलेला कागद रक्त नमुना परीक्षण करणाऱ्या त्या मुलाला दाखवला.

"त्या तिथे बसून घ्या, आलोच मी." म्हणून तो रक्त काढायला सिरीज आणायला गेला.

"मला खूप भीती वाटते रे इंजेक्शनची." दीपा म्हणाली.

"अगं, घाबरू नको मी आहे ना." संतोषने दीपा चा हात हातात घेऊन तिला धीर दिला.

"अहो घाबरू नका, फक्त अंगठा मध्ये घ्या आणि मूठ घट्ट दाबून धरा.तुम्हाला कळणारही नाही मी रक्त घेतले ते." तो मुलगा म्हणाला.

"बघा झालं पण, आता मूठ सोडली तरी चालेल." मुलगा म्हणाला.

"रिपोर्ट कधी मिळणार ?" दीपा म्हणाली. 

"अर्धा तास लागेल आणि डॉक्टर एक तासाने येतील." मुलगा म्हणाला. 

"बापरे!" अर्धा तास थांबायचं.

"तुझ्या आई- आबांकडे गेलो असतो पण ते घरी कळलं तर बोलणी खावी लागतील."

"नाही अरे, नको. आमच्या आबांना पण ते नाही आवडणार. होईलच आता यात्रेमध्ये आबांची भेट."

तेवढ्यात दीपा ला समोर तिच्या मुख्याध्यापिका दिसल्या. आई ला पाहिल्यावर जितका मुलाला आनंद होतो तसाच आनंद दीपाला मॅडम ला पाहिल्यावर झाला. 

"मॅडम तुम्ही." म्हणून दीपा मॅडम च्या पाया पडली. भरभरून आशीर्वाद देत मॅडमनी दीपाला आपल्या मिठीत घेतलं.

संतोष ही मॅडमच्या पाया पडला. त्यालाही मॅडमनी आशीर्वाद दिला.

"तुझ्याबद्दल विचारल्यावर समजले तुझे संतोष बरोबर लग्न झाले म्हणून. लवकर लग्न केलंस, पण चांगल्या मुलाशी केलं म्हणून आनंद वाटला." मॅडम म्हणाल्या. 

"काय रे संतोष ? कशी काय आजारी पडली दीपा ? मॅडम म्हणाल्या.

" हिमोग्लोबीन कमी झाले म्हणाले डॉक्टर." संतोष म्हणाला. 

"दीपा पोटभर जेवण करत जा. स्त्रियांना हिमोग्लोबिनची किती आवश्यकता असते माहिती ना तुला. फळं पालेभाज्या आणि हो गुळ भरपूर खा. बघ लगेच वाढतो की नाही हिमोग्लोबीन."

संतोष सगळ्यांसाठी जवळच असलेल्या भैरूकडे चहा सांगायला गेला. मॅडमनी दीपाची विचारपूस केली. दीपाच्या चेहऱ्यावरून मॅडमला दीपा फारशी खुश दिसत नव्हती. 

"दीपा तुला सासरी कशाचं टेन्शन आहे का?" मॅडम म्हणाल्या.

'एक असेल तर सांगता येतं इथं तर प्रत्येक गोष्टीचं टेन्शन येतं. इतक्या दिवसांनी तुम्ही मला भेटलात मॅडम आणि माझं गार्‍हाणं सांगून तुम्हाला टेन्शन देणं मला योग्य वाटत नाही ' दीपा मनातच विचार करत होती.

"नाही मॅडम, कसलेही टेन्शन नाही मला." दीपा म्हणाली.

"अगं, हे केस असेच पांढरे झाले नाहीत.अनुभवाने झालेत ते. आणि मी आज ओळखत नाही तुला. आत्ता सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण तुला जेव्हा केव्हा माझी गरज वाटेल तेव्हा तू मला नक्की फोन कर. हे घे माझं कार्ड." मॅडम म्हणाल्या.

"हो मॅडम." दीपा म्हणाली.

संतोष चहा घेऊन आला होता. सगळ्यांनी चहा घेतला. 

मॅडमनी दीपा आणि संतोषला आशीर्वाद म्हणून काही पैसे दिले. दोघांनीही नकार दिला पैसे घ्यायला पण मॅडम नी खूपच आग्रह केल्यावर दोघांनी ते पैसे घेतले.

मॅडम नी संतोषला पुन्हा एकदा " काही मदत लागली तर दोघांनीही मला फोन करा असे आवर्जून सांगितले." निघते मी आता म्हणून मॅडम निघून गेल्या.

संतोष दीपा चे रिपोर्ट आले का ते पाहायला गेला. रिपोर्ट आले होते. डॉक्टर येईपर्यंत दीपा आणि संतोष गप्पा मारत बसले.

"दीपा, तु लॉ कॉलेजला ऍडमिशन घ्यायला नको का म्हणाली ?" संतोष म्हणाला.

"काही नाही अरे, सहजच म्हणाले." दीपा म्हणाली.

'मला सासूबाईंनी कॉलेजला जायचं नावही काढायचं नाही,  म्हणून तुझी शपथ घातली आहे हे तुला मी नाही सांगू शकत संतोष.' दीपा म्हणाली.

"पण दीपा मला वाटतं तू कॉलेजला गेलीस, तर तुझं मन प्रसन्न राहील. आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात त्यांना प्राधान्य दिलं की, कोणताच विचार मनात येत नाही आणि ज्ञानात भर पडते आपल्या." असे मला वाटते.

"आई आणि आजी जुन्या विचाराच्या आहेत. त्यांना काही हे पटायचं नाही. पण तुझी इच्छा असेल तर मी म्हटल्यावर त्या तुला ऍडमिशन घ्यायला नाही हे म्हणणार नाही याची मला खात्री आहे ." संतोष म्हणाला.

'संतोष मला खूप काही सांगायच आहे पण तुला सांगता येत नाही हे दुर्दैव.' दीपा मनातल्या मनात बोलली.

तेवढ्यात डॉक्टर आले म्हणून संतोष आणि दीपा डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले.

संतोष ने डॉक्टरांना रिपोर्ट दाखवला.

"बघ मी म्हणालो होतो ना संतोष तुला. दीपाचा हिमोग्लोबीन फक्त पाच आहे. तुला तिची खूप काळजी घ्यावी लागणार आहे अन्यथा तिला ॲनिमिया होऊ शकतो." डॉक्टर म्हणाले.

"हो डॉक्टर, घेईन मी तिची काळजी" संतोष म्हणाला.

घरी जाताना संतोष दीपाला टेकडीवरच्या मंदिरात घेऊन गेला. 

"संतोष घरी गेल्यावर खूप उशीर झाला म्हणून आई, आजी आणि आता तुझ्या आलेल्या आत्याने काही म्हणू बोलू नये म्हणजे झालं मला नाही सहन होत रे." दीपा म्हणाली.

"दीपा,तुला तर माहीतच असेल आपल्या गावातच नव्हे, तर या पंचक्रोशीत टेकडीवरच्या महादेवावर लोकांची किती श्रद्धा आहे. माहिती आहे ना तुला?" संतोष म्हणाला

"हो,पण तू हे मला नव्याने का सांगतोय ?" दीपा म्हणाली.

"कारण आज तुला या महादेवाची शपथ आहे तू खरं खरं सांग. मी जोशना ला घेऊन यायच्या आधी तर ऍडमिशन घ्यायला तयार झालेली तू अचानक नाही कशी म्हणालीस? हा विचार माझ्या मनात त्यादिवशी ही आला होता, पण त्यादिवशी इतकं गांभीर्य वाटलं नाही. पण ज्या दिवशी तुला चक्कर आली त्या दिवशीपासून मला तू कुठल्या तरी गोष्टीची काळजी करतेस असं वाटतंय. खरं खरं सांग काय आहे ते?" संतोष काळजीने दीपाला म्हणाला.

रोज रोज मनातल्या मनात आपले विचार पुटपुटणारी दीपा खऱ्या अर्थानं व्यक्त होणार होती.

दीपा म्हणाली, "संतोष मला माझ्या माहेरी चौथीही मुलगी झाली म्हणून जास्त कौतुक झालं नसलं तरी जिथे माझे चुकत नव्हते तिथे विनाकारण कोणीच बोलले नाही. तुला माहितीय मला माझ्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्नच करायचं नव्हतं हे मी बाबांना पण सांगितलं होतं आणि त्यांनी ते मान्य केलं होतं. पण त्यादिवशी तुझे मामा आले आणि आबांची तब्येत बरोबर नव्हती. आबांनी माझ्यापुढे हात जोडले म्हणून मी तुझ्याशी लग्न करायला तयार झाले. पण तू मला खरच खूप आवडतोस. लहानपणापासून तुलाही शिक्षणाची आवड आहे हे मला माहीत होतं. आणि तू माझ्या या स्वप्नांमधे रंग नक्की भरशील अशी माझी खात्री होती. पण इथे आले आणि तुझ्या आईवर होणारा अन्याय मला सहन झाला नाही म्हणून मी जे बोलले तेच तुझ्या घरच्यांना खटकलं आणि तेव्हापासून सतत माझा अपमान करून मला फुकट आली म्हणून अगदी कामवाली करून सोडलं. त्याचंही मला दुःख नाही वाटलं पण लहानपणापासून मी बघितललं स्वप्न तुझ्या आई नी तुझी शपथ घालून पुसून टाकलं. 

आज कित्येक दिवसापासून अव्यक्त राहिलेल्या भावना अश्रू आणि शब्द याद्वारे व्यक्त होताना दीपाच्या मनावरचा ताण पूर्णपणे दूर झाला होता.

संतोषने दीपाचे डोळे पुसले. तो तिला म्हणाला, "आता यापुढे तुझं स्वप्न हे फक्त तुझं नाही तर ते आपल्या दोघांच आहे आणि यापुढे एकही अडथळा तुझ्या वाट्याला येणार नाही याची जिम्मेदारी माझी असेल."

आज दीपाने संतोष ला मिठी मारली. खरोखर शंकराला प्राप्त करण्यासाठी पार्वतीने ही खूप तपश्चर्या केली होती या पौराणिक कथेप्रमाणे काही काळाच्या प्रतीक्षेनंतर आज दीपालाही संतोष मिळाला होता.

दीपा आणि संतोष घरी जायला निघाले. रोज काही ना काही चांगलं घडतंय आजच्यापेक्षा उद्या नक्कीच काहीतरी चांगलं घडेल अशी जगदंबेला प्रार्थना करत दीपा आणि संतोष घरी गेले.


दीपा आणि संतोषला उशिर झाल्यामुळे घरच्यांच्या प्रतिक्रिया कशा असतील ? आणि संतोष त्यांना प्रतिउत्तर कसा देतोय ? 


ते पाहूया पुढील भागात क्रमशः


सौ.प्राजक्ता पाटील

लेख आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा.

आवर्जून लेख वाचल्याबद्दल आभार.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

प्राजक्ता पाटील

Teacher

Reading And Writing is my Passion....