तिचा संघर्ष.भाग -9

Every Woman Wants Love,respect And Support.

"उठली नाही का गं ही पोरगी अजून ? काय आजारी पडलीय का?" सासरे अगदी शांत आवाजात म्हणाले.


(सायंकाळी शिव्यांचा पट्टा चालूच ठेवणारे सासरे सकाळी मात्र "तो मी नव्हेच!" असेच काहीसे वागायचे.)


दीपाला त्यांच्या आवाजाने जाग आली.


सासूबाई : नवऱ्याने रात्री इथे आणून झोपवले, मग तो उठवायला आल्या शिवाय उठणार नसलं.


"अरे बापरे!किती उशीर झालाय मला उठायला आज. रोज सूर्य उगवण्याची मी आतुरतेने वाट पाहत होते आणि आज चक्क सुर्यच माझ्या उठण्याची वाट बघतोय." दीपाने स्मितहास्य करत अंथरूण पांघरूनाच्या घडया केल्या. आणि खोलीत नेऊन ठेवल्या.आजची सकाळ किती सकारात्मक होती. कालच्या त्या रात्रीने दीपा आणि संतोष मधला दुरावा कुठच्या कुठे पळवून लावला होता. नातं तेच होतं, पण आज नव्यानं बहरत होतं.


सासूबाईंचा स्वयंपाक उरकला होता. दीपा साठी संतोष चुलीवर आंघोळीला पाणी तापवत बसला होता.


दीपा खोलीत गेली तसा संतोष ही तिच्या मागोमाग खोलीत गेला.


"दीपा तुला बरं वाटतं ना !" का अजूनही अशक्तपणा जाणवत असेल तर फक्त तोंड, हातपाय धुऊन नाष्टा केलास तरी चालेल. गोळ्या घ्यायच्या आहेत तुला सकाळच्या. वेळेवर गोळ्या घेतल्यास म्हणजे ठणठणीत बरी होशील." संतोष म्हणाला.


संतोषने दिपाला मिठी मारली.


"अरे पाहुणे आलेत ना आपल्या घरी, आणि हे काय ? येईल कोणीतरी."


संतोषने दीपाला खिडकीतून बाहेर बघायला सांगितले. दीपाने बाहेर पाहिले. सगळे बाहेर उभे होते.


मग दीपा अलगद संतोषच्या मिठीमध्ये स्थिरावली. तोच आईने संतोष म्हणून आवाज दिला.दीपा मागे सरकली.


"काय म्हणते आई ?" म्हणून संतोष बाहेर आला.


"अरे नवरात्रीची तयारी करायची हाय ना ! त्यासाठी सरपंच आणि गावातील माणसं आलेत बघ तुला विचारायला. नवरात्रीत डेकोरेशन अन् कोणतं कार्यक्रम ठेवायचेत ते विचारायलेत ?" आई म्हणाली.


"बरं, बरं बघतो मी थांब !" संतोष बाहेर गेला.


" ये दीपा, आंघोळ करून घे बाई लवकर. शालीनीताई येणार आहेत म्हणाली जोशना. अन् त्या कवा बी सकाळी लवकरच येत्यात." सासुबाई दीपाला म्हणाल्या.


"हो, हो आंघोळीलाच चाललेय." दीपा म्हणाली.


दीपा आंघोळ करून खोलीत आली.आणि दीपा पाहतो तो काय ! टेबलवर ग्लासभरून दूध ठेवलेलं होतं आणि चक्क संतोष सुरीने सफरचंद कापत बसला होता.


"दीपा, ते ग्लासातलं दूध पिऊन घे.आणि हे सफरचंद खाऊन घे." संतोष म्हणाला.


"ये नाही हं ! असं मी एकटीनं खाणं बरं नाय दिसत." दीपा म्हणाली.


"बर थांब, मी जोशना ला हाक मारतो.ये जोशना, इकडे ये जरा." संतोष म्हणाला.


"काय रे दादा ? बोलवलंस काय मला ? जोशना म्हणाली. 


"होय बोलवलं मी तुला, हे बघ ही दीपा आजारी आहे म्हणून सफरचंद आणली तर एकटी खायला नको म्हणतीय, म्हणून म्हटलं तू पण ये खायला खावा दोघीजणी मिळून." संतोष म्हणाला.


"नाही, नको, मला नाही आवडत सफरचंद. मी कुठं आजारी आहे ? तू तिच्यासाठी आलेत ना, तर खाऊ दे की तिला!" जोशना चेहरा अगदी वेडावाकडा करत म्हणाली.


"घ्या ना जोशना ताई, आजारी असल्यावरच नव्हे; तर आजार पडू नये म्हणून सुद्धा खातातच की सफरचंद." दीपा अगदी प्रेमाने म्हणाली.


तेवढ्यात जोशना चा फोन वाजतो. ये दादा, माझ्या मैत्रिणीचा फोन आलाय, मी चालले. म्हणून जोशना निघून गेली.


"बघितलंस का दीपा, आता तर तुला एकटीलाच खावे लागतील सफरचंद. खाऊन घे पटकन. थोड्या वेळानं जेवण करून तुझा हिमोग्लोबिन तपासायला जायचं आहे आपल्याला." संतोष म्हणाला.


दीपा आणि संतोषने सफरचंद संपवले.


जोशना आईकडे गेली आणि म्हणाली, "आई, दादानं लयच लाड चालवलेत गं त्या दीपाचे. तिच्या माहेरी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती आणि ही मला सांगते सफरचंद शरीरासाठी किती चांगलं असतं ते!"


"लय शहाणी समजते ती स्वतःला." आईने लेकीला प्रत्युत्तर दिले.


"ह्या आजीला काही काम नव्हतं; दीपा सकाळपासून उपाशी आहे म्हणून डॉक्टर समोर, दादा समोर म्हणाली म्हणून दादानं तिला एवढं डोक्यावर घेतलं." आजीला उद्देशून जोशना म्हणाली.


"आता उद्यापासून काही बोलत नाही मी." आजी जोशना ला म्हणाली.


"आजी,ये आजी" जया आणि श्याम शालीनीची दोन्ही मुलं दरवाजाच्या बाहेरून आवाज देत होती.


"अगं बाई, शालिनी आली वाटतं." आजी भाकरीचा तुकडा घेऊन बाहेर आली.


आजीने नातवांची दृष्ट काढली आणि भाकरीचा तुकडा बाहेर फेकून आली.


जया आजीच्या पाया पडली. मग श्याम पण आजीच्या पाया पडला.


"बघ रत्ना, किती वळण लावलय ग माझ्या शालिनी ने लेकरांना. नाहीतर ती तुझी सुन, संतोषच्या पसंतीची.  सतत आपलं म्हणणं खरं म्हणणारी,अन दुसऱ्याला ज्ञान शिकवणारी. म्हणून म्हणत होते आपल्या संतोषला जया किती शोभून दिसली असती." आजी म्हणाली.


"मग काय तर बाई." रत्ना म्हणजे दीपाच्या सासूबाई म्हणाल्या.


दीपा बाहेर आली. शालिनी आत्याच्या, आजीच्या आणि सासूबाईंच्या पाया पडली. ननंदेचा मान म्हणून जोशनाच्या ही पाया पडली.


पण चूक काढायची म्हटल्यावर कशातही जाणून-बुजून चूक काढली जाते. किंवा चूक काढणार्‍या ला ती प्रकर्षाने जाणवते आणि ते म्हणतात ना "नावडतीचे मीठ आळणी.." त्याप्रमाणे दीपा कितीही चांगली वाटली तरी तिच्या सासरच्यांना मात्र काहीना काही दीपामध्ये उणीव सापडायची.


"अगं दीपा, तू पाया नाही पडलीस म्हणून काही माझ्या मुलीचे पाय सुजणार नाहीत, पण सगळ्यांच्या पाया पडलीस आणि माझ्या लेकीच्या पाया पडायचं विसरलीस." शालिनी आत्या आल्या आल्या दीपावर रागे भरत होत्या.


"आत्या, मग तुझ्या लेकीला सांग की दीपाच्या पाया पडायला खरं तर दीपाच वयाने मोठी आहे तुझ्या लेकीपेक्षा." संतोष आत्याला म्हणाला.


कारण आजारी असल्यामुळे संतोष दीपाला बाहेर जाऊ नको येईल आत्या घरात असे म्हणत असतानाही, आत्याला वाईट वाटू नये म्हणून दीपा बाहेर आली होती. आणि आता त्या उलट तिलाच बोल लावत होत्या, हे पाहून संतोषला आत्याचा जरा राग आला होता.  म्हणून संतोष ही जरा चिडून बोलला.


"खूपच बाजू घेतोस तू बाबा बायकोची. आत्ताच इतकं डोक्यावरच चढवल्यावर उतरणार नाही हो बायको खाली." आत्याही तावातावानं म्हणाली.


"दे ती बॅग इकडे, आणि बस जरा शांत. आली की कुठे लागली लगे भांडायला ?" संतोष म्हणाला.


आत्या घरात आली संतोष च्या खोलीत जाऊन बसली. सासूबाईंनी दीपाला चहा करायला सांगितला.


बघ दीपा , नाहीतर अजून चक्कर यायची तुला.का करू मी चहा? तू कर आराम. सासुबाई दीपाला टोमणा मारत म्हणाल्या.


"नाही नको, आता मला बरं वाटतंय. करते मी चहा."


म्हणून दीपा स्वयंपाक घरात गेली. संतोष ही दीपाच्या पाठोपाठ स्वयंपाक घरात गेला.


"आता हो वहिनी, हे काय नवीनच ? थोडावेळ पण बायकोला सोडायचं नाही. सारखं तिच्या मागे- मागे फिरायचं. हे काय सुरू केले संतोषनं?" आत्या यांच्या घरात भांडण लावायला आली की काय असंच वाटत होतं.


"त्याला जगावेगळी बायको मिळाली अप्सरा." सासूबाई म्हणाल्या. 


"अग आत्या, काल तिला चक्कर आलती, तेव्हापासून महाराणी कुठल्या कामाला हात लावत नाही." जोशना म्हणाली.


"आंघोळ करायला पाणीसुद्धा आज संतोषनी तापवलं." आजी म्हणाली.


"काय जादू केली काय माहीत त्या पोरीनं ? संतोषन कोणालाच न विचारता मामाचं ऐकून घरीच आणली तिला.


तेवढ्यात दीपा चहा घेऊन येताना सासूबाईंना दिसली म्हणून सगळे शांत बसले. दीपाने सगळ्यांना पाणी आणि चहा दिला.


"कशाने आलती गं दीपा तुला चक्कर?" आत्याने विचारलं.


"अशक्तपणा आला आहे म्हणाले डॉक्टर." दीपा म्हणाली.


"तुझे आई-वडिल तर दुसऱ्याकडे कामाला जातात वाटतं, सकाळ नंतर संध्याकाळच्या जेवणाचा प्रश्न असतो तुमच्याकडं असं ऐकलय मी. मग तुला तिथेही अशक्तपणा मुळे चक्कर येत असेल की." आत्या खोचकपणे म्हणाल्या.



आल्यापासून त्याचा एकही शब्द सरळ नव्हता सतत त्या दीपाला घालून पाडून बोलत होत्या. आता यांना बोलले तर पाहुण्यांचा अपमान केला म्हणून या बायका राईचा पर्वत करतील आणि आता कुठे संतोषचे आणि माझे सूर जुळले आहेत ते यांच्यामुळे बिनसले जाऊ नये अशीच माझी ईच्छा आहे. आता मी यांना काही न बोललेलेच बरे! म्हणजे शहाणपणाचे ठरेल. प्रत्येक वेळी प्रतिउत्तर महत्त्वाचं नसतं काही ठिकाणी मौनाचे सामर्थ्य अधिक शक्तिशाली ठरतं म्हणून दीपा शांत बसली.


दीपा या सर्वांच्या तोंडासमोर थांबायला नको म्हणून बाहेर गेली. दीपा किचन मध्ये गेली. संतोष ही दीपाच्या मागे गेला. संतोषला दीपा चे काहीतरी बिनसले हे तिच्या चेहऱ्यावरून समजले. पण दीपाने संतोषला काहीही सांगायचे टाळले.पण कालच्या प्रसंगापासून संतोष ची नजर दीपाच्या चेहऱ्यावरील पुसटशा रेषाही बदलल्या तरी अचूक  टिपत होती.


"दीपा, तू पटकन तयार हो. आपल्याला हिमोग्लोबिन चेक करायला जायचं आहे ना!" या संतोषच्या वाक्याने दीपाच्या चेहर्‍यावरील भाव बदलून दीपाचा प्रफुल्लित झालेला चेहराही संतोष च्या दृष्टिक्षेपातून निसटू शकला नाही.



आज दीपा लग्न झाल्यापासून पहिल्यांदा संतोष सोबत बाहेर जाणार होती.  मग ते दवाखान्याचे का असेना? पण एक निमित्त दोघांमधील नात्याला घट्ट करत होते.



सौ. प्राजक्ता पाटील 


लेख आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा.


मनापासून लेख वाचल्याबद्दल आभार.









🎭 Series Post

View all