Jan 26, 2022
नारीवादी

तिचा संघर्ष भाग-8

Read Later
तिचा संघर्ष भाग-8
या डॉक्टर. या खोलीत आहे दीपा म्हणत संतोष डॉक्टरांना दीपाजवळ घेऊन गेला. डॉक्टर दीपाला तपासत होते.

तोवर सासूबाई म्हणाल्या," काय दिवस बिवस गेलेत का डॉक्टर?" 

"अगं रत्ना, सकाळपासून जेवण केलं नाही म्हणून आली असल तिला चक्कर मनली न, जोशना मगाशी." आजीसासूबाई म्हणाल्या.

"तुम्ही जरा गप्प बसता का? तपासतोय न मी अजून पेशंटला." डॉक्टर जरा रागातच म्हणाले.

आता सगळेच जरा शांत बसले होते.

"लग्न होऊन किती दिवस झाले ?" डॉक्टर म्हणाले.

आजीसासूबाई आणि सासूबाईंच्या कपाळावर आठ्या उमटलेले दीपाने पाहिले होते.

"चार महिने." संतोष म्हणाला.

"पाळी वेळेवर येते का तुम्हांला?"डॉक्टरांनी विचारले.

"हो डॉक्टर." दीपा म्हणाली.

"काय दिवस गेलेत का डॉक्टर?" पुन्हा सासूबाईंनी विचारले.

"स्त्री म्हणजे मुलांना जन्म देणारं मशिन वाटलं का तुम्हांला?किती घाई झालीय आजी व्हायची ? माफ करा जरा स्पष्टच बोलतोय पण आधी आईला तर नीट सांभाळा मगच आजी व्हायचा विचार करा.

(दीपा मनात विचार करत होती. डॉक्टर तुम्हाला कुठे कळणार ? यांना उलट मुल नकोय व्हायला मला.)


डॉक्टरांनी दीपाला नखं दाखवायला सांगितले.

डॉक्टर म्हणाले,"यांचा हिमोग्लोबीन खूपच कमी झालाय. यांना आरामाची गरज आहे. संतोष उद्याच यांच रक्त तपासून घे आणि मला रिपोर्ट आणून दाखव. तापीसाठी काही गोळ्या लिहून दिल्या आहेत त्या जेवण केल्यानंतर त्यांना दे."

संतोष डॉक्टरांना बाहेर सोडून येतो आणि अजयला मेडिकल मधून गोळ्या घेऊन यायला सांगतो.


संतोष आज खरोखर मनातून खूप दु:खी होतो. खरचं माझं काहीतरी कुठेतरी चुकतंय! याची संतोषला जाणीव झाली. मी दीपाला गृहीत धरतोय का ? ती आज सकाळपासून उपाशी होती आणि मी तिला जेवलीस का ? हेदेखील विचारलं नाही. किती चुकीचं वागलो मी तिच्यासोबत. आणि काय गरज होती मला तिच्यावर उपकार केलेले दाखवायची ती मला म्हणाली होती का ? माझ्याशी लग्न कर म्हणून. माझ्याच मनात तिच्याविषयी प्रेम होतं. मी नाही तर दुसरं कोणी केलं असतंच ना दीपा शी लग्न ! एवढी हुशार आणि गुणी मुलगी असूनही कमी शिकलेल्या मला तिने कधीच जाणवू दिले नाही की, ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे.


 पण माझ्या मात्र हे लक्षात आलं नाही की, ज्या दीपाला दिवसातून एकदा तरी पाहता यावं; म्हणून मुद्दाम तिच्या घरासमोरून शेताकडं जाताना थोडावेळ थांबायचो आणि तिच्याशी बोलून मगच शेतात जायचो आणि आज ती माझ्या जवळ आहे तर मला तिला बोलायला थोडाही वेळ नाही. "घर की मुर्गी दाल बराबर.." म्हणजेच जी गोष्ट आपल्यापासून लांब असते तेव्हा तिची आपल्याला खूप किंमत असते आणि ती जेव्हा जवळ येते तेव्हा तिची किंमत राहत नाही का ? असं झालं बहुतेक माझ्या बाबतीत. पण आता नाही. नाही दीपा आता माझ्यामुळे तुला मी बिलकुल त्रास होऊ देणार नाही शब्द आहे माझा तुला. माफ कर मला. म्हणून दीपा जवळ जाऊन संतोषने दीपाच्या डोक्यावरुन हात फिरवला.


संतोषने आईला दीपासाठी जेवणाचं ताट घेऊन यायला सांगितलं होतं. संतोष दीपाला स्वतःच्या हाताने भरवत होता. दीपा नको म्हणत असतानाही तिला प्रेमाने भरवत होता. हे मात्र आई, आजी आणि जोशनाला बिलकुल पटत नव्हतं.


दीपाने विश्वासाने संतोषचा हात हातात घेतला. दीपा म्हणाली,  "संतोष, खरंच अरे सकाळी मला तुला एवढंच म्हणायचं होतं की, मला तुझी खुप आठवण येते. जोशना ताई, अजय दादा आणि विजय दादा आलेत म्हणून मी किचन मध्ये झोपते असं नव्हतं मला म्हणायचं रे ! तुला माझ्या बोलण्याचा अर्थच कळाला नाही.

"दीपा, आता तू कुठल्या गोष्टीचा ताण घेऊ नकोस. मला माझी चूक कळालीय. खुप प्रेम करतो मी तुझ्यावर. आता तू फक्त आराम कर, काही बोलू नकोस." संतोष बोलत होता.

"तुझ्या या बोलण्याने मला मानसिक समाधान मिळाले! अर्धा आजार तर पळून गेला बघ माझा. मला आजारी नाही पडायचय अरे. उद्या आणखी एक अतिथी येणार आहेत आपल्या घरी. लक्षात आहे ना!" दीपाने स्मितहास्य केलं.

"येऊ दे की मग. आहेत की घरात बाकीची माणसं. तू आराम कर. डॉक्टरांनी काय सांगितले लक्षात आहे ना !" 

संतोष प्रेमाने म्हणाला.


संतोष आज खऱ्या अर्थाने दीपा चा नवरा शोभत होता.

संतोषने अजयला फोन करून येताना दीपासाठी ताजी फळं, राजगिऱ्याचे लाडू ,चिक्की आणि दीपाला लहानपणापासून आवडणारी आठवडी बाजाराला लागून असलेल्या सखाराम बापू च्या दुकानातली गरम गरम जिलेबी घेऊन यायला सांगितली.


"संतोष, अरे याची काहीच गरज नव्हती!" दीपा हळू आवाजात म्हणाली.

"अगं बायको आहेस तू माझी आणि माझं कर्तव्य आहे तुला काय हवं नको ते पाहणं. आत्ता कुठे नवरा तुझा चूक सुधारण्याचा प्रयत्न करतोय, तर करू दे की त्याला." संतोष

अगदी प्रेमाने म्हणाला.

"बरं बाबा.तुझ्या माझ्या प्रेमाला कुणाची नजर ना लागो. हेच हवं होतं रे मला दुसरे काही नको." 

दीपा संतोषच्या नजरेत पुरती बुडाली होती.आज तिचं अस्तित्व तिला संतोष च्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं.

"तू आराम कर, मी आलोच." म्हणून संतोष आई कडे गेला. 

"आई,ए आई " संतोष जरा रागातच होता.

काय रे संतोष ? आई बाहेर आली.

"दीपा सकाळपासून जेवली कशी काय नाही?" संतोष आईला म्हणाला.

"कशी काय म्हणजे ? मी होते व्हय रं घरी ? मी तर शेतात गेलते आणि तुझी बायको  काय लहान लेकरू आहे का तिला घास भरवायला ? भूक लागल्यावर जेवायचं कळू नी का तीला? का आज तू जसं स्वतःच्या हाताने खाऊ घातलं तसं उद्यापासून बारी बारी आम्ही खाऊ घालावं असं वाटतं का तुला ?" आईचा पण आवाज चांगलाच वाढला होता.

"तसं नाही गं आई.(आजीला म्हणतो.)पण उद्यापासून आजी आपण असं करू, तू घरी असतीस म्हणून तुझ्याकडे जबाबदारी देऊन टाकू की, तुझ्यासोबत अन् जोशना सोबत दीपाला जेवायला घ्यायची." संतोष आजीला म्हणाला.

आज आजीच्या मनात नसूनही तिला नातवाच्या समाधानासाठी \"बरं\" म्हणावं लागलं होतं.

संतोष दीपा जवळ जाऊन बसला. अजय ही फळ घेऊन आला होता.

"काय बाई, जगावेगळीच ह्याची बायको एक आजारी पडलीय. आम्ही पण आजारी पडायचं पण आमच्या नवर्‍यानं इतकं कौतुक नाही केला कधी आमचं." सासुबाई आजी सासूबाईंना म्हणाल्या.

नाहीतर काय? आजी सासुबाईनीही सासूबाईंच्या सुरात सूर मिसळला.

"दीपा आधी काय खाणार आहेस ? जिलेबी हो की नाही ?" संतोष म्हणाला.

"हो, पण माझे एक ऐकशील का ? ऐक ना संतोष, आधी सगळ्यांना दे. खाईन अरे मी नंतर. आत्ताच तर जेवले ना! जागाच नाही बोटात शिल्लक!" दीपा म्हणाली.

"बरं!" म्हणून संतोषने अजय जवळ जिलेबी देऊन सगळ्यांना जिलेबी द्यायला सांगितले.

"अरे काय झालं ? परत का आलास ?" संतोष म्हणाला.

"कोणालाच जिलेबी नको आहे." अजय म्हणाला.

"बरं आण इकडे. दीपा तुला तर खावीच लागेल, तुझ्यासाठी खास मागवली मी." संतोष म्हणाला.

संतोष चा आज एवढा चांगला मूड आहे म्हटल्यावर, त्याला नाराज नको करायला आणि दीपाला ही खरोखरच लहानपणापासून ती गरमागरम जिलेबी खूप आवडायची. दीपाने मनसोक्त जिलेबीचा आस्वाद घेतला.

या जिलेबी मुळे आज खऱ्या अर्थानं दीपाच्या नवरा बायकोच्या नात्यातही गोडवा उतरला होता. आणि तो दीपाला तो कायम टिकवायचा होता म्हणून तिने त्यातलाच जिलेबीचा घास प्रेमानं संतोषला भरवला. 

संतोषने दीपाला डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या दिल्या. किती प्रेमाने संतोष दीपाच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत होता.

दीपा : संतोष, आपल्या संसार रुपी सागरात कितीही मोठे वादळ आले तरी आपण आपली नाव बिलकुल डगमगू द्यायची नाही हे लक्षात ठेव. मला फक्त तुझं प्रेम हवं आहे.


"हो दीपा, समाज मुलांना सगळीकडून बोलतो. लग्न झाल्यावर मुलगा बदलला हा शब्द प्रत्येक मुलाला ऐकावा लागतो. मला तसं होऊ द्यायचं नव्हतं कारण माझ्या आईने वडिलांचा लहानपणापासून खाल्लेला मार आणि तरीही आम्हाला उठून प्रेमाने खाऊ घातलेला घास मी विसरू शकत नाही. त्यामुळे मला आईच्या प्रेमापोटी तुझ्यावर अन्याय झालेला दिसलाच नाही. पण यापुढे माझ्याकडून ही चूक पुन्हा कधीच होणार नाही." संतोष आज दीपाजवळ खऱ्या अर्थाने व्यक्त झाला.

"माझ्यामुळे तू तुझ्या आई वडिलांना दुखावलेले ही मला नाही आवडणार, पण जिथे बरोबर असेल तिथे बायकोची बाजू घेणे ही खूप महत्वाचे असते कारण फक्त तुझ्या वरील विश्वासामुळेच मी तुझ्याबरोबर सात जन्माची गाठ बांधली आहे." दीपा म्हणाली.

"आज आपण दोघेही झोपूया स्वयंपाक घरात चालेल न."  रोमँटिक मूडमध्ये संतोष म्हणाला.  

"हो का नाही ! तू जिथे सोबत असशील तिथे यायला आवडेल मलाही."  दीपा ही म्हणाली.

आज दीपिकाची स्वयंपाक घरातून सुटका झाली होती. सासुबाई नी आज स्वयंपाक केला होता. सगळ्यांना जेवणाची ताटं वाढली होती. भांडी घासून ठेवली होती. सर्व आवरून सगळेजण झोपायला गेले होते. अजय आणि विजय टीव्ही पाहायला आले म्हणून संतोष ने स्वयंपाक घरात अंथरूण घातले. दीपालाही प्रेमाने आपल्या हाताचा आधार देत स्वयंपाक घरात नेले.आज संतोषच्या मिठीत दीपाच अवघं विश्व सामावले होते.


तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? म्हणत सुरु झालेला संतोष आणि दीपा चा नात्यातला गोडवा वाढत जातो की नवीन संघर्ष दीपा समोर उभा राहतो पाहूया पुढील भागात क्रमशः


सौ.प्राजक्ता पाटील ✍?

लेख आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा.

मनापासून लेख वाचला त्याबद्दल खूप खूप आभार.??


 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

प्राजक्ता पाटील

Teacher

Reading And Writing is my Passion....