Jan 26, 2022
नारीवादी

तिचा संघर्ष. (भाग2)

Read Later
तिचा संघर्ष. (भाग2)

घरातील प्रत्येक सदस्य कसाही वागला तरी दीपाला फरक पडत नव्हता पण संतोष शिकलेला असूनही वडीलांना काहीच बोलत नाही याचे मात्र दिपाला फार वाईट वाटायचे .त्यात आणखी भर पडली ती दीपाच्या नंदेची माऊशीकडे शिकायला गेलेली नंनद दीपा च्या लग्ना नंतर इथेच आली..

 

"शिकलेली शहाणी मुलगी आपल्या घरात आल्यावर आपल्याला तिच्या तालावर नाचावे लागते हे मात्र नक्की हो आई..! हे त्या दीपाच्या वागण्यावरून वेळोवेळी जाणवते बघ.. असे म्हणून आता ननंद आईचे कान भरू लागली. पण दीपाला मात्र कळत नव्हतं की ती कुठे चुकते ते ?? जे चुकीचं होतं त्यालाच तर ती विरोध करत होती.. बाकी घरातली कामं ती चोख बजावत होती..अगं दादाचं बारावी शिक्षण असून सुद्धा दिपा बीए शिकलेली मुलगी दादा सोबत लग्न करायला हो का म्हणाली असेल..?
नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे तिच्यामध्ये..! जोशना दीपाची ननंद म्हणाली..


पण संतोषला मात्र दीपा तिचा शिक्षण रुपी दिवा प्रज्वलित करणार असा विश्वास होता.. दिवसभर राबराब राबणारी दीपा नाईट कॉलेजला ऍडमिशन घेऊन बीए पास झाली होती.. केवळ आई-वडिलांच्या बिकट परिस्थिती आणि अट्टाहासमुळे ती या लग्नाला तयार झाली होती.. हेही त्याला ठाऊक होतं ..


संतोष सगळं माहीत असतानाही शांतच होता.. "आपलेच दात आणि आपलेच ओठ.." कोणाला काहीच बोलायचं नाही.. असं संतोषने ठरवलं.. संतोषला लहान वयातच घराची जबाबदारी स्वीकारावी लागली.. वडील नुसते दारू पिऊन धिंगाणा घालत होते आई आणि आजी त्यांची मनधरणी करणार हे त्याला अंगवळणी होतं पडलं होतं..  पुढचे शिक्षण तो घेऊ शकला नाही.. त्याची बहीण जोशना ला मात्र संतोष शैक्षणिक सुविधा मिळवून देत होता.. जोशनाने खूप शिकावं; खूप मोठं व्हावं.. अशी त्याची इच्छा होती..


संतोष बहिणीच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र एक करून काबाड कष्ट करतोय हे दीपाला ठाऊक होतं.. कमी शिकलेला असला, तरी तो माझ्या शिक्षणाचा आदर करेल हे दीपाला माहित होतं.. म्हणूनच  संतोषशी लग्न करण्याचा दीपाने दूरदृष्टीतून निर्णय घेतला होता..
"ज्याचं माप जिथं असेल; तिथं ती व्यक्ती जाते.." अशी पूर्वीची म्हण दीपाच्या बाबतीत सार्थ ठरली.. संतोष च्या आजी आणि बहिण यांचा विरोध असतानाही दीपा लग्न करून संतोष ची सुखदुःखाची सात जन्माची जीवन साथी बनली.. आता तो क्षण ज्या दिवशी खऱ्या अर्थानं दीपा आणि संतोष एकमेकांच्या जवळ येणार होते.. आणि त्यादिवशीच संतोषने दीपाला तो तिच्या पुढील शिक्षणासाठी हवी ती मदत करेल हे आश्वासन दिलं.. जगातली सगळ्यात नशीबवान मुलगी मीच आहे..असच दीपाला त्यादिवशी वाटलं..


घरच्या वातावरणाने भेदरलेली दीपा संतोषच्या विश्वास आणि पाठिंब्यावर पुन्हा उज्ज्वल भविष्याची स्वप्न रंगवू लागली..  नव्या नवरीचे नऊ दिवस संपले.. आणि आठवड्याने दीपाला समजले  संतोष आणि सासुबाई पहाटे शेतावर जातात आणि तेही डब्बा घेऊन हे  दीपाला समजलं.. दीपा ही लवकर उठून दोघांचा अगदी प्रेमानं डबा भरून देत असे.. संतोषने ठरल्याप्रमाणे दीपाचे लॉ चे ऍडमिशन केले.. दीपा ही कामात तरबेज होती.. दिवसभर घरचं सगळं काम करून ती नाईट कॉलेजला जाणार हे मात्र आजीसासूबाईंना पचनी पडेना.. "लग्न झाल्यावर शिकायची गरज काय आहे..? एवढ शिकून काय करणार आहे..? यावर संतोष म्हणाला, "आजी, जोशना माझी स्वप्न पूर्ण करणार आहे; दीपा पण तीच स्वप्न पूर्ण करू पाहते.. मग तू असं का बोलतेस..?? आज संतोष आपल्या बाजूने दोन शब्द का असेना बोलला यामुळे दीपाचा आत्मविश्वास अजूनच बळावला.


आजी म्हणाली.., "संतोष, जोशना तुझी बहिण आहे आणि माझी नात तिच्या शिक्षणाची जबाबदारी तुला घ्यावीच लागेल.." त्यावर संतोष म्हणाला.., "आजी, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट.." असच झालं तुझं... दीपा ही आता माझी अर्धांगिनी आहे.. या घरची सून..सून म्हणून ती सर्व जबाबदाऱ्या पार पाडणार...? मग तिच्या आकांक्षांना, इच्छांना पूर्ण करणं आपली जबाबदारी नाही का...?


मनापासून नसली तरी आजी दीपाच्या शिक्षणासाठी तयार झाली; यातच संतोष ला आकाशाला गवसणी घातल्याचा आनंद झाला.. दीपा आणि जोशना एकाच वर्गात असल्यामुळे दोघीच त्याच नाईट कॉलेजमध्ये संतोषने ॲडमिशन केलं.. वहिनी आणि माझी तुलना नाही होऊ शकत.. दोघीही दादाच्या लाडक्या नाही होऊ शकत.. लहानपणापासून आपल्यावर प्रेम करणारा दादा वहिनी ची बाजू घेतोय हे काही जोशना ला मान्य नव्हतं..
वहिनीला घरी बसवण्यासाठी जोशना च्या संकुचित मेंदूत एक घाणेरडी कल्पना अवतरली.. तिने वहिनीला तिच्याच एका मित्राला लवलेटर लिहायला सांगितलं.. आवर्जून दादाच्या नजरेस पडेल असं ठेवलं..  मजकुराचं वाचनही मोठ्या मनोरंजकपणे केलं.. तेव्हा मात्र साशंक नजरेने पाहणारे  संतोषचे डोळे दीपाच्या डोळ्यातील निष्पाप भाव ओळखू शकले नाहीत.. असेच दीपा ला वाटले.. आजीसासूबाईंचे बोचक शब्द दीपाच्या काळजाला जाऊन भिडले.. पण न डगमगता दीपा ने सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले.. कर नाही त्याला डर कशाला.. पण त्या दिवसापासून संतोष चे बोलणे, वागणे सर्व काही बदलले होते.. ते दीपाला लवलेटर पेक्षाही जास्त त्रासदायक वाटत होते..

दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात माणूस स्वतः पडतो.. हे अगदी खरं..!! ज्याच्याकडून जोशनाने चिठ्ठी लिहून घेतली होती.. तो रवी.. वारंवार जोशनाला ब्लॅकमेल करत होता.. आज तर त्याने जोशना ला लॉजवर भेटायला ये.. नाहीतर तुझ्या भावाला आणि घरच्या सगळ्यांना "लवलेटर" बद्दल खरं काय ते सांगेल..?? अशी घाणेरडी धमकी दिली हे दीपाला जोशना च्या मैत्रिणीकडून समजल...

दीपा ने जोशना ला सतत ब्लॅकमेल करणाऱ्या त्या रवीला खडे बोल सुनावले..जोशना साठी दीपाने जणु "दुर्गेचे"  रूप धारण केले होते.. ज्या वहिनीशी आपण चुकीचे वागलो; ती वहिनी किती चांगली आहे.. मोठ्या मनानं तिने सगळं बाजूला ठेवून आपल्याला मदत केली.. म्हणून जोशना धायमोकलून रडू लागली.. वहिनीची माफी मागू लागली... दादाला ही सर्व काही खरं ते सांगितलं.. "तुझा गुन्हा माफ करण्यासारखा नाही.. नवरा-बायकोच्या पवित्र नात्यात दुरावा निर्माण करण्याचा तुला काहीही अधिकार नाही.. पण ही तुझी शेवटची चूक समजून तुला मी माफ करतोय.." असे दादाने सुनावल्यावर अशी चूक परत होणार नाही म्हणत जोशनाने दादा वहिनीचे पाय पकडले..
वहिनीच्या रूपात मला माझी मोठी बहीणच मिळाली आहे..!!  तिलाही शिक्षणाचा अधिकार मिळायला हवा..!! तिलाही तिच्या पायावर उभे राहता यावे.. यासाठी "आजी, तु ही विरोध करणार नाहीस.. असं मला वचन दे.." अस म्हणून "जुनेच नाते नवीन ऋणानुबंधच्या धाग्याने गुंफले गेले.."

या ऋणानुबंधाचे धागे कितपत पक्के होते..? ते क्रमशः पुढील भागात..

सौ प्राजक्ता पाटील
??आवर्जून लेख वाचलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे..? ?लेख आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करायला विसरू नका...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

प्राजक्ता पाटील

Teacher

Reading And Writing is my Passion....