तिचा संघर्ष भाग-50

Every Woman Wants Love,respect And Support.

भाग - 50

दुर्गाने संतोषला आणि दीपाला रात्री मुक्कामाला आपल्याकडे ठेवून घेतले. दीपाने कितीही आग्रह केला तरी दीपाला कोणत्याही कामाला हात न लावू देता दोघी मायलेकींनी स्वयंपाकाबरोबर इतरही कामे भराभर आटोपली. सर्वांची जेवणं झाली. दीपा आणि दुर्गा आज कितीतरी वर्षांनी अशा निवांत पडून गप्पा मारत होत्या. दुर्गा सगळ्यात मोठी होती तर दीपा शेंडेफळ होते त्यामुळे दोघींमध्ये लहानपणापासून कधीच भांडण झालेले नव्हते. उलट दुर्गा आई शेतात गेल्यावर दीपाची आईप्रमाणे काळजी घ्यायची. त्यामुळेच दोघींचं छान जमायचं. दोघी बहिणींच्या गप्पा इतक्या रंगल्या होत्या की त्या दोघी बहिणीं रात्रीचे किती वाजलेत ? हे ही विसरून गेल्या.

"दीपा, तू काय बी म्हण. पण मला आता लय भीती वाटतेय बघ राणीला शिकवायचं म्हणलं की." बोलता-बोलता दुर्गा म्हणाली.

"दुर्गा आक्का, तू आता राणीची काहीही काळजी करू नकोस. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना ? (दुर्गाने होकारार्थी मान हलवली.) झालं तर मग. माझं पूर्ण लक्ष असेल राणीकडे. तू निश्चिंत रहा." दीपा म्हणाली.

"दीपा, तू खरंच खूप वेगळी आहेस गं. लहानपणापासून आई- आबांच्या फाटक्या संसाराला तूच टाके घातलेस बघ. त्यानंतर सासरच्या माणसांनी केलेला छळ सहन करूनही, सासरच्या माणसांना कायद्याने वठणीवर आणण्यापेक्षा प्रेमाने जिंकून दाखवलंस. आणि आज माझ्याही मदतीला   धावून आलीस. एवढं मोठं पद मिळवून सुद्धा गर्वाचा लवलेशही नाही तुझ्यात. सासरची आणि माहेरची दोन्ही नाती छान जपलीस तू. आणि मला जे नाही मिळालं ते माझ्या मुलांना मिळावं अशीच माझी इच्छा आहे आणि तुझ्यासारखाच राणीनेही खूप मोठं व्हावं असचं मला वाटतयं. पण.. " दुर्गाने आपले बोलणे मध्येच थांबवले. दीपा म्हणाली, आणि हो दुर्गा आक्का, आई आबावरून आठवलं आम्ही आई आबांना तुझ्याकडे चाललो आहोत हे सांगितलं नाहीये. तेंव्हा जे घडलं ते तू ही त्या दोघांना सांगू नकोस आणि राणीचं म्हणशील तर , राणी शिकून स्वतःच्या पायावर नक्की उभी राहणार बघ. आणि अगं तुलाच काय प्रत्येक आई-वडिलांना हेच वाटत असतं की, त्यांच्या मुलाने शिकून खूप मोठं व्हावं." आपल्या बहिणीनीचा हात हातात घेऊन दीपा म्हणाली,"तू आई आहेस, पण मी ही तिची मावशी असल्यामुळे मलाही तिची काळजी आहेच की !" स्मितहास्य करत दोघी बहिणी झोपी गेल्या. सकाळ झाली आणि दीपाने निघण्याची तयारी केली. राणीही आईबाबांनी पुढे शिक्षणासाठी परवानगी दिल्यामुळे खूप खुश होती. आपल्या ध्येयपूर्तीचे स्वप्न उराशी बाळगून राणी गाडीत बसली. आता मात्र फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची खूणगाठ राणीने मनाशी बांधली. कारण परिस्थितीतून मिळालेली अनुभवरूपी शिकवण कायम लक्षात राहते आणि राणीने ती परिस्थिती स्वतः अनुभवली होती. सगळ्यांचा निरोप घेऊन दीपा निघाली होती. परतीच्या प्रवासात दीपाने राणीला विचारले, "राणी तुला कशात करियर करायचंय पुढे ?"

राणी म्हणाली, "दीपा मावशी, आईला आणि बाबांना मी पोलीस अधिकारी व्हावं असं वाटत होतं म्हणून मी दहावीपासून शहरात अकॅडमी जॉइन केली होती. पण त्या एका प्रसंगाने सर्व बदललं आणि मी डॉक्टर व्हायचं ठरवलं. स्पेशली सर्जन. आणि दीपा मावशी, तुला माहितीय मला सर्जन का व्हायचं आहे ते?" स्मितहास्य करत राणी म्हणाली.

"का गं ? का व्हावं वाटतं तुला सर्जन ?" दीपा राणीला म्हणाली.

"दहावीत असताना मी नेहमी अभ्यासाला टाळाटाळ करायचे. आईला नेहमी वाटायचं, मी खूप मोठं व्हावं. ती जे करू शकली नाही, ते माझ्या मुलीने करून दाखवावं. कारण तिच्यावेळी मुलीचे लग्नाचे वय झाले की, समाज काय म्हणेल ? यामुळे लवकर लग्न करण्याची प्रथा होती म्हणे ; पण आता काळ बदलला मुलींनाही मुलाप्रमाणे आपल्या मर्जीने कोणत्याही क्षेत्रात पदार्पण करता येते. आणि त्या करतातही. आई मला सतत अभ्यास कर म्हणून पाठी लागलेली असायची. पण मला काहीच गांभीर्य नव्हतं. 

माझा धाकटा भाऊ रोहन मात्र अभ्यासात खूप हुशार होता. तो लहान असून सुद्धा मला अभ्यास कर म्हणून विनंती करायचा. पण ते म्हणतात ना "कोणताही विचार डोक्यातून नाही तर हृदयातून आला तरच तो यशस्वी होतो!  बाबा आईला नेहमी समजवायचे, "तू म्हणशील आणि राणी अभ्यास करेल, असं कधीच होत नसतं ; जोपर्यंत राणीला तिच्या मनातून वाटणार नाही तोपर्यंत ती अभ्यास करणार नाही. त्यामुळे तू विनाकारण टेन्शन घेणे सोडून दे. अ‍ॅकॅडमीला सुट्ट्या होत्या म्हणून मी गावाकडं येताना माझा छोटासा एक्सीडेंट झाला म्हणजे बसच्या लोखंडी रॉडने माझा हा बघ हा दात पडला ( आपल्या बोटाने दात दाखवत राणी म्हणाली.) आणि हा दुसरा. अर्धा तुटलेला दात. मी जेंव्हा माझा चेहरा आरशात पाहते, तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळतात. दवाखान्यात डॉक्टरांना दाखवून पडलेल्या दाताच्या ठिकाणी 'डुप्लिकेट' दात बसवला जातो ; पण तो अर्धा तुटलेला दात बसवायचा नाही. अस मी आईला ठामपणे सांगतलं होतं.

दात बसवायला मी पैशांमुळे तर नकार देत नसेल ना ? म्हणून आईने मला दात न बसवण्याचं कारण विचारलं. आईने विचारल्यावर मी तिला सांगितलं,"आई, दात हा शरीराचा किती छोटा भाग असतो, पण तरीही डुप्लिकेट दात बसवेपर्यंत मला समाजातील घटकांकडून जो मानसिक त्रास झाला, तसा समाजातील कित्तेक मुलींना, स्त्रियांना किंवा ज्यांचा ॲक्सिडेंट झालेला असतो. आणि त्यांनी एखादा अवयव गमावलेला असतो अशा व्यक्तींना किती होत असेल? याची मला जाणीव झालीय आणि अशाच लोकांसाठी मी सर्जन व्हायचं ठरवलंय.." आईच्या डोळ्यातून तर आनंदाश्रू वाहू लागले होते. आणि बारावीत चांगले मार्क्स घेतल्यावर सीईटीची तयारी करण्यासाठी मी क्लास जॉइन केले होते. आणि हे असं घडलं. पण मावशी आता मी तुला शब्द देते की तुला किंवा कोणालाच त्रास होईल असं मी बिल्कुल वागणार नाही. सर्जन बननूच गावात पाय ठेवेल." राणी म्हणाली.

"किती छान बोलतेस गं तू राणी ! आत्मविश्‍वास व्यक्तीला कधीच पराभूत होऊ देत नाही. आणि तुझ्यात आत्मविश्‍वास ठासून भरलेला आहे. मला खात्रीय तू नक्की यशस्वी होणार!" दीपा राणीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली.

"तू खरंच तुझ्या मावशीसारखी आहेस. जिद्दी आणि हुशार! होशील तू सर्जन." संतोष म्हणाला.

"हो का? म्हणजे बायको हुशार आहे तर तुझी !" दीपा म्हणाली.

"हो. आहेच माझी बायको हुशार. आज राणीच्या कौतुकाबरोबर बायकोचेही कौतुक करावेसे वाटले. आणि मनापासून केले. " संतोष म्हणाला.

सगळेजण मोठ्याने हसले. आणि गाडी दारात येऊन थांबली. गाडीचा आवाज ऐकून शार्दुल "आई-बाबा आले." असे म्हणून उड्या मारतच घरातून बाहेर आला. दीपा, संतोष आणि राणी गाडीतून खाली उतरले. शार्दुल आत जाऊन आजीला म्हणाला, "आजी, चल लवकर बाहेर. आईबाबा मला एक छान दिदी घेऊन आलेत." दोन्ही आजी विचारात पडल्या आणि लगबगीने बाहेर आल्या. राणीला पाहिल्यावर दीपाच्या आईने तिला मिठी मारली. राणीने सर्वांना वाकून नमस्कार केला. 

"अगं दीपा, आक्काकडे गेली होतीस तर आम्हाला का खोटं सांगितलंस?" आई दीपाला म्हणाली.

दीपा आता आईला काय सांगावे ? हाच विचार करत होती.तेवढ्यात संतोष म्हणाला, " ते काम करूनच आम्ही आक्काकडे गेलो. हो ना दीपा." 

"हो आई." दीपा म्हणाली आणि ती संतोषला डोळ्यांतूनच थॅन्क्स म्हणाली. राणी मात्र मावशी आणि काका "मेड फॉर इच ऑदर "आहेत हाच विचार करत होती.

"शार्दुल, ही तुझ्या सगळ्यात मोठ्या मावशीची मुलगी राणी दिदी." दीपाने शार्दुलला राणीची ओळख करून दिली.

"ओके. खूप छान आहे माझी दिदी , हो ना रे हरीदादा?" हरी मात्र काहीच न बोलता आत निघून गेला. 

सगळेजण मोठ्याने हसले. 

शार्दुल मात्र जाम चिडला. "जा.तुम्ही कोणीच नका बोलू माझ्याशी." शार्दुल म्हणाला. 

"स्वारी." म्हणत संतोषने शार्दुल ला उचलून घेतले.

पुढील भागात क्रमश: 

सौ. प्राजक्ता पाटील 

कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा आणि हो मला "फॉलो" करायला विसरू नका. 

कथा प्रकाशनाचे सर्वाधिकार लेखीकेकडे राखीव.  

कथा मनापासून वाचणाऱ्या सर्व वाचक वर्गाचे खूप खूप आभार. 

#साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.






🎭 Series Post

View all