तिचा संघर्ष भाग- 46

Every Woman Wants Love , Respect And Support.

भाग- 46



दीपा भाषण करण्यासाठी उभी राहिली होती. टाळ्यांच्या कडकडाटाने दीपचं स्वागत करण्यात आले.

दीपाने सर्वांनाच अभिवादन करून भाषणाला सुरुवात केली. 

दीपा म्हणाली, " मी लहानपणापासून ऐकत आले होते, वाचत आले होते की , एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हे जरी खरे असले तरी माझ्या नवर्‍याने मात्र एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुषही असू शकतो हे खरे करून दाखवले. प्रत्येक स्त्री लग्न करून सासरी आल्यावर फक्त सासरच्या सुखासाठी प्रयत्न करते ती स्वतःचे अस्तित्व विसरून जाते. मी ही तेच करणार होते. पण माझ्या नवऱ्याने मात्र लग्न करून सासरी आल्यावर माझ्या सुखाचा विचार केला. माझ्या नवऱ्याची संतोषची साथ जन्मोजन्मी अशीच मिळावी असं मला वाटतं कारण त्याच्या सहकार्यामुळेच मी यश मिळवू शकले. हे मी एवढ्यासाठी सांगते की , ग्रामीण भाग असूनही लोक काय म्हणतील ? याचा विचार न करता आपल्याला काय करायचे आहे ? हे संतोष प्रमाणेच प्रत्येक कुटुंबाने स्वतः ठरवावे. आयुष्य हा असा एक पेपर असतो. ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न वेगळा असतो आणि त्या प्रश्नाचे उत्तरही वेगळे असते. म्हणजे मला शिक्षणाची आवड होती म्हणून प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला लग्नानंतर शिक्षण द्यावे असे मी म्हणणार नाही. पण आपल्या बायकोची आवड कशामध्ये आहे हे जाणून,  तिला जर घरातून बाहेर पडण्याची मुभा मिळाली तर ती तुमच्या संसारालाही हातभार लावेल शिवाय ती स्वावलंबी होईल. त्याचप्रमाणे आपल्या गावात बचत गटामार्फत लघुउद्योग सुरू केला तर गावातील महिलांना रोजगार उपलब्ध होईल आणि म्हणूनच सरपंचांनी या बचतगट सुरू करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन द्यावे. त्यांच्या लघुउद्योगातून बनलेल्या उत्पादनाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न करावा अशी मी त्यांना विनंती करते.  आई-वडील दोघं कमावतील तर मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना कोणत्याही सावकाराकडे हात पसरावा लागणार नाही. यातून नक्कीच शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही रोखल्या जातील. त्याचबरोबर गावातील सर्व मुलांना उच्च शिक्षण घेता येईल , पर्यायाने आपल्या गावाचा विकास होईल. ह्या ज्या माझ्यासमोर सावित्रीच्या लेकी बसल्या आहेत त्यांना मी एवढंच सांगेन , स्त्री ही कमजोर कधीच नाही तर कणखर आहे. ग्रामीण भागामध्ये काहीही झाले तरी मुलीलाच दोषी ठरवले जाते. त्यामुळे जगाकडे लक्ष न देता आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचे. भरपूर अभ्यास करून आपणही आपल्या आईवडिलांची म्हातारपणाची काठी बनू शकतो हे या समाजाला दाखवून द्यायचे. माझ्या यशात माझ्यामागे खंबीरपणे उभे असलेले माझे आई आणि आबा यांचा आज मला खूप अभिमान वाटतो. तसेच "रक्ताच्या नात्याहूनही प्रेमाची नाती श्रेष्ठ असतात." हे प्रत्येक प्रसंगी दाखवून देणाऱ्या माझ्या मॅडम यांचे ऋण मी या जन्मात काय तर पुढचे सात जन्मही फेडू शकणार नाही. म्हणून मी सर्व गावकऱ्यांना सांगू इच्छिते प्रामाणिक कष्ट करणाऱ्यांच्या मागे परमेश्वर उभा असतो. त्यामुळे तरुण मुलांना माझी विनंती असेल की, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. खूप शिका. खूप मोठे व्हा. आपल्या आई-वडिलांचं तसेच आपल्या गावाचं नाव मोठं करा." दीपा जे बोलत होती ते शब्दन् शब्द ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या मनामनावर कोरले जात होते.

सरपंचांनी लवकरच जास्तीत जास्त बचत गट सुरू करण्याची आणि लघु उद्योगाच्या उत्पादनाला योग्य भाव देण्याची ग्वाही देत, सर्वांचे आभार प्रकट करून कार्यक्रम संपला असे जाहीर केले. 

चहा पाण्याचा कार्यक्रम संपल्यावर दीपा स्टेजवरून खाली उतरत होती. तेवढ्यात अचानक एक बाई दीपा समोर येऊन हात जोडून उभ्या राहिल्या. " दीपा , पोरी मला माफ कर गं." त्या बाई म्हणाल्या. दीपा म्हणाली , माफी कशामुळे मागताय ?" त्या बाई म्हणाल्या , "गौरव बद्दल आणि तुझ्याबद्दल मला कुणीतरी सांगितल्यावर , मी माझ्या पोरीला शिकवणीला पाठवलं नाही. त्यामुळे आमची पोरगी हुशार असून सुद्धा लवकरच आम्ही पोरीचं लग्न उरकलं. पण मला काय माहित होतं तू इतकी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ असशील ते. पण आज माझे डोळे उघडले म्हणूनच तुझी माफी मागतेय बघ. तू म्हणालीस ते बरोबर आहे, "ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे." आता मी बी माझ्या राणीला पुढं शिकवा म्हणून तिच्या सासरच्यांना हात जोडून विनवणी करणार आहे."

दीपा म्हणाली , " मी तुमच्या पेक्षा लहान आहे , त्यामुळे हात वगैरे जोडून माफी मागू नका. ते म्हणतात ना , "घर का भुला अगर शाम को वापस आ जाये तो उसे भुला नही कहते।" आणि सासरच्या मंडळींनी तुमच्या राणी ला पुढे शिक्षण घ्यायला नकार दिला तर मला सांगा, मी स्वतः बोलेन त्यांच्याशी. आणि चला आता मला आशीर्वाद द्या." दीपा त्या बाईंना नमस्कार करत म्हणाली.

"निर्मळ मनाची हायस पोरी, लय मोठी होशील बघ !" त्या बाईंनी अगदी मनापासून दीपाला आशीर्वाद दिला.

गौरव कोपऱ्यात उभा होता. दीपा गौरवला म्हणाली ," काय झालं गौरव ? का असा तोंडाचा चंबू करून उभा राहिला आहेस ?" 

"दीपा , अगं राधिकाचं तिच्या घरचे लग्न जमवत आहेत." गौरव म्हणाला.

न कळल्यासारखे सोंग करत दीपा म्हणाली, मग काय झालं ?"

"अगं दीपा , राधिका माझ्यावर प्रेम करतेय. तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या घरचे दुसऱ्या मुलाशी लग्न लावत आहेत." गौरव म्हणाला.

" ओह स्वारी ! असे का करतायेत पण ते ?" दीपा म्हणाली.

"अगं मी शिकवण्या घेऊन पोट भरतोय. तर मी काय सुखात ठेवीन राधिकाला ? असं वाटतंय तिच्या घरच्यांना. पण दीपा माझं खुप प्रेम आहे राधिकावर आणि तिचंही माझ्यावर." गौरव म्हणाला.

"राधिका म्हणजे कोण रे ?" दीपा म्हणाली.

" ते रत्नाकर आबा त्यांची मुलगी. ते बघ तिथे उभारलेले.  बहुतेक ते तुलाच भेटायला येत आहेत." गौरव म्हणाला.

" येऊ देत. बघ दीपा कशी तुझ्या आणि राधिकाच्या लग्नाला त्यांना हो म्हणायला लावते ते." मॅडम म्हणाल्या.

दीपा मॅडम कडे आश्चर्याने पाहत होती. मॅडम हसून म्हणाल्या , "अगं वकील होऊन जज झालीय ना तू , मग मांड तुझ्या अशिलाची बाजू ."

"हो दीपा , तुला मांडावीच लागेल माझी बाजू. गौरव म्हणाला. हसून दीपाही " हो " म्हणाली. 

राधिकाचे बाबाही आता दीपाच्या समोर येऊन उभे राहिले होते.  आणि दीपाला म्हणाले , " दीपा नशीबवान आहेस पोरी. अगं इतक्या मोठ्या पदावर पोहचणं लय अवघड असतं बघ." 

दीपा म्हणाली , "तुम्ही आता मी जे बोलले ते ऐकले का ?"

"होय, होय. सगळं ऐकलं." राधिका चे बाबा म्हणाले.

"नाही म्हणजे मी ह्या पदावर कुणामुळे पोहोचू शकले ? हे पण ऐकले असेल." दीपा म्हणाली. 

"अगं संतोषनं तुला साथ दिली , म्हणून तू ह्या पदावर पोहोचलीस ऐकलं की मी सगळं." राधिका चे बाबा म्हणाले.

" संतोष किती शिकलेला आहे माहित आहे का तुम्हाला ?" दीपा म्हणाली.

"नाही." राधिका चे बाबा म्हणाले.

"निश्चितच माझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे. हे तर तुम्हाला मान्य असेल ? पण त्याने माझ्यासाठी हे सगळं का केलं ?" दीपा म्हणाली.

"हे काय विचारणं झालं का ! बायकोवर असलेल्या प्रेमामुळे." राधिका चे बाबा म्हणाले.

"म्हणजे नात्यात प्रेम असेल तरच नातं बहरत. हे तुम्हालाही मान्य आहे तर. आणि हा प्रेमाचा पाया भक्कम असेल तर  जीवनात कुठलीही गोष्ट मिळवणं अशक्य नसतं. जीवनातील कितीतरी कठीण प्रसंगात , सुखदुःखात हे प्रेम नवरा बायकोच्या नात्याचा आधार बनतं." दीपा म्हणाली.

"अगदी खरं बोललीस बघ दीपा." राधिका चे बाबा म्हणाले.

"मग माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही खरं प्रेम करणाऱ्यांना वेगळं करू नका. राधिकाच आणि गौरवच एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांच्या प्रेमाच्या ताकतीने ते आर्थिक दृष्ट्याही संपन्न होतील. " दीपा म्हणाली.

राधिकाच्या बाबांना आपली चूक समजली. बाबांनी गौरवला जवळ बोलावलं. आणि राधिकाचे बाबा गौरवला म्हणाले ," मी जे काही बोललो त्याबद्दल माफी मागतो. उद्याच भाकरी टेकायला तुमच्या घरी येतो बघा." सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकत होतं.

"पोरी तुझे पण खूप उपकार झाले बघ. तुझ्यामुळंच आज माझे डोळे उघडले. संसार दोघांना करायचा असतो आणि त्यात महत्वाचं असत ते प्रेम,  पण मी मात्र प्रेम सोडून सगळं बघत होतो." राधिकाचे बाबा हसत हसत म्हणाले.

दीपाच्या सासूबाई मनापासून दीपाचं कौतुक करत म्हणाल्या , " मला तर साक्षात देवी दिसते बघ दीपा तुझ्यात."

"होय विहीणबाई खरंय. माझी दीपा लक्ष्मी , दुर्गा आणि सरस्वती अशी देवीची नऊ रुपं घेऊन जन्माला आली आहे बघा." दीपाची आई म्हणाली.

" चला चला निघूया. सासूबाई आम्ही आजच निघणार आहोत. संतोषच्या आणि जोशना ताईंच्या ही दवाखान्यात जावं लागेल." दीपा म्हणाली.

सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण संतोष आणि जोशनावर उपचार करणं ही तितकंच महत्त्वाचं होतं.

"बरं, बरं." म्हणत दीपाचे सासरे शार्दुलला कडेवर घेऊन घराकडे निघाले.

सर्वजण गाडीत बसून घराकडे निघाले.

संघर्षाचा टप्पा पार करून अखेर दीपाला सुखाची चाहूल लागलीच ….

क्रमशः पुढील भागात

सौ. प्राजक्ता पाटील

कथा आवडल्यास लाईक करा , कमेंट करा आणि नावासकट शेअर करा आणि हो मला फॉलो करायला विसरू नका.

कथा मनापासून वाचणाऱ्या सर्व वाचक वर्गाचे आभार. कथा प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. 

#साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.














🎭 Series Post

View all