तिचा संघर्ष भाग-43

Every Woman Wants Love, Respect And Support.

भाग-43



"राकेश, आज खरंच मी खूप आनंदी आहे रे. मी सगळं मिळवलं होतं, पण माझी सासरची माणसं फार दुरावली होती. आज ती ही मिळाली आणि तु ही जोशनाचा स्वीकार करेन म्हणालास म्हणून आज मला खरंच खूप काही मिळालं असं वाटतंय." दीपा म्हणाली.

"दीपा ताई, आता तुझ्या सासरची माणसं कधीच दूरावू नयेत हीच ईश्वराकडे प्रार्थना असेल." राकेश म्हणाला.

"व्हय गं दीपा, आम्हाला आमची रागिणी आणि तु कधी वेगळ्या वाटलाच नाहीत बघ, लहानपणापासूनची तुमची मैत्री बघत आलोय ग आम्ही. अन् तुझ्यासारख्या पोरीला संतोष च्या घरच्यांनी त्रास दिला हे कळलं तेव्हा काळीज लय तुटलं बघ. तुझा संसार मोडण्यासाठी राकेशचा त्या जोशनाने वापर केला म्हणल्यावर तर आम्ही तिला त्रास होईल असच वागलो पण जवा तु म्हणालीस की समोरच्या सारखच वागल्यावर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला ते मला बी मनातून पटलंय बघ. आता नाही गं ह्याच्या पुढं आम्ही तिला त्रास होईल अस वागणार हा आमचा शब्द असेल बघ. पण दीपा, लवकरात लवकर बरी होईल ना ग जोशना ?" अश्रूंनी भरलेल्या नयनांनी राकेशची आई दीपाला म्हणाली.

"हो काकू, तुम्ही काही काळजी करू नका. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे बघा. नक्कीच जोशना ताई ठीक होतील. पण मी तुम्हाला विनंती करू?" दीपा म्हणाली.

"हो ग पोरी, बोल की." राकेशची आई म्हणाली.

"तुम्ही या जोशना ताईच्या मुलीला माझ्यासोबत शहरात पाठवाल का? रोज नाही जमले तरी सुट्टीच्या दिवशी मी तिला जोशना ताईकडे घेऊन जाईन आणि हिला पाहिल्यावर जोशना ताईंच्या प्रकृतीत ही लवकरच सुधारणा होईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर हिला माझ्यासोबत नेण्यासाठी तुम्ही परवानगी द्याल ना ? एवढंच विचारायचं होतं." दीपा म्हणाली.

"आमची परवानगी आहे. व्हय ना रे राकेश ?" राकेशची आई म्हणाली.

"दीपा ताई, मी आलो तर चालेल का ग शहरात राहायला? सध्या माझाही धंदा म्हणावा तसा होत नाही. मी काहीही काम करेल आणि जोशनालाही बरं करण्यासाठी प्रयत्न करेल. म्हणजे मी केलेल्या पापांचं प्रायश्चित्त करता येईल." राकेश म्हणाला. 

"ठरलं तर मग. संतोषशी बोलून मी ठरवते, आपण कधी शहरात जाऊया ते." दीपा म्हणाली.

दीपा जोशना च्या मुलीला घेऊन मॅडम सोबत गाडीत बसली. चिमुकलीच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहत होता. दीपाही खूप खुश होती. सगळं काही सुरळीत होईल अशी दीपाला खात्री होती. गाडीत बसल्यावर ही दीपा जोशनाच्या उपचारांविषयी विचार करत होती. गाडी दीपाच्या सासरच्या अंगणात येऊन थांबली. दीपा त्या चिमुकली सोबत अंगणात उभी होती. अंगणातच संतोष शार्दुल सोबत गप्पा मारत होता. शार्दुल आपल्या बाबा बरोबर गप्पा मारताना पाहून दीपाला खूप आनंद झाला होता. जोशनाच्या मुलीला दीपाच्या सासूबाईनी प्रेमाने मिठी मारली. तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला खूप गोड पापी दिल्या. त्यांना त्या मुलीत जणू जोशनाची बालपणीची छबी दिसत होती. दीपाने संतोष जवळ जोशनाच्या मुलीला नेले. संतोषनेही मुलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. दीपा अजून ही दारातच उभी होती.

"आई ही कोण?" शार्दुलने कुतुहलाने विचारले.

"ही तुझी नवीन मैत्रीण. तुझ्या जोशना आत्याची मुलगी." दीपा म्हणाली.

"फ्रेंड्स." म्हणून शार्दुल ने हात पुढे केला. पण ती निरागस चिमुकली दीपाच्या मागे उभी राहून हळूच शार्दुलकडे पाहत होती.

"आई, आता हिला काय झालं लपायला ?" शार्दुल म्हणाला.

दीपाने हळूच जोशना च्या मुलीचा हात शार्दुलच्या हातावरती ठेवला आणि दीपा म्हणाली," नाऊ यु आर फ्रेंड्स." पण त्या चिमुकलीच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह पाहून दीपा म्हणाली, "अग तू आता आमच्या सोबत शहरात येणार आहेस ना. मग तिथे तुझ्या सोबत गप्पा मारायला कुणीतरी हवे , मग तुला शार्दुलशी मैत्री करायला आवडेल ना ?"

त्या चिमुकलीने होकारार्थी मान हलवली. " ये आई, पण हिचं नाव काय आहे?" शार्दुल म्हणाला. "अरे बापरे ! गप्पांच्या ओघात तुझं नाव विचारायचं राहूनच गेले. काय नाव आहे तुझं ?" दीपा त्या चिमुकलीला प्रेमाने म्हणाली.

अबोल असलेली ती चिमुकली काय नाव सांगते, म्हणून सगळे जण कान देऊन ऐकत होते. "रिंकी." ती चिमुकली म्हणाली. तसे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

"दारात का उभी दीपा ? ये ना आत मध्ये." दीपा च्या सासुबाई दीपाला म्हणाल्या. आबा गावातल्या त्यांच्या मित्रांना भेटायला गेले होते. दीपाच्या सासुबाईंनी आणि आईने जेवणाची तयारी करून ठेवली होती. दीपाला आणि मॅडम ला त्या जेवण्यासाठी आग्रह करत होत्या. आबांना गावच्या सरपंचानी जेवायला त्यांच्या घरी नेले म्हणून आबांचा दीपाला फोन आल्यावर आबांची वाट न बघता सगळेजण जेवायला बसले. दीपाने आज समाधानाचे दोन घास का असेना सासरी अगदी आग्रहाने खाल्ले होते. आणि सगळ्यांच्या चेहर्‍यावरील समाधान पाहून दीपाचे पोट न जेवताच भरले होते. दीपा संतोष ला आपल्या हाताने जेवण भरवत होती. तेव्हा संतोष दीपाला म्हणाला, "अगं दीपा, माझा पाय मोडला आहे. हात अगदी शाबूत आहे. खाईन मी हाताने."

"अरे माहित आहे मलाही. पण बायको प्रेमाने भरवताना नाही,नको म्हणायचं नसतं. खा पटपट. आणि हो आपण तुझा पाय लवकर बरा होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आणि मला खात्री आहे तुझा पाय लवकर बरा होईल आणि तु स्वतःच्या पायावर उभा राहशील." दीपा आत्मविश्वासाने म्हणाली.

दीपाचे आणि संतोषचे एकमेकांवर असलेले नितांत प्रेम त्यांच्या डोळ्यातून व्यक्त होत होते. शार्दुल ही आई बाबा दोघांना एकत्र पाहून खूप खुश होता. सगळ्या मित्रासारखे त्यालाही बाबा आहेत ही गोष्ट त्याला खूप आनंद देत होती.

बाबांनी शार्दुल ला आपल्या हाताने एक घास भरवला. तेव्हा दिपाने नजरेनेच रिंकीलाही घास भरव म्हणून संतोषला खुणावले. संतोषनेही रिंकी ला जवळ घेत प्रेमाने घास भरवला. सासूबाई दुरून हे सर्व पाहत होत्या. दीपा च्या समजूतदारपणाचे कौतुक त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रूतून व्यक्त होत होते. घरातील जगदंबेच्या मूर्तीला हात जोडून दीपाच्या सासुबाई केलेल्या वाईट गोष्टींबद्दल मनातून माफी मागत होत्या. आणि दीपासारखी समजूतदार सून दिली म्हणून देवी आईचे आभार ही मानत होत्या. दीपाने दोनच दिवसांची रजा काढली होती. तेव्हा या दोन दिवसांत दीपाला सर्व काम करायची होती. दीपा संतोषला  म्हणाली," राकेश ही शहरात यायचं म्हणतोय. त्याचा व्यवसाय इथे व्यवस्थित चालत नाही. मग शहरात येऊन तो काहीही काम करायला तयार आहे. घेऊन जायचं का त्याला आपल्यासोबत आणि जोशना ताईही आपल्या माणसांना पाहिल्यावर लवकर बऱ्या होतील असं मला वाटतं."

"पण जोशनाला राकेशला पाहून जास्त त्रास होऊ नये; असं मला वाटतं." संतोष म्हणाला.

"नाही होणार." राकेश उंबऱ्यात उभा राहून संतोषला म्हणाला.

"अरे राकेश तू , ये ना आत ये." संतोष म्हणाला.

"ते आपल्याला तिथे गेल्यावरच कळेल. आणि राकेश, जोशना ताई ला तुझ्यामुळे त्रास झालाच तर तुला त्यांच्यापासून दूरही राहावे लागेल हेही लक्षात असू दे. या सगळ्यात तुझा संयम फार महत्त्वाचा आहे." दीपा म्हणाली.

"हो दीपाताई, तुला काय म्हणायचे ते आले माझ्या लक्षात." राकेश म्हणाला.

तेवढ्यात आबा गावच्या सरपंचांना घेऊन आत आले होते. सरपंचांनी संतोषला आणि राकेश ला राम राम केला. दिपाने आबांना आणि सरपंचांना बसायला खुर्ची दिली. सरपंचांनी मॅडमला बाहेर बोलावून घेतलं. मॅडमही बाहेर येऊन बसल्या होत्या. तेव्हा सरपंच म्हणाले, "मॅडम, आत्तापर्यंत तुम्ही गावातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना खूप मदत केलीय. पण आज आमच्या गावातली मुलगी  न्यायाधीश झाली. त्यात सगळ्यात मोलाचा वाटा तुमचा होता हे आम्हाला आबांकडून कळालं. गावाच्या प्रतिष्ठेत भर पडली बघा. सगळ्या गावाला तुमचा आणि दीपाचा अभिमान वाटतोय. आणि त्यामुळेच उद्या आम्ही तुमचा आणि दीपाचा गावात सत्कार समारंभ आयोजित केला आहे. तेव्हा नाही म्हणू नका आणि हा सत्कार स्वीकारा. तुमच्या चार मार्गदर्शनपर शब्दाने गावातल्या मुलींनाही प्रेरणा मिळू द्या." सरपंच हात जोडून म्हणाले.

मॅडम म्हणाल्या, "आहो दीपाच्या यशात माझा काहीच वाटा नाही. दीपाने स्वतः कष्ट करून यश मिळविले आहे. तेव्हा तुम्ही तिचा सत्कार करा. तिचा म्हणजेच माझा सत्कार असेल."

"मॅडम, "गुरु तसा चेला" असं का म्हणतात ? तर गुरु जसा असेल तसा त्यांचा शिष्य बनण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या समोर आदर्श असेल तरच एखादी व्यक्ती आदर्श बनू शकते. आणि माझा आदर्श तुम्ही आहात." दीपा म्हणाली.

उद्या दीपा आणि मॅडमचा सत्कार सोहळा थाटात कसा पार पडतो. पाहूया पुढील भागात क्रमशः

सौ. प्राजक्ता पाटील 

कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा आणि हो मला फॉलो करायला विसरू नका. 

#कथा प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखीकेकडे राखीव.

#साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.

आवर्जून कथा वाचणाऱ्या सर्व वाचकवर्गाचे खूप खूप आभार.

18/2/2022.








🎭 Series Post

View all