तिचा संघर्ष भाग-40

Every Woman Wants Love, Respect And Support.

भाग - 40



"अवो, ही कागद बघून आम्ही बरोबर पत्त्यावर आलोय का, ते सांगा तेवढं . अन् आम्हाला आत मध्ये पण सोडा की. जज बाईंना भेटायला लय लांबून आलोय बघा आम्ही. " एक महिला दीपाच्या शासकीय निवासस्थाना बाहेर थांबलेल्या वॉचमनला विनंती करत होती. पण त्या बाईचा अवतार पाहून वॉचमन ने काही तिला आत सोडले नाही. 

" हे बघा तुम्हाला हा पत्ता कोणी दिला ? हे एका न्यायाधीश मॅडम चे निवासस्थान आहे . त्यांना असं अपॉइंटमेंट शिवाय कोणीही उठून भेटायला येऊ शकत नाही. तेव्हा मला माफ करा . मी तुम्हाला आत जाण्याची परवानगी देऊ शकत नाही." वॉचमन विनम्रपणे म्हणाला.

"तसं नका म्हणू हो साहेब, आम्ही लय गरीब माणसं आहोत बघा . माझ्या सोन्यासारख्या पोरीला तिच्या सासरच्यांनी लय छळलंय वो. अगदी आमचं घर धुवून आम्ही हुंडा दिला पण त्या लालची लोकांचं पोट नाही भरलं. एक लेकरू आहे माझ्या पोरीच्या पदरात अन् आता तिचा नवरा दुसरं लग्न करायला निघालाय. लय वाईट दशा झालीय हो माझ्या पोरीची." अस हात जोडून म्हणत असताना त्या महिलेला रडू अनावर झाले आणि ती रडू लागली.

गेटवर एक महिला वॉचमन समोर हात जोडून विनंती करतेय हे मॅडम ना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात धुसर दिसले. मॅडम नी वॉचमन ला कॉल केला. 

तेव्हा वॉचमन म्हणाला, " मॅडम, बाहेर आलेल्या ह्या महिला न्यायाधीश मॅडमला भेटायच म्हणत आहेत. त्यांनी मॅडम ची अपॉइंटमेंट घेतलेली नाही. आणि आता मॅडम ही घरी नाहीत, त्यामुळे त्यांना आत जाता येणार नाही आणि मॅडमला भेटता ही येणार नाही हेच मी त्यांना समजावून सांगत होतो. पण त्यांच्या मुली चा सासरी प्रचंड छळ झालेला आहे आणि आता तिचा नवरा दुसरे लग्न करतो आहे म्हणून त्या खूप रडत आहेत मॅडम."

"ओके, वेट. मी येऊन पाहते. काय झालंय ते." महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या मॅडमला त्या महिलेच्या अश्रूंनी आणि दीपाच्या भूतकाळाशी साधर्म्य असणाऱ्या वाक्यांनी बाहेर येण्यास भाग पाडलं. फोन ठेवून मॅडम तडक बाहेर आल्या.

"मॅडमनी काय झालेय ?" हे विचारताच त्या महिलेने मॅडमचे चक्क पाय पकडले. 

आणि ती महिला मॅडम ला म्हणाली ," न्यायाधीश मॅडम, तुम्हाला माझ्या लेकीला न्याय द्यावाच लागेल ?"

"मी माझ्या आयुष्यात कुठल्याच महिलेवर अन्याय होऊ दिला नाही. त्यामुळे मी तुमच्या मुलीला न्याय मिळवून देईन हे ठिक आहे, पण तुमचा गैरसमज झालाय मी न्यायाधीश नसून माझी मुलगी न्यायाधीश आहे. या ना, आत या. आपण माझी मुलगी येईपर्यंत वाट पाहू." असं म्हणून मॅडम त्या दोघांनाही आत घेऊन गेल्या.

मॅडम नी मावशीला पाणी घेऊन यायला सांगितलं. त्यांना चहा पाणी दिल्यानंतर थोड्यावेळात शार्दुल मॅडम जवळ येऊन बसला आणि मॅडमला म्हणाला, "आजी, हे आपल्याकडे गेस्ट आलेत का ?"

"हो बाळा." मॅडम म्हणाल्या.

शार्दुल पटकन उठून गेस्ट आलेल्या त्या दोघांच्या पाया पडला. 

" नको रे, नको बाबा. आमच्या गरीबाच्या पाया पडू." म्हणून त्या महिलेने शार्दुल च्या गालावरून हात फिरवला.

शार्दुल ने ते खरबडीत हात हातात घेऊन उलट त्यांनाच प्रश्न विचारला," तुम्ही शेतात काम करता का ?"

"होय रे बाळा. तुला कसं कळलं ?" त्या महिला म्हणाल्या.

"कारण माझ्या दुसऱ्या आजी-आजोबांचेही हात असेच खरबडीत आहेत. आणि तेही शेतात काम काम करायचे मग माझी आई म्हणते, त्यांचेच हात खरबडीत असतात जे प्रामाणिक कष्ट करून सगळ्यांचे पोट भरतात. म्हणून या जगात त्यांच्या पेक्षा श्रीमंत कोणीच नसतो. मग तुम्हीही गरीब नाहीत हे लक्षात ठेवा." छोट्याशा शार्दुल च्या वाक्याने त्या महिलेला क्षणभर तरी दुःखाचा भार हलका झाल्यासारखे वाटले.

"शार्दुल ये, इथे बैस." मॅडम शार्दुल ला म्हणाल्या.

"हो." म्हणून शार्दुल मॅडम जवळ येऊन बसला. 

"किती वळण लावलय हो पोराला. आई-बाप नशीबवान असल्यावर अशी लेकरं पोटी जन्माला येतात बघा." ती महिला शार्दुल चं तोंडभरून कौतुक करत होती.

मॅडम नी तिला तिथंच थांबवलं आणि मॅडम पुढे म्हणाल्या, "चुकीचं बोलताय तुम्ही. त्याच्या आईनं स्वतःच नशीब स्वतः बदललंय हो, तिच्या अथक प्रयत्नाने. आणि मुलावर संस्कार म्हणाल तर तेही तिने एकटीनेच केले आहेत बरं का! "

तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि परत मावशी दार उघडायला गेल्या. दीपा चे आई आणि आबा शेजारीच असलेल्या मंदिरात दर्शन घ्यायला गेले होते. ते घरात आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले. मॅडमना त्या दोघांना काय झाले हे कळत नव्हते.

" कशाला आलाव वो पुन्हा माझ्या लेकीचे आयुष्यात ?" म्हणून दीपाच्या आईचे डोळे अश्रुंनी डबडबले होते.

"म्हणजे ?" मॅडम म्हणाल्या.

"होय मॅडम, या दीपाच्या सासुबाई आणि हे संतोष चे मामा हाईत." आबा मॅडमला म्हणाले. 

"दीपा यायच्या आत तुम्ही इथून निघून जावा बरं. किती मोठी चूक केली मी. तुम्हाला घरात बोलवून." मॅडम च्या डोळ्यातूनही अश्रू ओघळू लागले. 

तेवढ्यात पुन्हा दरवाजाची बेल वाजली. दरवाजा उघडताच दीपा हॉलमध्ये आली. संतोष च्या मामाला आणि तिच्या सासूबाई ला पाहून दीपाच्या पायाखालची जमीनच सरकली.

"का आलात तुम्ही इथे ?" दीपा चा आवाज चांगलाच वाढला होता.

"दीपा, आम्ही खरंच तुला भेटायला नाही आलो गं, अन् कधी तुझ्या आयुष्यात परत येणार बी नाही. देवानं आम्हांला लय मोठी शिक्षा दिलीय बघ तुझ्याबरोबर चुकीचं वागल्याची. आम्हाला ह्या मॅडमच्या न्यायाधीश लेकीला भेटायचंय." दीपाच्या सासूची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती.

"मला म्हणत होता ना, मी नाटकं करते म्हणून. मग आता खरी नाटकं तुम्ही करत आहात. भेटायला तर मलाच आलात आणि वर मला भेटायला आला नाहीत हे मला सांगताय." दीपा रागा रागाने म्हणाली. 

"अहो मॅडम, तुम्ही तरी सांगा ना तुम्हीच मगाशी म्हणाला होतात की माझी मुलगी न्यायाधीश आहे म्हणून. मग मी दीपाला कशी भेटायला आले?" दीपा ची सासू म्हणाली.

"हो, ही माझी मुलगी दीपा. जी न्यायाधीश म्हणून न्यायदान करते. पण नात्यांची किंमत तुम्हाला नाही कळायची." मॅडम म्हणाल्या.

"मॅडम, असं बोलू नका हो. दीपा गेली आणि आमच्या घरची लक्ष्मीच निघून गेली बघा. होत्याचं नव्हतं होऊन बसलयं सगळं. नात्यांची काय, दीपाला जाणून बुजून दिलेल्या प्रत्येक त्रासाची किंमत कळून चुकली हो आम्हाला." दीपा ची सासू रडत रडत बोलत होती. 

छोट्या शार्दुल ने मोठ्यांच्या संभाषणावरून बरोबर अंदाज लावत निष्कर्ष काढला होता. तो मॅडमला म्हणाला, "मॅडम आजी प्रिन्सेस च्या स्टोरी मधले माझ्या प्रिन्सेस आईला त्रास देणारे बॅड पिपल हेच ना. उगाच बोललो मी मगाशी यांच्याशी."

"शार्दुल, मोठ्यांच्या मध्ये बोलणे बॅड हॅबिट असते ना. मग  तू जा बरं आत मध्ये." दीपा शार्दुल ला म्हणाली.

"सॉरी." म्हणून शार्दुल आत गेला.

"अहो संतोष तरी निदान चांगला असेल असं वाटलं होतं, पण नाही तोही अगदी तुमच्या सगळ्या सारखाच निघाला. जोशना चं लग्न झालं की कायमचा दीपा आणि त्यांच्या प्रेमाची निशाणी असलेल्या बाळासोबत शहरात राहायला येतो असा म्हणाला होता. या दोघांची ती भेट एक सोहळा व्हावा म्हणून मी दीपा च ढोवळ जेवण किती थाटात करायचं ठरवलं होतं. सगळी तयारी झाली होती. पण संतोष आलाच नाही पण आवर्जून त्याने दीपाला घटस्फोटाची नोटीस पाठवली. आपल्या बायकोच्या पोटात वाढणारा आपला अंश, त्याचीही संतोषला कसलीच काळजी वाटली नाही. काय कमी होतं दीपा मध्ये, की त्याला दुसरे लग्न करण्याची इतकी घाई झाली होती." मॅडम कसलीही पर्वा न बाळगता बोलत होत्या.

"आता तुम्ही सगळे खुश असाल ना, संतोषचे दुसरे लग्न करून. तुम्ही आता गेलात तरी चालेल आणि पुन्हा कधीच माझ्या आयुष्यात येऊ नका." दीपा म्हणाली.

"दीपा, 'आपण जे करतोय ते इथच फेडावं लागतंय' हे आता मला कळून चुकलंय. मी, आमच्या घरातले सगळे तुझ्याशी जरी चुकीचं वागलो असलो तरी माझा संतोष कधीच तुझ्याशी चुकीचा वागला नाही.  हे कायम लक्षात ठेव. अगं माझ्या लेकानं, तो कधीच बाप होऊ शकत नाही अन् त्यामुळंच तो दुसरं लग्न करणार नाही असं मला खोटं सांगितलं. जे आता मला उलगडलय की, त्याचं तुझ्या पोटातल्या बाळावर, तुझ्यावर लय प्रेम होतं गं. आज मी इथं आले होते ते माझ्या जोशना चं गाऱ्हाणं मांडायला पण आता कोणत्या तोंडाने तुला माझ्या लेकीला न्याय दे असं म्हणू ? जिच्यावर मी माफ न करण्यासारखा अन्याय केलाय. माझा संतोष त्यादिवशी तुला का भेटायला आला नाही, याचं खरं कारण तुला घरी येऊन संतोषला भेटल्यावरच कळंल. तु आज बी त्याच्या वर प्रेम करत असशील तर ये. यापुढं आम्ही तुझ्या आयुष्यात कधीच फिरकणार नाहीत." दीपाच्या सासूबाई दीपाची हात जोडून माफी मागत होत्या.

दीपा जाईल का संतोष ला भेटायला ? का बंद केलेली भूतकाळातील कटू आठवणीची पाने बंदच राहिलेली बरी ? तुमचा अभिप्राय नोंदवायला विसरू नका.


सौ.प्राजक्ता पाटील 

कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा.

कथा प्रकाशनाचे सर्वाधिकार लेखीकेकडे राखीव.

#साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.

कथा वाचणाऱ्या सर्व वाचक वर्गाचे मनापासून आभार.










🎭 Series Post

View all