तिचा संघर्ष भाग-38

Every Woman Wants Love, Respect And Support.

भाग- 38


"संतोष मी कनाय, जरा मावशीकडं जायचं म्हणतेय." आई म्हणाली. 

"जाण्याबद्दल कुठे काय आहे माझं, पण तु आत्ताच तिच्याकडं पैसे मागायला जात असशील तर इतक्यात जाऊ नको एवढंच म्हणायचं आहे मला. बघू आधी आपल्या साठवणुकीत किती आहेत ते. जे आपण जोशना च्या लग्नासाठी बँकेत ठेवले होते." संतोष अगदी सरळ विचार करणारा असल्यामुळे तो मनात कसलाही गुंता न ठेवता स्पष्टपणे म्हणाला.

'संतोष मला माफ कर रं पोरा. कुठल्या जन्मीचं पाप देव माझ्याकडून धुऊन घेयलाय की बघ. पण मी दुसऱ्याच कामासाठी मावशीकडे चाललेय बघ, जे तुला नाही सांगू शकत.' आई मनातून संतोषीची माफी मागत होती.

"नाही आताच जावं लागंल मला. जया आणि मी दोघी बी जाणार आहोत. अन् मामी दोन दिवस देते मनलीय डबा.  हा, पण डबा आणायला तुला जावं लागलं बघ . मामाच्या मागं कामं हायती मनलाय मामा." आई संतोषला म्हणाली. 

"नाय म्हणजे मामाला कामं जरी नसती तरी मीच आणला असता डबा. एकतर डबा बी द्या, अन् परत घरी आणून द्या. असला रूबाब मला नाही आवडत." संतोष आईला म्हणाला. 

'किती गुणाचं आहे माझं पोर. अगदी नाकाच्या रेषेत सरळ चालणारं. पोरगं असून कधी कोणाचं वाईट म्हणून नाही घेतलं माझ्या संतोषनं अन् ह्या पोरीनं मात्र कुठं तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. अजून कुणाला माहित नाही की जोशनाला दिवस गेलेत पण ही काय लपवून ठेवण्यासारखी गोष्ट थोडीच आहे.काय होईल पुढं ?' आई मनात विचार करत घाम पदराने टिपत होती.

"आई, तू नेमकं कशाचं टेन्शन घेतलयं मला तर काय कळना झालंय बघ. घाम बघ किती आलाय तुला. आताच निघणार आहेत का तुम्ही. चल मग, रानात जाता जाता सोडतो मी तुम्हाला. " संतोष काळजीने म्हणाला.

भाकरी बांधून आई आणि जोशना निघाल्या. त्या दोघींना एसटीत बसवून संतोष रानात निघून गेला. आई जोशनाच्या मावशीच्या घरी गेल्यावर बहिणीच्या गळ्यात पडून खूप रडली. 

"काय झालंय ताई तुला रडायला ? कुठं लय लांब चाललीय आपली जोशना नांदायला, गावात तर हाय म्हण की तिचं सासर. उगाच रडू नको बरं तू .चल मी ताटं वाढून घेते जेवण करून घेऊ." जोशना ची मावशी जोशना च्या आईला म्हणाली.

जेवण केल्यावर जोशना ची आई ची सतत आपल्याच विचारात आहे, ही गोष्ट जोशना च्या मावशीच्या लक्षात आली. ती बहिणीला म्हणाली, " ताई मी आल्यापासून बघतेय तुझ्या चेहऱ्यावर जोशना च्या लग्नाचा काहीच आनंद दिसत नाही. माणसं चांगली नाहीती का ?"

"काहीच चांगलं नाही गं. माणसं ना पोरगं." आई रडत रडत म्हणाली.

" मग कशाला घाई करताव ? अन् अजून काय तिच वय बी नाही झालं लग्नाचं." मावशी म्हणाली.

घडलेली सर्व हकिकत जोशनाच्या आईने बहिणी समोर मांडली. जोशनाच्या मावशीने ही कपाळाला हात लावला.

"काय केलंस गं जोशना हे." मावशी रडत रडत म्हणाली.

"अगं ही तर काहीच नाही, एवढा मोठा हुंडा घेतलाय अन् वर आमची सगळी जमीन बी नवरदेवाच्या नावावर करायची हाय म्हणून अडून बसलाय नवरदेव. जोशनाला दिवस गेलेत हे फक्त तुलाच सांगितलंय, संतोष ला यातलं काय बी माहित नाही. हे जर त्याला कळलं तर जोशना सोबत त्यो मला बी बोलायला कमी करणार नाही. त्या दीपाला घरातून बाहेर काढायला हे सगळं केलं अन् नवरदेवाच्या मागण्या पुरवता पुरवता एक दिवस आम्हालाच घरातून बाहेर जावं लागतंय की काय असं वाटायला लागलंय बघ." आई नाराजीच्या स्वरात म्हणाली.

"आता बाई किती अवघड हून बसलंय ग सगळं. आता पुढं काय करायच ठरवलंय मग तू." मावशी चिंताग्रस्त होऊन म्हणाली.

" मी जमिनीची कागदं घेऊन आलेय. त्या राकेश ला हितं बोलवून वकिलाकडून त्याच्या नावावर जमीन करायची, पण जोशना च्या गळ्यात हार घातल्यावर कागद त्याच्या हातात द्यायचं असं ठरवलंय मी." आई म्हणाली.

" बरं बाई, तू म्हणती तसं करू. संध्याकाळी अजय चे बाबा आले की त्यांना विचारून वकील ठरवू. होईल सगळं नीट नको काळजी करू." मावशी म्हणाली.

दुसर्‍या दिवशी वकील शोधून, राकेशला बोलवून जोशनाच्या आईने  स्वतःच्या नावावरची जमीन राकेश च्या नावावर केली. अन् त्याला आपली अट बी सांगितली. तीन महिन्यांत तारीख काढायचंही राकेश कडून कबूल करून घेतलं. आई आणि जोशना पुन्हा गावी परतल्या. संतोष ला मात्र आईचं कायतरी बिनसलयं हे चांगलं लक्षात आलं होतं. पण जोशना नांदायला जाणार यामुळं असंल आई नाराज असा संतोष ने विचार केला.

"आई लग्नाची तारीख बी काढावी आणि हुंडा बी त्याच दिवशी द्यावा बघ." संतोष म्हणाला.

"बरं ." म्हणून आई आत गेली, पण आईच्या चेहऱ्यावर जराही उत्साह दिसत नव्हता. पाहुणे बघायला येणार म्हटल्यावर एवढी उत्साही असणारी आई अचानक इतकी नाराज बघून संतोषच्या मनात प्रश्नाचं काहूर माजलं होतं.

जोशना च्या लग्नाची तारीख फिक्स झाली हे सांगायला संतोष ने मॅडम ना फोन केला तेव्हाच त्याला मॅडम म्हणाल्या, "लग्न झाल्यावर लगेच येशील ना दीपाला भेटायला?"

"हो मॅडम, दुसऱ्या दिवशी लगेच निघेन." संतोष आनंदाने म्हणाला.

"अरे व्वा ! मी ही मग इकडे तुमच्या इतक्या दिवसानंतर च्या भेटीचे ग्रॅन्ड सेलिब्रेशन करेन." मॅडम उत्साहाने म्हणाल्या.

"दीपा माझ्यासोबत असेल याहून ग्रॅन्ड सेलिब्रेशन माझ्यासाठी दुसरे असूच शकत नाही. आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. तुमचे खुप खुप उपकार आहेत मॅडम आमच्यावर." संतोष म्हणाला.

"अरे असे उपकार वगैरे म्हणून तुम्ही मला परकं नकात रे करत जाऊ." मॅडम म्हणाल्या.

" रक्ताची नातीही करणार नाहीत इतकं केलंय तुम्ही आमच्यासाठी. परक्या कधीच नाहीत." संतोष म्हणाला.

"बरं फोन ठेवते आता. नंतर बोलू." म्हणून मॅडम नी फोन ठेवला.

तशा मॅडम त्यांच्या सासूबाई च्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या, " सासूबाई, आपल्याला एखादी पार्टी आयोजित करण्यासाठी कोणतं कारण योग्य असेल ?"

"शार्दुल येणार म्हणून आहे ना ही पार्टी. मग वेलकम पार्टी. म्हणू शकतेस ना." मॅडम च्या सासूबाई म्हणाल्या.

" नाही. शार्दुल साठी नाही, दीपा साठी आहे ही पार्टी. आणि तीही तीन महिन्यानंतर." मॅडम म्हणाल्या.

मॅडम आणि मॅडम च्या सासूबाई विचार करत होत्या तितक्यात सासूबाई म्हणाल्या , "अगं तीन महिन्यांनी तर दीपाला सातवा महिना सुरू होईल मग तिच्या बेबीसाठी वेलकम पार्टी म्हणजेच डोहाळजेवण हा कार्यक्रम आयोजित केला तर पार्टी होईल ना."

" हो मस्त आहे ही आयडिया. दीपाचे डोहाळजेवण अगदी थाटामाटात करूया." मॅडम आनंदाने म्हणाल्या. आणि आपल्या खोलीत गेल्या.

संतोष ने किती बरं सांगितली जोशनाच्या लग्नाची तारीख? म्हणून मॅडम नी कॅलेंडर हातात घेतले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी डोहाळे जेवणासाठी चा शुभमुहूर्त मॅडम ना कॅलेंडर वर दिसला. 'अरे वा! शुभमुहूर्त ही मिळाला.' म्हणून मॅडम खूप खुश झाल्या.त्या तारखेला त्यांनी गोल करून ठेवला.

बघता बघता दीपाची सेकेंड सेमिस्टर ची परीक्षा जवळ आली होती. दीपा मन लावून अभ्यास करत होती. वर्गातील टॉप ची विद्यार्थी नी म्हणून दीपाने आपली ओळख निर्माण केली होती. दीपाला आता सातवा महिना सुरू झाला होता. संतोष च्या बहिणीचे लग्न ही दोन दिवसांवर आले होते. इकडे मॅडम नी फुलांच्या सहाय्याने संपूर्ण हॉल सजवण्या ची ऑर्डर दिली होती. धनुष्य, चंद्र सर्व डोहाळजेवणा च्या कार्यक्रमासाठी सज्ज झाले होते. आमंत्रणे ही देऊन झाली होती. जेवणाचे मेनूही ठरले होते.

दीपा मॅडम ना म्हणाली, " मॅडम, तुम्ही तयारी छान केलीत पण येणारी लोकं बाळाच्या बाबांविषयी विचारतील त्याचं काय ?" दीपाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. 

'तेच तुझ्यासाठी सरप्राईज आहे दीपा.' मॅडम मनात विचार करत होत्या.

"कोणी तुला हे विचारणार नाही. हा माझा शब्द आहे.आहे ना तुझा माझ्यावर विश्वास?" मॅडम म्हणाल्या. 

"हो मॅडम, स्वतःपेक्षाही जास्त." दीपा म्हणाली. 

"झालं तर मग, कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नको घेऊ."मॅडम म्हणाल्या. "हो" म्हणून दीपा आपल्या खोलीत गेली.

जोशनाला ही तीन महिने झाले होते. पण नाजूक कुडीची जोशना गरोदर असेल अशी किंचीत ही जाणीव कोणालाही झाली नाही. हळदीचा कार्यक्रम निर्विघ्न पणे पार पाडला. पण लग्नाच्या दिवशीच जोशनाला चक्कर आली आणि ती खाली पडली. घरात आई, मावशी आणि संतोष हे तिघेच होते. बाकी वऱ्हाड शाळेच्या मैदानावर पोहोचले होते. संतोष ने डॉक्टर ला बोलावून आणले होते. डॉक्टर ने जोशनाला दिवस गेलेत हे सांगितल्यावर मात्र संतोष चे हात पाय गळून गेले. कोणालाही ही गोष्ट कळू देऊ नका म्हणून संतोष ने डॉक्टरचे पाय धरले. आईला हे ठाऊक असून तिने मला अंधारात ठेवले म्हणून संतोष ला फार वाईट वाटले. नवरदेव नवरीला हार का घालत नाही म्हणून लोकं कुजबूज करू लागली. तेव्हा संतोष च्या आई ने जमिनीचे कागद पुढे केले.

हे बघून संतोष म्हणाला, "आई, हे कसले कागद आहेत ?

राकेश म्हणाला, "म्हणजे तुला माहीत नाही व्हय ? आता तुमची सगळी जमीन माझ्या नावावर झालीय. अन् तुला दुसऱ्याच्या शेतात कामाला जावं लागणार आहे."

राकेशनं जोशना च्या गळ्यात हार घातला. संतोषचे आणि त्याच्या आईचे डोळे आसवांनी डबडबले होते.

'किती सहन करायचं ह्या सगळ्यांच ? मी यांच्या साठी माझ्या बायको पासून दूर राहिलो. इतका खोटेपणा कसं काय करू शकतात हे लोक ? आई तुला आणि जोशनाला मी कधीच माफ नाही करू शकत.' संतोष ने मनात विचार केला.

जोशना ची पाठवणी केल्यावर संतोष घरी येऊन बॅग भरू लागला.

"अरे कुठे चाललास तू ? " आई म्हणाली.

"एवढं सगळं झाल्यावर बी मी तुला सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी असं वाटत असेल तर मला माफ कर. मी तुझ्या पासुन खुप लांब चाललो आहे." संतोष रागाने म्हणाला.

दिवे लागायच्या वेळेला गाडीवर बसून गेलेल्या संतोष च्या पाठमोऱ्या आकृती कडं पाहून आई अंगणात रडत बसली होती.

कसा असेल संतोष चा यापुढचा प्रवास ? पाहूया यापुढील भागात क्रमशः

सौ. प्राजक्ता पाटील. 

कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर कर आणि हो मला फॉलो करायला विसरू नका. 

कथा प्रकाशनाचे सर्वाधिकार लेखीकेकडे राखीव.

#साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.

कथा मनापासून वाचणाऱ्या सर्व वाचक वर्गाचे खूप खूप आभार.




🎭 Series Post

View all