तिचा संघर्ष भाग-37

Every Woman Wants Love, Respect And Support.

भाग- 37




दीपाने फोन ठेवला आणि दीपा पुन्हा सोफ्यावर जाऊन बसली. तेवढ्यात मॅडम आणि दीपा च्या आई आश्रमातून आतमध्ये आल्या होत्या. दीपाला एकटीलाच बसलेले पाहून मॅडम म्हणाल्या, "दीपा अगं टीव्ही तरी चालू करायचा होतास ना, आणि तुझ्या मोठ्या मॅडम कुठे गेल्या ? त्या नाहीत का आल्या गप्पा मारायला खाली?"

"अगं मी देवघरात आहे. गणपती स्तोत्र वाचत होते. आणि हो मोठ्याने वाचले बरं. जेणेकरून दीपा आणि तिच्या बाळाला ही ऐकू यावे इतके मोठ्याने. हो की नाही गं दीपा ? ऐकू आले ना तुला ?" मॅडमच्या सासुबाई हसत हसत म्हणाल्या.

"हो मॅडम आणि मोठ्या मॅडम सोबत मीही गणपती स्तोत्र मनात म्हणत होते. त्यामुळे मी एकटी आहे असं मला वाटलंच नाही." दिपा म्हणाली.

"आणि हो मॅडम, तुम्हाला एक सांगायचं होतं, शार्दुल सरांनी घरच्या लँडलाईन फोनवर कॉल केलेला तुमचा मोबाईल स्विच ऑफ येत होता म्हणून."

"मग काय म्हणाला शार्दुल?" मॅडम म्हणाल्या.

"नाही,  म्हणजे तुमच्याशीच बोलतो म्हणाले." दीपा म्हणाली.

"बरं, मग लगेच जाऊन लाडक्या लेकाला फोन करावा लागेल." म्हणत म्हणत मॅडम खोलीत पोहोचल्या. स्विच ऑफ झालेला आपला फोन मॅडम नी ऑन करून शार्दुल ला कॉल केला. 

\"अगं बाई, माझ्या मोबाईल ला नेटवर्क च नाही येतंय. काय झालं असेल बरं माझ्या मोबाईल ला.\" मॅडम स्वतः शीच पुटपुटत होत्या.

मॅडम मोबाईल हातात घेऊन हॉलमध्ये आल्या आणि दीपाला म्हणाल्या, "ये दीपा, बघ ना माझ्या मोबाईल ला काय झालंय ते. अगं नेटवर्क टॉवर नाय दाखवत."

दीपाने मोबाईल हातात घेऊन पाहिले तर टॉवर दिसत होता. दीपा म्हणाली, "मॅडम दिसतोय ना टॉवर, हा बघा ."

"हो की खरंच दिसतोय अगं, तुझ्या हातात आल्यावर दिसला बघ." मोबाईल हातात घेऊन मॅडम म्हणाल्या. 

"अहो नाही मॅडम, माझ्या हातात वगैर असं काही नाही स्विच ऑन केला की लगेच नेटवर्क टॉवर नाही येत मोबाईल मध्ये." दीपा म्हणाली.

"अगं आज काय पहिल्यांदा माझा मोबाईल स्वीच ऑफ पडला की काय ? खूप वेळा पडतो अगं. तेव्हा नाही असं कधी झालं ते." मॅडम म्हणाल्या.

"तेव्हा स्विच ऑफ काढल्या काढल्या तुम्ही कोणाला कॉल ही नसेल ना केला लगेच, म्हणून तुमच्या लक्षात नसेल आले. " दीपा हसून म्हणाली.

"हो, दॅटस् द पॉईंट ! "दीपा व्हिडिओ कॉल कर बरं शार्दुल ला. गडबडीत चष्मा रूममध्येच विसरून आलेय मी." मॅडम म्हणाल्या.

दीपा शार्दुल चा नंबर व्हॉटस् अॅप मधून शोधून काढत होती तितक्यात मॅडम च्या सासुबाई मॅडम ना म्हणाल्या, "अगं, व्हिडिओ कॉल वर तुला शार्दुल ला बघायचय ना, मग दीपा फोन करतेय तोपर्यंत जाऊन घेऊन ये तुझा चष्मा."

"हो, हो" म्हणत मॅडम चष्मा आणण्यासाठी खोलीत गेल्या. तो पर्यंत शार्दुल ने कॉल रिसीव्ह केला होता. दीपाने पटकन फोन मोठ्या मॅडम च्या हातात दिला. आणि दीपा पायऱ्या चढून वर तिच्या खोलीत जात होती. पाठमोऱ्या दीपाचे ते काळेभोर, लांबसडक केस पाहून शार्दुल मोठ्या मॅडम ना म्हणाला, " जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी ऑंखों वाली ये तो बता तेरा नाम \"दीपा\" है क्या ?" लाऊडस्पीकर ऑन असल्यामुळे दीपाला शार्दुल ने गुणगुणलेले गाणे अगदी स्पष्ट ऐकू आले होते. म्हणून दीपाने मागे वळून पाहिले. आणि स्मित हास्य करून होकारार्थी मान हालवली. आणि दीपा पटपट जिना चढून वर गेली.

तेवढ्यात मॅडम तिथे आल्या आणि म्हणाल्या," अरे वाह ! हिन्दी गाण्यांची आवड आहे का अजून ? आणि आवाज ही किती गोड आहे माझ्या लेकाचा."

"अग सहज सुचलं म्हणून गायलो. बरं माझ्या गोड आई आणि आजी तुमच्यासाठी गोड बातमी आहे माझ्याकडे आणि ती म्हणजे मी लवकर भारतात परत येणार आहे." शार्दुल च्या ह्या वाक्याने आई आणि आजीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते. आजीने तर मोबाईल मध्ये दिसणाऱ्या शार्दुल च्या चेहर्‍यावरून हात फिरवत आपल्या कपाळावर बोटे मोडली. त्याचा खूप मोठा आवाज झाला आणि शार्दुल आजीला म्हणाला," खरंच आजी तुला माझी खूप माया आहे. बघ किती मोठा आवाज झालाय तुझ्या बोटांचा."

"लवकर ये, शार्दुल." आजी म्हणाली.

" हो गं आजी, येईन मी लवकर." शार्दुल म्हणाला.

शार्दुल सोबत खूप वेळ गप्पा मारल्यावर फोन ठेवून मॅडम दीपाच्या खोलीत आल्या. 


दीपा वर जाऊन आपल्या खोलीत अभ्यासाला बसली होती. मॅडम दीपाला म्हणाल्या, येऊ का दीपा आत ?" दीपा पटकन उठुन उभी राहिली आणि मॅडमना खुर्ची देऊन, "बसा न मॅडम." म्हणाली.\" 

"दीपा, तुला राग नाही न आला शार्दुल गाणं गुणगुणला म्हणून. म्हणजे तो दाखवत नसला तरी खूप हळवा आहे गं तो. कोणी दुःखी असेल तर नाही पाहवत त्याला. म्हणजे आश्रमात येणाऱ्या मुलींना बहीण समजून प्रत्येक राखी पौर्णिमेला त्यांच्याकडून राखी बांधून घ्यायचा. सगळ्या लहान मोठ्यांना त्याने लळा लावला होता." मॅडम चष्मा काढून डोळे पुसत म्हणाल्या.

"नाही मॅडम, त्यांच मन किती स्वच्छ आहे ! हे त्यांनी मला \"अभिनंदन !\" सांगितले तेव्हाच कळाले, कारण त्यांच्यासमोर मी एक साधारण मुलगी आहे पण तिचंही कौतुक करण्याचा हा गुण त्यांनी नक्कीच तुमच्याकडून घेतलाय असं मला वाटतं आणि फोनवर बोलताना तर ते अनोळखी असल्या सारखे वाटलेच नाहीत मुळी. आणि ज्या माणसाला दुसऱ्याचं मन जिंकता येतं त्या माणसापेक्षा श्रीमंत या जगात दुसरं कोणीच नसतं असं मला वाटतं. त्यामुळे मला तसं काहीच वाटलं नाही तुम्ही नका काळजी करू." दीपा मॅडम ला म्हणाली.

"आता माझा जीव भांड्यात पडला बघ. बरं तू कर अभ्यास आता मी निघते." म्हणून मॅडम निघून गेल्या.

--------------

इकडे संतोष संध्याकाळी घरी आला होता. त्याला जोशना च्या आणि आईच्या चेहऱ्यावर कसलं तरी टेन्शन दिसत होतं. 

संतोष आईला म्हणाला, " आई, काय हुंड्याचं टेन्शन आलंय का काय तुला ? लयंच टेन्शन मध्ये दिसायलीस. हुंड्याचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. जोशना चं काय आपल्याला उद्याच लग्न नाही करायचं . तेव्हा चार-पाच महिन्यात जमा होतील की माझ्याकडे पण काही पैसे. आणि आलीच काही अडचण तर मी मावशी कडून, मामाकडून घेईन उसणे पैसे अन् परत जाईन मी शहरात कायतरी कामधंदा शोधायला. अन् करीन सगळ्यांचे पैसे परत."

आईला मनापासून आनंद झाला होता कारण आईचं विचार चक्र सुरु झालं होतं. आईनं मनात विचार केला की, \" लग्न लागल्यावर संतोष शहरात जायचं म्हणतोय, तवा घेतलं राकेशनं शेत तर आपल्याला कुठं काय फरक पडणाराय ? संतोष देईल पैसे पाठवून अन् मग काय शेताची गरज नाहीच की. अन् संतोष बी बाप नाही बनू शकत म्हणल्यावर खातील जोशनाची लेकरं शेत पिकवून. आता कशाला संतोषला सांगायचं, राकेश शेत त्याच्या नावावर करा म्हणालाय ते.\"

"आई , मी हातपाय धुऊन आलोय तरी तू अजून विचारच करतेस का ? उठ की. वाढ जेवायला मला." संतोष म्हणाला. 


आईनं संतोष ला जेवायला वाढलं. संतोष जेवण करून शेतात झोपायला गेला. तेव्हा आईने जोशना ला सगळं समजून सांगितलं की, "संतोष ला शेत नावावर करायचं काही सांगू नको आताच. लग्नात त्या राकेश ला मी देते शेताची सगळी कागदं.आमच्या माघारी हे सगळं तुझंच आहे." 

जोशना ला आईने सांगितलेलं सगळं पटलं होतं पण \"आईच्या माघारी यांचं सगळं माझं कसं असेल? दीपा गेली ते ठीक आहे, पण जया बरोबर दादाचं लग्न करायचं तर म्हणतेय की मग दादाला मुलं होतील त्याचं असंल की हे सगळं.\" हा मनात विचार करून जोशना झोपी गेली.

दुसऱ्या दिवशी तिनं राकेश चा फोन आल्यावर आई काय काय म्हणाली ते सर्व राकेश ला सांगितलं.

पण राकेश ला मात्र " हुंडयाबरोबरच जमीन त्याच्या नावावर झालेली कागदपत्रे हवी आहेत." असं त्यांना जोशना ला सांगितलं. जोशनाने ते सर्व आईला येऊन सांगितलं. आई विचार करत होती.


काय असेल आईचा निर्णय ? पाहूया व पुढील भागात क्रमशः


सौ प्राजक्ता पाटील. 

कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा आणि हो मला फॉलो करायला विसरू नका. 

कथा प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखीकेकडे राखीव.

#साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.






🎭 Series Post

View all